Friday, July 7, 2017

बाप आणि मुलाच्या हळव्या नात्याचे भावस्पर्शी 'रिंगण' - दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेन्टसाठी केलेले परीक्षण - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेन्टसाठी रिंगण या मराठी चित्रपटाचे मी केलेले परीक्षण. त्याची लिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-REV-REV-marathi-film-…
---
Movie Review : बाप आणि मुलाच्या हळव्या नात्याचे भावस्पर्शी 'रिंगण'
---
- समीर परांजपे | Jun 29, 2017, 18:05 PM IST
--
चित्रपट रिंगण
रेटिंग - 5 स्टार
कलावंत शशांक शेंडे, मास्टर साहिल जोशी, सुहास शिरसाट, कल्याणी मुळ्ये, विजय साळवे, उमेश जगताप, शंतनू गांगणे, अभय महाजन, विठ्ठल पाटील, केतन पवार, श्याम सावजी, गोविंद भातलवंडे, दत्तात्रय जगताप, प्रशांत तपस्वी, ओंकार माने
दिग्दर्शक/ कथा - मकरंद माने
निर्माता - विठ्ठल पाटील
संगीत दिग्दर्शक - रोहित नागभिडे
---
'रिंगण' हा चित्रपट तयार झाला २०१५ सालीच. पण त्याला गेली दोन वर्षे वितरकच न मिळाल्याने तो साऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. मात्र या काळात हा चित्रपट विविध चित्रपट महोत्सवांतून आपली मोहोर उमटवत राहिला होता. ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार रिंगणला मिळाला होता. ५३व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्येही अनेक पुरस्कारांवर रिंगणने आपली मुद्रा उमटवली होती. त्याशिवाय लंडन, स्टुटगार्ट, कान्स आदी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये रिंगणला समीक्षक, जाणत्या प्रेक्षकांची वाहव्वा मिळाली आहे. रिंगणसारख्या उत्कृष्ट चित्रपटाला जसे वितरकाविना प्रतिक्षा रांगेत उभे राहावे लागले तेच दुर्भाग्य सध्या दशक्रिया, हलाल, कासव या उत्कृष्ट चित्रपटांच्याही ललाटी आले आहे. या ग्रहणातून सुटका झालेल्या रिंगणने चित्रपट प्रदर्शित होण्याचे रिंगण पूर्ण केले आहे.
कथा - 
'रिंगण' या चित्रपटात बरेच कलाकार असले तरी त्याची कथा फिरते ती अर्जून मगर व त्याचा सात वर्षांचा मुलगा अभिमन्यू या दोघांच्याच भोवती. तेच या चित्रपटाचे दोन नायक आहेत. अर्जुन मगर हा गरीब शेतकरी. सातत्याने तीन वर्षे दुष्काळ पडल्याने अत्यंत आर्थिक अडचणीत आलेल्या अर्जुनच्या डोक्यावर सावकाराचे कर्ज आहे. ते कर्ज फेडता येत नसल्याने त्या कर्जाच्या वाढत जाणाऱ्या व्याजाच्या ओझ्याने तो अजूनच दबलेला आहे. त्याची जमिन सावकाराकडे गहाण पडलेली आहे. व्याजासहित कर्जाची मुद्दल एका वर्षभराच्या काळात फेडता आली नाही तर त्याची जमिन व घर यांचा लिलाव करुन पैशाची वसुली करण्याचा इशारा सावकाराने त्याला दिलेला असतो. या परिस्थितीमुळे त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही काही वेळा येऊन जातात. अर्जुनच्या बायकोचे अकाली निधन झालेले आहे. त्याला सात वर्षांचा अभिमन्यू नावाचा एक मुलगा आहे. या अभिमन्यूला आपल्या आईची, तिच्या मायेची आस लागलेली असते. त्यामुळे तो सतत वडिलांना माझी आई कुठे आहे? मला तिच्याकडे घेऊन चला असा धोशा लावत असतो. त्याची आई वारली आहे असे अभिमन्यूला थेट सांगत नाही कारण या मुलाचे अजाणते वय. त्याला मृत्यू म्हणजे काय, त्याची वेदना काय याची जाणीव होण्याची तशी शक्यता नसतेच. त्यामुळे अर्जुन अभिमन्यूला तुझी आई देवाकडे गेली आहे इतकेच सांगतो. त्यानंतरही अभिमन्यूचे समाधान होत नाही. 
