Friday, September 1, 2017

उबुंटू, अनान,`फुर्र', बंदूक्यासारख्या आडवळणी शीर्षकांनी मराठी चित्रपटांचे प्रेक्षक पडले कोड्यात! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 29 आँगस्ट 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 29 आँगस्ट 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही बातमी. या बातमीचा मूळ मजकूर व जेपीजी फाइल व वेबपेज लिंक सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/b…/251/29082017/0/5/
---
उबुंटू, अनान,`फुर्र', बंदूक्यासारख्या आडवळणी शीर्षकांनी मराठी चित्रपटांचे प्रेक्षक पडले कोड्यात!
ग्रामीण भागाशी नाळ जोडणारी नावे चित्रपटांना देण्याचा अवतरलाय प्रवाह
- समीर परांजपे
मुंबई, दि. २९ आॅगस्ट - मराठी चित्रपट अधिकाधिक आशयघन होत चालले आहेत अशी चर्चा असताना गेल्या चार पाच वर्षांत त्यातील काही चित्रपटांना ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणारी नावे दिली गेल्याने शहरी प्रेक्षकांना ती आडवळणी नावे वाटत आहेत. गेल्या वर्षी `फुंतरु' नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला होता, त्या शीर्षकाचा अर्थ तरुण पिढीतील बऱ्याच लोकांना माहित होता मात्र मध्यमवयीन प्रेक्षकांना त्या नावाचा चित्रपट बघितल्यानंतरच थोडाफार उलगडा झाला होता. आता उबुंटू, अनान, फुर्र, बंदूक्या या शीर्षकांचे मराठी चित्रपट येऊ घातले असून त्या नावांनीही प्रेक्षकांना नवे कोडे घातले आहे.
`फुर्र ' या मराठी चित्रपटाची निर्मिती अॅफरॉन एन्टरटेन्मेन्ट ही संस्था करत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील याचे आहे. `चौर्य ' या त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. पाखरे फुर्र उडून गेली असे म्हटले जाते. पण त्या शब्दाचा हा अर्थ हा काही या चित्रपटाचा विषय नाही. `फुर्र' हा नेहमीच्या पठडीतला चित्रपट नाही . प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना यात संवेदनशील पद्धतीने आणि त्याला विनोदाची झालर चढवून मांडल्या आहेत. वायझेड, डिस्को सन्या, इथे मेंदू धुवून मिळेल, मर्डर मेस्त्री, बाबुराव ग्रॅज्यूएट, एफयू या अलीकडे येऊन गेलेल्या मराठी चित्रपटांची नावे त्यातल्या त्यात कळणारी पण तरीही कोड्यातच पाडणारी होती.
दरम्यान `शाळा’, ‘आजोबा’ या दोन चित्रपटांनंतर सुजय डहाके ‘फुंतरु’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. फुंतरु हा हा एक सायन्स फिक्शन चित्रपट होता. ‘फुंतरू’ मध्ये केतकी माटेगावकरसह बालक-पालक’मधल्या भाग्याची भूमिका साकारणारा अभिनेता मदन देवधर झळकला होता. या चित्रपटातून केतकी आणि मदन हे दोघे अनाया आणि विरा या व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या दोघांच्याही लूकमध्ये त्यांच्या भूमिकेनुसार विशेष बदल करण्यात आले होते. मात्र फुंतरुला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नाही.
नागनाथ मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट या चित्रपटाचे नावही शहरी प्रेक्षकांच्या पटकन अंगवळणी पडले नव्हते. सैराट या चित्रपटाने सुमारे ९० कोटीहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला. त्यातील परशा व आर्चीच्या कहाणीने शहरी, ग्रामीण भागातील प्रेक्षकांना विलक्षण मोहिनी घातली. या लोकप्रियतेत सैराट शब्दाचा अर्थ काय असे विचारणारे मात्र या लोकप्रियतेच्या लाटेत वाहून गेले. सैराट हा शब्द मराठीत प्रथम समीक्षक रा. ग. जाधव यांनी दादा कोंडके यांच्या संदर्भात वापरला होता. सैराट शब्दाचा उगम स्वैर शब्दामध्ये आहे. स्वैर म्हणजे स्वच्छंदी असाही अर्थ होतो. मोकळा या शब्दापासून जसे मोकाट हा शब्द बनला तसेच स्वैर शब्दापासून सैराट शब्द बनल्याचे मानले जाते. मात्र उच्चभ्रू समाजात सैराट हा शब्द जास्त प्रचलित नाही. त्यामुळे सैराट या नावाविषयी काहीशी उत्सुकता व अनभिज्ञताही होती. नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेला २०१३ साली आलेला फँड्री या दोन मराठी चित्रपटांची नावे देखील फारशी परिचयाची नसल्याने त्या नावांचा नेमका अर्थ काय याविषयी हे चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत उत्सुकता ताणली गेली होती.
भाऊराव कऱ्हाडे लिखित व दिग्दर्शित ख्वाडा हा मराठी चित्रपट २०१५ रोजी झळकला. धनगरी समाजाचे जगणं मांडणाऱ्या या चित्रपटाचे ख्वाडा हे शीर्षक शहरी प्रेक्षकांना चटकन कळले नाही. ग्रामीण भागात ख्वाडा चे वेगवेगळे अर्थ आहेत ते म्हणजे अटकाव / अडथळा येणे. कुस्तीचा डाव जो सोडविता येणे मुश्किल आहे आणि एक अर्थ मुळापासून उखडून टाकणे. ख्वाडाप्रमाणेच उर्फी या चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ काय यावरही प्रेक्षक डोके खाजवत आहेत. उबुंटू, अनान या आगामी मराठी चित्रपटांच्या शीर्षकांनी घातलेले अर्थाचे कोडे येते काही दिवस मराठी प्रेक्षक सोडवत बसणार असे चित्र अाहे.
`पुढचं पाऊल'चे केले `सासूबाई मला मारु नका!'
विनय नेवाळकर यांची निर्मिती असलेल्या व राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेला पुढचं पाऊल हा चित्रपट १९८८मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट इस्लामपूरमध्ये एका चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याआधी त्या चित्रपटगृहाच्या मालकाने परस्पर या चित्रपटाचे नाव पोस्टरवर बदलून टाकले ते म्हणजे सासूबाई मला मारु नका! हे नाव का बदलले असे विचारल्यावर या चित्रपटगृहाच्या मालकाने निर्मात्याला सांगितले `पुढचं पाऊल हे नाव तुमच्या पुण्या-मुंबईला चालेल पण आमच्या इथे नाही. पुढच पाऊल नावाने हा चित्रपट लावला असता तर इस्लामपूरच्या एकाही माणसाने चित्रपटगृहात पाऊल ठेवले नसते! ' हे ऐकून चित्रपट निर्माते अवाक झाले...

No comments:

Post a Comment