Friday, July 21, 2017

ती आणि इतर या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंट, २१ जुलै २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी ती आणि इतर या नव्या चित्रपटाचे मी केलेले हे परीक्षण. त्या लेखाची वेबलिंक मी पुढे दिली आहे. 
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-REV-REV-movie-review-…
---
Movie Review : 'ती आणि इतर' अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी कथा
- समीर परांजपे | Jul 21, 2017, 14:44 PM IST
---
चित्रपट - ती आणि इतर
रेटिंग - 3 स्टार
कलावंत - सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भुषण प्रधान, प्रिया मराठे, सुमन पटेल, गणेश यादव
कथा/ संवाद - शांता गोखले
दिग्दर्शन - गोविंद निहलानी
संगीत - वसुदा शर्मा
निर्माता - प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहलानी, धनंजय सिंह
श्रेणी- फॅमिली ड्रामा
--
अर्धसत्य, आक्रोश, द्रोहकाल यासारखे वास्तववादी विषय आपल्या चित्रपटांद्वारे मांडणारे प्रगल्भ दिग्दर्शक गोविंद निहलानी हे 'ती आणि इतर' हा आपला पहिलावहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करणार असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली तमस ही दुरचित्रवाहिनीवरील मालिका देखील समाजाचे वास्तव दाखविणारी होती. लेखिका मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक 'लाईटस् आऊट'वर 'ती आणि इतर' हा मराठी चित्रपट आधारलेला आहे.
गोविंद निहलानी यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटासाठी कॅमेरामन म्हणून काम केले होते. त्यानंतर तब्बल ४५ वर्षांनी निहलानी 'ती आणि इतर'च्या निमित्ताने पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीशी संलग्न झाले आहेत. हा चित्रपट केल्यानंतरचा तुमचा पुढचा प्रकल्प काय असेल असे प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर गोविंद निहलानी म्हणाले की, यापुढे मला अजून एखादा मराठी चित्रपट करायला आवडेल. हे सगळे लक्षात घेऊनच प्रेक्षक `ती आणि इतर' चित्रपट बघायला जाणार आहे.
कथा 
अनिरुद्ध गोडबोले आणि त्याची बायको नयना गोडबोले हे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. नयना गायिका देखील असते. त्आयांना हे. अनिरुद्ध व नयनाला दोन अपत्ये आहेत. मध्यमवयीन सुखी माणसांचा जसा संसार असतो तसा या गोडबोले दांपत्याचाही आहे. नयानाचा संसार सुखाने चाललेला असला तरी तिला एक खंत असते ती म्हणजे तिचा नवरा अनिरुद्ध तिला फारसा वेळ देत नाही. तो सतत कामात मग्न असतो. गृहिणी म्हणून घरात बसून राहाण्यापेक्षा ती आपला गायनाचा छंद जोपासते. त्यातूनच नयनाच्या गाण्यांचा नुकताच एक सोलो अल्बम प्रकाशित होतो. या अल्बमचे रसिक भरभरुन स्वागत करतात. हे यश साजरे करण्यासाठीच अनिरुद्ध व नयना आपल्या घरी एका छोटेखानी पार्टीचे आयोजन करतात. या पार्टीत गोडबोले दांपत्याच्या जवळची अगदी मोजकी मंडळी सहभागी झालेली असतात. त्यामध्ये त्यांचा फॅमिली फ्रेंड भास्कर, त्याची पत्नी माधवी, नयनाची मैत्रिण व व्यवसायाने पत्रकार असलेली जानकी, मित्र मोहन हे सहभागी झालेले असतात. ते गोडबोले यांच्या घरातील डिनर टेबलपाशी बसून छान गप्पा मारत असतात. ही चर्चा सुरु असताना अचानक एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज सर्वांना ऐकायला येतो. तो आवाज ऐकून गोडबोलेंच्या घरातले सारेच जण विचलित होतात. हा नेमका कोणाचा आवाज होता यावर चर्चा सुरु होते. ही महिला नेमकी कुठून ओरडत होती, ती कोण आहे हे शोधून काढायला पाहिजे असे मत पत्रकार असलेली जानकी व्यक्त करते. तर त्या महिलेच्या प्रकरणात आपण पडायला नको असे शु्द्ध पांढरपेशा वृत्तीचे मत भास्कर व्यक्त करतो. तर भास्करची पत्नी प्रिया म्हणते की, अडचणीत असलेल्या त्या महिलेला आपण मदत केली पाहिजे. शेवटी गोडबोलेंच्या घरातून पोलिसांना दूरध्वनी केला जातो व त्यांना बोलाविले जाते. अनिरुद्ध व नयना ज्या इमारतीत राहात असतात तिच्यासमोर अर्धवट बांधकाम होऊन तशीच राहिलेली एक इमारत असते. आजूबाजूच्या परिसरातील घरकाम करणाऱ्या मुली, महिला किंवा अन्य