Thursday, September 28, 2017

घुमा या चित्रपटाचे दि. २८ सप्टेंबर रोजी दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटला प्रसिद्ध झालेले परीक्षण - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाईटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेंटमध्ये दि. २८ सप्टेंबर २०१७ रोजी घुमा या नवीन मराठी चित्रपटाचे मी लिहिलेले हे परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. त्या परीक्षणाचा मजकूर व त्याच्या मजकूराची वेबलिंकही पुढे दिली आहे.
---
घुमा - विषमतेने वेढलेल्या आयुष्यांची गाथा
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - चार स्टार
--
कलाकार - शरद जाधव, पूनम पाटील, आदेश आवारे, प्रमोद कसबे, तेशवानी वेताळ, शशांक दरणे, नंदकिशोर गोरे.
पटकथा, दिग्दर्शक - महेश रावसाहेब काळे
निर्माते - एमएएसएस फिल्म्स, ड्रीम सेलर फिल्म्स
संगीत - जसराज-हृषिकेश-सौरभ
चित्रपट प्रकार - फॅमिली ड्रामा
--
फॅँड्री, सैराटसारख्या आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे कम्युनिकेशन स्टडीजचे पदव्युत्तर शिक्षण झाले ते अहमदनगरच्या न्यू आर्टस, सायन्स, कॉमर्स कॉलेजमध्ये. ख्वाडा या चित्रपटाचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे मासकॉममधील शिक्षणही याच महाविद्यालयातून झाले. हीच परंपरा महेश रावसाहेब काळे यानेही कायम ठेवली. याच महाविद्यालयातून महेशनेही हाच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याने दिग्दर्शक म्हणून आपला पहिलावहिला केला तो म्हणजे घुमा. नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे व महेश रावसाहेब काळे या तिघांत एक समान धागा असा आहे की त्यांनी तद्दन मसालापट न करता आशयघन मराठी चित्रपट बनविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महेश रावसाहेब काळे याने मास्टर ऑफ कम्युनिकेशन स्टडी करत असताना २०१३ साली रुपया व २०१४ साली वट अमावस्या हे दोन लघुपट केले होते. २०१४ रोजी त्याच्या रुपया या लघुपटाला कोलकाता येथे नॅशनल स्टुडंट फिल्म अॅवॉर्ड (एनएसएफए) मिळाले होते. या लघुपटाला इतर अनेक महोत्सवांतही पुरस्कार मिळाले. भाऊराव कऱ्हाडे ख्वाडा चित्रपट बनवत असताना त्यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून महेशने काम केले आहे. या अनुभवानंतर महेश या युवा दिग्दर्शकाने चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार केला. त्याला समाजात असलेली विषमता, अस्वस्थता यांच्याकडे घुमासारख्या आशयघन चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष वेधायचे आहे. आपल्या दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात महेश रावसाहेब काळे कमालीचा यशस्वी झाला आहे हे आवर्जून सांगितले पाहिजे. 
कथा - देशातल्या खेडापाड्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच बिकट असते. आपली शेती ही पर्जन्यमानावर अवलंबून असलेली. