Friday, July 21, 2017

ना धड सायको ना धड थ्रीलर - मांजा चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी वेबसाइटचे मराठी कट्टा सेगमेंट, दि. २१ जुलै २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी मांजा या नव्या मराठी चित्रपटाचे मी केलेले हे परीक्षण. त्या लेखाची वेबलिंक मी पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-REV-REV-marathi-film-…
---
Movie Review : ना धड सायको ना धड थ्रीलर
समीर परांजपे | Jul 21, 2017, 14:46 PM IST
---
चित्रपट - मांजा
रेटिंग - 2 स्टार
कलावंत - अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर, रोहित फाळके, अपूर्व अरोरा, शिवानी टांकसाळे, मोहन कपूर, डेन्झिल स्मिथ
कथा, पटकथा,दिग्दर्शन - जतीन वागळे
संगीत - शैल- प्रीतेश
निर्मिती - त्रिलोक मल्होत्रा, के. आर. हरीश (इंडिया स्टोरीज)
श्रेणी - सायको थ्रीलर
---
'पाठलाग' हा १९६४ साली आलेला मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला मराठी रहस्यपट. राजा परांजपे निर्मित व दिग्दर्शित हा चित्रपट इतका गाजला, की त्यावरून दिग्दर्शक राज खोसला यांनी हिंदीमध्ये `मेरा साया' हा चित्रपट निर्माण केला. रहस्यपट म्हटले, की प्रत्येक वेळेला आल्फ्रेड हिचकॉकची साक्ष काढण्याची काही आवश्यकता नाही. हिंदीपेक्षा मराठीत सायकोथ्रीलर व रहस्यपटांची संख्या तुलनेने कमीच आहे. 'पाठलाग'नंतर बऱ्याच वर्षांनी 'रानभूल', 'चेकमेट', 'रिंगा रिंगा' असे चांगले मराठी रहस्यपट येऊन गेले. पण मराठीतील चांगला सायकोथ्रीलर असे नाव घ्यायचे असेल तर ते विजू माने दिग्दर्शित 'ती रात्र' या चित्रपटाचे घ्यावे लागेल. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सायकोथ्रीलरची मराठीत तशी वानवा होती. ही उणीव थोड्या प्रमाणात का होईना 'मांजा' हा सायकोथ्रीलर म्हणवणारा चित्रपट भरुन काढेल असे वाटले होते पण या चित्रपटात थ्रीलही नाही आणि सायकोगिरी पण फार नाही.
कथा
लोणावळ्याचे एक हायस्कूल कम ज्यूनियर कॉलेज. जयदीप नावाच्या आपल्या मुलाची अॅडमिशन घेण्यासाठी त्याची आई समिधा या कॉलेजच्या प्रिन्सिपलना भेटायला आलेली आहे. समिधा व तिचा पती सिद्धार्थ (सिद्धार्थ हे पात्र पडद्यावर येत नाही. सिद्धार्थचे सारे तपशील हे जयदीप, समिधा यांच्या परस्परसंवादातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.) हे दोघे आर्किटेक्ट. त्यांचा प्रेमविवाह झालेला असतो. मात्र ज्यावेळी जयदीप या मुलाचा जन्म होतो त्यानंतर मात्र सिद्धार्थचे वागणे संपूर्णपणे बदलते. त्याची समिधाला मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. पण एक दिवस सिद्धार्थ जयदीपलाच मारायला उठतो तेव्हा नवऱ्याबरोबरचे नाते आता संपवायलाच हवे हा समिधाचा विचार पक्का होतो. ती जयदीपला सोबत घेऊन सिद्धार्थच्या घरातून कायमची बाहेर पडते. त्याच्याशी कायमचे नाते तोडते. समिधा आपला मित्र सौरभ व त्याची पत्नी वीणा यांच्या लोणावळा येथील हॉटेलमध्ये गेस्ट रिलेशन्स मॅनेजर म्हणून काम करु लागते. सौरभ समिधाला समजावतोही, की आर्किटेक्ट असणे हे तुझे खरे करिअर आहे. तू ते काय सोडते आहेस? पण समिधाचा निर्धार कायम असतो. तिला नव्या कार्यक्षेत्रात काम करुन आपल्या साऱ्या जुन्या आठवणी विसरायच्या असतात. तिचा मुलगा जयदीप हा बराचसा अबोल आहे. 
