Friday, July 21, 2017

सृजनाला सलाम! - दहा क्लासिक या अनिता पाध्ये लिखित पुस्तकाचे परीक्षण - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी १८ जुलै २०१७ची मधुरिमा पुरवणी



दै. दिव्य मराठीच्या दि. १८ जुलै २०१७च्या अंकातील मधुरिमा या पुरवणीमध्ये मी केलेले हे पुस्तक परीक्षण. त्याची वेबपेज लिंक, टेक्स्टलिंक, जेपीजी फाइल व मुळ मजकूर पुढे दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-write…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/m…/246/18072017/0/8/
---
स्लग : पुस्तकांच्या गावा
-------------------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-------------------
सृजनाला सलाम!
------------------
असे काही चित्रपट असतात, जे आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून बसतात. गतकाळातल्या आठवणींचा, नात्यांतल्या गोडव्याचा एक भाग होऊन जातात. त्या चित्रपटांची कथा, पटकथा, संगीत, संवाद, कलाकारांचा अभिनय; इतकेच नव्हे, तर त्यांची वेषभूषा, रंगभूषा यापैकी प्रेक्षकांना आपापल्या रुचीप्रमाणे काहीही आवडू शकते. किंवा अख्खा चित्रपटही ते डोक्यावर घेऊ शकतात. व्यावसायिक चौकटीतल्या उत्तम चित्रपटाची प्रत्येकाची संकल्पना निराळी असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनही काही चित्रपट त्यापलीकडेही म्हणजे, ‘क्लासिक्स’ दर्जात मोडतात. ते कधी टीव्हीवर झळकले, तर प्रेक्षक ते आवर्जून पुन्हा पाहतात. त्या चित्रपटांविषयी बोलतात. ही नेमकी नस ओळखून चित्रपटांच्या सुजाण अभ्यासक अनिता पाध्ये यांनी क्लासिक्स सदरात मोडणारे दहा हिंदी चित्रपट निवडले, व हे चित्रपट नेमके बनले कसे, यामागची निर्मिती कथा एकेका प्रकरणात वाचकांना उलगडून दाखविली. त्यातूनच तयार झाले आहे, ‘दहा क्लासिक्स’ हे पुस्तक. 
दो बिघा जमीन, प्यासा, दो आँखे बारह हाथ, मदर इंडिया, मुगले आजम, गाइड, तिसरी कसम, आनंद, पाकिजा, उमराव जान या दहा चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया वाचताना, त्या काळात आपण नकळत भ्रमंती करायला लागतो. याचे कारण, अनिता पाध्ये यांची चित्रवाही लेखनशैली. पूर्वीच्या काळी घडलेला एखादा प्रसंग मांडताना त्या अत्यंत समर्पक व मोजक्या शब्दांत त्याबद्दल लिहून जातात. या पुस्तकाच्या मनोगतात अनिता पाध्ये यांनी म्हटले आहे की, ‘निरनिराळे दहा आशय-विषय व निरनिराळे दहा सर्जनशील, प्रतिभावंत दिग्दर्शक कलाकार असलेल्या दहा निवडक क्लासिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास लिहिण्याचा मी निर्णय घेतला. बिमल रॉय, गुरुदत्त, विजय आनंद, व्ही. शांताराम, हृषिकेश मुखर्जी, मेहबुब खान, कमाल अमरोही, के. असिफ, मुजफ्फर अली या दिग्गज दिग्दर्शकांच्या प्रत्येकी एका चित्रपटाची निवड केली.'
‘दो बिघा जमीन’मध्ये फरफट झालेल्या शेतकऱ्याची व्यथा आहे, तर ‘दो आँखे बारह हाथ’मध्ये मानवतेचा संदेश आहे. ‘मदर इंडिया’मध्ये स्वाभिमानी, आदर्श स्त्री आणि प्रेमळ परंतु प्रसंगी कठोर होणाऱ्या आईची कहाणी आहे. ‘आनंद’मध्ये जगण्याचे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. ‘मुगले आजम’मध्ये कर्तव्यनिष्ठ मुघल बादशाह आणि नर्तिकेवर प्रेम करणारा राजपुत्र यांच्यातील तात्त्विक संघर्ष आहे. ‘पाकिजा’मध्ये गणिका असणाऱ्या गायिकेची अनोखी प्रेमकथा पाहायला मिळते. ‘गाइड’मध्ये नकळतपणे अध्यात्माकडे ओढल्या जाणाऱ्या तरुणाची कथा आहे, तर ‘तिसरी कसम’मध्ये गाडीवानाची असफल प्रेमकथा आहे. ‘प्यासा’मध्ये स्वार्थी जगापासून दूर जाऊ पाहणाऱ्या कविमनाच्या तरुणाची मनोव्यथा आहे.