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या नीट सोयीही नाहीत. बीिबयाणांचा दर्जा चांगला असेलच असे नाही. मूठभर श्रीमंत शेतकरी वगळता मध्यम किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर अनेकदा आर्थिक संकट उभे असते. त्यात निसर्गराजाच्या लहरीपणाचा तडाखा बसला तरी पीकपाण्याच्या होणाऱ्या नुकसानाने या शेतकऱ्याचे कंबरडेच मोडते. कर्जाच्या ओझ्याखाली वाकलेला, दबलेला शेतकरीराजा मग आपल्या बळावर ताठ कण्याने उभा तरी कसा राहाणार? भारत हा कृषीप्रधान देश आहे असे पाठ्यपुस्तकांत जरुर म्हटले आहे परंतु प्रत्यक्षात देशात सर्वात दुर्लक्षित क्षेत्र आहे ते शेतीचेच. ही सगळी पार्श्वभूमी घुमा या चित्रपटातील नामदेव कठाळे या शेतकऱ्याच्याही पाचवीला पुजली आहे. हा अल्पभूधारक शेतकरी. नामदेव हा अनेक आघाड्यांवर विविध प्रश्नांना तोंड देत जगत असतो. त्यात जसे शेतीचे प्रश्न आहेत तसे भावकीचेही. नामदेवचे कुटुंब चौकोनी आहे. त्याची बायको संजी, दोन मुले विकास आणि गुणी. कुटुंब मर्यादित असूनही गरीबीमुळे जे हाल होतात ते नामदेवच्या संसाराच्या बाबतीतही टळत नाहीत. त्याचा मोठा मुलगा विकास. त्याला शिक्षणात अजिबात रस नाही. नववी झाल्यानंतर त्याने शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे. तो मोटर, मोटरसायकल दुरुस्तीचे काम करतो. मेकॅनिकचे काम करुन आपला उदरनिर्वाह चालेल असे त्याला वाटते. नामदेवचा छोटा मुलगा गुणी हा अभ्यासात हुशार आहे. तो गावच्या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत आहे. ही शाळा मराठी माध्यमाची आहे. गुणी हा अभ्यासात हुषार आहे. त्याला शालेय अभ्यासक्रमातील विषयांमध्ये चांगली गती आहे. गुणी हा हुषार आहे याची नामदेवला पुरेपूर जाणीव आहे. मोठा मुलगा विकास पुढे शिकला नाही याची नामदेवच्या मनात खंत असते. त्यामुळे गुणीने तरी शिकून खूप मोठे व्हावे यासाठी नामदेवची विलक्षण धडपड सुरु आहे. नामदेवची वडिलोपार्जित शेती आहे. मात्र त्या शेतजमिनीवरुन नामदेवचा भाऊ हरीभाऊ याने वाद उकरून काढला आहे. त्याने नामदेवच्या मालकीच्या जमिनीचा काही भागावर आपला हक्क सांगितला आहे. नामदेव त्या शेतभागात गेला असता हरीभाऊने त्याला हुसकावून लावले होते. हा सलही नामदेवच्या मनात आहे. गावात मराठी माध्यमाची जी शाळा आहे ती इयत्ता चौथीपर्यंतच आहे. पाचवी ते दहावी इयत्तेची शाळा ही नामदेवच्या गावापासून दोन किमी लांब आहे. त्यामुळे गुणी व त्याच्यासारख्याच चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर या लांब अंतरावरच्या मराठी माध्यमाच्या शाळेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नामदेव हा काही स्वत: फार शिकलेला नाही. त्याची बायकोही निरक्षर आहे. गावाच्या जवळ एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु झालेली आहे. त्या शाळेत पंचक्रोशीतील बागायतदारांची मुले, गावच्या सरपंचाचा मुलगा हे जात असतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सर्वच प्रकारच्या सुविधा आहेत. तेथील शिक्षण हे आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्यांनाच परवडू शकते हे साध्या डोळ्यांनी दिसणारे सत्य नामदेवही पाहात असतो. दुसऱ्या बाजूला नामदेवच्या गावातल्या मराठी माध्यमाच्या शा‌ळेची दुरवस्था झाली आहे. एकतर कमी शिक्षकवर्ग व त्यातच त्यांच्याकडे तुटपुंजी संसाधने आहेत. या शाळेत गरीब घरातलीच मुले शिकायला येत असतात. याचे कारण या शाळेत फी अगदी कमी आहे. ती गरीब विद्यार्थ्यांना परवडू शकते अथवा शिष्यवृत्त्यांचा सहारा. शाळेच्या कामाव्यतिरिक्त या शाळेतील शिक्षकांवर अनेक सरकारी योजनांच्या, निवडणुकांच्या कामांचे ओझेही आहेच. त्यामुळे येथील शिक्षकवर्ग त्या कामाच्या ओझ्याखालीही दबून गेलेला आहे. या सगळ्या चरकातून निघाल्यानंतर मग जो काय वेळ उरेल तो ते या विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यांची