Friday, September 1, 2017

बंदूक्या या नव्या मराठी चित्रपटाचे दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी १ सप्टेंबर २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी बंदूक्या या नव्या मराठी चित्रपटाचे १ सप्टेंबर २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण. त्याचा मजकूर, वेबपेजलिंक पुढे दिली आहे. 
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-MB-movie-review-of-ma…
---
बंदूक्या - वंचित समाजातील वेदनांचे प्रत्ययकारी चित्रण
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - बंदूक्या
--
रेटिंग - ३ स्टार
--
कलावंत - अतिषा नाईक, शशांक शेंडे, निलेश बोरसे, नामदेव मुरकुटे, अमोल बागुल, तन्मयी चव्हानके, वासंतिका वाळके
कथा/पटकथा/दिग्दर्शक - राहुल मनोहर चौधरी
पटकथा/संवाद - नामदेव मुरकुटे
संगीत – परिक्षित भातखंडे
श्रेणी - फॅमिली ड्रामा
जातपंचायतीचे वर्चस्वामुळे विविध जातीजमातीतील सामान्य माणसांवर खूप अन्याय होत असतो. या अन्यायाविरोधात दाद मागण्याची हिंमत करणाऱ्याला मनमानेल ती शिक्षा जात पंचायत देते. देशाचा कायदा वगैरे त्यांच्या लेखी नसतो. जातपंचायतीच्या या भीषण वास्तवावर थेट भाष्य करणारे चित्रपट आजवर मराठीत फारसे आलेले नव्हते. ती उणीव बंदूक्या या चित्रपटाने भरुन काढली आहे. रामनाथ चव्हाण यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. हरयाणा, पंजाब यासारख्या राज्यांमध्ये खाप पंचायतींच्या जुलमी नियमांमुळे विशिष्ट जातीजमातीतील स्त्रीपुरुषांवर जो अन्याय होत होता त्याला वाचा फुटली होती. पण महाराष्ट्रात जातपंचायतींचे जे नियम आहेत, त्याचप्रमाणे विविध जातीजमाती, आदिवासींमधील प्रथा आहेत त्यांच्या खूप खोलवर अंतरंगात शिरुन या प्रथा, परंपरांचे चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचे काम मराठीत फारसे झाले नव्हते. बंदूक्या या चित्रपटात नेमके हे चित्रण करण्यात आले आहे. केले आहे. जात पंचायतीला मूठमाती देण्यासाठी राज्य सरकारने संमत केलेल्या जात पंचायतविरोधी कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. त्यानंतर राज्यभरात हा कायदा लागू झाला. `महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण २०१६' असे कायद्याला नाव देण्यात आले. यातील दोषींना ३ वर्ष कारावासाची शिक्षा अथवा १ लाख रुपये दंड किवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागणार आहेत. या सगळ्या घटना घडत असताना दूसऱ्या बाजूला बंदूक्या या चित्रपटातून जातपंचायतींवर भाष्य करण्यात आले आहे हे या चित्रपटाचे वेगळेपण आहे.
कथा - बंदूक्या हा चित्रपट वास्तववादी घटनेवर आधारित आहे. ज्या जमातीचे चित्रण या चित्रपटात केले गेले आहे त्या जमातीचे कुठेही नाव घेतलेले नाही. ब्रिटिशांनी जन्मजात गुन्हेगार असा शिक्का मारुन या जमातीला कुंपणाआडच्या जगात बंदिस्त करुन टाकले होते. स्वातंत्र्यानंतर या जमातीची त्या कुंपणातील जगातून सुटका झाली असली तरी त्यांच्यात अनेक शतकांपासून जे रितीरिवाज चालत आले आहेत त्यापासून त्यांची अजिबात सुटका झालेली नाही. या प्रथांमुळे त्या जमातीतील स्त्रियांवर खूप मोठा अन्याय होत आहे. जात पंचायतही अशा अन्यायाला खतपाणी घालत असते. असेच एका गावाजवळचे पाल आहे. तिथे एका विशिष्ट जमातीची माणस मुक्कामाला थांबलेली असतात. त्यातील काही जण गावातील एका शेतात डुकराची शिकार करायला रात्री जातात. पण गावकरी त्यांना चोर समजून खूप मारहाण करतात. त्यात एकाचा मृत्यू होतो. त्यानंतर गावकरी या जमातीच्या लोकांना आपली पालं हलवून दुसरीकडे जाण्यासा सांगतात. या जमातीच्या लोकांचा संसार म्हणजे विंचवाच्या बिऱ्हाडासारखा असतो. पाठीवर वागविलेला संसार, आपले किडुकमिडुक घेऊन ते दुसऱ्या गावी मुक्काम हलवितात. या पालावर सुरंगी ही मध्यमवयीन बाई