Monday, September 25, 2017

नदी वाहते या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे. दै. दिव्य मराठी वेबसाइट - २२ सप्टेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेन्टमध्ये 22 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेला नदी वाहते या नव्या चित्रपटाचा रिव्ह्यू त्याच्या वेबपेज लिंकसह पुढे दिला आहे.
-----
नदी वाहते - जीवनदायिनी नदीचे तत्व व महत्व यांचे प्रवाही दर्शन
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - चार स्टार
--
कलाकार - पूनम शेटगांवकर, आशा शेलार, हृदयनाथ जाधव, अभिषेक आनंद, जयंत गाडेकर, भूषण विकास, महादेव सावंत, गजानन झारमेकर, विष्णुपद बर्वे, वसंत जोसलकर, शिव सुब्रमण्यम
पटकथा/संवाद/दिग्दर्शन - संदीप सावंत
निर्माते - संदीप सावंत, नीरजा पटवर्धन
कला दिग्दर्शन व वेशभूषा - नीरजा पटवर्धन
पार्श्वसंगीत – तुषार जयराज
--
कोणत्याही प्रदेशातील नद, नद्या हे तेथील जीवनवाहिन्या असतात. माणसाला जगण्यासाठी जे अत्यावश्यक घटक लागतात त्यामध्ये पाण्याचा समावेश होतो. पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नद्यांना माणसाने खरेतर जपायला पाहिजे. त्या प्रदुषित होणार नाहीत याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पण तसे होत नाही. विकासाच्या नावाखाली माणसाने नदी, समुद्र, विहिरी, झऱ्यांसारखे जलस्रोत यांच्या नैसर्गिक चलनवलनात इतका हस्तक्षेप केलेला आहे की, त्यातून उभे राहिलेले नैसर्गिक संकट एक दिवस माणसालाच गिळेल की काय अशी स्थिती भविष्यात येऊ शकते. निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. पण त्याच निसर्गाला माणूस ओरबाडायला निघाल्यानंतर तो कधी ना कधी उग्र स्वरुप धारण करणारच. जगातील बहुतांश मानवसंस्कृती नदीकाठी वसलेल्या दिसतील. आदिमकाळापासून नदीशी असलेला माणसाचा हा भावबंध मनस्पर्शी आहे. नदी वाहते हा चित्रपट नेमके याच भावबंधाचे दर्शन घडवितो. संदीप सावंत यांनी १३ वर्षांपूर्वी श्वास हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. श्वासने मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा जागतिक लोकमान्यता मिळवून दिली. या चित्रपटातून संदीप सावंत यांच्यातील अभ्यासू व अफाट दिग्दर्शक दिसून आला होता. त्याच दिग्दर्शकाचा नदी वाहते हा चित्रपट येणार म्हटल्यानंतर प्रेक्षकांच्याही अपेक्षा उंचावल्या होत्या. या साऱ्या अपेक्षा नदी वाहते हा चित्रपट पूर्ण करतो हे आवर्जून सांगायला हवे.
कथा - या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली आहे ती अंती या नदीनेच. या नदीभोवतीच सारी कथा फिरते. सारा चित्रपट कोकणात घडतो. अंती नदीच्या शेजारी वसलेल्या एका गावात ही कथा प्रवाही होते. अंती नदीमुळे आपल्या गावाला काय काय फायदे झाले आहेत याची नेमकी जाण असणारे लोक इतर गावांप्रमाणेच या गावातही कमी संख्येनेच असतात. यातील अनघा हे एक पात्र. अंती नदीवर तिचे नितांत प्रेम असते. अंती नदीमुळे या परिसराला जी निसर्गवैविध्य लाभले आहे त्याबद्दल ती या नदीची ऋणी आहे. ही नदी एकप्रकारे तिची सखी आहे. ती या नदीशी बोलते, तिच्याशी संवाद साधते. तीसहून अधिक गावांतून वाहणारी ही नदी भविष्यातही अशीच प्रवाहित राहावी व तिने आपल्या काठावरील लोकांचे आयुष्य असेच उजळत राहावे अशी तिची मनोमन इच्छा असते. अनघासारखेच या गावामध्ये काही समविचारी लोक असतात. त्यात अनघा, तिची आई, भाऊ, आकाश, प्रकाश, मंगेश, गुरुजी, तुकाराम अशा लोकांचा समावेश असतो. कोकणातील या नदीच्या किनारी असलेल्या गावांतील जमिनींची अवस्था मात्र बिकट आहे. काही विशिष्ट ऋतू सोडले तर या जमिनींमध्ये पिके घेण्यासाठी स्थानिक शेतकरी उदासीन आहेत. शेतजमिनीतून जे उत्पन्न येते त्यातून कुटुंबाचे पूर्णपणे भरणपोषण होणार नाही ही त्यांच्या मनात असलेली पहिली नकारात्मक भावना. विशिष्ट पिके घेतल्यानंतर शेतीमध्ये आणखी प्रयोग करण्याविषयी त्यांच्या मनात असलेली अनास्थाही प्रबळ आहे. त्यामुळे शेती करण्यापेक्षा शहरात जाऊन नोकरी केलेली बरी अशा मानसिकतेने या गावांतील माणसे पछाडलेली आहेत. त्यामुळे कोणी त्यांची शेतजमिन विकत घेतली तर लगेच ते तो व्यवहार करुन पूर्ण होतात. याचे कारण जमिन विकल्यानंतर मिळणारे पैसे. मात्र हे पैसे आयुष्याला पुरणार नाहीत याची त्यांना कदाचित जाणीव असली तरी खेद नसतो. अंती नदीच्या तीरावरील गावाच्या शेतजमिनी अशाच पटापट विकल्या जात आहेत. अनघा राहात असते त्या गावात देखील अंती नदीच्या किनाऱ्यावरील जमिनींचा असाच होताना तिला व समविचारी लोकांना बघावे लागत आहे. हे सारे रोखण्यासाठी व अंती या जीवनदायी नदीचा उपयोग करुन कोकणातील गावात नंदनवन कसे फुलवता येईल याचा विचार अनघा व तिचे समविचारी लोक करत आहेत. अंती नदीच्या वरच्या अंगाला एक बडा उद्योगपती भव्य टुरिस्ट रिसॉर्ट सुरु करणार असल्याची बातमी येऊन धडकते. आणि मग त्या दिशेनेच भराभर घटना घडू लागतात. अंती नदीवर भव्य धरण बांधून पाणी अडवायचे अशी या उद्योगपतीची योजना असते. तिथे जे टुरिस्ट रिसॉर्ट सुरु होईल त्यामध्ये पर्यटकांचा ओघ लागेल व त्यातून आपला व्यवसाय आणखी भरभराटीला आणायचा अशी या उद्योजकाच्या मनात योजना असते. त्याला आपल्या उद्योगाचा ब्रँड पुढच्या दहा वर्षांत खूप स्ट्राँग करायचा असतो. त्यामुळे त्यासाठी हा टुरिस्ट प्रॉजेक्ट त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे अंती नदीच्या किनारी असलेल्या गावांमधील जमिनी विकत घेऊन या प्रकल्पाला कसा आकार देता येईल याचा विचार हा उद्योगपती करीत असतो. पण हे वाटते तितके सोपे नसते. त्यासाठी नदीकिनारी मोक्याच्या जागी असलेल्या जमिनी स्थानिक लोकांनी या उद्योजकाला विकणे नितांत आवश्यक असते. मग त्यासाठी हा उद्योजक आपले जाळे टाकतो. त्यात एका गावचा सरपंच सामील होतो. सरपंचाच्या हाती गावची बऱ्यापैकी सत्ता असल्याने तो आपल्या बाजूला जास्तीत जास्त लोक वळविण्यासाठी प्रयत्न करु लागतो. गावामध्ये अंती नदीचे पाणी पाईपलाइनद्वारे गावातील प्रत्येक घरात पोहोचविण्याची एक योजना पुढे येते. त्या योजनेच्या मंजुरीसाठी ग्रामसभा बोलावली जाते. पण आयत्यावेळेला ग्रामसभेत महिलांची उपस्थिती कमी असल्याचे कारण दाखवून ही योजना मंजूर होऊ शकत नाही असा निर्णय शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. या सगळ्या कारस्थानामागे सरपंच व त्याचे बगलबच्चेच असतात. अंती नदीच्या किनाऱ्यावरील जमिनी त्या उद्योजकाच्या घशात कशा जातील यासाठी सरपंच आडूनआडून खूप प्रयत्न करत असतो. अंती नदीवर भव्य धरण बांधायची योजना व्यवहार्य नाही. त्यामुळे नदीचा प्रवाह अडून या जीवनदायिनीच्या किनाऱ्यावरील गावांत जे निसर्गसौंदर्य आहे व जीवनमान आहे ते सारे उध्वस्त होईल हे सत्य अनघा, मास्तर व त्यांच्यासारख्या काही समविचारी लोकांना पटलेले असते. ते आपल्यापरीने गावकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण ते प्रयत्न तोकडे पडताना दिसतात. पण तरीही या संकटाला दूर पळवून लावण्यासाठी योग्य तोडगा शोधायला हवाच