पटसंख्या कमी पडत असली तर सरकारी नियमांप्रमाणे आवश्यक पटसंख्या दाखविण्यासाठी गावातील शाळेत न येणाऱ्या मुलांना जबरदस्तीने काही दिवस तरी शाळेत आणून बसवणे हे सारे उद्योग तेथील शिक्षकांना करावे लागतात. ही स्थिती बहुतेक गावांतील प्राथमिक शाळांमध्ये आहे. अशा वातावरणात देखील नामदेवचा लहान मुलगा गुणी हा उत्तम शैक्षणिक प्रगती करतो. गुणीचे इंग्रजी विषयाचे आकलन चांगले आहे. तो आपले वडिल नामदेव यांना विविध सरकारी फॉर्म्स भरण्यासाठी मदत करतो त्यावेळी त्याच्या इंग्रजी भाषेच्या आकलनाची चुणूक नामदेवला कळून येते. गुणीने खूप शिकावे असे वाटत असताना नामदेवच्या मनात एक विचार आकार घेऊ लागतो तो म्हणजे गावाजवळील इंग्रजी शाळेत गुणीने शिकायला जायला हवे. गुणीने इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतले तर त्याची प्रगती आणखी जोमाने होईल असेही त्याला वाटत असते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुणीला प्रवेश मिळविण्यासाठी आता नामदेव प्रयत्न करु लागतो. दुसऱ्या बाजूला तो गावातील मजूरीची कामे करुनही आपल्या संसाराला पैका जोडत असतो. त्याची बायको संजी ही देखील मोलमजूरीचे काम करायची. नामदेवचा मोठा मुलगा मेकॅनिकचे काम करीत असला तरी तो घरामध्ये खर्चासाठी काहीही रक्कम देत नसतो. त्यावरुनही नामदेव त्याला अधूनमधून बोलायचा पण सर्वात मोठी खंत ही की विकासने शिक्षण अर्धवट सोडले. मुले उत्तम शिकली तर त्यांना आपल्या सारखे मोलमजूरी करुन जगावे लागणार नाही हे नामदेवला ठामपणे कळलेले असते. इंग्रजी शा‌ळेत गुणीला प्रवेश मिळवून देेण्यासाठी नामदेव गावातील अधिकाऱ्याशी बोलतो. या अधिकाऱ्याचा नातेवाईक जव‌ळच्या इंग्रजी शाळेत कर्मचारी असतो. तो संदर्भ घेऊन नामदेव एक दिवस इंग्रजी शाळेत चौकशीसाठी जातो. तेव्हा त्याला कळते की मुलाला पाचवी इयत्तेत प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर एका वर्षाची तीस हजार रुपये फी भरावी लागेल. नामदेवच्या पुढे मोठे संकट उभे राहाते. मोलमजूरी करुन, शेती करुन जे उत्पन्न हाती येते त्यातून एवढी मोठी रक्कम उभारणे शक्यच नसते. तरीही नामदेव हार मानत नाही. तो प्रयत्न करीत राहातो. नामदेव आपला मुलगा गुणी याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी धडपडतोय याची गावातले टवाळ लोक चेष्टा करीत असतात. सरपंचालाही असे वाटते की त्याचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो आहे, या गोष्टीची बरोबरी नामदेव करायला निघाला आहे. सरपंचही मनातून नाही म्हटले तरी दुखावतोच. गुणीला इंग्रजी शाळेत प्रवेश मि‌ळवून देण्यासाठी पाचवी इयत्तेकरिता जी तीस हजार रुपयांची फी भरावी लागणार आहे ती निम्मी आधी व काही काळाने निम्मी अशी भरली तरी चालणार आहे अशी आश्वासक माहिती नामदेवला इंग्रजी शाळेतल्या ओळखीच्या कर्मचाऱ्याकडून मिळते तेव्हा त्याला काहीसा दिलासा मि‌ळतो. पण नामदेवपुढे त्याचवेळी अजून दोन संकटे दत्त म्हणून उभी राहातात. पहिले संकट म्हणजे त्याचा भाऊ हरीभाऊ हा नामदेवला एक लिगल नोटिस पाठवितो. वडिलोपार्जित जमिनीपैकी जो नामदेवचा हिस्सा आहे त्यातील काही भागही आपलाच आहे असा दावा या नोटिशीत हरीभाऊने केलेला असतो. नामदेवचा त्या जमिनभागावर काहीही हक्क नाही असे सांगत त्याच्यावर खटला गुदरण्याची तयारी हरीभाऊने या नोटीशीद्वारे केलेली असते. ही नोटिस बघून नामदेवच्या पायाखालची जमिन सरकते. तो सरपंचाकडे