Friday, September 1, 2017

मुंबईत पानी-पत! - दै. दिव्य मराठीच्या दि. १ सप्टेंबर २०१७च्या संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला अग्रलेख - समीर परांजपे


दै. दिव्य मराठीच्या दि. १ सप्टेंबर २०१७च्या संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला हा अग्रलेख. त्याचा मजकूर, जेपीजी फाइल व वेबपेजलिंक सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/01092017/0/4/
--
मुंबईत पानी-पत!
--
मुंबई शहर व आसपासच्या परिसरातील रहिवाशांना २६ जुलै २००५ रोजी झालेली भयंकर अतिवृष्टी तसेच महापुरामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीच्या आठवणी अजूनही अस्वस्थ करतात. बारा वर्षांपूर्वीची ती विदारक परिस्थिती पुन्हा ओढवावी इतका पाऊस मुंबईत मंगळवारी निश्चितच झाला नाही. मात्र या दिवशी मुंबईत पाणी साचून या शहराचे कंबरडे मोडले हे मान्य केले पािहजे. कोणत्याही शहराचे नियोजन कितीही उत्तम असले व तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर पाणी तुंबण्याचे व शहरातील जनजीवनाचे व्यवहार थंडावण्याचे प्रकार जगभर सर्वत्र होत असतात. मुंबईही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. मात्र अशा आपत्ती ओढविल्यानंतर विदेशांमध्ये आपत्ती निवारण व्यवस्थापन ज्या पद्धतीने राबविले जाते तशी जय्यत तयारी भारतातील मुंबईसह कोणत्याच शहरांमध्ये, गावांमध्ये आढ‌ळून येत नाही. अतिवृष्टी झाली, पूर येऊन गेला किंवा अजून काही मानवी किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्या की त्यानंतर आपल्याकडे रस्त्यांवरील वाहतूक, वीजपुरवठा अशा काही गोष्टी पुन्हा नीट सुरळीत झाल्या आहेत ना हे पाहाणे यालाच बहुदा आपत्कालीन संकटनिवारणाचे उपाय समजत असावेत असे एकंदर वातावरण आहे. नालेसफाई न झाल्याने मुंबईमध्ये पाणी साचले असा आरोप शिवसेनेचा सत्तेसाठीचा मित्रपक्ष भाजप व विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसनेही केला आहे. पालिकेत भाजप सत्तेत सहभागी असला तरी सत्तेच्या किल्ल्या महापौर शिवसेनेचा असल्याने एकप्रकारे त्यांच्याच हातात आहेत. त्यामुळे नालेसफाईबाबत जे आरोप झाले ते खोडून काढण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे सरसावले यात काहीही नवल नाही. मंगळवारी मुंबई ठप्प झाली हे मी मान्य करतो, मात्र हे नैसर्गिक संकट असून या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हा प्रश्न विचारण्यापेक्षा ही परिस्थिती कशी हाताळली हे महत्त्वाचे आहे असे जे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे त्याला आपल्या खांद्यावरील जबाबदारी ढकलणे असे म्हणतात. मुंबई शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही हे स्वच्छ डोळ्यांनी दिसते आहे. रस्तेदुरुस्ती, नालेसफाईसाठी जे कोट्यवधी रुपये खर्च केले गेले ते मुंबईकर करदात्यांकडून पालिकेला मिळालेले होते. त्यामुळे शहरातील नागरी सुविधांची अवस्था दयनीय असेल तर त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारला गेलाच पाहिजे. मुंबईत पाणी साचल्याबद्दल शिवसेनेवर टीका होत असल्याने भाजप भलताच खूष झाला आहे. पण मुंबईच्या दुरवस्थेत सत्तेतील भागीदार भाजपही तेवढाच जबाबदार आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर टीका केली पण शिवसेना-भाजपच्या हातात अनेक वर्षे महापालिकेची सत्ता असूनही मुंबईची अवस्था वाईट का याचेही उत्तर शेलार यांनी दिले पाहिजे. 
उद्धव ठाकरे यांच्या माहितीप्रमाणे २९ आॅगस्ट रोजी मुंबईच्या डोक्यावर ९ किमी उंचीचा मोठा ढग होता सुदैवानं तो फुटला नाही. ही माहिती त्यांना कुठून मिळाली माहित नाही. मात्र अत्यंत भ्रष्ट कारभाराचे काळे मेघ मुंबईच्या क्षितिजावर नक्कीच जमा झाले आहेत व ते फुटले तर एक दिवस या शहराच्या व्यवस्थेचे मातेरे होईल एवढे मुंबईतील सुज्ञ नागरिकाला नक्की माहिती आहे. मुंबईला पाण्याने वेढले तेव्हा परळ येथील उघड्या ड्रेनेजमधे पडून बॉम्बे रुग्णालयाचे प्रख्यात पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ज्या पद्धतीने मृत्यू ओढविला त्यावरुनही आता हे राजकीय पक्ष एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करीत आहेत. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा हा प्रकार आहे. केवळ बृहन्मुंबईच नव्हे तर मराठवाड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पाऊस व त्यामुळे पूर येऊन गेल्यानंतर त्या प्रदेशात मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया, अतिसार, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसिस अशा सारखे आजार उद्भवतात. पावसाळ्यातील या आजारांना नियंत्रणात राखण्यासाठी राज्य सरकारने काही धोरणात्मक पावले टाकणे आवश्यक झाले आहे. आपत्कालीन निवारण व्यवस्थापनात आजारांचा मुकाबला व त्यावर नियंत्रण मिळविणे हा पण एक महत्वाचा भाग असतो. तसा विचार करुन नागरी व वैद्यकीय यंत्रणा राज्यातील प्रत्येक शहरात सुसज्ज ठेवायला हव्यात. शहरातील गटारांमध्ये प्लास्टिक कचरा साचून राहिल्यामुळेही पाणी तुंबण्यास हातभार लागतो. नाल्यात कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर न करणे अशा सवयी नागरिकांनी लावून घेतल्यास पावसाळा अधिक सुसह्य होऊ शकतो. कायदे करुनच ही सारी कामे होतील असे नाही. पावसाळ्यात अापल्या शहराचे `पानी'पत होऊ नये यासाठी प्रत्येकानेच दक्ष राहावे हा धडा मुंबईतील मुसळधार पावसाने दिला अाहे.

No comments:

Post a Comment