Thursday, April 10, 2014

दरीतील इंद्रधनुष्य आणि सुकलेला तलाव (दै. सामना - ४ नोव्हेंबर २००१)

लेखाचा मुळ भाग





लेखाचा उर्वरित भाग





पिनॅकल क्लबचे तीन शिलेदार विजय उर्फ मामा भालेराव, राजेश वरळीकर व विजय वाघधरे. हिमालयातील निसर्ग व गिरिशिखरे सच्च्या गिर्यारोहकांना नेहमीच खुणावत असतात. पिनॅकल क्लबच्या या तीनही शिलेदारांनी जोशीमठहून आपल्या पदभ्रमणाला सुरुवात केली. त्यातील अनुभवांवर आधारित लेख मी दैनिक सामनाच्या ४ नोव्हेंबर २००१च्या अंकात लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


दरीतील इंद्रधनुष्य आणि सुकलेला तलाव


-    समीर परांजपे

-     
रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या पायांना लागलेली असते एक भिंगरी...सतत वेगाने फिरणारी...गती एके गती...याशिवाय दुसर्या वाटाच आपल्याला पाठ होत नाहीत...या धकाधकीत दमलेले भागलेले सारेच जीव आनंदाच्या चार क्षणांसाठी आसुसलेले असतात...कोणाला अंगावर चांदणे पांघरायचे असते...झाडांच्या पानांची सळसळ ऐकायची असते. शुभ्रगहिर्या ओढ्यात मनसोक्त आंघोळ करायची असते. अशा या आनंदक्षणांच्या शोधातच निघाले होते पिनॅकल क्लबचे तीन शिलेदार विजय उर्फ मामा भालेराव, राजेश वरळीकर व विजय वाघधरे. हिमालयातील निसर्ग व गिरिशिखरे सच्च्या गिर्यारोहकांना नेहमीच खुणावत असतात. पिनॅकल क्लबच्या या तीनही शिलेदारांनी जोशीमठहून आपल्या पदभ्रमणाला सुरुवात केली.
पिनॅकल क्लबच्या वतीने १९९२ साली कामेट शिखराच्या चढाईची मोहिम पार पडली होती. त्यावेळी विजय भालेराव यांच्यासह आठ गिर्यारोहकांनी जोशीमठ येथे मुक्काम केलेला होता. जोशीमठ जवळ असलेला औलीचा परिसर बघायचा हे भालेरावांचे त्यावेळी अपूरे राहिलेले स्वप्न २००१ साली त्यांनी या भागात पुन्हा पदभ्रमण केले त्यावेळी पूर्ण झाले. औली गावामध्ये हिवाळ्यात स्किईंगच्या स्पर्धा होतात. जोशीमठहून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या औली गावामध्ये थ्रीस्टार, फाईव्हस्टार हाँटेलही आहेत. गावातील उंच ठिकाणी हनुमान मंदिर असून त्या जागेला औली टाँप म्हणतात. औली टाँपवरून नीळकंठ, नरपर्वत, कामेट माना, गौरीपर्वत, हाथी, बर्मल, धानासुरी, वटार थोली अशा दहा हिमशिखरांचे दर्शन होते. या हिमशिखरांची उंची १८ हजार फूटांपासून ते २५ हजार फूटांपर्यंत आहे. उत्तर-पूर्व ते उत्तर-दक्षिण अशा दिशत या शिखरांची रांग पसरलेली आहे.
विजय भालेराव, विजय वाघधरे, राजेश वरळीकर या तिघांनी सुंदरसिंग या पोर्टरसह १० हाजर फुट उंचीवरील औली गाव मागे टाकून पदभ्रमणास प्रारंभ केला. औलीनंतर सव्वा दोन कि.मी. अंतर दूर गेल्यावर त्यांना घनदाट जंगल लागले. सप्टेंबर महिन्यात शेवट असल्याने वातावरणात थंडावा हा होताच. या ठिकाणापासून अजून एक-दीड किलोमीटर चालून गेल्यानंतर लष्कराचा बोरसू कँप लागला. इथे एक जुने पडियार मंदिर असून त्याची बांधणी दगडाची आहे. देवळातील देवीची मूर्ती साध्या शिळेची असून तेथे वर्षातून एकदा जत्रा भरते. नवस फेडण्यासाठी बकर्याचा बळी देवीला देण्याची प्रथा आहे.
पिनॅकल क्लबच्या सदस्यांचा पहिला पडाव हा बोरसुमध्येच पडला. बोरसुहून सुमारे पाच. ते साडेपाच कि. मी. अंतराचा चढ चढून गेल्यानंतर ताली हा परिसर लागतो. तालीकडे जाणारी वाट ही डोंगराच्या कडेकडेने जाणारी, निसरडी आहे. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. तालीकडे जाताना करचो, रायगडी, करची अशी गावे दरीच्या पोटामध्ये दिसतात. तालीच्या कडेने ऋषीगंगा नदी वाहाते. येथील घनदाट जंगलात वास्तव्य करण्याच्या दृष्टीने गिर्यारोहकांनी इथे तंबू ठोकला. या जागेपासून जवळच मेंढपाळांची एक वस्ती दिसत होती. विजय भालेराव, विजय वाघधरे, राजेश वरळीकर हे जगन्मित्र असल्याने ते या मेंढपाळांमध्ये लगेच रमले. त्यावेळी तेथील मेंढपाळ पूरणसिंग याने दिलेली या तिघांना दिलेली माहिती खूपच रंजक आहे.