जातो व या समस्येवर मार्ग काढा म्हणून त्याला गळ घालतो. हरिभाऊला सरपंच समज देतो व आपापसात तोडगा काढून हे भांडण मिटवा असे सांगतो. सरपंचाचे ऐकून हरिभाऊ नोटीस मागे घेण्यास तयार होतो पण वकीलासाठी जो काही खर्च झाला आहे तो नामदेवने दिला तरच हा वाद मी मिटवेन अशी भूमिका हरीभाऊ घेतो. सरपंचालाही नामदेवबद्दल असूया असतेच. तो या गोष्टीचा फायदा घेऊन असा निर्णय लादतो की, वकील, कायेदशीर प्रक्रिया याचा झालेला खर्च नामदेवने हरीभाऊला द्यावा. नामदेव अखेर हे मान्य करतो. वकीलावर झालेल्या खर्चापोटी किती पैसे द्यायचे हे जेव्हा तो वकीलाला विचारतो तेव्हा बारा हजार रुपये द्यावे लागतील असे उत्तर येते. कारण तुझी केस ऑलरेडी कोर्टाच्या बोर्डावर आता चढली असल्याने ती रद्द करायला हवी. या सगळ्या प्रक्रियेमुळे खर्च वाढला असे वकिल बिनदिक्कत खोटे नामदेवला सांगतो. न शिकलेल्या नामदेवाला ते खरे वाटते. आपल्या संसारासाठी जपून इथेतिथे जपून ठेवलेली रक्कम गोळा करुन नामदेव त्या वकीलाचे पैसे देऊन टाकते. अशा रितीने हरीभाऊने लादलेले संकट तर निवारले जाते. पण आता दुसरा प्रश्न कायम उरतोच की गुणाला इंग्रजी शाळेत प्रवेश द्यायचा तर जी निम्मी रक्कम म्हणजे पंधरा हजार रुपये भरायचे आहेत ते कुठून उभे करायचे? पुन्हा जीवाची तगमग, घालमेल हे सारे नामदेव अनुभवू लागतो. वडिल आपल्याला इंग्रजी शाळेत घालू पाहात आहेत हे गुणीला अजिबात आवडलेले नसते. त्याला ती गावची शाळा, तिथले शिक्षक, मित्र हे प्रिय असतात. पण तो जेव्हा एकदा वडिलांबरोबर गावानजिकच्या इंग्रजी शाळेत सहज म्हणून जातो तेव्हा तेथील विस्तिर्ण मैदान, भव्य वर्ग, टाय, बुट घातलेले व कडक इस्त्रीचे गणवेश परिधान केलेले विद्यार्थी, ते इंग्रजीतून करीत असलेले संभाषण हे सारे पाहून गुणी देखील काही क्षण भारावून जातो. नाम्याने तर ठरविलेलेच असते की काही झाले तरी गुणीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवीत प्रवेश मिळवून देणार म्हणजे देणारच. आता तो प्रवेशासाठी आवश्यक असलेले पंधरा हजार जमविण्याच्या मागे लागतो. पैसे तर अपुरे असतात त्याच्याकडे. आपल्या वडिलांची ही चाललेली ही धडपड नामदेवचा मोठा मुलगा विकास पाहात असतो. त्यालाही आतून कुठेतरी वाटते की आपणही काही जबाबदारी उचलली पाहिजे. तो आपल्या कमाईतून साठविलेले काही हजार रुपये नामदेवच्या हवाली करतो. अशा रितीने पंधरा हजार रुपये नामदेवकडे जमतात. त्याला विलक्षण आनंद होतो. तो गुणीच्या प्रवेश मुलाखतीच्या दिवशी आनंदाने पत्नी, गुणीसह इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो. पालक व पाल्याची शाळेच्या मुख्याध्यापिका मुलाखत घेत असतात. त्या गुणीला इंग्रजीतून काही प्रश्न विचारतात. त्याला तो बिनचुक उत्तरे देतो. पाचवी इयत्तेच्या प्रवेशासाठी दोनच जागा शिल्लक असतात. या मुलाखतीदरम्यान नामदेवला समजते की शाळेच्या विकास फंडासाठी दहा हजार रुपये व फीच्या एकुण रकमेपैकी निम्मी म्हणजे पंधरा हजार रुपये असे पंचवीस हजार रुपये तातडीने भरले तरच गुणीला या शाळेत प्रवेश मिळू शकतो. पण इतके पैसे त्याच्याजवळ नसतात. त्यामुळे तो खूप हताश होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे संकट निवारुन गुणीला या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवी इयत्तेत प्रवेश मिळतो का? असा प्रश्न निर्माण होतो. त्याची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. 
