Wednesday, April 9, 2014

किल्ले रायगडच्या जतनासाठी नव्या अँक्शन प्लॅनची गरज! (दै. सामना -पूर्वार्ध - २१ एप्रिल २०००)

किल्ले रायगडवर अशा काही वास्तू आहेत की, ज्यांच्या उपयोगितेबद्दल ऐतिहासिक वाद आहेत. मात्र रायगड पठाराच्या निर्जन अशा भागात या वास्तू असल्याने त्यांच्या देखभालीकडे आर्किआँलाँजिकल सर्व्हे आँफ इंडिया (एएसआय) या केंद्र सरकारच्या खात्याचे विशेष लक्ष गेलेले नाही. या वास्तुंसहित संपूर्ण रायगड किल्ल्याच्या जतनीकरणासाठी सांगोपांग विचार करुन या खात्याने नवा अँक्शन प्लँन तयार करावा अशीही मागणी आता इतिहासतज्ज्ञांकडून होत आहे. या लेखाचा पूर्वार्ध व उत्तरार्ध मी लिहिला असून तो अनुक्रमे २१ एप्रिल २००० रोजी व २२ एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झाला होता. पण दुर्देवाने माझ्या संग्रही रायगड जतनासंदर्भातील लेखाचा पूर्वार्ध नाहीये. त्यामुळे या लेखाचा फक्त उर्वरित भाग येथे दिला आहे.



किल्ले रायगडसाठी नव्या अँक्शन प्लॅनची गरज!

समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com

किल्ले रायगडवर अशा काही वास्तू आहेत की, ज्यांच्या उपयोगितेबद्दल ऐतिहासिक वाद आहेत. मात्र रायगड पठाराच्या निर्जन अशा भागात या वास्तू असल्याने त्यांच्या देखभालीकडे आर्किआँलाँजिकल सर्व्हे आँफ इंडिया (एएसआय) या केंद्र सरकारच्या खात्याचे विशेष लक्ष गेलेले नाही. या वास्तुंसहित संपूर्ण रायगड किल्ल्याच्या जतनीकरणासाठी सांगोपांग विचार करुन या खात्याने नवा अँक्शन प्लँन तयार करावा अशीही मागणी आता इतिहासतज्ज्ञांकडून होत आहे.
रायगड किल्ल्याचे ज्येष्ठ अभ्यासक आप्पा परब यांनी रायगडवरील वास्तूंची नेमकी कशी देखभाल व्हायला हवी याचे विस्तृत विवेचन करताना सांगितले की, रायगड किल्ल्यावर एकुण पाच तलाव, ५२ हून अधिक पाण्याची टाके आहेत. यातील पाच तलावांपैकी गंगासागर हा तलाव सर्वात प्रसिद्ध. आज रायगडला येणार्यांना पिण्यासाठी पाचपैकी तीन तलावांतील पाण्याचा उपयोग होतो. दुर्देवाने आज गंगासागरात मोठेमोठे शिलाखंड पडलेले असून या तलावाचा आकारही बेढब झाला आहे. हे शिलाखंड तलावातून बाहेर काढून तलावातील पाणी स्वच्छ ठेवता येईल. उद्या या तलावात भयानक रोग पसरविणारे विषाणू पसरले तर गडावर इतका मोठा दुसर्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे एएसआयने नव्या रासायनिक प्रक्रियांचा आधार घेऊन गंगासागर तलाव स्वच्छ ठेवावा. त्याशिवाय कालकुंड, कोळींब तलावातही पाण्याचा साठा उपलब्ध आहे. पण या तलावांची सफाई अनेक वर्षांत झालेली नाही. त्याशिवाय हत्ती तलाव, कुशावर्त तलावाच्या तळाशी लिकेज असल्याने तेथे पाण्याची साठवणूक शक्य नाही. भूगर्भशास्त्राट्आ नव्या तंत्राने हे लिकेज थांबविणे एएसआयला शक्य आहे.
रायगडावरील ब्राम्हण आळी व शिवकालीन अधिकार्यांची निवासस्थाने असलेल्या काही वाड्यांचे सुमारे एक वर्षांपूर्वी एएसआयने उत्खनन केले होते. त्यावरुन तेथे कोणत्या प्रकारची घरे असावीत याचे वस्तुनिष्ठ अनुमान काढणे तज्ज्ञांना शक्य झाले होते. मातीखाली गाडली गेलेली वाड्यांची जोती आज रायगड पठारावर जागोजागी दिसतात. शिवरायांच्या समाधीच्या उजव्या हाताने बाराटाक्यांकडे जाताना धनगरवाड्यांच्या शेजारी काही वाड्यांची जोती अशीच मातीखाली दबून गेली आहेत. त्या वाड्यांचे उत्खनन झाल्यास निश्चित पुरावे हाती येतील. तसेच जगदीश्वराच्या मंदिराकडून भवानी कड्यापर्यंत शिबंदी ठाणी असावीत असा एक कयास असून त्यांचे अधिकारी बाराटाक्यांच्या परिसरात राहत असावेत. या वाड्यांच्या जोत्यांचेही उत्खनन झाल्यास असे किती अधिकारी रायगडावर होते याचा शोध लावणे शक्य होईल. ब्राम्हण आळीतील उत्खननाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर रायगडावर शिवकाळात धार्मिक कार्यासाठी किती ब्रम्हवृंद होता याचीही माहिती मिळू शकेल.
रायगडावरील हनुमान टाक्याच्या आसमंतात असलेली वस्ती कोणाची असावी याबाबत अजूनही निश्चित विधान करता येत नाही. या भागाचेही उत्खनन झाल्यास तेथे एख विशिष्ट समाजाची वस्ती होती याबद्दलचे काही अनुमान काढता येईल. कारण ही वस्ती किल्ले रायगडच्या एका बाजूस आहे. छत्रपतींच्या पत्नी पुतळाबाई यांची सतीशिळाबही अशीच एका जागेतून हलवून शिरकाई मंदिराच्या पाठच्या अंगाला आणून ठेवण्यात आलेली आहे. ही सतीशिळा वस्तुत: छत्रपती शिवरायांच्या समाधीशेजारी असणे नितांत आवश्यक आहे.
कुशावर्त तलावाच्या शेजारुन खालच्या अंगाला गेलो तर अवशेष दिसायला लागतात. काळाच्या तडाख्यामध्ये हे भग्नावशेष वेगाने नष्ट होत आहेत. या वाड्यांतल्या रहिवाशांना पाणीपुरवठा होण्यासाठी शिवकालीन अभियंत्यांनी केलेली विशेष व्यवस्थाही अशा मातब्बरांच्या वाड्यांपाशी दिसते. कुशावर्त तळे हे पर्वप्रसंगी स्नान करण्यासाठी उपयोगात आणले जात असावे. या तळ्याकाठी शिवरायांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांचीही समाधी आहे. कारण ती त्यांच्या वाड्याच्याच शेजारी आहे. नंतरच्या या समाधीला दिवाबत्तीची सोय त्यांच्या वंशजांकडून होत असावी. ही समाधीही आज भग्नावस्थेत आहे.
किल्ले रायगडच्या बालेकिल्ल्यात फिरताना छत्रपतींचे खासगी व सार्वजनिक जीवन यांच्यातील भेद स्पष्ट करणार्या वास्तू जागोजागी दिसतात. त्यातील छत्रपतींचा राहाता वाडा अत्यंत वाईट स्थितीत असून त्यातील हमामखाना व प्रात:विधीगृह या उरल्यासुरल्या वास्तू केव्हाही ढासळू शकतात. या महालाच्या सज्जाचे काही दगड अशा अवस्थेत आहेत की, ते निखळले तर अपघातही होऊ शकतो. शिवरायांच्या सिंहासनामागीलल विटांच्या भिंतीची दुरुस्ती एएसआय़ने फार पूर्वी केलेली असली तरी बारकाईने बघितले तर ही भिंतही आता सुमारे वीस अंशांत कललेली आहे. महाराजांच्या राजवाड्याबाहेर राणीवर्ग व त्यांच्या दासदासींसाठी जे दोन मनोरे उभारले आहेत ते सातमजली असल्याचा चुकीचा उल्लेख आर्किआँलाँजिकल सर्व्हे आँफ इंडियाने केला आहे. वस्तुत: हे दोन्ही मनोरे दोन मजली असून त्यांचे बांधकाम दगडी आहे. या मनोर्यांवर पाच मजल्यांच्या दगडांचा भार पेलणे शक्यच नाही. त्यामुळे या दोन मनोर्यांवरील मजल्यांचे बांधकाम विटांचे होते. या मनोर्यांचे बांधकाम आता ढासळले असून उर्वरित अवशेषांमध्ये प्राण्यांचे सुंदर मुखवटे, कारंजे यांचे भाग दिसतात. या मनोर्यांची तत्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तसेच मनोर्यांचे जे भाग तुटून खाली पडले आहेत ते धुळीत माखलेले आहेत. तेही योग्य जागी बसविण्यास एएसआयने घ्यायला हवी.
शिवरायांना बालपणी जे शिक्षण मिळाले त्यात वास्तुशास्त्र हा एक विषय होता. त्यावरुन रायगडावरील छत्रपतींचा महाल, बालेकिल्ला या महत्वाच्या वास्तूंवर शिवाजी महाराजांची देखरेख असावी असा एक कयास निघतो. यातील प्रत्येक वास्तूचा आराखडा व तिचा संक्षिप्त इतिहास असलेल्या नामनिर्देशक पाट्या जागोजागी एएसआयने लावावयास हव्यात. अटलबिहारी वाजपेयींनी रायगडच्या जतनीकरणासाठी मंजूर केलेले एक कोटी रुपये हा निधी अत्यंत अपुराच आहे. मात्र रायगडवरील वास्तूंच्या जतनीकरणासाठी एएसआयने नवा अँक्शन प्लँन तयार करुन या कामासाठी किमान ५०कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी इतिहासतज्ज्ञांनी केलेली आहे.


No comments:

Post a Comment