Thursday, April 24, 2014

सव्यसाची इतिहासकार - आपले महानगर सायंदैनिक - १९ आँगस्ट २०००

लेखाचा मूळ भाग


लेखाचा उर्वरित भाग



सव्यसाची इतिहासकार  व लेखक श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांच्या जन्मशताब्दीस गेल्या १६ आँगस्ट २०००पासून प्रारंभ झाला होता. श्री. रा. टिकेकर यांचा प्रत्यक्ष सहवास माझ्यासारख्या युवा पिढीतील लेखकाला मिळणे शक्यच नव्हते. परंतु त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचल्यानंतर श्री. रा. टिकेकर यांचे इतिहासकार म्हणून जे आकलन झाले, ते मी आपले महानगर या सायंदैनिकात १९ आँगस्ट २००० रोजीच्या अंकात सलील श्रोती या टोपणनावाने लिहिलेल्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


सव्यसाची इतिहासकार


-         समीर परांजपे
-         paranjapesamir@gmail.com


-          
मराठीतील वैचारिक पत्रकारितेच्या परंपरेत `कर्हाडे प्रवाहही आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून ते श्री. रा. टिकेकर, ह. रा. महाजनी, गोविंद तळवलकर, डाँ. अरुण टिकेकर या प्रतिथयश संपादकांनी आपल्या विचारशैलीची मुद्रा मराठी पत्रव्यवहारावर उमटविली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी तर स्वत:च इतिहास घडविला. उपरोक्त सर्व पत्रपंडितांनी इतिहासाचा अभ्यास व लेखन करणे हे एक महत्त्वाचे अंग मानलेय. त्या अनुषंगाने आयुष्यभर ग्रंथांची निर्मिती केली. मराठी इतिहासलेखनाचे दालन या पत्रपंडितांनी समृद्ध केले. या प्रत्येकाचा दृष्टीकोन, अभ्यासविषय वेगळा असल्याने विविध विषयांच्या इतिहासाची पुस्तके मराठीत आली. या `कर्हाडे परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांच्या जन्मशताब्दीला गेल्या १६ आँगस्ट २०००पासून प्रारंभ झाला आहे.  श्री. रा. टिकेकर यांचा प्रत्यक्ष सहवास माझ्यासारख्या युवा पिढीतील लेखकाला मिळणे शक्यच नव्हते. परंतु त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचल्यानंतर श्री. रा. टिकेकर यांचे इतिहासकार म्हणून जे आकलन झाले, ते या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री. रा. टिकेकरांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे १६ आँगस्ट १९०१ रोजी झाला. १९१८ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९२० पर्यंत सांगलीचे विलिंग्डन व पुण्याचे फर्ग्युसन अशा दोन महाविद्यालयांत पुढील शिक्षणासाठी त्यांची भ्रमंती झाली. १९२० साली गांधीजींच्या असहकार आंदोलनात श्री. रा. यांनी भाग घेतला. या धामधुमीत महाविद्यालयीन शिक्षणाचा कार्यभाग मात्र आटोपला. १९२५ ते १९२७ या कालावधीत श्री. रा. टिकेकरांची पावले पत्रकारितेकडे वळली. `बाँम्बे क्राँनिकल`लोकमान्य या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी विपुल लिखाण केले. १९३० साला केसरी वर्तमानपत्रासाठी त्यांनी पेशावर, कराची, बसरा, बगदाद या ठिकाणांचा अत्यंत कठीण दौरा केला. या दौर्यातील निरीक्षणे नोंदविणारे `सिंहाला शह हे पुस्तक त्या काळी प्रचंड गाजले होते. द, ग. सावरकर व श्री. शं. नवरे यांच्यासोबत प्रतापचे केलेले संपादन, धनुर्धारी, महाराष्ट्र शारदा, विविध वृत्त, आलमगीर, इकाँनाँमिक टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा विविध वर्तमानपत्रांत श्री. रा. टिकेकर त्यांच्या खास आवडीच्या विषयांवर लिहित राहिले. आपले रास्त म्हणणे बेधडकपणे सांगणे हा पत्रकारितेतील सर्वात मोठा गुण श्री. रा. यांच्या लेखनातून दिसतो. पत्रकारितेतील या समृद्ध कामगिरीमुळे वाईकर भटजी लिहिणार्या धनुर्धारींचे सुपुत्र असलेल्या श्री. रा. टिकेकरांनी विद्वतजनांची मान्यताही मिळाली.