आपली जमिन सावकाराच्या पाशातून सोडविण्यासाठी नातेवाइकांकडे आर्थिक मदत मागण्याकरिता अर्जुन हा अभिमन्यूला सोबत घेऊन जातो. पण पदरी निराशा येते. शेवटी ते दोघे पंढरपूरला जातात. तिथे विठोबाचे दर्शन घेऊन आम्हाला साऱ्या संकटातून बाहेर काढ असे आर्जव करण्याचे अर्जुनच्या मनात असते. तर देवाघरी गेलेली आई आपल्याला पंढरपूरला म्हणजे देवाच्या गावी नक्की भेटणार अशी अभिमन्यूची खात्री असते. पंढरपुरात आल्यावर अर्जुनचे सामान, मोटारसायकल एक चोर पळवून नेतो. त्यामुळे संपूर्ण कफल्लक झालेला अर्जुन आपला मुलगा अभिमन्यूसह पंढरपुरात ठिकठिकाणी भटकतो. पोटाला अन्न मिळविण्यासाठी, मग काम मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरु होते. यात त्याला पंढरपूर या तीर्थक्षेत्राचे विविध रंग दिसतात. 
पंढरपुरात असताना अर्जुनला एका कुंकुवाची विक्री करणाऱ्या दुकानात नोकरी मिळते. त्याला थोडे स्थैर्य मिळते. या नोकरीतून साठविलेल्या पैशातून सावकाराचे सारे पैसे चुकते करुन आपली जमिन त्याच्या तावडीतून सोडवून घ्यावी या विचाराने अर्जून आपल्या मुलासह सहा महिने पंढरपुरातच राहातो. या काळात अभिमन्यूचा पंढरपुरात आपल्या आईचा सुरु असलेला शोध सुरुच असतो. पंढरपुरातील या वास्तव्यात अर्जुन व अभिमन्यू या पितापुत्रांमधील गहिरे नाते, त्यातील सुक्ष्म तणाव, प्रेम यांचे दर्शन कथानकातून घडत राहाते. सावकाराच्या तावडीतून आपली जमिन सोडविण्यात अर्जुन यशस्वी ठरतो का? आपली आई देवाघरी गेलेली आहे हे सत्य अभिमन्यूला अखेर कसे कळते? या सर्व प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी रिंगण हा चित्रपट आवर्जून बघायलाच हवा.
अभिनय 
शशांक शेंडे यांनी अर्जुन मगर या दुष्काळ व आर्थिक ओढाताणीने गांजलेल्या शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे. शशांक हे मुळात प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार, दिग्दर्शक, लेखक. त्यामुळे रिंगणसारख्या चित्रपटात अर्जुन या शेतकऱ्याची जगण्यातली वेदना व अभिमन्यू या आपल्या मुलाच्या भावविश्वाला जपत असताना त्याच्या मनाची होणारी उलघाल हे अभिनयातून दाखविताना त्यांनी अतिशय वास्तववादी वाटावा असा अभिनय केला आहे. शशांक शेंडे या अतिशय प्रगल्भ अभिनेत्याचा ताकदीने वापर आगामी काळात मराठी, हिंदी चित्रपटकर्त्यांनी अधिकाधिक केला पाहिजे. मास्टर साहिल जोशी याने अभिमन्यू या सात वर्षांच्या मुलाची जी भूमिका केली आहे ती तर अक्षरश: मन हेलावून टाकते. आपल्या आईच्या शोधात असलेला अभिमन्यू, त्यासाठी चाललेले त्याचे प्रयत्न या साऱ्यात प्रेक्षक गुंगून जातो. अभिमन्यू व त्याच्या वडिलांचे गहिरे नाते पडद्यावर साकारण्यात साहिल जोशी व शशांक शेंडे कमालीचे यशस्वी ठरले आहेत. बाकी सहकलाकारांनी केलेल्या भूमिका चपखल आहेत. वास्तवाला ताकदीने भिडणारा व एकही प्रसंग नाटकी न वाटणारा असा हा रिंगण चित्रपट आहे. 
दिग्दर्शन
रिंगण चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने हा मुळात अकलूजचा. पंढरपूर वारी, पंढरपूरातील वातावरण हे सारे त्याने जवळून पाहिलेले आहेच शिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची कथा व व्यथाही त्याला चांगलीच माहित आहे. त्यामुळे हे सारे संदर्भ गुंफून त्याने जी कथा लिहिली, त्याच्यावर त्याने चित्रपट दिग्दर्शित केला. हे उत्तम झाले. त्याच्या कथेतील प्रत्येक प्रसंग हा रिंगण चित्रपटात उत्तमरितीने साकारला आहे. मकरंद माने भविष्यात असेच उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित करेल असा विश्वास त्याच्या रिंगणमधील कामगिरीमुळे वाटू लागतो. 
संगीत
रिंगण चित्रपटाला रोहित नागभिडे याने आशयघन संगीत दिले आहे. या चित्रपटात दोन गाणी आहेत. ती अतिशय अर्थवाही आहेत. त्यातील पहिले गाणे म्हणजे `देव पाहिला.' ते गाणे गायले आहे प्रसिद्ध संगीतकार व गायक अजय गोगावले यांनी. त्यांचा गाण्यातील आर्त स्वर प्रेक्षकांच्या काळजाला भिडल्याशिवाय राहाणार नाही. तर दुसरे गाणे आहे `विठ्ठला'. रोहित नागभिडे यांच्या संगीतकार म्हणून भावी कारकिर्दीकडे प्रेक्षकांचे यापुढे नक्कीच लक्ष राहिल अशीच कामगिरी त्यांनी रिंगणमध्ये केली आहे.

No comments:

Post a Comment