सिद्धार्थ व समिधामध्ये जेव्हा जेव्हा भांडणे व्हायची, ती विकोपाला जायची तेव्हा त्या गोष्टींचा लहानपणापासून जयदीपच्या मनावर परिणाम झालेला असतो. त्यामुळे तो बराचसा अबोल, काहीसा भित्रा व निर्णयशक्ती बळकट नसलेला मुलगा बनतो. अशा या जयदीपला समिधा जीवापाड सांभाळत असते. जयदीप ज्या हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ११ वी इयत्तेत प्रवेश घेतो तिथे त्याला विक्रांत म्हणजे विकी हा विद्यार्थी भेटतो. विकी व जयदीप दोघेही सायन्स शाखेत शिकत आहेत. विकी हा अत्यंत बोलका, समोरच्यावर चटकन प्रभाव पाडणारे देखणे व्यक्तिमत्व लाभलेला व आपल्याला हवी ती गोष्ट कोणत्याही मार्गाने मिळविण्याची मानसिक तयारी असलेला असा मुलगा आहे. तो जयदीपचे मानसिक दौबर्ल्य हेरतो व त्याला आपल्या प्रभावाखाली घेण्याचा प्रयत्न करतो. तो प्रथम त्याच्याशी छान दोस्ती करतो. त्याला कॉलेज, घर या व्यतिरिक्त बाहेरचे जग दाखविण्याचा प्रयत्न करतो. जयदीप या गोष्टी सहजासहजी स्वीकारत नाही. पण त्याला हे बाहेरचे जग काही प्रमाणात आवडू लागते. विकी जयदीपच्या घरी जायला सुरुवात करतो. जयदीपची आई समिधाशी ओळख करुन घेतो. माया नावाच्या मुलीवर विकी मनापासून प्रेम करत असतो. मात्र माया ही जयदीपची आई समिधा हिचा मित्र सौरभची मुलगी आहे हे जेव्हा विकीला कळते तेव्हा त्याचे विचार बदलतात. तो जयदीप व माया एकमेकांच्या जवळ कसे येतील यासाठी वरकरणी प्रयत्न करु लागतो. त्यासाठी प्लॅन आखू लागतो पण त्याच्या मनात दुसराच विचार शिजत असतो. जयदीपला सोबत घेऊन फिरताना विकी त्याला आपल्या क्रौर्याच्या काही कथा ऐकवतो. 
मायाला मी सांगितलेल्या ठिकाणी तुझ्यासोबत घेऊन ये, माझे तिच्यावर प्रेम आहे, तिच्यापर्यंत ते पोहोचविण्यासाठी ही एकांताची जागाच योग्य आहे असे विकी जयदीपला सांगतो. त्यानंतर एक दिवस जयदीपला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील एका पुलावर नेऊन तिथून खाली ढकलून देण्याची धमकीही देतो. त्यामुळे जीवाचा थरकाप उडालेला जयदीप मायाला सोबत घेऊन त्या एकांत ठिकाणी येतो. त्या ठिकाणी विकी पोहोचतो का? जयदीपची आई समिधा ही आपल्या मुलाची डोळ्यात तेल घालून काळजी घेत असते. विकी जयदीपला कैचीत पकडत असताना त्या गोष्टींची चाहूल समिधाला लागते का? विकीचे मायावर खरच प्रेम असते की अजून काही भावना त्याच्या मनात दडलेल्या असतात? विकीच्या गैरकृत्यांचा जयदीप बळी ठरतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय
अश्विनी भावेसारखी समर्थ अभिनेत्री लाभून सुद्धा तिने केलेली समिधाची भूमिका फारशी रंगू शकलेली नाही याचे कारण त्या भूमिकेला जे अनेक पदर आहेत तेच नीट उलगडले गेलेले नाहीत. आईच्या भूमिकेतील समिधा काही वेळाने खोटी वाटू लागते असेही काही प्रसंग ओढूनताणून या चित्रपटात आले आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या बालक पालक या चित्रपटामधीलमधील अव्याचे अभ्यासू पात्र साकारणारा बालकलाकार रोहित फाळकेने त्याच्या अभिनयाने त्यावेळी सगळ्यांना भुरळ घातली होती. मांजामध्ये जयदीपची रोहित फाळकेनी केलेली भूमिका चांगली झाली आहे. कायम मानसिक दडपणाखाली असलेला, आत्मविश्वास गमावलाय असे वाटणारा जयदीप जेव्हा त्याच्या आईने दिलेल्या पाठबळामुळे काहीसा खंबीर बनतो ते व्यक्तिमत्वातले परिवर्तन रोहित फाळकेने उत्तमरित्या दाखविले आहे. या चित्रपटात विकी हा खलनायक असला तरी तोच खरा नायक आहे असे म्हणावे लागेल. विकीची भूमिका निळ्याशार डोळ्यांच्या सुमेध मुद्गलकर याने चांगली केली आहे. त्याने डोळे, शारीराभिनयातून त्याचे पॅरासाइट असणे नेमकेपणाने दाखविले आहे. कलाकारांची कामगिरी चांगली पण कथानक ढिसाळ असा मांजाचा मामला आहे. आपल्या मुलाचे आयुष्य हे पतंगासारखे असते. त्या पतंगाला नियंत्रणात ठेवतो तो मांजा. मांजा जर आईच्या हातात असेल तर पतंगावर नियंत्रण राहाते. मांजाला ढिल दिली तरी बोट कापते, मांजा अधिक घट्टपणे पकडून ठेवला तरी बोट कापते. कसेही असले तरी पतंगावर नियंत्रण राखणे महत्वाचे. समिधा आपल्या प्रेमाचा, कणखरतेचा मांजा आपल्या हाती ठेवून मुलगा जयदीपच्या आयुष्याचा पतंग भरकटू नये म्हणून काळजी घेते अशी ही सारी कथा आहे. पण हे कथानकच इतके विस्कळीतपणे मांडले आहे की मांजा चित्रपटाचा पतंग भरकटू लागतो. तो नियंत्रणात राहात नाही.
दिग्दर्शन
जतीन वागळे यांनी मांजाचे जे दिग्दर्शन केले आहे ते करताना त्यांच्यावर पाश्चिमात्य चित्रपटांचा फारच प्रभाव असावा असे वाटते. मुळात समिधा व तिचा मुलगा जयदीप यांची जीवनशैली उच्चमध्यमवर्गीय गटातील आहे हे चित्रपटात न सांगताही लक्षात येते. सध्या श्रीमंत, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीयांमध्ये इंग्रजीचा प्रभाव बराच वाढला आहे. आजचा युवकही मराठीतून बोलताना अनेक इंग्रजी शब्दही त्यात वापरतो. हे सर्व मान्य करुनही या चित्रपटात सुमारे एक चतुर्थांश संवाद इंग्रजी आहेत हे जरा खटकते. जतीन वागळे यांनी अशा धाटणीने चित्रपट करुन पहिला रसभंग केला. दुसरा रसभंग त्यांना विकी ज्या पद्धतीने चित्रपटाच्या अखेरीस वागतो ते अधिक गडद रहस्यात्मकरित्या दाखविता आले असते. पण या चित्रपटाचा शेवट ढोबळ पद्धतीने केला आहे. त्यामुळे एक चांगला सायकोथ्रीलर होण्याची शक्यता जतीन वागळे यांनी वाया घालवली.
संगीत
या चित्रपटाला शैल- प्रीतेश यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात एकच गाणे आहे. खलप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आता देवीच साक्षात अवतरली आहे असे वाटायला लावणारे गाणे चित्रपटात मध्येच असे घुसडले आहे की, ते अत्यंत हास्यास्पद वाटते. हे गाणेही रटाळ आहे.

No comments:

Post a Comment