पत्रकार हा चौकस बुद्धीचा असावा असे म्हटले जाते. पण श्री. रा. टिकेकर हे संशोधक पत्रकार होते. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन, वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारेच लेखन करणे हा त्यांचा पिंड होता. त्यामुळे श्री. रा. टिकेकरांची पत्रकारितेतील महनीय कामगिरी लक्षात घेऊनही ते इतिहासकार म्हणून अधिक स्मरणीय वाटतात. टिकेकरांना कोणत्याच विषयाचे वावडे नव्हते. लोखंड, पोलाद निर्मितीपासून ते जातीव्यवस्थेच्या चिकित्सेपर्यंत सर्वच विषयांतील साधार माहितीचा खजिना त्यांच्यापाशी असे. आजही अनेक पत्रकार एखाद्या विषयावर भरमसाठ माहिती देणारे ग्रंथ लिहितात. परंतु ते ग्रंथ इतिहासग्रंथ होऊ शकत नाहीत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही अनेकांजवळ माहितीचा साठा खूप असतो. परंतु त्या माहितीच्या विश्लेषणासाठी आवश्यक तात्विक बैठक नसेल तर त्याविषयीच्या लिखाणातील प्राणच निघून गेलेला असतो. या आघाडीवर श्री. रा. टिकेकरांच्या इतिहासविषयक लिखाण चिरकालिक वाटते. इतिहासाच्या तत्वज्ञानाची बैठक थोड्यांनाच उमजते. याबाबतीत श्री. रा. टिकेकर हे अग्रभागी होते. रुढार्थाने इतिहास या विषयातील विद्यापीठीय पदवी नसूनही पीएच. डी. करिता श्री. रां. नी अनेकांना मार्गदर्शन केले होते.
श्री. रा. टिकेकरांनी जे ऐतिहासिक ग्रंथ लिहिले वा संपादित केले त्यामध्ये सरदेसाई स्मारक ग्रंथाचा समावेश होता. जदुनाथ सरकार आणि रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्याशी टिकेकरांचे घनिष्ठ संबंध होते. मुळ साधनांच्या आधारावर इतिहासलेखन करणे हा सर्वात मोठा गुण टिकेकरांनी या दोन इतिहासकारांकडून घेतला होता. प्रसिद्ध इतिहासकार गो. स. सरदेसाई यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरील इंग्रजी आणि मराठी ग्रंथ १९३८ साली प्रसिद्ध झाले. त्यामधील इंग्रजी ग्रंथात सरदेसाईंचा परिचय सरकारांनी आणि मराठी ग्रंथातील परिचय टिकेकरांनी करुन दिला होता. रियासतकार सरदेसाईंशी असलेल्या ओळखीतून टिकेकरांचा परिचय जदुनाथ सरकारांशी झाला. सरकार आणि सरदेसाई यांच्या गुणवैशिष्ट्यांची ओळख पुढे श्री. रा. टिकेकरांनी जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई या आपल्या ग्रंथाद्वारे करुन दिली. या संशोधकांबद्दलचा तौलनिक अभ्यास या पुस्तकात आहे. On Histiriography – A study of methods of historical research and narration of Sir Jadunath Sarkar, Dr. G.S. Sardesai And Dr. P. K. Gode  या श्री. रा. टिकेकरकृत ग्रंथामध्ये जदुनाथ सरकार, सरदेसाई यांच्या प्रमाणेच भारताच्या प्राचीनतेचा शोध घेणार्या डाँ. प. कृ. गोडे यांच्या इतिहाससंशोधन पद्धतीचा