आजूबाजूच्या प्रदेशातील मेंढपाळ सुमारे ८०० ते ९०० मेंढ्यांना घेऊन जंगलात जातात. आठ महिने फिरुन आँक्टोबर महिन्याच्या अखेरीस बर्फ पडायला सुरुवात होण्याआधी हे मेंढपाळ मेंढ्यांना घेऊन स्वत:च्या गावामध्ये परततात. या मेंढपाळांच्या स्वयंपाकाचे व इतर सामान वाहून नेण्याकरिता त्यांनी सोबत वीस खेचरेही आणलेली होती. ८००-९०० मेंढ्यांमध्ये कोणीतरी पिल्लांना जन्म देते, कोणीतरी हरविते, त्या सर्वांना कळपामध्ये पुन्हा आणण्याचे काम मेंढपाळ फार कौशल्याने करतात. या मेंढपाळांना जंगलातील अनेक औषधी वनस्पतींची माहिती असते. पूरणसिंगने पिनॅकल क्लबच्या  सदस्यांना काही औषधी फाँसिल्स दिले. ते त्वचारोगावर गुणकारी होते असा त्याचा दावा होता. छिपी, सिल्फोडी, ज्युनिफर (धूप), सिदोम, अथ्रोड या वनस्पतीही येथील जंगलांमध्ये आढळून येतात.
तालीनंतर पदभ्रमणाचा पुढील टप्पा गिलगड हा ४ कि.मी. इतका दूर होता. गिलगडच्या रस्त्यावर जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्याचे दिसले. या रस्त्यांवरली दर्यांमध्ये अनेक प्रकारचे दगड आढळून येतात. जमिनीच्या पोटात सतत चालणार्या घडामोडींमुळे हे होत असावे. गिलगडमध्ये आँगस्ट महिन्यात दर्याखोर्या फुलांनी भरुन निघतात. हिमाचल प्रदेशात व्हँली आँफ फ्लाँवर्स हा परिसर जितका सुंदर दिसतो, तेच सौंदर्य गिलगडलाही प्राप्त होते. गिलगडला पिनॅकलचे गिर्यारोहक पोहोचले तेव्हा त्यांना १४ हजार फुटांची उंची गाठलेली होती. पण गिलगडला फार वेळ न थांबता या तिघांनी कुवाँरी पासच्या दिशेने पदभ्रमण करायला सुरुवात केली. हिमालयात हवामान हे अत्यंत लहरी असते. गिलगड ते कुँवारी पास हे अंतर फक्त ३ कि.मी. आहे. कुँवारी पासला पिनॅकलचे सदस्य पोहोचले तेव्हा दुपार झाली होती तरी वातावरण ढगाळ होते. काही क्षणांतच हे ढगांचे मळभ दूर होऊन सुंदर इंद्रधनुष्य अवतरले. हे इंद्रधनुष्य सर्वांनी आपापल्या कॅमेर्यामध्ये बंदिस्त केले नसते तरच नवल. कुवाँरी पास हा कुमारिका देवीच्या प्रयाणाचा मार्ग असल्याची स्थानिक
नागरिकांची श्रद्धा आहे. कुवाँरी पासहून पुन्हा आपले गिर्यारोहक मित्र गिलगडला आले.
गिलगडच्या पुढचे लक्ष्य होते तपोवन. या गावाच्या कडेने ऋषीगंगा नदी वाहाते. तपोवनामध्ये गरम पाण्याची कुंडे आहेत. तपोवनापासून भविष्यबद्रीकडे जाण्याच्या रस्त्यात सलढार हे गाव लागते. सलढारहून १ कि.मी. अंतर पुढे आलो की, गंधकाचा अंश असलेला एक आडवा डोंगर लागतो. या डोंगरातूनच गरम पाण्याचे झरे वाहत येऊन तपोवनातील कुंडांना मिळतात. तपोवनवरुन पिनॅकल क्लबचे गिर्यारोहक पुढे लाता या गावी गेले. लाताहून भविष्यबद्री हे ठिकाण ७ ते ८ कि. मी. अंतरावर आहे.
हिमालयात विशालबद्री, योगध्यान बद्री भविष्यबद्री, वृद्धबद्री, आदिबद्री अशा पंचबद्री आहेत. बद्रिनाथ येथे नरसिंहाचे एख मंदिर आहे. या नरसिंहाच्या मूर्तीच्या एका हाताची झीज होत असून ती क्रिया पूर्ण झाल्यानंतर बद्रिनाथ ते जोशीमठे हा मार्गच पूर्णपणे बंद होईल अशी येथील स्थानिक नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच पुढचा विचार करुन तीर्थस्थान म्हणून भविष्यबद्रीला महत्व प्राप्त झाले आहे. भविष्यबद्रीला दगडांनी बांधलेले देवीच एक साधे देऊळ आहे. भविष्यबद्री येथीह गरम पाण्याची कुंडे आहेत. पिनॅकल क्लबचे सदस्य भविष्यबद्री पाहून लाता गावी परतले.
लाता गावातील पोर्टर संग्रामसिंगला बरोबर घेऊन पिनॅकल क्लबचे सदस्य जुम्मा या १६ कि.मी. अंतरावरील गावाकडे निघाले. जुमाम्हून लंक हिमशिखर दिसते. जुम्माहून पिनॅकल क्लबचे सदस्य द्रोणगिरी गावाकडे रवाना झाले. या गावाजवळ आयचीबीपीने बांधलेले हेलिपॅड आहे. एकदा विश्रांतीसाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु द्रोणगिरीमध्ये राहून गेल्याचे गावातील जुनेजाणते लोक सांगतात. द्रोणगिरीहून नंदीकुंडला जाताना वाटेत भरळा या प्राण्यांचा कळप गिर्यारोहकांना दिसला. नंदीकुंड येथे एक तलाव आहे मात्र भर सप्टेंबरमध्ये हा तलाव सुकलेला होता. प्रत्यक्ष देवाच्या वास्तव्याचे ठिकाण असल्याची श्रद्धा असूनही पर्यटक येथे पायात चपला घालून वावरतात. त्यामुळे देवाचा अपमान झाल्यानेच तलाव सुकला अशी कथा स्थानिक गावकर्यांनी सांगितली.

