Monday, April 7, 2014

ऐतिहासिक परंपरेचा वारसा जतन करणारे टकमक रॅपलिंग ( दैनिक सामना - ३ जानेवारी २०००)



गिर्यारोहणात अवघड कडेकपार्या पार करुन पर्वताचे शिखर सर करण्याच्या मोहिमांतून रॅपलिंग हा नवा साहसी क्रीडा प्रकार हल्ली लोकप्रिय झाला आहे. मुंबईच्या पिनॅकल क्लबने दैनिक सामनाच्या  सहकार्याने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संस्थापनेस साक्षी असलेल्या किल्ले रायगडावरील दुर्गम टकमक टोकावरुन खाली रॅपलिंग करण्याची मोहिम यशस्वीरित्या पार पाडली. ही मोहिम उद्योन्मुख गिर्यारोहकांना मार्गदर्शक ठरेल अशीच होती. हा लेख मी दैनिक सामनाच्या ३ जानेवारी २००० रोजीच्या अंकात लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


ऐतिहासिक परंपरेचा वारसा जतन करणारे टकमक रॅपलिंग

-    - समीर परांजपे


छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संस्थापनेस साक्षी असलेल्या किल्ले रायगडवरील महारौद्र टकमक कडा तमाम शिवप्रेमी, गिर्यारोहक यांचा आकर्षणबिंदू ठरलेला आहे. या टकमकभोवती अनेक कथा-दंतकथांचे वलय आहे. मग ती रामनाक गायकवाडची कहाणी असो की संभाजी महाराजांनी गद्दारीच्या संशयावरुन ज्यांचा कडेलोट टकमक कड्यावरुन केला त्यांची असो. अशा या टकमक कड्यावरुन पिनॅकल क्लबने दि. २३ ते २८ डिसेंबर २००० या कालावधीत दोरीच्या सहाय्याने रॅपलिंग करीत खाली उतरण्याचा कार्यक्रम अत्यंत भव्य व नेत्रदीपकरित्या पार पाडला. टकमक रॅपलिंगचे हे बारावे वर्ष. ऐतिहासिक परंपरेविषयी तोंडपाटिलकी न करता आधुनिक काळातील प्रवाहांचा यथायोग्य उपयोग करुन ही परंपरा जतन करता येते हे पिनॅकल क्लबने दाखवून दिले आहे.
टकमक रॅपलिंगच्या कार्यक्रमाला यंदा दै. सामनाचे सक्रिय सहकार्य लाभले होते. एकंदर तीन तुकड्यांमध्ये ११० स्त्री-पुरुषांनी रॅपलिंग कार्यक्रमात भाग घेतला होता. सहभागी झालेल्यांचे व्यवसाय, विचारशैली निरनिराळी. पण टकमकवरुवन रॅपलिंग करण्याचा अमृतानुभव मिळणार या आनंदात डुंबल्यामुळे किल्ले रायगडावर कार्यक्रमकाळामध्ये भारावलेले वातावरण तयार झाले होते. टकमकवरुन दोरीच्या साहाय्याने रॅपलिंग करणार्या सर्वच गिरीप्रेमींना मार्गदर्शन करण्यासाठी पिनॅकल क्लबचे सदस्य टकमक कड्यांवरील तीन खोबणींमध्ये अत्याधुनिक गिर्यारोहण साधनांसह सज्ज होते.
यंदाच्या वर्षी केदार पुरव या सात वर्षांच्या चिमुरड्याने निधड्या छातीने टकमक कड्यावरुन रॅपलिंग केले. हजार फूट खाली रॅपलिंग करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. केदारप्रमाणेच स्वप्नील शिर्के (वय १० वर्षे), नम्रता शेट्टी (१०), पुष्कर म्हात्रे (९), कुणाल मंत्री (९), मिथिला मंत्री (१३) या बालकांनीही रॅपलिंग केले. रॅपलिंग पूर्ण केल्यानंतर या मुलांच्या चेहेर्यावर जो आनंद ओसंडत होता त्यांचे वर्णन कोणत्या शब्दांनी करणार? टकमक रॅपलिंगच्या कार्यक्रमात महिलावर्गही आघाडीवर होता. त्यातील कविता भावे, सुप्रिया या मध्यमवयीने महिलांनी रॅपलिंग केल्यानंतर जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचा मतितार्थ असा होता की, नोकरी किंवा घरकाम करणे या पलीकडे आमचे विश्व गेले नव्हते. आज टकमक रॅपलिंग यशस्वीपणे पूर्ण केले. हा थरारक अनुभव आम्ही उभ्या जन्मात विसरणार नाही.
टकमक रॅपलिंग कार्यक्रमात जयंत म्हात्रे हे पोलिओमुळे डावा पाय निकामी झालेले अपंग गृहस्थ मोठ्या जिद्दीने सहभागी झाले होते. रॅपलिंगचे तंत्र व्यवस्थित समजून घेऊन त्यांनीही टकमक कड्याचे आव्हान सहजतेने पेलले. टकमक रॅपलिंदच्या सराव कार्यक्रमातच जयंत म्हात्रे यांची जिद्द सर्वांना कळून चुकली होती. तिचा पुनर्प्रत्यय यानिमित्ताने सर्वांना आला. जयंत म्हात्रे यांचा मुलगा पुष्कर हाही मोठ्या उत्साहाने किल्ले रायगडावर आला होता. त्या दोघांना बघून `बाप से बेटा सवाई की `बेटे से बाप सवाई असा विचार अनेकांच्या मनात डोकावला असणार इतके ते टकमक रॅपलिंग या दोन शब्दांशी एकरुप झालेले होते.

पिनॅकल क्लबच्या टकमक रॅपलिंग कार्यक्रमाला स्वत:चा वेगळा आकार आहे. या उपक्रमाला १२ वर्षे लोटली तरी त्यात साचेबद्धपणा आलेला नाही. यंदा विवेक शिंदे व महिबूब मुजावर या दोन गिर्यारोहकांच्या संयुक्त नेतृत्वाखाली टकमक रॅपलिंग कार्यक्रम रंगला होता. या सर्वांमागे संतोष कल्याणपूर यांचे कुशल मार्गदर्शन होतेच. टकमक रॅपलिंग सुरु असताना मेजर सुधीर सावंत यांनी त्या ठिकाणी भेट दिली. टकमक रॅपलिंग करताना पिनॅकल क्लबने केलेली शिस्तबद्ध आखणी, त्यानंतर रायगड दर्शनाचा असणारा मनोवेधक कार्यक्रम, गिर्यारोहण साधनांची प्राथमिक ओळख करुन देणारे व्याख्यान या उपक्रमांचेही मेजर सुधीर सावंत यांनी मनापासून कौतुक केले. रायगडप्रेमी सुरेश वाडकर हे टकमक रॅपलिंगमध्ये सहभागी झालेल्यांबरोबर नेमक्या शब्दांत किल्ले रायगड या स्थानाचे ऐतिहासिक महत्व विषद करीत होते. त्यानंतर रायगड किल्ल्यावरील वेगवेगळ्या ठिकाणांचे दर्शन घडविणारा स्लाईड शो दाखविण्यात येत होता. इतक्या भरगच्चा कार्यक्रमांमुळे रॅपलिंग वीरांनी जे गवसले ते शब्दातीतच होते.

No comments:

Post a Comment