Friday, July 28, 2017

भेटली तू पुन्हा या मराठी चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी वेबसाइट २८ जुलै २०१७.

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटच्या मराठी कट्टा सेगमेंटसाठी भेटली तू पुन्हा या नव्या मराठी चित्रपटाचे मी केलेले परीक्षण 28 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध झाले. त्या लेखाचा मजकूर व वेबलिंक पुढे देत आहे.
---
भेटली तू पुन्हाचा प्रवास आहे कंटाळवाणा...
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - भेटली तू पुन्हा
--
रेटिंग - २ स्टार
--
कलावंत - वैभव तत्ववादी, पूजा सावंत, गिरीश ओक, किशोरी अंबिये, अभिजित चव्हाण, मीनल बाळ, गणेश हजारे, विश्वास सोहोनी, भारत सावळे
निर्माता - गणेश रामदास हजारे
कथा, पटकथा , संवाद – संजय जमखंडी
दिग्दर्शक - चंद्रकांत कणसे
संगीत – चिनार महेश
श्रेणी - कौटुंबिक चित्रपट
---
बिफोर सनराईज हा १९९५ साली झळकलेला अमेरिकी चित्रपट. रोमँटिक ड्रामा अशी जातकुळी असलेल्या हा चित्रपट रिचर्ड लिंकलॅटर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटावर आधारलेला मुंबई पुणे मुंबई हा सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट २०१० साली झळकला होता. मुंबई पुणे मुंबईमध्ये रेल्वेचा प्रवास नसला तरी मुलगा व मुलगी यांच्या आधी अनोळखी व मग जुळलेल्या नात्याची वीण व्यवस्थित दाखविली होती. भेटली तू पुन्हा चित्रपटातही मुलगा व मुलगीही आहे...त्यांनी एकत्र केलेला प्रवास आहे. त्यातून दोघांमध्ये प्रेमाचे नाते फुलते का हाही कथागाभा आहे...पण भेटली तू पुन्हा हा चित्रपट कोणत्याच अंगाने फुललेला नाही. भेटली तू पुन्हा या चित्रपटाला तशाच जातकुळीच्या मुंबई पुणे मुंबई या बहारदार चित्रपटाची सर येणे तर शक्यच नाही.
कथा - आलोक भावे हा मुलगा. सेटल झालेला. करिअरही चांगल्यापैकी मार्गी लागलेले. तो लग्नासाठी मुली पाहाण्याचा सतत कार्यक्रम करत असतो. तब्बल ३५ हून अधिक मुली त्याने पाहून झालेल्या असतात. पण त्यातील एकही त्याला पसंत पडत नाही. मुलगी पसंत न पडण्याची त्याची म्हणून काही कारणे असतात. ती खूप वेगवेगळी असतात. याच मुलींमध्ये अश्विनी नावाची एक मुलगी असते. तिला पाहाण्याचा कार्यक्रम होतो. अश्विनी ही मुलगी अगदी साधीसरळ असते. डो‌ळ्यांवर चष्मा, साडी परिधान केलेली, चेहरा अगदी सोज्ज्वळ अशी ही साध्या राहाणीमानाची मुलगी आलोकला अजिबात पसंत पडत नाही. तो तिला नकार देतो. त्यानंतरही तो मुली पाहाण्याचे कार्यक्रम करत राहातोच. खरतर आलोकने अश्विनीला लक्षात ठेवण्याचे काही कारण नसते. पण असा एक प्रसंग घडतो की अश्विनी त्याच्या समोर अचानक येते. आलोक हा एका कंपनीत कामाला आहे. तो कामानिमित्त गोव्याला निघालेला आहे. त्याला गोव्यात वॉस्कोला जायचे आहे. आपला मित्र चंद्रचूड देशपांडे याला सांगून अालोक पुण्याहून गोव्याला जाणाऱ्या रेल्वेगाडीतील जागेचे रिझर्व्हेशन करतो. या गाडीत त्याच्या डब्यात नेमके त्याला भेटते पुन्हा अश्विनी. ती त्याच गाडीने गोव्याला चाललेली असते. तिला गोव्यात मडगावला जायचे आहे. अशा रितीने आलोक व अश्विनीचा