Sunday, September 3, 2017

मराठी पुस्तकांतून होणारे गणेशदर्शन - समीर परांजपे


मराठी पुस्तकांतून होणारे गणेशदर्शन
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
गणपती ही विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध आहेच. त्याचप्रमाणे संकटनिवारक देवता म्हणूनही गणेशाचे पूजन केले जाते. घरात, सार्वजनिक ठिकाणी कुठेही मंगलकार्य असो किंवा प्रकल्पाचे उद्घाटन तसेच शीलान्यास अथवा अनावरण त्या कार्यक्रमाच्या आरंभी `श्री गणेशाय नम: ' अवश्य म्हटले जातेच. गणेशाची पूजा करुन कोणत्याही कार्याला आरंभ करणे हे त्यामु‌ळे ओघाने आलेच. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणशोत्सवाची सुरुवात केल्यानंतर गणपती या विषयावर मराठीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले गेले. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासून गणेशपूजा, गणेशस्तवन, गणेशोत्सवावरील नवी मराठी पुस्तके, तसेच या विषयांवरील जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या बाजारात विक्रीसाठी येऊ लागतात. मराठीमधे जितकी पुस्तके गणपतीवर लिहिली गेली तितकी ती कोणत्याच देवतेवर लिहिली गेली नसावीत.
गणेशावर पूर्वीपासून विविध प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले आहेत. यासंदर्भात एका नियतकालिकात दिलेल्या माहितीनूसार `गणेश गीता नावाचा एक ग्रंथ आहे. तो जवळपास भगवद्गीतेसारखाच आहे. फक्त श्रीकृष्णाऐवजी गणेश असे नाव घालण्यात आलं आहे. त्याशिवाय याखेरीज गणपति पूजा, गणपती पंत्र विधान, गणपति मानसपूजा, गणपति रत्नप्रदीप, गणपति रहस्य, गणपति सूक्त, गणपति स्तवराज, गणेश महात्म, गणपती कवच, गणपती पंचरत्न, गणपति पंचांग, गणपति पंचावरण स्तोत्र (शंकराचार्यकृत), गणपतीपुराश्चरणाविधी,गणपति पूजा इत्यादी अनेक गणेश पूजनाचे ग्रंथ आहेत. आनंदतीर्थांनी लिहिलेला `शंकर दिग्विजया' हा ग्रंथ दहाव्या शतकातला असण्याची शक्यता आहे.
देवनागरी लिपीची निर्मिती गणेशाने केली असा एक समज आहे. व्यास सांगत असलेल्या महाभारताचे लेखन गणेशाने केले अशीही कथा आहे. अमरेंद्र गाडगीळ यांच्या गणेशकोशात या देवतेची सविस्तर माहिती आहे. प्रा. स्वानंद पुंड यांची गणपतीवरील पुस्तके अप्रतिम आणि माहितीपूर्ण आहेत. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले `बाप्पा मोरया' हे गणपतीवरील मराठी पुस्तक महत्वाचे मानले जाते. या पुस्तकात छत्रपती संभाजीराजांचे खड्या हिंदीतील कवन आणि स्वा. सावरकरांचे गणेशावरील काव्य यांचा समावेश आहे. आबालवृद्धांसाठी अर्थासहित 'अथर्वशीर्ष' दिले आहे. आद्य शंकराचार्यांची श्रीगणेश पञ्चरत्नं आणि गणेश भुजङ्गम् ही स्तोत्रे अर्थासहित दिलेली आहेत. 
गणेश ही विद्येची देवता असल्याने डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून दोन वर्षांपूर्वी ‘वाचाल तर वाचाल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना मिळावी हा हेतू होता. यावेळी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सवात त्यावर्षी गणेशोत्सवातील देखावा म्हणून सुमारे आठ हजार पुस्तकांपासून इग्लू साकारण्यात आला होता. 
ज्योर्तिभास्कर जयंतराव साळगावकर यांनी गणेश या दैवताचा इतिहास, स्वरुप, प्रसार याबद्दल विवेचन करणारे देवा तूचि गणेशु हे पुस्तक लिहिले आहे. त्याशिवाय विविध १९९५-१९९९ या कालावधीत देवाचिये व्दारी या स्तंभात त्यांनी लििहलेल्या गणेशावरील लेखांच्या संकलनातून दूर्वाक्षरांची जुडी हे पुस्तक तर गणेशावरील लेख व गणपती या विषयावर साळगावकर यांनी दिलेल्या मुलाखती यांचे संकलन करुन गणाधीश जो इश हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला. ही तीनही पुस्तके गणपतीचे मर्म समजून घेण्यासाठी वाचणे आवश्यक आहे. यातील एका पुस्तकात गणेशाची थोरवी सांगताना ज्योर्तिभास्कर जयंतराव साळगावकर यांनी म्हटले आहे की, `मानवी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आणि आवडीच्या