Sunday, April 13, 2014

मुंबईतल्या गुंफा (दै. महाराष्ट्र टाइम्सची मुंबई टाइम्स पुरवणी – ३ आँगस्ट २००३)





यश लोके या टोपण नावाने महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई टाइम्स या पुरवणीमध्ये मी २००३ या वर्षाच्या पूर्वार्धात विविध विषयांवर लेखन करीत असे. त्याच काळातला हा लेख पुढे दिला आहे. तो मुंबईतील गुंफांवर आहे. हा लेख महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई टाइम्स पुरवणीत ३ आँगस्ट २००३ रोजी प्रसिद्ध झाला होता.




मुंबईतल्या गुंफा



-    समीर परांजपे
-     
भारतामध्ये सुमारे बाराशे कोरीव गुंफा आहेत. त्यापैकी हजार गुंफा एकट्या महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. शैव, वैष्णव यांनीही गुंफा कोरल्या असल्या तरीदेखील बौद्ध धर्माच्या वैभवकाळातच जास्तीत जास्त गुंफा कोरल्या गेल्या हे निर्विवाद सत्य आहे. सह्याद्रीचा पत्थक हा गुंफा कोरण्यासाठी आदर्श होता. मुंबई या शहरालाही प्राचीन इतिहास आहे. इ.स.वि.सन १५०मध्ये  टाँलेमी या विचारवंताने प्रथम मुंबईचा लिखित उल्लेख केला होता.
मुंबईतील उत्तर भागात कान्हेरी, मंडपेश्वर, मागठाण, महाकाली, जोगेश्वरी गुंफा आढळतात. आरे मिल्क काँलनीतील पाचकोड व ताकपाडा येथी कांदिवटी येथेही गुंफांचे अवशेष आढळून आले आहेत.
पूर्वी बौद्ध धर्माचे मोठे केंद्र नालासोपारा (पूर्वीचे नाव शूर्पारक किंवा सोपोर) भागात होते. नालासोपारा हे मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते. उल्हास नदीच्या प्रवाहातून व्यापारी घारापुरी, ठाणे, कल्याण, सोपारा अशी बंदरे घेत असत. तर मिठी नदीतूनही जलमार्ग होते. त्यामुळे उत्तर मुंबईत जास्त गुंफा का, याचे उतर सहजी मिळते. गुंफा कोरण्याचे काम धनिक व्यापार्यांनी दिलेल्या दानातूनच होत असे.
कान्हेरी गुंफा
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून आठ किलोमीटर आतमध्ये असलेल्या कान्हेरी गुंफा म्हणजे एकेकाळी फार मोठे बौद्ध केंद्र होते. कृष्णगिरी या संस्कृत शब्दातून कान्हेरी शब्दाची निर्मिती झाली आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत कान्हेरीतील विविध गुंफांची निर्मिती सुरु होती. या गुंफात बहुतांश बौद्ध विहार असून, येथे बुद्ध धर्माचा अभ्यास, ध्यानधारणा चालायची. ख्रिस्तपूर्व २२५ यावर्षी पूर्ण या राजाने आपल्या शिलालेखात कान्हेरी गुंफांना अर्जुनाने भेट दिल्याचा दाखला दिला आहे. इ. स. वि. सन ७८ मध्ये नहापन राजाने कान्हेरीचा कृष्णगिरी असा उल्लेख वारंवार केला आहे. कान्हेरीमध्ये २००च्या वर गुंफा असून हीनयान, महायान, वज्रायान या तीन पंथांच्या मूर्ती तेथे आढळतात. कान्हेरी हे बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे प्रमुख केंद्र होते. कान्हेरी गुंफांचे जतन आर्किआँलाँजिकल सर्व्हे आँफ इंडियातर्फे होते. कान्हेरीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अतोनात गर्दी होते. कान्हेरी हे बौद्ध धर्मियांचे असूनही तेथील एका बौद्ध स्तुपालाच शिवलिंग समजून ही गर्दी होते. त्यामुळे महाशिवरात्रीला कान्हेरी गुंफांमध्ये होणारा प्लास्टिक व इतर वस्तूंचा कचरा ही मोठी समस्या बनते. आपल्या देशात अंधश्रद्धाळूपणाची किंमत माणसाला नव्हे तर वास्तूंनाही भोगावी लागते हे वचन कान्हेरी गुंफांकडे पाहून पटते.
मंडपेश्वर