अभिनय - घुमा या चित्रपटात नामदेव या परिस्थितीने गांजलेल्या शेतकऱ्याची भूमिका शरद जाधव यांनी केली आहे. आपल्या गरिब परिस्थितीमुळे जसे संसाराला नीट हातभार लावू शकत नाही तसेच मुलांनाही चांगल्या शाळेत शिक्षण देता येत नाही ही बोच त्याला सतत लागलेली आहे. त्यातून होणारी जीवाची तगमग शरद जाधव यांनी अप्रतिम अभिनयातून उभी केली आहे. यातील दुसरी महत्वाची व्यक्तिरेखा आहे गुणी या मुलाची. आदेश आवारे याने सहजाभिनयाने गुणीचा चुणचुणीतपणा, हुशारी तसेच समंजसपणा साकारला आहे. गावातील बागायतदारांकडे अमाप पैसा आहे त्यामुळे त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ शकतात पण आपण गरीब असल्याने या शाळेचे तोंडही आपला मुलगा पाहू शकत नाही ही विषमता नामदेवच्या मनाला खात असते. ही विषमता भेदण्यासाठी तो ज्या खंबीरपणे उभा राहातो तो क्षण भारी आहे. नामदेवची बायको संजीची भूमिका पूनम पाटीलने केलेली आहे. प्रमोद कसबे (विकासची भूमिका करणारा कलाकार), तेशवानी वेताळ (विकासच्या मनाला भावलेली मुलगी प्रगती), शशांक दरणे (सरपंच), नंदकिशोर गोरे (हरिभाऊ) या सहकलाकारांच्या भूमिकाही नैसर्गिक अभिनयाचा अविष्कार आहे. ही सारी पात्रे त्या गावातील अस्सल मातीतील वाटतात. कुठेही त्यांना ओढूनताणून ग्रामीण बाज चढविला आहे असे वाटत नाही. 
दिग्दर्शन - राहुल रावसाहेब काळे या दिग्दर्शकाच्या पहिल्याच मराठी चित्रपटाला वास्तववादाचा प्रखर स्पर्श आहे. नामदेव या शेतकऱ्याच्या जगण्याचे, त्याच्या आपल्या कुटुंबाप्रतीच्या इच्छा आकांक्षांचे चित्रपट दर्शन दाखविताना सत्याची जमिन राहुलने अजिबात सोडलेली नाही. समाजात जी भीषण आर्थिक, सामाजिक विषमता आहे त्याचे चटके जितके दुर्बल घटकास लागतात तितके ते कोणासही लागत नाही. आपला आर्थिक स्तर, सामािजक स्तर मेहनतीच्या बळावर उंचावू पाहाणाऱ्या दुर्बलांचा समाजात नेहमीच उपहास केला जातो. शेतकऱ्यांच्या जगण्यामध्ये परिस्थितीने जी विदारकता आली आहे त्याचेही हृदयविदारक दर्शन या चित्रपटात घडते. शिक्षणामुळेच आपल्या मुलांचे जीवनमान चांगले होईल या विचाराने झपाटलेला नामदेव हा विकासाची आस लागलेला चातक पक्षी वाटतो. ते सारे बारकावे राहुलने इतक्या नेटकेपणाने घुमा चित्रपटात टिपले आहेत की क्या बात है! नामदेव राहातोय त्या गावचा निसर्ग, तेथील माती, जमिन यांची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्ये, नामदेव ज्या ठिकाणी काम करतोय त्या खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या सुरुंगस्फोटाची दृश्ये ही या चित्रपटाला अधिक उंचीवर नेतात. जमिनीवर राहून जमिनीवरचे सांगणारा हा चित्रपट आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटात महेश रावसाहेब काळे याने उत्कृष्ट दिग्दर्शनाचा षटकार मारला आहे. त्याच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असतील भविष्यात. ग्रामीण पार्श्वभूमीचा, ग्रामीण बोलीचा हा चित्रपट नेटका झाला कारण त्याची पटकथा बांधेसूद आहे हेही श्रेय महेशचेच.
संगीत - घुमा चित्रपटाला जसराज, हृषिकेश, सौरभ या त्रयीने संगीत दिले असून त्यातील गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. त्यातील गाणी अजय गोगावले, प्रियांका बर्वे, मुग्धा हसबनीस यांनी गायली आहे. प्रियांका बर्वे हिने गायलेली लावणी फक्कड झाली आहे. दिग्दर्शन, संगीत, छायाचित्रण, संकलन सर्वच बाबतीत उजवा असलेला घुमा हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा असाच आहे.                                                                         http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-ghuma-5706987-PHO.html

No comments:

Post a Comment