राहात असते. तिच्या नवऱ्याला चोर समजून असेच खूप पूर्वी एका गावातील लोकांनी ठार मारलेले असते. त्याचे शल्य तिच्या मनात असते. ती जरी हातभट्टीची दारु तयार करुन ती विकण्याचा धंदा करीत असते तरी तिने आपल्या मुलाला कधीही चोरी, दरोडेखोरी करण्यास उद्युक्त केलेले नसते. तिचा मुलगा आवल्या हा आपल्या वडिलांना ज्या प्रकारे मृत्यू आला त्याचे शल्य मनात बाळगून असतो. आपण आयुष्यात कधी चोरी करायची नाही, मेहनत करुन पैसे कमवायचे असे त्याने ठरविलेले असते. अशा सरळमार्गी आवल्याला आपली आई सुरंगीचा भाऊ डोरल्याची मुलगी तोलक ही मनातून आवडत असते. तोलकलाही आवल्या पसंत असतो. हे लक्षात घेऊन सुरंगी जेव्हा डोरल्याकडे आपल्या मुलासाठी तोलकचा हात मागायला जाते तेव्हा या समाजातील एका प्रथेचा मोठा अडसर समोर येतो. भारतीय समाजात मुलगा हा मुलीच्या वडिलांकडून हुंडा घेतो. तशी पद्धत आहे. पण बंदूक्या चित्रपटात दाखविलेल्या समाजात किंवा अशा भटक्या विमुक्तांतील काही जमातींत दयाजची प्रथा आहे. म्हणजे एखाद्या मुलाला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे त्या मुलीच्या वडिलांना त्या मुलाने दयाजच्या रुपाने विशिष्ट रक्कम द्यायची. एकप्रकारे मुलाने मुलीच्या वडिलांना हुंडा द्यायचा. असे दयाज मिळणे हा मुलीच्या वडिलांचा हक्क समजला जातो. त्याची रक्कम मुलीचे वडीलच ठरवतात. आवल्या जेव्हा तोलकशी लग्न करु पाहातो तेव्हा त्याची आई तोलकचे वडिल डोरल्याला विशिष्ट रक्कम दयाज म्हणून द्यायचे कबुल करते. त्यातील अर्धी रक्कम सुरंगी डोरल्याला देते व उरलेली रक्कम लग्नानंतर पुढील पोर्णिमेला द्यायचे कबूल करते. हे सगळे घडत असताना त्या समाजातील पालावरचा एक गुन्हेगार बंदूक्या हा कोठडीतून सुटून पालावर येतो. तो अट्टल गुन्हेगार असल्याने त्या समाजाच्या संकेतांनूसार तो जणू प्रतिष्ठीत नागरिकच आहे. त्यामुळे तो डोरल्याला काही प्रमाणात पसंत असतो. बंदूक्याचाही तोलकवर जीव जडलेला आहे. असेच एकदा दरोडा घातल्यानंतर बंदूक्या पालांवरुन काही दिवसांसाठी गायब होतो. नेमके त्याच दिवसांत आवल्या व तोलकचे लग्न होते. बंदूक्याला ही गोष्ट खूप लागते. तो तरीही तोलकला मिळवण्यासाठी प्रयत्न करीतच असतो. दरम्यान सुरंगीला पोलिस एका प्रकरणात पकडून नेतात व इतकी मारहाण करतात की ती कोठडीमध्येच मरण पावते. पण आता पंचाईत अशी होते की, सुरंगी डोरल्याला दयाजची जी उर्वरित रक्कम देणार असते ती तशीच बाकी राहाते. ती देण्याची आर्थिक ताकद आवल्यामधे नसते. त्यामुळे संतापलेला डोरल्या जात पंचायतीची बैठक बोलावतो व तिथे आवल्याविरोधात फर्याद करतो. आवल्या जितकी रक्कम डोरल्याला देणे लागतो तितकी रक्कम बंदूक्या पुढे करतो व त्या बदल्यात त्या जमातीच्या परंपरेनूसार आवल्याची बायको तोलक ही बंदूक्याकडे गहाण राहाते. जोपर्यंत आवल्या बंदुक्याकडून उधार घेतलेले सर्व पैसे फेडत नाही तोपर्यंत तोलक बंदूक्याकडेच राहाणार असा निर्णय जात पंचायतीतील पंच पूर्वापार नियमांच्या हवाल्याने देतात. आवल्या यामुळे खूप व्यथित होतो. ही रक्कम लवकर देता यावी म्हणून तो एका दरोड्यातही सामील होतो पण तो व त्याचे सहकारी पकडले जातात. सरतेशेवटी खूप मेहनत करुन पैसे गोळा करुन ते सारे बंदूक्याला देऊन तोलकची त्याच्या कचाट्यातून मुक्तता करण्याचा निर्धार आवल्या करतो. या वळणावर हा चित्रपट येऊन ठेपल्यावर काही प्रश्न निर्माण होतात. आवल्या बंदूक्याकडून उधार घेतलेले सर्व पैसे फेडून तोलकची सुटका करण्यात यशस्वी होतो का? दयाजच्या प्रथेपायी डोरल्या आपली मुलगी तोलकच्या संसाराची राखरांगोळी करतो. त्या कृत्याबद्दल डोरल्याला पश्चाताप होतो का? बंदूक्याला काही उपरती होते का? सरळमार्गी आवल्या आपल्या जमातीतील वाईट प्रथांविरुद्ध बंड करतो का? या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा चित्रपट पाहायलाच हवा.
