Tuesday, August 22, 2017

आरती या नव्या मराठी चित्रपटाचे मी दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी दि. 19 आँगस्ट 2017 - समीर परांजपे

आरती या नव्या मराठी चित्रपटाचे मी दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी दि. 19 आँगस्ट 2017 रोजी केलेले परीक्षण. त्याची ही लिंक व मजकूर.                                        http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-aarati-5673859-PHO.html
---
आरती - असीम त्यागाच्या लोकविलक्षण गोष्टीची सरधोपट मांडणी
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - आरती
--
रेटिंग - २.५ स्टार
--
कलावंत - अंकिता भोईर, रोशन विचारे, उमेश दामले, आसावरी असूडकर, सपना कारंडे, प्रियांका करंदीकर,सुप्रित कदम, तृप्ती गायकवाड, आशुतोष दीक्षित, आर जे रिया, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे, राधिका देशपांडे, विनोद सिंग.
पाहुण्या कलाकार - वहिदा रेहमान
निर्माती /दिग्दर्शक /कथा - सारिका मेणे
संवाद - प्रभाकर भोसले
संगीत – प्रशांत सातोसे व सुजित -तेजस
श्रेणी - फॅमिली ड्रामा
वास्तववादी घटनांवर आधारित चित्रपट बघताना एक वेगळा दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखांमध्ये कुठेही काल्पनिक रंग मिसळलेला असला किंवा अवास्तव वाटणारे पदर त्या भूमिकेला असले तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. वास्तववादी घटनांवर आधारित असा दावा करत बनविलेले जाणारे काही चित्रपट इतके भीषण असतात की ते िचत्रपट पाहाणेही अंगावर काटा आणणारे असते. अशा बऱ्याच चित्रपटांची उदाहरणे देता येतील. पण त्या विषयात न जाता आरती या चित्रपटाबद्दल जाणून घेऊ. आरती या मुलीला झालेल्या अपघातानंतर ती मानसिक व शारिरिकदृष्ट्या संपूर्ण विकल झाली. ती संपूर्णपणे परावलंबी झाली. तिला तिच्या अस्तित्वाची फार जाणीवही राहिली नव्हती. असा स्थितीत तिच्या प्रियकराने तिची जीवापाड काळजी घेतली. एक दोन दिवस नव्हे तर काही महिने. तिच्या शुश्रुषेत तो रात्रंदिवस मग्न झालेला होता. त्याचे सारे जग आता आरतीची देखभाल हेच झाले होते. आजच्या काळात जिथे सख्खा भाऊ आपल्या भावाला विचारत नाही, तिथे केवळ प्रेमाच्या नात्याने प्रियकर आपल्या अपघाताने विकल झालेल्या प्रेयसीची इतकी काळजी वाहातो ही कहाणीच लोकविलक्षण आहे. 
कथा - आरती या चित्रपटाची दिग्दर्शिका सारिका मेणे हिचा सख्खा भाऊ सनी पवार व सनीची मैत्रिण आरती मकवाना यांची वास्तव कथा आरती या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. २००६ सालची गोष्ट अाहे. आरती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे सहलीला गेली होती. ती ज्या गाडीतून प्रवास करत होती त्या गाडीला अपघात झाला. त्यात पुढच्या सीटवर बसलेल्या आरतीच्या मेंदूला मार लागला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर काही वेळ पुन्हा शुद्धीत आली. सनी व त्याच्या घरच्यांना आरतीच्या अपघाताबद्दल कळताच ते तातडीने भाईंदरला धावले. तिथे स्थानिक रुग्णालयात आरतीवर उपचार सुुरु असताना आरती परत कोमात गेली. तिला जसलोक रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे ती सहा महिने कोमात होती. त्यावेळी सनी पवार हा रात्रंदिवस तिच्यासोबत होता. आरतीची मनोभावे