असे निरनिराळे पैलू असलेले चित्रपट घेऊन त्यांचे अंतरंग उलगडून दाखविताना अनिता पाध्ये यांची लेखणी चिकित्सकही होते. त्याचा फायदा असा की, वाचकाला त्यामुळे बरीच विविधांगी माहिती मिळत जाते. ‘आनंद मरा नही, आनंद मरते नही' असे सर्वांना सांगून गेलेला ‘आनंद' चित्रपटाचा नायक साकारला राजेश खन्ना यांनी. पण त्या भूमिकेसाठी आधी हृषिकेश मुखर्जी यांनी शशी कपूरची निवड केली होती, हे आपल्याला माहीतही नसते. आनंद चित्रपटातील भूमिका हातची जाऊ नये, म्हणून इतर वेळेला घमेंडीने वागणाऱ्या राजेश खन्ना याने हृषिकेश मुखर्जी यांच्यासमोर नमते घेतले होते. या चित्रपटातील आनंदची भूमिका ही आपल्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरणार आहे, याची राजेश खन्नाला कल्पना आली होती. मात्र, राजेशच्या सेटवर उशिरा येण्याला कंटाळून हृषिकेश मुखर्जी यांनी ‘आनंद’ चित्रपटाचे चित्रीकरण कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राजेश खन्ना याने हृषिकेश मुखर्जी यांचे मन रमेश देव यांच्या मदतीने वळविल्याने हा बाका प्रसंग टळला होता. असे अवघड प्रसंग प्रत्येक चित्रपट निर्मितीमध्ये येतात. या अडथळ्यांवर मात करून जो निर्माता, दिग्दर्शक, कलाकार तो चित्रपट पूर्ण करतात, उत्तमरीतीने तयार करतात, त्यांच्या मेहनतीला दाद ही द्यायलाच हवी. नेमका तोच प्रयत्न ‘दहा क्लासिक्स’ या पुस्तकात करण्यात आलेला आहे.
विजय आनंद यांनी दिग्दर्शित केलेला ‘गाइड’ हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटांना पडलेले वास्तववादी पण गोड स्वप्न होते. ‘गाइड’ चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, दिग्दर्शक विजय आनंद यांनी प्रेक्षकांना अध्यात्माची ओळख करून देण्याचा, अध्यात्म सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी साधू झालेल्या राजू गाइडद्वारे प्रेक्षकांना त्यांनी प्रवचन दिले नाही, किंवा अध्यात्माचे डोसही पाजले नाहीत. शेवटच्या वीस मिनिटांमध्ये भारतीय जीवन, तत्त्वज्ञान, मानव आणि परमात्मा यांच्यातले नाते आदी गोष्टींद्वारे अध्यात्मासारखा अत्यंत गहन विषय त्यांनी सोप्या शब्दांमध्ये सांगितला आहे. उलटपक्षी राजू गाइडला उलगडत गेलेले विश्वाचे रहस्य, गावकऱ्यांविषयी त्याच्या मनात निर्माण झालेली करुणा, त्यातून येणारी अनुभवसिद्धता हे सारे विजय आनंद यांनी दिग्दर्शक या नात्याने अभिनेता देव आनंदकडून सुंदरपणे साकारून घेतले आहेत. चित्रपटांची एक मर्यादा असते, पण ‘गाइड’मध्ये जी सखोलता आहे, ती अन्य भारतीय चित्रपटांमध्ये सहसा आढळत नाही. या व अशा अनेक निरीक्षणांसह अनिता पाध्ये यांनी त्यांना क्लासिक वाटणाऱ्या दहा चित्रपटांची निर्मितीकथा सांगताना वाचकांना त्या चित्रपटाचे मर्मही सांगितले आहे.
‘मदर इंडिया’ हा अजून एक अजरामर चित्रपट. त्यातील नर्गिसची भूमिका कोण विसरेल? आतापर्यंत चित्रपटांमध्ये आईची अनेक रूपे वेगवेगळ्या दिग्दर्शक-लेखक जोडीने साकारली. परंतु "मदर इंडिया'मधली आईची अत्यंत प्रभावी व्यक्तिरेखा नंतरच्या कुठल्याच चित्रपटात दिसली नाही आणि आईची व्यक्तिरेखा चित्रपटात असणे गरजेचे अाहे, असे मानणाऱ्या एकाही निर्माता-दिग्दर्शकाच्या मनात हिरोऐवजी आईची मध्यवर्ती भूमिका असणारा चित्रपट बनविण्याचा विचार काही काळ तरी आला नाही, ही खरंच आश्चर्यकारक गोष्ट आहे, असे म्हणावे लागेल. म्हणूनच मदर इंडिया व त्याचे दिग्दर्शक मेहबूब खान यांचे चित्रपटक्षेत्रातले स्थान आजही अबाधित आहे. यापुढेही ते कायम राहील, यात शंका नाही.
या पुस्तकातील इतर सात क्लासिक चित्रपटांबद्दल नेमके काय लिहिले आहे, याचा आढावा इथे विस्तारभयास्तव घेणे शक्य नाही. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रख्यात पटकथा लेखक सलीम खान यांनी म्हटले आहे की, चित्रपटक्षेत्राची मनोरंजक तसेच वास्तववादी माहिती जाणून घेण्यासाठी "दहा क्लासिक्स' हे पुस्तक वाचकांना नक्कीच उपयोगी ठरणार आहे. जेव्हा एखादा लेखक आतली गोष्ट सांगत असतो, तेव्हा त्याने त्याबाबत नीट अभ्यास केलेला असतो. त्याची या गोष्टींकडे पाहण्याची एक खास नजर असते. सदर पुस्तकात हे सारे गुण अाहेत.
एकंदरीतच, ‘दहा क्लासिक्स’ या पुस्तकाचे प्रत्येक पान वाचून संपवताना सलीम खान यांनी पुस्तकाच्या प्रारंभी व्यक्त केलेली भावना वाचकांच्याही मनात सहजपणे उत्पन्न होईल, असा परिणाम लेखिकेने निश्चितच यशस्वीपणे साधला आहे. 
पुस्तकाचे नाव : दहा क्लासिक्स
लेखिका : अनिता पाध्ये
प्रकाशक : देवप्रिया पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या : ३२१
किंमत : ‌~ ४८०/-

No comments:

Post a Comment