बोरिवली पश्चिम व दहिसरच्या वेशीवर असणारी मंडपेश्वर लेणी हीदेखील प्राचीन आहेत. मंडपेश्वर या शैव गुंफेच्या आत जे शिवलिंग होते, त्याजागी पोर्तुगीज राजवटीमध्ये क्राँस कोरण्यात आला. या गुंफेत शिवतांडव, लकुलिश यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत. मंडपेश्वर गुंफा सहाव्या शतकात कोरण्यात आल्या. पंधराव्या शतकानंतर या गुंफांकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. पोर्तुगीजांनी या गुंफांचे रुपांतर एका चर्चमध्ये केले. मंडपेश्वर गुंफांच्या बाहेर सोळाव्या शतकात आँन्टोनिअ डी पोर्टो याने एक भिंतही बांधली. मुळात हिंदू पण आता ख्रिश्चनांच्या ताब्यात असलेल्या या मंडपेश्वर गुंफांची देखभाल सध्याच्या काळातही फारशी होत नाही. त्रिपुरी पोर्णिमेला या मंडपेश्वर गुंफांमध्ये दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडतो. त्यानंतर तेथे वर्षभर अंधारच असतो. मंडपेश्वर गुंफा अतिक्रमणापासून इतकी वर्षे कशा काय वाचल्या हे एक आश्चर्यच आहे.
महाकाली गुंफा
अंधेरी रेल्वे स्थानकापासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या महाकाली गुंफांमध्ये १९ विहार आहेत. इ. स. वि. सन पूर्व दुसर्या ते पाचव्या शतकात या गुंफा कोरल्या गेल्या. महाकाली गुंफांना कोंदिवटी असेही नाव होते. या गुंफांतील स्तुपाचा आकार शिवलिंगासारखा वाटल्याने त्यांना महाकाळ असेही म्हटले गेले. महाकाली गुंफांच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले महाकालीचे मंदिर ही नंतरची निर्मिती आहे. या महाकाली गुंफांमध्ये भिकारी, गर्दुल्ले, भटके यांचा आजही सर्रास वावर आढळतो. मात्र पूर्वी आपल्या भणंग दिवसांत आघाडीचे गीतकार जावेद अख्तर यांनी काही काळ महाकाली गुंफेत निवास केल्याची आठवण आहे.
जोगेश्वरी गुंफा
मालाडच्या खाडीजवळ जोगेश्वरी गुंफा आहे. या गुंफेमध्ये जाण्यासाठी अडीचशेच्यावर पायर्या आहेत. या गुंफेची निर्मिती घारापुरी गुंफांच्या अगोदर म्हणजे सहाव्या शतकात झालेली आहे. या शैव गुंफा असून त्यात लकुलिशाच्या चार मूर्ती आढळतात. जोगेश्वरी गुंफेच्या दक्षिणेस दुय्यम गुंफा आहेत. सध्या जोगेश्वरी गुंफेचा परिसर झोपडपट्टीने वेढलेला आहे.
घारापुरी गुंफा
प्रत्यक्ष मुंबईत नसली तरी मुंबईजवळील एका बेटावर घारापुरी उर्फ एलिफंटा केव्हज आहेत. इ. स. वि. सहाव्या –सातव्या शतकामध्ये कोरल्या गेलेल्या घारापुरी गुंफांमध्ये शैव, वैष्णव, पाशुपत या पंथांच्या शिल्पकलेचे कौशल्य दिसते. घारापुरी हे पूर्वी व्यापारी बेट म्हणून प्रसिद्ध होते. मधल्या बर्याच मोठ्या दुर्लक्षित कालखंडानंतर पोर्तुगीजांनी या बेटावर पाऊल ठेवले. एका मोठ्या खडकामध्ये कोरलेले हत्तीचे एक भव्य शिल्प पाहून पोर्तुगीजांनी घारापुरीला एलिफंटा असे नाव दिले. शिवाय योगमुद्रा, शिवाचे तांडवनृत्य, शिव-पार्वतीचा विवाह, गंगावतरण, अर्धनारीनटेश्वर, महेश, कैलास राणा अशा अनेक मूर्ती येथील गुंफांमध्ये आहेत. घारापुरी गुंफा पाहाण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक आता मोठ्या संख्येने येतात. गेट वे  आँफ इंडियावरुन घारापुरीत जाण्यासाठी लाँचसेवाही उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे संस्कृतीचे दर्शन घडविणारा घारापुरी महोत्सवही येथे दरवर्षी साजरा केला जातो. मात्र आजही घारापुरी बेटावर वीज आलेली नाही. पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल असतात. गुंफांमुळे घारापुरीचा इतिहास उजळ असली तरी अपुर्या सुविधांमुळे वर्तमान मात्र अंधारलेले आहे.
मुंबईतील गुंफांचे व्यवस्थित जतन व्हायला पाहिजे. नेहमीप्रमाणे त्याची जबाबदारी पुरातत्व खात्यावरच न ढकलता सुजाण नागरिकांनीही या कामी पुढाकार घेण्याची गरज आहे.


No comments:

Post a Comment