यासाठी ते धडपडत असतात. टुरिस्ट रिसॉर्टच्या प्रोजेक्ट हेडला हे लोक जाऊन भेटतात. त्याला अंती नदीवर भव्य धरण बांधू नका अशी विनंतीही करतात. पण तो बधत नाही. त्यामुळे आता हेच गावकऱ्यांसमोर आपल्या कृतीने काही चांगले निर्माण करुन दाखविण्याच्या ध्येयाने कामाला लागतात. अंती नदीकिनारी असलेल्या नाम्या नावाच्या माणसाच्या शेतजमिनीत ते विविध पिकांचे प्रयोग सुरु करतात. अनघाने आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करुन पिकविलेल्या अनेक भाजा बाजारात विकतात. आपली शेतजमिन ही अत्यंत महत्वाची असून तिची उत्तम मशागत केली तर वर्षभर ती आपल्याला पुरेल इतके उत्पन देऊ शकते हे अंती नदीच्या किनाऱ्यांवरील गावांतल्या रहिवाशांना पटावे म्हणून हे समविचारी लोक झटत असतात. त्यासाठी अंती नदीवर छोटे छोटे बंधारे बांधण्याचा विचारही त्यांच्या मनात येतो. तसा बंधारा ते एके ठिकाणी बांधतातही पण गावकरी येऊन तो बंधारा पुन्हा उखडतात. पण अनघा, मास्तर व त्यांचे समविचारी लोक थकत नाहीत ते पुन्हा हा बंधारा बांधतात. अंती नदीच्या तीरावरील गावांमध्ये जी निसर्गसंपदा आहे त्याकडे लोकांनी आकृष्ट व्हावे म्हणून तिथे निसर्गशिबिरे, साहसशिबिरे यांचे आयोजन व्यावसायिक तत्वावर करुन त्यातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो याचीही चुणूक ते गावकऱ्यांना दाखवू इच्छितात. हे त्यांचे सारे प्रयत्न पूर्ण होतात का हा प्रश्न महत्वाचा आहेच पण त्याचे उत्तर शोधण्याचे काम दिग्दर्शकाने प्रेक्षकांवर सोडले आहे. नदी ही माणसासाठी जीवनरेखा आहे हा विचार या साऱ्या कथेतून प्रबळ होत राहातो. 
अभिनय - या चित्रपटामध्ये कोणीही नायक नाही किंवा नायिका नाही. मात्र मुख्य भूमिकेत आहे ती अंती नदी. नदी बोलू तर शकत नाही मात्र तिच्या खळाळत्या पात्राचे चित्रपटभर दिसणारे दर्शन प्रेक्षकांशी संवाद साधत राहाते. मला वाचवा आणि तुम्हीही वाचा हे या अंती नदीचे सांगणे आहे. तिचे हे मनोगत ज्यांना कळते अशी माणसे अर्थातच संख्येने कमी आहेत. पण अंती नदीचा प्रवाह निरंतर असाच वाहता राहावा म्हणून ही संवेदनशील माणसे जी धडपड करतात ती खरच हृदयस्पर्शी आहे. त्या धडपडीतूच सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम अभिनय केला आहे. पूनम शेटगांवकर (अनघा), आशा शेलार (आई), हृदयनाथ जाधव (भाऊ), अभिषेक आनंद (आकाश), जयंत गाडेकर (अप्पा नाईक), भूषण विकास (कचरे), महादेव सावंत (तुकाराम), गजानन झारमेकर (प्रकाश), विष्णुपद बर्वे (मंगेश)
वसंत जोसलकर (गुरुजी), शिव सुब्रमण्यम( प्रोजेक्ट हेड) या सगळ्या कलाकारांनी अगदी नैसर्गिक अभिनय केला आहे. कोकणातील माणसांचा भाबडेपणा, इरसालपणा, प्रयोगशीलतेबद्दल असलेला आळस, एकमेकांवर असलेले प्रेम, दुश्वास यावर आजवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकांत, चित्रपट, मालिकांत भरपूर काही दाखविले गेले आहे. पण नदी वाहते या चित्रपटात कोकणी माणसाचे टोकाला जाऊन अतिशयोक्त दर्शन घडवायचे टाळण्यात आले आहे. त्यातील माणसांचे रंग, रुप, मातीचे दर्शन हे सारे वास्तववादी आहे. त्या वास्तववादी दर्शनाला धक्का न लागेल असाच अभिनय या सर्व कलाकारांनी केल्याने चित्रपटाचे दर्शनमूल्य अधिक वाढले आहे. त्यात अजून एका व्यक्तिचा तितकाच मोलाचा वाटा आहे ती म्हणजे नीरजा पटवर्धन. नीरजा यांनी या चित्रपटासाठी उत्तम कला दिग्दर्शन केले आहे. कोकणी माणूस नेमका कसा जगतो हे त्याच्या वेशभूषेतूनही प्रतित होते. त्याचे नेमके दर्शन नीरजा यांनी घडविले आहे. 