एकत्र प्रवास सुरु होतो. या प्रवासादरम्यान आलोकला हे लक्षात येते की, घरगुती वळणाची, साध्या राहाणीमानाची म्हणजे थोडक्यात काकुबाई असे समजून आपण जिला नकार दिला ती अश्विनी प्रत्यक्षात अत्यंत बिनधास्त, मोकळ्या स्वभावाची मुलगी आहे. अश्विनी या रेल्वे प्रवासात गाडीमध्ये खूप धमाल करते. त्या साऱ्या गमतीत ती आलोकलाही सामावून घेते. त्यामुळे आलोकला हा प्रवास खूप आवडतो. तो कधी संपूच नये असे वाटते. या प्रवासात सतत काही ना काही घडत राहाते. एका स्थानकावर गाडी थांबली असताना डब्यातील अंध विद्यार्थ्यांना स्टेशनबाहेर सोडण्यासाठी अश्विनी मेनगेटपर्यंत जाते. तेवढ्यात गाडी सुटते. तिची गाडी चुकल्याने ती खूप हताश होते. हे सारे पाहात असलेला आलोकही ती गाडी सोडतो. त्यानंतर आलोक व अश्विनी मिळेल ते वाहनाने गोव्याला जायला निघतात. आता प्रवासात एक वळण असे येते की जिथे मडगाव व वॉस्को या ठिकाणी जाण्याकरित दोन वेगवेगळे रस्ते समोर येतात. आता आलोक व अश्विनी या दोघांनाही आपापल्या मार्गाने जावे लागणार आहे. ही कदाचित त्यांची पुन्हा झालेली पण शेवटचीही भेट असेल. याआधी आपणच नाकारलेली अश्विनी ही मुलगी गोव्यापर्यंतच्या प्रवासादरम्यान आलोकला आवडायला लागलेली असते. तो आपल्या भावना तिच्याकडे व्यक्त करणार तेवढ्यात अश्विनी त्याला सांगते की तिचे ऋग्वेद साठे नावाच्या मुलाबरोबर लग्न ठरलेले आहे. ही गोष्ट कळल्यावर आलोकला प्रचंड धक्का बसतो. मात्र तरीही नानाप्रकारे प्रयत्न करुन आलोक आपल्या मनातील अश्विनीप्रती असलेल्या खऱ्या भावना तिच्यापर्यंत पोहचविण्यात यशस्वी होतो. आलोकचे आपल्याविषयीचे बदललेले मत ऐकून अश्विनीला काय वाटते? अश्विनीचे ऋग्वेद साठेबरोबर लग्न होते का? अश्विनी आलोकच्या प्रेमाला नकार देते की त्याचा स्वीकार करते? असे प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांचा उलगडा चित्रपट पाहाताना होईलच.
अभिनय - आलोकच्या भूमिकेत वैभव तत्ववादी आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नृत्य व अभिनयाची उत्तम जाण असलेले जे युवा कलाकार आहेत त्यामध्ये वैभव हा अधिक उजवा आहे. त्याने आलोक याची भूिमका चांगली केली आहे. अनेक मुलींना नाकारणारा व स्वत:च्याच मस्तीत असणारा आलोक जसा त्याने छान रंगविला आहे तसेच आपण याआधी नाकारलेली अश्विनी जेव्हा त्याला मनापासून आवडायला लागते ते परिवर्तनही त्याने व्यवस्थित दाखविले आहे. सग‌ळ्यात कमाल केली आहे ती पूजा सावंतने. ती एक व्हर्सटाइल अभिनेत्री आहे. तिने अश्विनीच्या भूमिकेला असलेले विनोदी पैलू छानरितीने उलगडून दाखविले आहेत. आता या चित्रपटाची गंमत अशी आहे की, त्या त्या कलाकारांच्या वाट्याला आलेले प्रसंग कितीही हास्यास्पद असले तरी या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ते सुसह्य केलेले आहेत. गिरीश ओक ( पात्राचे नाव - श्री. भावे), किशोरी अंबिये (सौ. भावे), अभिजित चव्हाण (चंद्रचूड देशपांडे), मीनल बाळ (रोहिणी डांगे), गणेश हजारे ( प्रभाकर सारंग), विश्वास सोहोनी (गोऱ्हे), भारत सावळे (प्रवासी) या कलाकारांनी वैभव तत्ववादी व पूजा सावंतला बरी साथ दिली आहे.