वाटतात, त्या सर्व गोष्टींमध्ये रमणारा देव म्हणजे गणपती. गणपती हा गोडधोड खाणारा आहे. त्याला "लाडू मोदक अन्ने परिपूर्ण पात्रे' प्रसन्न करतात. तो मोजकेच का होईना, पण अंगावर दागिने घालतो. पण असे असले तरी तो सुखासीनतेत रमणारा देव नाही. वेळप्रसंग घडला तर तो हातातील शस्त्रांचा उपयोग करायला मागेपुढे पाहात नाही. तो देवांचा सेनापतीही आहे. असे सांगतात की, २१ शिपायांचा एक गट असे २१, पुन्हा या २१ गटांचा एक मोठा गट असे २१ मोठे गट अशा पद्धतीने गणपतीने आपले सैन्य उभारले आणि सैन्याच्या अशा स्वरुपाची रचना आजही केली जाते. गणपती सेनापती म्हणून इतका श्रेष्ठ आहे की तो रणांगणात कधीही हरलेला नाही. तो निरंतर अजेय आहे. बरे, असे असूनही तो केवळ लढणारा शिपाई गडी नाही. त्याला नृत्य, नाट्य, गायन अशा कलांमध्ये विशेष रस आहे. "गणराज रंगी नाचतो' असे आपण कौतुकाने म्हणतो. सिद्धि - बुद्धि अशा दोन पत्नी निरंतर त्याच्यासोबत असतात. वादविवादात, लढाईत जिंकायचेच अशा निष्ठेने तो वावरतो. आपण लढाईत कमी पडू अशी शंका आली तर कपटाचा डाव मांडण्यासही तो मागेपुढे पाहात नाही. गणेशाचे हे स्वरूप म्हणूनच आपल्याला विलोभनीय वाटते आणि त्यामुळेच गेली काही हजार वर्षे आपण मनोभावे त्याचे पूजन करीत आलो आहोत आणि त्याबरोबरच त्याच्यावर मनापासून प्रेमही करीत आलो आहोत.'
गणेश मंदिरांवर देखील काही मराठी पुस्तके निघाली आहेत. पुण्याची ग्रामदेवता गणपती आहे. मंगल कार्याच्यावेळी कसबा गणपतीचे दर्शन घेण्याची प्रथा रूढ आहे. पेशव्यांची आराध्यदेवताही गणपतीच होती. तळ्यातील गणपती, दशभुजा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ही पुणेकरांच्या भक्तीची स्थाने आहेत. त्रिशुंडया गणपती, रमणा गणपती,फडके गणपती, गणेशखिंडीतील पार्वतीनंदन यांना पुण्याच्या भावविश्वात वेगळे स्थान आहे. पुण्यातील अशा सुमारे साठ गणेशस्थानांची एकत्रित माहिती मंदार लवाटे यांनी `पुण्यातील गणपती मंदिरे' या छोटेखानी पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक देखील वाचकप्रिय आहे. 'तानापिहिनिपाजा' या द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात `गणपती आणि गणेशोत्सवातल्या सुपाऱ्या' हा माहितीपर लेख अनेकांना भावून जातो. मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे गिरगाव येथील केशवजी नाईक यांच्या चाळीतील गणेशोत्सव. १८९३ साली त्याची सुरुवात झाली. यंदा या गणेशोत्सवाने १२५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. केशवजी नाईक चाळीच्या गणेशोत्सवाला १९९३ साली शंभर वर्षे पूर्ण झाली त्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव : शतकाची वाटचाल हे अतिशय माहितीपूर्ण पुस्तक प्रसिद्ध केले होते. २५२ पानांचे हे पुस्तक असून त्यामध्ये गणेशोत्सवाचे प्राचीन काळापासूनचे स्वरुप, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु केला त्यामागच्या प्रेरणा, मुंबईतील गणेशोत्सव, गणेशोत्सवातील मेळे, गणेशोत्सवाचे सामाजिक, धार्मिक, राजकीय परिणाम अशा विविध अंगाने या उत्सवाचा जो विचार अनेक मान्यवरांनी, संशोधकांनी आपल्या लेखांतून केला ते लेख संकलित करुन हे पुस्तक तयार झाले आहे. गोविंद तळवलकर, मृणालिनी देसाई, अरुण टिकेकर, रवींद्र रामदास, ब. ना. जोग, यशवंत पाठक, अशोक रानडे, जयंत साळगावकर, प्रकाश कामत, प्रा. जे. व्ही. नाईक अशा लेखकांचा यात समावेश आहे. तो गणेशोत्सवावरील उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. लोकमान्य टिळकांनी १८९४, १८९५, १८९६ या कालावधीत केसरीमधून गणेशोत्सवावर जे अग्रलेख लिहिले त्यांचे संकलनही या पुस्तकात आहे. कोणत्याही पुस्तकांच्या दुकानात गणेशस्तवन, अथर्वशीर्षाच्या पुस्तकांची, गणेशोत्सवातील आरत्या यांची जी सतत विक्री सुरु असते तो भाग निराळाच आहे. विद्येची देवता असलेल्या गणेशावर लिहिल्या गेलेल्या मराठी पुस्तकांचे ओझरते दर्शन हे असे आहे.
---

No comments:

Post a Comment