शुश्रूषा करुन मैत्रीचे नाते निभावत होता. ती कोमातून त्यानंतर बाहेर आली तेव्हा तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता. आरतीची अवस्था दोन वर्षांच्या बाळासारखी होती. अशा अवस्थेत ती सुमारे साडेतीन वर्ष जगली. त्या सर्व काळात सनी पवार तिच्या सोबत सावलीसारखा राहिला. आरतीवर उपचार चालू असताना तिच्या स्थितीबद्दल व तिची मनोभावे शुश्रूषा करणारा तिचा प्रियकर सनी या दोघांबद्दल वृत्तवाहिन्यांवरुन व वृत्तपत्रांतून बातम्या झळकल्या. त्यातून असंख्य व्यक्ती व संस्थांकडून आर्थिक मदत मिळून आरतीवर एक मोठी शस्त्रक्रिया होऊ शकली. त्यानंतर तिला काही काळाने रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. त्यानंतरही अारतीची खूप काळजी सनी पवार घेत होता. या सगळ्या कालावधीत सनी पवारचे शिक्षण थांबलेले होते. अखेर आरतीची आई व सनीचे आई-बाबा, कुटुंबातील इतर सदस्यांनी सांगितल्यामुळे तसेच समाजसेवा हेच आपले आयुष्य जगण्याचे ध्येय असल्याचे लक्षात आल्याने सनी पवारने एमएसडब्ल्यूला प्रवेश घेतला. समाजसेवेचा हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करुन सनी पवारने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यालाच वाहून घेतले. आरतीच्या तब्येतीत काहीही सुधारणा होण्याची शक्यता नाही असे डॉक्टरांनी सनी पवारला स्पष्टपणे सांगितलेच होते. त्याप्रमाणे आजाराशी झुंजत असलेली आरती एक दिवस मरण पावली. आरतीच्या आजारपणाच्या साडेतीन वर्षात सनी पवारने एक प्रियकर, एक मित्र म्हणून त्याग केला तो अलौकिकच होता. आरती मकवाना व सनी पवारमध्ये जे सच्चे प्रेम होते त्याची गाथा म्हणजे हा चित्रपट आहे.
अभिनय - हा चित्रपट जिच्या भोवती फिरतो ते पात्र म्हणजे आरती. आरतीची भूमिका अंकिता भोईर हिने केली आहे. हा अंकिताचा पहिलाच चित्रपट. रोशन विचारे हा सनी पवारच्या भूमिकेत आहे. ही दोन्ही मुख्य पात्रे अभिनयक्षेत्रात अगदी नवखी आहेत. आणि ते त्यांच्या कामातूनही स्पष्टपणे जाणवते. सनी पवारच्या वडिलांचे काम केलेले उमेश दामले हे एकमेव कसलेले कलाकार या चित्रपटात आहेत. त्यांच्या कामातून ते स्पष्टपणे जाणवते. नाजनीनची भूमिका केलेली राधिका देशपांडे हिची अभिनयाची चांगली समज तिच्या कामातून लक्षात येते. आसावरी असूडकर (सनीची आई), सपना कारंडे (आरतीची आई ), प्रियांका करंदीकर (सानिका ) सुप्रित कदम (जयेश), तृप्ती गायकवाड (दिपाली), आशुतोष दीक्षित (अमित), आर जे रिया (आरतीची बहीण) सुजित यादव (मॅडी), तेजस बने (तेजस), मेघाली जुवेकर (जुही), प्रांजली वर्मा (बबली) कांचन पगारे (शेजारचे काका), विनोद सिंग (डॉ. राजपाल) या सर्व कलाकारांचा अभिनय फारच प्राथमिक दर्जाचा झाला आहे. हौशी रंगभूमीवर काम करणारे कलाकार ज्या पद्धतीने काम करतील त्याप्रमाणे या सर्वांची कामे झाली आहेत. अभिनयाचा उच्च दर्जा वगैरे या चित्रपटात अपेक्षित करु नये. या चित्रपटात ख्यातनाम अभिनेत्री वहिदा रहेमान पाहुण्या कलाकार म्हणून झळकल्या आहेत. आरतीच्या आजाराची व तिच्यावर सुरु असलेल्या उपचारांकरिता आर्थिक मदत गोळा करण्याची जी सनी पवारची धडपड सुरु होती त्याची माहिती वहिदा रहेमान यांना वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून ती मिळाली. त्यांनी सनी पवारला दूरध्वनी करुन अारतीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली पण आपण कोण बोलतोय हे वहिदा रहेमान यांनी सनी पवार कधीही कळू दिले नाही. वहिदा रहेमान यांच्याकडून नियमितपणे आरतीवरील उपचारांसाठी विशिष्ट आर्थिक मदत मिळत होती. आरतीचे निधन झाल्यानंतर वहिदा यांना खूपच वाईट वाटले. त्यांनी ज्यावेळी गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी मिनिम ही संस्था सुरु केली त्यावेळी त्यांनी आवर्जून सनी पवारला मदतीसाठी आपल्या सोबत घेतले. सनी पवार व आरती यांच्यावर आरती हा मराठी चित्रपट बनविण्यास वहिदा रहेमान यांनीच िदग्दर्शिका सारिका मेणे िहला प्रोत्साहन दिले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रारंभीच वहिदा रहेमान या चित्रपटाविषयी दोन मिनिटे प्रेक्षकांशी हितगुज करतात. तसेच गरजू लोकांना मदत करण्यासाठी वहिदा रहेमान यांनी जे मिनिम फाऊंडेशन सुरु केले आहे त्या फाऊंडेशनने आरती हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. एखाद्या मराठी चित्रपटात वहिदा रहेमान दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या दोन मिनिटेच पडद्यावर दिसतात पण त्या अल्पकाळातही सारा पडदा व्यापून टाकतात. 
दिग्दर्शन - आपला भाऊ सनी व त्याची मैत्रिण-प्रेयसी आरती यांच्या अतुट प्रेमाचीच वास्तववादी कहाणीच पडद्यावर साकारायची असल्याने सनीची बहिण व या चित्रपटाची दिग्दर्शिका सारिका मेणे हिच्याकडून उत्तम दिग्दर्शनाबाबत खूप अपेक्षा असणे साहजिकच आहे. या साऱ्या घटनेचे बारीकसारीक तपशील सारिका मेणे हिला माहित असल्याने ती कथा पडद्यावर मांडताना ती त्यातील प्रत्येक पात्र अत्यंत उत्तमपणे उभे करेल असे वाटले होते. पण या चित्रपटात उमेश दामले वगळता बहुतांश नवोदित कलाकार घेतल्याने अभिनयाचा दर्जाला पहिला फटका बसला. या चित्रपटाचा मध्यंतराआधीचा भाग हा खूपच विस्कळीत आहे. उत्तरार्धात आरतीच्या आजारपणाची सारी गाथा आहे. तिच्या उपचारांसाठी सनीची चाललेली धावपळ, त्याची आरतीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळविण्याकरिता चाललेली घालमेल हे सारे प्रसंग उत्तरार्धात असल्याने तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पण तरीही संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड अजिबात घेत नाही. याचे कारण दिग्दर्शनातही खूपच नवखेपणा आहे. आरतीचा आजार व सनीची धडपड या घटकांना पडद्यावर योग्य न्याय देण्यात सारिका मेणे दिग्दर्शक म्हणून कमी पडल्या आहेत. या चित्रपटाचे संवादही खूपच ढोबळ आहेत. ते म्हणताना बऱ्याच कलाकारांच्या चेहेऱ्यावर निर्जिव भाव असतात. त्यामुळे एका भावनाशील चित्रपटातील भावनाच संकोचल्या आहेत. 
संगीत - या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू काय असेल तर ते या चित्रपटाचे संगीत. प्रशांत सातोसे, तसेच सुजित-तेजस जोडगोळीने या चित्रपटासाठी जी गाणी केली आहेत ती सगळीच्या सगळी श्रवणीय आहेत. ही गाणी सुजित यादव, तेजस बने यांनी लिहिली आहेत. तर हरिहरन, दिपाली साठे, आदर्श शिंदे, प्रशांत सातोसे, सुजित यादव यांनी ती गायली आहेत. आरती चित्रपटाची सारी गाणी स्वतंत्रपणे ऐकली तर ती कानसेनांना नक्कीच आवडतील. प्रशांत सातोसे, तसेच सुजित-तेजस या संगीतकारांच्या भविष्यातील वाटचालीकडे यापुढे रसिकांचे नक्कीच लक्ष राहिल.

No comments:

Post a Comment