Sunday, July 23, 2017

मराठी रंगभूमीच्या क्षितिजावर आविष्कार प्ले स्टोअर, रंगवाचा या दोन नव्या त्रैमासिकांचा उदय - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी दि. 18 जुलै 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 18 जुलै 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेजलिंक, जेपीजी फाइल व मुळ मजकूर सोबत देत आहे
-----
मराठी रंगभूमीच्या क्षितिजावर आविष्कार प्ले स्टोअर, रंगवाचा या दोन नव्या त्रैमासिकांचा उदय
नियतकालिकांना घरघर लागलेली असताना मराठी नाट्यसंस्थांनी केले अनोखे धाडस
- समीर परांजपे
मुंबई, दि. 18 जुलै - मराठी रंगभूमीला वाईट दिवस आले आहेत, मराठी नियतकालिकांना घरघर लागली आहे अशी चर्चा एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूस रंगभूमीविषयक घडामोडीला वाहिलेल्या दोन नव्या मराठी नियतकालिकांचा अलीकडेच उदय झाला आहे. मुंबईतील अाविष्कार या नाट्यसंस्थेच्या वतीने `आविष्कार प्ले स्टोअर' व कोकणातल्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृितक प्रतिष्ठानच्या वतीने `रंगवाचा' ही नवी त्रैमासिके प्रसिद्ध करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नाट्यविषयक घडामोडींच्या विश्लेषणासाठी रंगकर्मी व प्रेक्षकांना दोन नवी हक्काची लेखनव्यासपीठे उपलब्ध झाली आहेत.
मराठी रंगभूमीच्या अलीकडच्या काळातील इतिहासात अत्यंत दुर्मिळ म्हणावी अशीच ही घटना आहे. `अाविष्कार' या संस्थेने जून महिन्यात आपल्या `आविष्कार प्ले स्टोअर' या नव्या त्रैमािसकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्याची किंमत अवघी पाच रुपये ठेवण्यात आली आहे. हे त्रैमासिक सुरु करण्यामागची मनोभूमिका सांगताना `अाविष्कार' नाट्यसंस्थेचे प्रमुख अरुण काकडे यांनी सांगितले की, अाविष्कार सांस्कृतिक केंद्राचे आविष्कार प्ले स्टोअर त्रैमासिक हे नवे रुप आहे. प्रख्यात अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी अाविष्कार प्लेस्टोअरचा पहिला अंक प्रसिद्ध करण्यात आला. नाट्यविषयक माहिती, घडामोडी, नाटकाच्या विविध अंगांची चर्चा देणाऱ्या मासिक/त्रैमासिकांची एक मोठी परंपरा आपल्याकडे होती परंतु दुर्दैवाने सध्या लोप पावत चालली आहे. त्या परंपरा पुन्हा उज्ज्वल स्वरुपात पुढे यावी यासाठी `आविष्कार'ने आविष्कार प्ले स्टोअर हे नवे त्रैमासिक सुरु केले आहे. या अंकामध्ये सुलभाताई देशपांडे यांच्या आठवणी सांगणारा गोविंद निहलानी यांनी लिहिलेला विशेष लेख, गोष्टी सांगितल्या पािहजेत हा जयंत पवार लिखित लेख आहे. या त्रैमासिकाचे संपादक अरुण काकडे असून संपादक मंडळात दीपक राजाध्यक्ष, युगंधर देशपांडे, पराग ओझा, कृणाल आळवे यांचा समावेश आहे.
कोकणातल्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृितक प्रतिष्ठानच्या वतीने `रंगवाचा' या त्रैमासिकाचा पहिला अंक फेब्रुवारीमध्ये व त्यानंतर दुसरा अंक मेमध्ये प्रसिद्ध झाला. आता तिसऱ्या अंकाच्या मजकुराची जुळवाजुळव सुरु आहे. `रंगवाचा' हे नवे रंगभूमीविषयक त्रैमासिक का सुरु करावेसे वाटले याविषयी संपादक वामन पंडित यांनी म्हटले आहे की, गेली चार दशके मराठी रंगभूमीसंबंधात वैयक्तिक व संस्थात्मक काम करताना दस्ताऐवजीकरणाचा अभाव सतत अस्वस्थ करीत राहिला. नुसती अस्वस्थता बाळगून राहण्यापेक्षा निदान आपल्या परीने काही काम सुरु करावे ही रंगवाचा नियतकालिक प्रकाशित करण्यामागची मुळ प्रेरणा आहे. आजच्या जमान्यात मुद्रित नियतकालिकाची आवश्यकताच काय असेही या क्षेत्रातील थोरा-मोठ्यांचे म्हणणे होते. तरीही वसंतराव आचरेकर सांस्कृितक प्रतिष्ठानने हे नियतकालिक सुरु करण्याचा माझ्या हट्टाला मान्यता दिली. मासिक नाही निदान त्रैमासिक सुरु करुन ते निरंतर चालविता येईल का याची चाचपणी करुन निर्णय पक्का केला. दरम्यान रंगवाचा हे नाव रंगकर्मी अतुल पेठे यांनी सुचविले. अनेक घडामोडीनंतर रंगवाणी त्रैमासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला व आमचे प्रयत्न सार्थकी लागले.
रंगभूमीविषयक नियतकालिके भराभर बंद पडली...
मराठी रंगभूमीच्या इतिहासात रंगभूमी या विषयाला वाहिलेली काही नियतकालिके सुरु झाली व कालांतराने अस्तंगत झाली. यात सर्वात पहिले जे लक्षणीय नियतकािलक होते त्याचे नावच `रंगभूमी' होते. १९०७ ते १९१६ या कालावधीत रंगभूमी नियतकालिकाचे प्रकाशन नित्यनेमाने होत असे. त्यानंतरचे महत्वाचे नियतकािलक म्हणजे मुंबईतील गिरगाव येथील साहित्य संघाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणारे `साहित्य' नियतकालिक. सुधीर दामले हे संपादक असलेले नाट्यदर्पण हे नियतकालिकही मराठी रंगभूमीवरील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींबद्दल रसिकतेने लिहित असे. एनसीपीएमध्ये फोर्ड फाऊन्डेशनने दिलेल्या अनुदानातून संगीततज्ज्ञ अशोक रानडे यांनी एक मराठी नियतकालिक सुरु केले होते. त्यात मराठी नाटक, संगीत, नृत्य आदी सर्व कलांबद्दल उत्तम लेख असायचे. साहित्य नियतकालिक वगळता बाकीची सर्व नियतकालिके काही ना काही कारणांनी कालांतराने बंद पडली. मराठी रंगभूमीवरील घडामोडींची प्रकर्षाने दखल घेणाऱ्या नियतकालिकांची उणीव जाणवत असताना ती पोकळी भरुन काढण्यासाठी `आविष्कार प्ले स्टोअर' व `रंगवाचा' या दोन नव्या त्रैमासिकांचा उदय झाला.

No comments:

Post a Comment