दिग्दर्शन - भेटली तू पुन्हा या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद हे संजय जमखंडी यांनी लिहिताना ते अशा पद्धतीने लिहिले आहेत की त्यातून फक्त आणि फक्त भीषण दर्जाचाच चित्रपट निर्माण होईल. या कथेला पुण्यापासून गोव्यापर्यंत रेल्वे व अन्य वाहनाने आणताना दिग्दर्शकाची खूपच दमछाक झालेली आहे आणि ती चित्रपटात वारंवार दिसते आहे. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात आलोकने आपल्याला नकार दिला होता हे अश्विनी चित्रपटात इतक्या वेळा सांगते की त्याचा कंटाळा यायला लागतो. त्याचबरोबर आलोक व अश्विनीचे रेल्वेप्रवासादरम्यान जे अवखळ प्रसंग आहेत त्यातील काहींचा दर्जा हा बालिश आहे. त्यात प्रसंगांमध्ये कुठेही दिग्दर्शकाचे कौशल्य जाणवत नाही. रेल्वेगाडी चुकल्यानंतर गोव्याला जाईपर्यंत आलोक, अश्विनी कर्नाटकातही अलगदपणे जाऊन येतात. कानडी भाषिकही चित्रपटात डोकावून जातात. गोव्याला जाताना एका निसर्गरम्यस्थळी आपण जात आहोत असे सांगून अश्विनी व आलोक जिथे जातात ते बोरिवली कान्हेरी गुंफांचे लोकेशन असते. ते लोकेशन ज्याला लक्षात येते ते प्रेक्षक या गोष्टींवर खदाखदा हसतात. सांगायचा मुद्दा असा की कितीही सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली असो, चित्रपटात दृश्ये दाखविताना जशी कपड्यांची कंट्युनिइटी नीट सांभाळावी लागते, तशी लोकेशन्सचीही. याचे भान चंद्रकांत कणसे यांना हा चित्रपट दिग्दर्शित करताना राहिलेले नाही. त्यामुळे हा चित्रपट कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शनाच्या अंगाने अतिशय ढिला झालेला आहे. फक्त कलाकारांच्या अभिनयामुळेच या चित्रपटात काही राम शिल्लक आहे. या अभिनयामागेही दिग्दर्शकाचे कौशल्य किती असेल याचीही शंका येते. बाळबोधपेक्षाही वाइट दिग्दर्शन आहे या चित्रपटाचे. त्यामुळे (भीषण चित्रपटा) भेटू नको पुन्हा कधीही... असे म्हणण्याची पाळी प्रेक्षकांवर आली आहे.
संगीत - या चित्रपटाची गीते ही मंगेश कांगणे यांनी संगीत चिनार महेश यांनी दिले आहे. ही गाणी स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, निखील मोदगी, सिद्धार्थ महादेवन यांनी गायली आहेत. पण अगदी खरे सांगायचे तर एकही गाणे लक्षात राहात नाही.                                                                                                                                                    http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-movie-review-of-marathi-film-bhetali-tu-punha-5656460-PHO.html

No comments:

Post a Comment