दै. दिव्य मराठीच्या दि. 15 जुलै 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीचा मजकूर, जेपीजी फाइल व वेबलिंक सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/15072017/0/1/
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/15072017/0/9/
----
बालगंधर्वांच्या प्रदीर्घ वास्तव्याचा साक्षीदार असलेला माहिम येथील बंगलाही आता जाणार काळाच्या पडद्याआड!
- आज, १५ जुलै रोजी बालगंधर्वांच्या निधनाला झाली ५० वर्षे पूर्ण
- मुंबईतील बालगंधर्वांच्या एकेक स्मृतिखुणा झाल्या पुसट
- समीर परांजपे
मुंबई, दि. 15 जुलै - ज्यांनी आपल्या अवीट मधुर गायकीने अवघ्या महाराष्ट्राला रिझविले ते नटश्रेष्ठ नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या निधनाला १५ जुलै रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्तुळात फारशी दखल घेतली गेली नाही ही लज्जास्पद गोष्ट आहे. बालगंधर्व आपल्या अखेरच्या काळात मुंबईतील माहिम भागात आशिया मंझिल (आताचे अग्रवाल भवन) या वास्तूत राहात होते ती वास्तूही तीन वर्षांपूर्वी एका बिल्डरने विकत घेतली अाहे. तिथे काही काळाने नवी गगनचुंबी इमारत उभी राहिल व बालगंधर्वांची मुंबईमध्ये वास्तूच्या रुपात उभी असलेली एकमात्र आठवणही काळाच्या पडद्याआड नाहीशी होईल.
माहिम पश्चिमेला वीर सावरकर मार्गावर कापड बाजाराच्या नजिक अग्रवाल भवन हा एकमजली बंगला उभा आहे. ही वास्तू आता जीर्ण झाली आहे. बालगंधर्व राहायचे त्यावेळी या बंगल्याचे नाव आशिया मंझिल होते. त्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर बालगंधर्व त्यांची दुसरी पत्नी गोहरबाईसह राहायचे. हा बंगला सरकारी मालमत्ता होती. बालगंधर्वांच्या मृत्यूनंतर हे घर शासनाने पूर्णपणे ताब्यात घेतले आणि नारायण कटारिया या सिंधी गृहस्थाला विकले. कटारिया यांच्याकडून रामेश्वर दयाल अग्रवाल यांनी १९८१ साली खरेदी केला. त्यानंतर आशिया मंझिलचे नाव बदलून ते अग्रवाल भवन ठेवण्यात आले. २०१३ साली अग्रवाल भवन हा बंगला अग्रवाल यांच्याकडून एम. जे. बिल्डर्स यांनी विकत घेतला. आता नजिकच्या काळात हा बंगला पाडून साहजिकच तिथे नवी इमारत बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. या बंगल्यात पूर्वी बालगंधर्व ज्या पहिल्या मजल्यावर राहात होते तो मजला आता रिकामाच असतो. तिथे कोणीही राहात नाही. तळमजल्याला जेटली नावाचे कुटुंब अजूनही राहाते.
या वास्तूसंदर्भात `तो एक राजहंस' या पुस्तकात लेखक बाळ सामंत यांनी काही माहिती दिली आहे. त्यानूसार बालगंधर्व माहिमच्या काद्री महलमधून १९४७च्या सुमारास आशिया मंझिलमध्ये राहायला गेले. त्याअाधी ते माहिमच्या चर्चच्या मागे अरब मंझिलमध्ये राहात होते. आशिया मंझिल ही इमारत माहिम बाजारासमोर अगदी रस्त्यावरच आहे. या काळात हे घर घेण्याचा व्यवहार बालगंधर्व यांची दुसरी पत्नी गोहरबाईच्या अंगाशी आला. आशिया मंझिल विकत घेण्यासाठी एका मुस्लिम व्यक्तीशी गोहरबाईने करार करुन विसारादाखल पंचवीस हजार रुपये दिले. परंतु खरेदीचा हा करार पूर्ण होण्यापूर्वीच ती मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानात निघून गेल्याने भारत सरकारने आशिया मंझिल निर्वासिताची मालमत्ता म्हणून जप्त करुन ताब्यात घेतले. ते घर जप्तीतून मुक्त व्हावे म्हणून बालगंधर्वांनी जंगजंग पछाडले. त्यासाठी त्यांनी दिल्लीला डॉ. केसकर, काकासाहेब गाडगीळ यांच्याशी पत्रव्यवहार केला. सरतेशेवटी काकासाहेब गाडगीळांच्या प्रयत्नाने महिना ऐंशी रुपये भाड्याने ते घर बालगंधर्वांना राहायला मिळाले. घर खरेदीचा मुस्लिम व्यक्तीशी केलेला व्यवहार गोहरबाईच्या नावाने झालेला होता. तो पूरा न झाल्याने बालगंधर्वांचे पंचवीस-तीस हजार रुपये गेले ते गेलेच. या बंगल्यात वास्तव्य करीत असताना त्यांची तब्येत फारच बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतून पुण्यात हलविण्यात आले. पुण्यातच त्यांना १५ जुलै १९६७ला अंत झाला.
महापालिकेने ऐतिहासिक माहितीचा नीलफलकही लावला नाही.
१९५२ साली बालगंधर्वांच्या एका पायात दोष उत्पन्न झाला. त्यामुळे त्यांना एक पाय ओढीत चालावे लागे. १९५५ साली त्यांचे दोन्ही पाय अधू झाल्याने त्यांचे जगणे संपूर्णपणे परावलंबी झाले. आशिया मंझिलमध्ये वरच्या मजल्यावर जी एक मोठी खोली होती, त्यातील लाकडी पलंगावर बालगंधर्व बसून असत. त्यांच्या शेजारच्या खोलीत गोहरबाई व तिची नातेवाईक आशम्मा वगैरे मंडळी राहात असत. बालगंधर्व एकटेच असले म्हणजे तुकारामाच्या गाथेतील अभंग वाचत बसलेले असत. त्यांची आर्थिक अवस्था अतिशय हालाखीची होती. १९ नोव्हेंबर १९६३ रोजी रात्री साडेबारा वाजता गोहरबाईचे निधन आशिया मंझिलमध्येच झाले. त्यानंतर बालगंधर्व अगदीच एकाकी व दयनीय अवस्थेत या वास्तूत जगत होते. बालगंधर्व पूर्वी आशिया मंझिल हे नाव असलेल्या व त्यानंतर अग्रवाल भवन हे नाव धारण केलेल्या बंगल्यात राहात होते असा नीलफलक मुंबई महानगरपालिकेला त्या वास्तूजवळ लावता आला असता पण ती सुबुद्धीही पालिकेला झाली नाही.
No comments:
Post a Comment