नंदीकुंड येथे अत्यंत थंड हवामान असल्याने पिनॅकल क्लबच सदस्य या ठिकाणी फक्त दहा मिनिटेच थांबून उतरणीच्या प्रवासाला लागले. वाटेत पुन्हा द्रोणगिरी गाव लागले. आता हे गाव ओसाड होत चालले आहे. गावातले तरुण कामधंद्यासाठी शहरात गेल्याने घराघरात फक्त म्हातारीकोतारी माणसेच जास्त उरली आहेत. या ठिकाणी शाळा १५ मे ते १५ डिसेंबरपर्यंतच असते. नंतर द्रोणगिरीतील मुलांना १५ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत हिवाळ्याची सुट्टी असते हे ऐकून अंचबाच वाटला. नंदीकुंड, द्रोणगिरी गावांमध्ये तिबेटी लोकांची अधिक वस्ती आहे. येथील लोकांच्या जेवणात बटाटा, मांस यांची रेलचेल असते. हिवाळ्यात घरामध्ये खड्डा खोदून ते या पदार्थांची साठवणूक करतात. उन्हाळ्यात घरी परतल्यानंतर हे पदार्थ त्यांना उपयोगी पडतात. हिवाळ्यात द्रोणगिरी, नंदीकुंड गावातील सर्व लोक आपली घरे रिकामी करुन खालच्या गावात राहायला जातात. नंदीकुंडहून पिनॅकल क्लबचे गिर्यारोहक पुन्हा जोशीमठला आले. पिनॅकल क्लबच्या सदस्यांनी २००१ साली त्या राज्यातील फारशी प्रचलित नसलेली ठिकाणेच निवडून तेथे पदभ्रमण केले. वेगळ्या लोकांशी, संस्कृतीशी जवळीक साधली. कारण शेवटी देशाटनानेच अंगी शहाणपण येते.

No comments:

Post a Comment