भागातील महिलांना या इमारतीत आणून त्यांच्यावर स्थानिक गुंड लैंगिक अत्याचार करीत असतात. त्यांच्या छळाला महिला खूप कंटाळलेल्या असतात पण गुंडांच्या दहशतीमुळे कोणी या गैरप्रकारांविरोधात ब्र काढायला धजावत नसतो. अनिरुद्ध व नयनाच्या इमारतीतल्या लोकांनाही गुंडांच्या उच्छादाबद्दल सर्वच माहिती असते पण त्या विरोधात कोणीच काही हालचाल करीत नाही. कारण प्रत्येकाला स्वत:च्या जीवाची काळजी असते. गोडबोलेंच्या घरातून दूरध्वनी आल्यानंतर पोलिस इन्स्पेक्टर रमाकांत गावंडे चौकशीसाठी येतात. तेही गोडबोले दांपत्य व त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांनाच समजवायला लागतात की असे प्रकार होत असतात पण त्याविरोधात चौकशी केली की, एकही माणूस खरी माहिती सांगायला पुढे येत नाही. अप्रत्यक्षपणे ते त्या गुंडांचीच बाजू घेत असतात. गोडबोले राहात असलेल्या इमारतीमधील लोकांकडेही पोलिस समोरच्या इमारतीतील गैरप्रकारांबद्दल चौकशी करतात पण ते सर्वच जण मुग गिळून बसलेले असतात. पार्टी सुरु असताना ज्या महिलेचा ओरडण्याचा आवाज येतो तिला मदत करण्यासाठी गोडबोले व त्यांच्या घरी जमलेली मंडळी खरच पुढाकार घेतात का? या सर्व प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय असते? ज्या गुंडांच्या गैरप्रकाराविरोधात आवाज उठविला जातो ते गुंड गोडबोले दांपत्याशी कसे वागतात? या गुंडांपासून वाचण्यासाठी असे अनेक प्रश्न या कथानकातून निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा. 
मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबे आपण आखून घेतलेल्या चौकटीत जगत असतात. त्यांना हादरवणारी घटना जेव्हा घडते तेव्हा ते त्या अन्यायाविरोधात उभे ठाकतात की गप्प राहातात याचे मनोविश्लेषक चित्रण ती आणि इतर या चित्रपटातील प्रत्येक दृश्यातून दिसते. महिलांवरील अत्याचार गपगुमान बघत राहाणारा समाज हा निर्जिव असतो. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजाने ठोस कृती केली पाहिजे हा संदेश या चित्रपटातून प्रभावीपणे देण्यात आला आहे.
अभिनय 
'ती आणि इतर' चित्रपटामध्ये अनिरुद्ध गोडबोले याची भूमिका सुबोध भावे याने अत्यंत समंजसपणे साकारली आहे. गृहिणी असलेली व यशस्वी गायिका बनलेली नयना गोडबोले हिच्या मनाची घालमेल सोनाली कुलकर्णी हिने उत्तम साकारली आहे. आपल्या इमारतीच्या समोरच्या इमारतीत एक महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडत असूनही आपण तिला वाचविण्यासाठी काहीच करु शकत नाही याची अगतिक जाणीव तिला प्रकर्षाने झाली आहे. हीच जाणीवपत्रकार जानकीच्या भूमिकेतील अमृता सुभाष, भास्करची पत्नी म्हणजे माधवीच्या भूमिकेतील प्रिया मराठे यांनी प्रभावीपणे व्यक्त केली आहे. भूषण प्रधान, अविष्कार दारव्हेकर, सुमन पटेल हे आपापल्या भूमिकांना न्याय देतात
दिग्दर्शन 
गोविंद निहलानी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्या पूर्वपरिचित शैलीला अनुसरून अत्यंत प्रगल्भतेने केले आहे. त्यांनी एकाही पात्राला जास्तीचा अभिनय करु दिलेला नाही. रोजच्या आयुष्यात आपण ज्या स्वाभाविकपणे बोलतो, वागतो नेमका तोच टोन या चित्रपटातील कलाकारांनी राखायला हवा यासाठी गोविंद निहलानी विलक्षण आग्रही असल्याचे ते करून घेण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसते. समाजातील महिलांची वास्तव स्थिती या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणण्याचा गोविंद निहलानी यांचा प्रयत्नही यशस्वी होताना दिसतो. 'सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन...' ही टॅगलाइन चित्रपट सार्थच ठरवतो. 
संगीत 
'ती आणि इतर' या चित्रपटाचे संगीत वसुदा शर्मा यांनी दिले आहे. ते चित्रपटाच्या माहोलला साजेसे आहे. या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेते, दिग्दर्शक सचिन यांनी शफक या टोपणनावाने लिहिलेली 'बादल जो घीर के आये' ही उर्दू गझल अदिती पौल यांनी गायली आहे. ती सुरेखच जमली आहे. मंदार चोळकर लिखित 'आतुर मन' हे गाणे गायिका अंकिता जोशीने गायले आहे. ही गाणी या चित्रपटाची खुमारी वाढवितात.

No comments:

Post a Comment