Friday, September 1, 2017

रयत शिक्षण संस्थेचा शंभर वर्षातील इतिहास कथन करणारा साकारतोय दोन खंडातील बृहदग्रंथ - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी 31 आँगस्ट 2017



दै. दिव्य मराठीच्या 31 आँगस्ट 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मूळ मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/31082017/0/5/
---
रयत शिक्षण संस्थेचा शंभर वर्षातील इतिहास कथन करणारा साकारतोय दोन खंडातील बृहदग्रंथ 
- रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षास होणार ४ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रारंभ. त्यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ करणार हा ग्रंथ प्रकाशित
- इतिहासकार डॉ. विश्वनाथ पवार हे आहेत या पुस्तकाचे लेखक
- -समीर परांजपे
मुंबई, दि. 31 ऑगस्ट -
बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हावा या उद्दिष्टाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सातारा जिल्ह्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ४ ऑक्टोबर २०१८ पासून या संस्थेच्या शताब्दीवर्षास प्रारंभ होईल. रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षातील प्रचंड कार्याचा साद्यंत इतिहास कथन करणारे `रयत शिक्षण संस्था : शताब्दी वाटचाल' हे दोन खंडातील पुस्तक इतिहासकार डॉ. विश्वनाथ पवार लिहित आहेत. हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभी प्रसिद्ध होईल.
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये डॉ. विश्वनाथ पवार हे इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासाबद्दल पुस्तक लिहिण्यासंदर्भात विश्वनाथ पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला १ डिसेंबर २०१५ रोजी एक प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव स्वीकारल्याचे पवार यांना मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी कळविले होते. रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा सविस्तर इतिहास दोन खंडांमध्ये लिहिण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या खंडात १९१९ ते १९५९ या कालावधीत रयत शिक्षण संस्थेची वाटचाल कशी झाली याचा इतिहास असेल. तर दुसऱ्या खंडात १९५९ ते २०१७ पर्यंतच्या कालावधीत संस्थेच्या कार्याचा कसा विस्तार होत गेला याचा इतिहास असणार आहे.
डॉ. विश्वनाथ पवार यांचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत व महाविद्यालयात झालेले आहे. याच शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयात ते इतिहासाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.या गोष्टींमुळेही रयत शिक्षण संस्थेच्या कार्याची पवार यांना खूप जवळून ओळख आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा अत्यंत चिकित्सक व अभ्यासकाच्या तटस्थ वृत्तीने लिहिलेला इतिहास या पुस्तकाच्या रुपाने वाचकांसमोर येणार आहे. रा. अ. कडियाळ यांनी लिहिलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने याआधी प्रसिद्ध केलेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सध्या ७१५ शाखा असून त्यात ४१ महाविद्यालये, ४५० माध्यमिक विद्यालये, डीएड, बीएड महाविद्यालये तसेच विविध प्रकारच्या शिक्षणसंस्था आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष असून डॉ. अनिल पाटील हे चेअरमन आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यावर लिहिली गेली अनेक मराठी पुस्तके
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवनचरित्र सांगणारी काही पुस्तके यापूर्वी लिहिली गेली आहेत. त्यामध्ये कर्मोपनिषद ( लेखक - बॅ. पी. जी. पाटील), कर्मवीर अण्णा ( बा. ज. पवार), माणसातील देव (प्रा. अजित पाटील), लक्ष्मीच ऋण ( प्रा. अजित पाटील) अशी अनेक महत्वाची पुस्तके आहेत. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर इंग्लिश भाषेतूनही लिखाण झालेले आहे. मात्र रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा साद्यंत इतिहास सांगणारे पुस्तक अद्यापपर्यंत एकाही प्रकाशकाने प्रसिद्ध केले नव्हते. ती उणीव आता डॉ. विश्वनाथ पवार यांच्या पुस्तकाने भरुन निघणार आहे.

No comments:

Post a Comment