Friday, September 1, 2017

१२५व्या वर्षात यंदा पदार्पण केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा साधेपणा कायम - - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी. 25 आँगस्ट 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 25 आँगस्ट 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. त्या बातमीचा मूळ मजकूर, तिची जेपीजी फाइल व वेबपेज लिंक सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/25082017/0/4/
-----
१२५व्या वर्षात यंदा पदार्पण केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा साधेपणा कायम
- केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव मंडळाने आयोजिले सामाजिक उपक्रम
- गिरगावातील ब्राह्मण सभेच्या गणेशोत्सवाच्या शतकमहोत्सवी वर्षास यंदा प्रारंभ
- समीर परांजपे
मुंबई, दि. 25 ऑगस्ट - लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला त्यातून प्रेरणा घेऊन गिरगावमधील केशवजी नाईक चाळीतील रहिवाशांनी १८९३ साली गणेशोत्सव सुरु केला. हा मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव असून त्याचे यंदा १२५वे वर्ष आहे. गिरगावमधील ब्राह्मण सभेच्या गणेशोत्सवाच्या शतकमहोत्सवी वर्षास यंदा प्रारंभ झाला आहे. या दोन्ही ठिकाणी नेहमी अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा होतो तसाच माहोल यंदाही असणार आहे. मुंबईत एकाबाजूला नवसाचे गणपती कोणते याची चढाओढ बऱ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत सुरु असताना या दोन गणेशोत्सव मंडळांचा भर सामाजिक कार्यावरच आहे हे अतिशय मोलाचे आहे.
केशवजी नाईक चाळीत श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवाला लोकमान्य टि‌‌ळकांनी १ ६ सप्टेंबर १९०१ रोजी भेट दिली होती. या गणेशोत्सव संस्थेचे विद्यमान विश्वस्त विनोद सातपुते यांनी सांगितले की, आमच्या गणेशोत्सवाच्या १२५व्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांनी प्रख्यात चित्रकार अच्युत पालव यांनी आमच्या गणेशोत्सवासाठी खास तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण केले होते. त्याचप्रमाणे यावेळी मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींना आम्ही एकत्र आणून त्यांना या उत्सवासंबंधी बोलते केले होते. मार्च महिन्यात जागतिक महिला दिनानिमित्त धनश्री लेले यांचे निरक्षर स्त्रीचे काव्य या विषयावर व्याख्यान आयोजिण्यात आले होते. गेल्या मे महिन्यात आम्ही व ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसांची लोकमान्य व्याख्यानमाला आयोजिण्यात आली होती. यंदा या गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते आज संध्याकाळी चार वाजता होणार आहे.
गिरगाव येथील ब्राह्मण सभेला १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत व या संस्थेच्या गणेशोत्सवाच्या शतकमहोत्सवी वर्षास यंदा प्रारंभ झाला आहे. यासंदर्भात ब्राह्मण सभेचे कार्यवाह अमोल बापये यांनी सांगितले की, ब्राह्मण सभेने जातीनिरपेक्ष कार्य करणे हा या संस्थेच्या स्थापनेचा मुळ हेतू आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे, रुग्णालय, औषधालय, वाचनालय, व्यायामशाळा याद्वारे समाजपयोगी कार्य करणे हे संस्थेने हळुहळू सुरु केले. ब्राह्मण सभेच्या गणेशोत्सवात दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांबरोबर काही कार्यक्रमही होतात. पूर्वी या बरोबरच व्याख्याने व संगीत मैफलींचेही कार्यक्रम होत. महाराष्ट्रातील असंख्य नामवंत मंडळी या कार्यक्रमांत हजेरी लावून गेली आहेत. त्यावेळी झालेल्या या संगीत कार्यक्रमांचे अनेक संदर्भ विविध नामवंत गायक, गायिकांच्या चरित्रांत पाहायला मिळतात. आम्ही गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करतो. संस्थेचा भर समाजकार्यावर अधिक आहे. ते वर्षभर निरंतर सुरुच असते.
गिरगाव परिसरात जितेकर वाडी गणेशोत्सव मंडळ (१०५ वर्षे), फणसवाडी जगन्नाथ चाळ (१२३ वर्षे), बेडेकर सदन, शांताराम चाळ (११७ वर्षे), गंगाराम खत्री वाडी (१०४ वर्षे) व ग्रँटरोड येथील शास्त्री हॉल (१०१ वर्षे) या गणेशोत्सवांनीही शंभरी केव्हाच पार केली असून तेथील गणेशोत्सवही साध्या पद्धतीनेच साजरे होतात. हे सारे गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झाले असून ते मुंबईतील सर्वात जुने गणेशोत्सव आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवांमधील चढाओढ
लालबागचा राजा नवसाला पावतो अशी प्रसिद्धी झाल्याने गेल्या काही वर्षांपासून तिथे गणेशोत्सवाच्या काळात होणारी गर्दी दरवर्षी वाढत आहे. भाविक देत असलेल्या देणग्यांतही दरवर्षी काही कोटी रुपयांनी वाढ होत आहे. लालबागच्या राजाने आपल्या गणेशोत्सवातील कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी पब्लिक रिलेशन यंत्रणा रितसर राबविली आहे. पूर्वी लालबागमधील गणेश गल्लीतील गणेशोत्सव हा महत्वाचा समजला जायचा. पण तो लालबागचा राजाला मिळणाऱ्या प्रसिद्धी व महत्वामुळे झाकोळला गेला आहे. त्याचप्रमाणे विभागवार राजा असलेल्या अनेक गणपतींचे लोण पसरले आहे. भाविकांनी आपल्याच गणपतीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने यावे म्हणून ही गणेशोत्सव मंडळे दहा दिवस आटापिटा करताना दिसतात. त्यामुळेच साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशोत्सवांचे महत्व अधिक उठून दिसते.

No comments:

Post a Comment