दिग्दर्शन - संदीप सावंत हे अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक आहे हे त्यांच्या श्वास चित्रपटातून प्रेक्षकांना कळलेच होते. मुळात ते अत्यंत अभ्यासू आहेत. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय ते चित्रपट दिग्दर्शित करायला सज्ज होत नाहीत. तेही कोकणातलेच असल्याने तेथील माती, निसर्गाशी त्यांचा गहिरा संबंध आहे. अंती नदीच्या किनाऱ्यावरील गावांत राहाणाऱ्या माणसांचे भावविश्व साकारताना संदीप सावंत यांनी वास्तवदर्शनावर अधिक भर दिला आहे. संयत शैलीच्या त्यांच्या दिग्दर्शनाने सारा चित्रपट समतोल झाला आहे. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, निर्मिती ही सारी अंगे संदीप सावंत यांनीच पेलली आहेत. पण ते कोणत्याही बाबतीत कुठेही उणे पडलेले नाहीत. अंती नदी हेच चित्रपटाचे मुख्य पात्र आहे हे भान ते प्रेक्षकांना वारंवार आणून देतात. या चित्रपटाच्या चौकटींमध्ये त्यांनी अंती नदीची विविध रुपे व त्या रुपांमध्ये मिसळलेले गावातील लोक ज्या पद्धतीने साकारले आहेत त्यावरुन इतकेच म्हणता येईल की हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट झाला आहे. नदीचे तत्व व महत्व अशा पद्घतीने खूपच कमी चित्रपटांतून दिसले आहे. श्वासने मराठी चित्रपटांच्या क्षेत्रात इितहास घडविला होता. नदी वाहते हा चित्रपट मराठी चित्रपटांची आशयघनता आणखी उंचावर नेऊन ठेवेल यात शंका नाही.
संगीत - या चित्रपटात गाणी नाहीत पण चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे अतिशय प्रभावी आहे. हे पार्श्वसंगीत तुषार जयराज यांनी दिले आहे. चित्रचौकट अधिक जिवंत करण्यात हे पार्श्वसंगीत मोलाचा हातभार लावते. ते कुठेही अनाठायी वाटत नाही. या चित्रपटाचे कॅमेरामन संजय मेमाणे, संकलक नीरज व्होरालिया, सिंक साउंड व साउंड डिझाईन करणारे सुहास राणे, साउंड डिझाईन व मिक्सिंग करणारे मंदार कमलापूरकर या सर्वांच्या एकत्रित कामगिरीनेच नदी वाहते हा प्रभावी चित्रपट बनला आहे. त्यामुळे या सर्वांचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. असे उत्तम आशयाचे मराठी चित्रपट अधिक संख्येने यायला हवेत. त्यांना उदंड रसिकाश्रय लाभला पाहिजे. मराठी चित्रपट सातासमुद्रापार गेला अशा नुसत्या गप्पा मारुन उपयोग नाही, तशी कामगिरीही चित्रपटातून दिसावी लागते. संदीप सावंत यांच्या दिग्दर्शनात ती ताकद नक्कीच आहे.        http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-nadi-vahate-directed-by-sandeep-sawant-5699779-PHO.html?ref=ht

No comments:

Post a Comment