Friday, September 1, 2017

विंदा करंदीकर अल्पकाळ `डोंबिवलीकर' होते त्यालाही झाली त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षात ६० वर्षे पूर्ण - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 23 आँगस्ट 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 23 आँगस्ट 2017च्या अंकात कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी प्रारंभाच्या अनुषंगाने मी केलेली ही विशेष बातमी. तिची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक, मूळ मजकूर इथे सोबत दिले आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/amr…/…/23082017/0/3/
---------
विंदा करंदीकर अल्पकाळ `डोंबिवलीकर' होते त्यालाही झाली त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षात ६० वर्षे पूर्ण
- डोंबिवलीतील सरखोतांच्या चाळीत तळमजल्यावरील खोली क्रमांक सातमध्ये होते पाच ते सहा महिने वास्तव्य
- विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षास २३ ऑगस्टपासून प्रारंभ
- समीर परांजपे
मुंबई, दि. 23 ऑगस्ट - ज्ञानपीठ पुरस्कारविजेते श्रेष्ठ कवी गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षास यंदा २३ ऑगस्टपासून प्रारंभ होत अाहे. विंदा करंदीकर हे बेळगावहून मुंबईतील माटूंगा पूर्व येथील रुइया महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, त्यावेळी ते डोंबिवली येथील सरखोतांच्या चाळीमधे १९५७ सालच्या ऑगस्ट महिन्यात राहायला आले त्या घटनेलाही या महिन्यात ६० वर्षे पूर्ण झाली. डोंबिवली पूर्व येथील टाटा पॉवर लाइन या भागात असलेली ही सरखोत चाळ पुढील एक वर्षानंतर पाडून तेथे वेदपाठशाळेची नवीन इमारत उभारली जाणार आहे. परंतू विंदांच्या वास्तव्याने बहरलेली ही वास्तू डोंबिवलीकरांच्या मात्र कायम स्मरणात राहिल.
यासंदर्भात माधवी सरखोत यांनी `दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की, सरखोतांच्या या चा‌‌‌ळीची मालकी माझी आई कुमुदिनी भालचंद्र सरखोत हिच्याकडे होती. तिने केलेल्या मृृत्यूपत्रानूसार जातपात, स्त्रीपुरुष असा कोणताही भेद न करता समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी या जागेवर वेदपाठशाळेची नवी इमारत बांधली जाईल. तिचे काम एका वर्षानंतर सुरु होईल. ही चाळ १९५२-५३ साली बांधण्यात आली होती. ही चाळ एकमजली असून त्यात तळमजल्याला ९ व पहिल्या मजल्यावर ९ अशा एकुण १८ खोल्या होत्या. सरखोत चाळीतील तळमजल्यावर खोली क्रमांक ७मध्ये विंदा करंदीकर १९५७ साली राहायला आले होते. त्यांचा या खोलीत पाच ते सहा महिनेच मुक्काम होता.
यासंदर्भात प्रख्यात स्वाक्षरीसंग्राहक सतीश चाफेकर यांनी सांगितले की, १४ मार्च २०१० रोजी विंदा करंदीकर यांचे निधन झाले. त्यानंतर आठवडाभरातच सरखोत चाळीत पूर्वी विंदा करंदीकर ज्या खोलीत राहात होते त्या चाळीच्या आवारात डोंबिवलीतील साहित्यप्रेमी नागरिकांनी एक आदरांजली सभा घेतली होती. यावेळी विंदा करंदीकर यांच्या अनेक आठवणी डोंबिवलीतील त्यांच्या परिचितांनी सांगितल्या होत्या. या कार्यक्रमाच्या वेळी विंदा करंदीकरांच्या स्वाक्षरी, हस्ताक्षराच्या प्रती तसेच त्यांच्या कवितांचे फ्लेक्स या चाळीतील ७ क्रमांकाच्या खोलीत लावण्यात आले होते.
विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर यांनी `रास' या आपल्या आत्मचरित्रात डोंबिवलीत सरखोत चाळीतल्या वास्तव्यािवषयी विस्ताराने लिहिले आहे. विंदा करंदीकर डोंबिवलीत जिथे राहायला गेले ती वास्तू सरखोतांची नवी चाळ म्हणून ओळखली जायची. सुमा करंदीकर यांची शशी जोशी नावाची पुण्याची जुनी मैत्रिण डोंबिवलीला राहात होती. शशी जोशींचे यजमान श्री. जोशी हे मुंबईच्या काॅलेजमध्ये पालीचे प्राध्यापक होते. ते विंदा करंदीकरांना ओळखतच होते. करंदीकर नव्या जागेच्या शोधात आहेत हे त्यांना समजले. त्याचवेळी डोंबिवलीत सरखोतांची नवी चाळ तयार झाली होती. या चाळीत ऑगस्ट १९५७च्या सुमारास विंदा करंदीकरांना दोन खोल्या भाड्याने मिळाल्या.
सरखोतांच्या चाळीतील दिवस...
सरखोतांच्या नव्या चाळीतील पाच-सहा महिन्यांच्या वास्तव्यात विंदा करंदीकरांना डोंबिवलीहून पहाटे उठून माटुंग्याला रुइया महाविद्यालयामध्ये सकाळी साडेसातला लेक्चर देण्यासाठी जावे लागे. डोंबिवलीत सरखोतांच्या चाळीतून पहाटे साडेपाचला कंदील घेऊन विंदा करंदीकरांना थोड्या अंतरापर्यंत सुमा करंदीकर सोबत करीत असत. तेव्हा डोंबिवलीत फारशी वीज नव्हती. इथे राहायला आल्यानंतर आठ पंंधरा दिवस पहाटे उठून, विंदा करंदीकरांना पोळीभाजी करुन देण्याचाही प्रयोग सुमा करंदीकर यांनी करुन बघितला. पण थोड्याच दिवसात तो बंद झाला. रुइया महाविद्यालयाच्या रेसिडेन्सीमध्ये विंदा दुपारचे जेवू लागले. विंदा करंदीकर रोज संध्याकाळी पाचच्या सुमारास डोंबिवलीत घरी परतत असत. असे पाच-सहा महिने गेल्यानंतर डोंबिवली येथून माहिमच्या बेडेकर सदनमध्ये विंदा करंदीकर राहायला आले व डोंबिवलीशी वास्तव्याचा संबंध संपला. पण विंदा करंदीकर कधीकाळी डोंबिवलीकर होते या भावनेने डोंबिवलीकर आजही सुखावतो...विंदांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्यावरील अनेक कार्यक्रमांनी डोंबिवलीकर त्याचा प्रत्ययही आणून देणार आहेत...
आज सरखोत चाळीत विंदाच्या प्रतिमापुजनाचा कार्यक्रम
विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त फ्रेंड्स कट्टा या संस्थेच्या वतीने 23 आँगस्ट रोजी विंदा डोंबिवलीत पूर्वी राहात असलेल्या सरखोत चाळीत त्यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. हा कार्यक्रम 23 आँगस्टला सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी अनेक सर्व विंदाप्रेमी रसिक उपस्थित राहाणार आहेत. विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फ्रेंड्स कट्टातर्फे वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment