Sunday, June 25, 2017

ऑडिओ, टेक्स्ट एकातच असलेल्या नव्या अभिनव मोबाइल अॅपमुळे होणार मराठीसह अनेक भाषांतील पुस्तकांचे वाचन, श्रवण अधिक सुलभ - बुकहंगामा पोर्टलवर मिळणार ही सुविधा या जूनअखेरीस - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी दि. २५ जून २०१७.


दै. दिव्य मराठीच्या २५ जून २०१७च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. त्याची वेबलिंक, टेक्स्ट, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aura…/…/25062017/0/10/
---
ऑडिओ, टेक्स्ट एकातच असलेल्या नव्या अभिनव मोबाइल अॅपमुळे 
होणार मराठीसह अनेक भाषांतील पुस्तकांचे वाचन, श्रवण अधिक सुलभ
--
बुकहंगामा पोर्टलवर मिळणार ही सुविधा या जूनअखेरीस
--
- समीर परांजपे
मुंबई, दि. २५ जून 
मराठीसह अन्य तीन भाषांतील इ-बुक मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या बुकहंगामा पोर्टलवर या जून महिन्याच्या अखेरीस एक अभिनव मोबाईल अॅप उपलब्ध होणार अाहे. त्यात ऑडीओ (ध्वनी) आणि टेक्स्ट (वाचन) हे एकाच अॅपमध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे वेगवेगळी अॅप मोबाईल मध्ये ठेवावी लागणार नाहीत. त्यामुळे ऑडिओ स्वरुपात पुस्तक ऐकताना नेट वाय-फाय किंवा डाटा कार्डची गरज भासणार नाही. त्यामुळे खर्चात बचत होईल. अशा प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण अॅप सध्या भारतातील पुस्तकविषयक एकाही वेबसाइटवर उपलब्ध नाही.
यासंदर्भात बुकहंगामाच्या संचालकांपैकी एक असलेले विक्रम भागवत यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या मोबाइल अॅपने मराठीसह अन्य भाषांतील वाचकांची मोठी सोय होईल. तसेच मराठी ऑडिओ पुस्तकांच्या श्रवणात त्यामुळे एक नवा बदलही येईल. 
पाच वर्षांपूर्वी साहित्यिक नाटककार विक्रम भागवत यांनी ‘न लिहिलेली पत्रे’ हे फेसबुक पेज सुरु केले आणि अल्पावधीत त्याची लोकप्रियता वाढत गेली. अनेक अभिनव विषय हाताळणाऱ्या पत्रमालिका या पेज वरून प्रकाशित करण्यात आल्या. यामध्ये मानसशास्त्र, मानवी नातेसंबंध, चित्रपट समीक्षा रसग्रहण, आयुर्वेदिक वृक्ष, असे साहित्यिक, सामाजिक भान जोपासणारे मानवी भावभावनांचे चित्रण करणारे अनेक विषय आदींचा समावेश आहे. आजवर एकूण पाच हजाराहून अधिक पत्र या पेजवरून प्रकाशित करण्यात आली आहेत. यातून पुढे जाऊन या नव्या दमाच्या लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करायचे अशी कल्पना पुढे आली आणि त्यातून इ-बुक्सची निर्मिती करण्यासाठी विक्रम भागवत, सुनील गोवर्धन, जयंत पोंक्षे या तिघांनी मिळून www.bookhungama.com या पोर्टलची निर्मिती केली. बुकहंगामातर्फे अलिकडेच पुण्यात पहिले नुक्कड साहित्य संमेलनही घेण्यात आले होते.
बुकहंगामा या पोर्टलवर राजेंद्र बनहट्टी, डॉ. माधवी वैद्य, भा. रा. भागवत, गंगाधर गाडगीळ, सुधीर गाडगीळ, चिन्मय मांडलेकर अशा मातब्बर लेखकांची पुस्तके जशी इ-बुक्स बुकहंगामा या पोर्टलवर आहेत तशीच तरुण, होतकरू आणि ज्यांना प्रकाशन व्यासपीठ चटकन उपलब्ब्ध होत नाही पण ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे अशा लेखकांची इ-पुस्तके या पोर्टलवर उपलब्ध आहेत. गेल्या दिड वर्षात बुकहंगामावर ७५० इ-पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेली पुस्तके त्यात असून त्यातील सुमारे दीडशे पुस्तके ही बुकहंगामाने प्रसिद्ध केलेली स्वत:ची इ-पुस्तके आहेत. बुकहंगामाने प्रसिद्ध केलेल्यापैकी प्रा. माधवी भट यांनी लिहिलेले बारकीची पत्रे, रुपाली पारखे-देशिंगकर यांचे फिटे अंधाराचे जाळे अशी काही इ-पुस्तके विशेष गाजली आहेत. त्याशिवाय बुकहंगामाने नवी इ-बुक करण्यासाठी ७५० पुस्तकांचे हक्क मिळविले आहेत. बुकहंगामाची स्वतःची जागतिक दर्जाची इ-बुक निर्मिती यंत्रणा आहे. ते सध्या प्रत्येक महिन्याला ६० इ-बुकची निर्मिती करतात. आता त्यातील निवडक पुस्तकांची ऑडिओ बुक तयार होतील व ती नवीन अॅपद्वारे श्रोत्यांना ऐकता येतील.
मराठी लेखकांसाठी खास कार्यशाळा
बुकहंगामातर्फे मराठी लेखकांसाठी दोन दिवसांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. त्यात लेखन मार्गदर्शन आणि आपले पुस्तक विकण्यासाठी सोशल मिडियाचा वापर कसा करावा आपले ब्रँडिंग कसे करावे ह्याचे प्रशिक्षण देण्यात येते. ग्रामीण भागातून येणाऱ्या होतकरू लेखकांनाही अधिक प्रोत्साहन मिळावे याकडे बुकहंगामाचा कटाक्ष असतो.

No comments:

Post a Comment