अभिनय - हा सारा चित्रपट फिरतो ते बंदूक्या या पात्राविषयी. ही भूमिका नामदेव मुरकुटे यांनी साकारली आहे. बंदूक्यामधील खतरनाक गुन्हेगार, त्याचे नशापाणी, त्याचे रंगेल व रगेल असणे हे सारे पैलू नामदेव यांनी उत्तम साकारले आहेत. त्यासाठी त्यांना त्यांच्या आवाजाची जोड छान मिळाली आहे. आवल्याच्या भूमिकेत निलेश बोरसे व तोलकच्या भूमिकेत वासंतिका वाळके यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. यामध्ये सुरंगीच्या भूमिकेत अतिषा नाईक व डोरल्याच्या भूमिकेत शशांक शेंडे आहेत. अतिषा व शशांक हे दोघे या चित्रपटातील असे चेहरे जे प्रेक्षकांना अधिक माहित आहेत. या दोघांनी आपल्या भूमिका अतिशय समंजसपणे केल्या आहेत. त्याशिवाय अमोल बागुल (चित्या), तन्मयी चव्हाणके (शिंडी) यांच्या व अन्य कलाकारांच्या भूमिकाही बऱ्या वठल्या आहेत. या चित्रपटांत बहुतेक कलाकार नवीन आहेत पण विशिष्ट जमातीची पालं, त्यांची भाषा, जीवनपद्धती या साऱ्यांचे चित्रण पडद्यावर दाखविताना ते तंतोतंत तसे यावे म्हणून दिग्दर्शकाने या कलाकारांकडून घोटवून अभिनय करवून घेतला आहे. त्यामुळेच हा चित्रपट आशयप्रधान झाला आहे. 
दिग्दर्शन - विशिष्ट जमातीची गोष्ट घेऊन त्यावर चित्रपट करणे हे व्यावसायिकदृष्ट्या धाडसच होते. कारण असे चित्रपट प्रेक्षक स्वीकारतील का याची काही शाश्वती नसते. रामनाथ चव्हाण यांच्या एका कथेचा विस्तार करुन राहुल मनोहर चौधरी या दिग्दर्शकाने बंदूक्या हा चित्रपट बनविला. ही वेगळी वाट चोखाळल्याबद्दल त्याचे सर्वात आधीअभिनंदन. बंदूक्या चित्रपटाचा पूर्वार्ध हा अतिशय वेगवान आहे पण उत्तरार्धात हा चित्रपट काहीसा रेंगाळतो. दयाज देण्यासाठी उधार घेतलेले पैसे फेडण्याकरिता आवल्या जी मेहनत करतो तो भाग विस्कळीत झाला आहे. विशिष्ट जमातीचे चित्रण करताना त्यांची पाले, जीवनशैली, बोली याचे जे बारकावे चित्रपटात यायला हवेत ते सारे दिग्दर्शक राहूलने बरोबर टिपले आहेत. हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. काही ठिकाणी दिग्दर्शनातला नवथरपणा चित्रपटात स्पष्टपणे दिसतो हे मान्य पण त्यामुळे चित्रपटाच्या आशयाला धक्का लागत नाही, तो फार भरकटतही नाही हाही एक प्लस पॉइंट आहेच की. खास "जुंदरी झटका' म्हणून स्वतंत्र ओळख असणारी जुन्नर भागातली निखळ विनोदी भाषा या चित्रपटातून प्रथमतःच महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर आली आहे. अभिनेता निलेश बोरसे यांचं चित्रपट क्षेत्रात प्रथम पदार्पण असल्याने मराठी सिनेसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. बंदूक्या चित्रपटाने ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या पुरस्कारांमुळे या चित्रपटाची उंची नक्कीच वाढली आहे. दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरीच्या दिग्दर्शनाला ही मिळालेली पावती आहे.
संगीत - बंदूक्या चित्रपटाला परिक्षित भातखंडे यांनी संगीत दिले असून त्यातील गाणी गुरु ठाकूर व नामदेव मुरकुटे यांनी लिहिली आहेत. नामदेव मुरकुटे यांनी लिहिलेले `माझा ईर' हे गाणे जुंदरी झटक्याचा प्रेक्षकांना अनुभव देईल. हे गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे. या चित्रपटातील गाणी जावेद अली, महालक्ष्मी अय्यर, आदर्श शिंदे यांनी गायली आहेत. पण ती गाणी सुश्राव्य झाली आहेत असे मात्र मुळीच नाही.
-----

No comments:

Post a Comment