मार्मिक आढावा घेण्यात आलेला आहे. इतिहासलेखन करताना त्या इतिहासकाराच्या प्रेरणांचा शोध घेण्याचे आगळे कार्य टिकेकरांकडून या निमित्ताने झाले. सितामहूचे राजकुमार डाँ. रघुवीर सिंह यांचे जदुनाथ सरकार हे गुरु. १९३३ ते १९५८ या काळामध्ये गुरुने शिष्याला तीनशेहून अधिक तत्त्वचिंतनपर पत्रे लिहिली. गुरु-शिष्याचा हा पत्ररुपी संवाद `Making of a princely historian’ ह्या ग्रंथाद्वारे संपादित करुन श्री. रा, टिकेकरांनी या दोन व्यक्तिमत्वांचे अनेक पैलू वाचकांसमोर आणले. रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्याकडे तब्बल १८ वर्षे इतिहास लेखनातील त्यांचे सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर श्री. रां.ना जी वेगळी दृष्टी लाभली, त्यामुळे त्यांनी इतिहासाचे प्रांगण अधिकच उजळ केले.
पत्रकारिता करताना अत्यंत धाडसी वृत्तीने केलेल्या भ्रमंतीतून श्री. रा. टिकेकरांनी सिंहाला शह, ब्रम्हपुराण, बातमीदार अशी अनेक पुस्तके लिहिली. महाराष्ट्राच्या इतिहासाविषयीही टिकेकरांचे सातत्याने चिंतन चाललेले असे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही काळांतील वैचारिक आंदोलनांचे टिकेकर साक्षी होते. या काळात महाराष्ट्रात जी परिवर्तने झाली त्याची प्रत्यक्ष कडू-गोड फळेही त्यांना चाखायला मिळाली. महाराष्ट्राच्या या वैचारिक जडणघडणीची वाचकांनाही माहिती करुन द्यावी या हेतूने पत्रपंडित प्रभाकर पाध्ये यांच्यासह आजकालचा महाराष्ट्र या ग्रंथाचे लेखन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्याचा संकल्प अनेक महाराष्ट्रीय इतिहासकारांनी केला. महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांच्या बोलघेवडेपणामुळे त्यांच्याकडून शिवकालीन इतिहास कधीच लिहून झाला नाही. त्र्यं. ज. शेजवलकरांनी संकल्पित शिवचरित्र लिहिण्यासाठी बरीच तयारी केली होती, पण त्याआधी त्यांचे निधन झाले. शेजवलकरांनी शिवचरित्रासाठी जी टिपणे काढली होती, त्यातील कालविपर्यास तसेच तपशीलातील चुकांची अत्यंत शास्त्रीय छाननीच श्री. रा. टिकेकरांनी केली होती. वा. सी. बेंद्रे यांचे शिवचरित्र हे देखील एक संकलनच आहे अशी आशयगर्भ टीका टिकेकरांनी त्यावेळी केली होती. टिकेकर प्रतिपक्षाच्या चुका दाखवत, पण त्या कृतीत एक निर्लेपता, निर्मोहीपणा असे. १९२७ साली त्रिशतसांवत्सरिक शिवाजी उत्सव साजरा करण्यात श्री. रा. टिकेकरांनी मोठा पुढाकार घेतल्याचे अनेकांना स्मरत असेल.
अनेक भाविक जसे श्रद्धेने पंढरपूरची वारी करतात, त्याच श्रद्धेय भावनेने श्री. रा. टिकेकर पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळ व मुंबईच्या राँयल एशियाटिक लायब्ररीच्या वास्तूंमध्ये विहरत. टिकेकरांचे परमस्नेही ना. गो. चापेकर यांच्याकडे वर्षातून एकदा काही निवडक विद्वानांचा मेळावा भरे. त्यामध्येही इतिहासातील कूट प्रश्नांवर चर्चा चालत असत. ना. गो. चापेकर संस्मृती, केसरी प्रबोध, श्यामकांताची पत्रे, लोकहितवादींची शतपत्रे हे ग्रंथ म्हणजे टिकेकरांमधील सव्यसाची संपादकाची बृहत् ओळख आहे. १९३० सालापासून श्री. रा. टिकेकरांनी ३७च्या वर ग्रंथ लिहिले वा संपादिले. अनेक ठिकाणी ग्रंथसमीक्षणे, स्फुट लेख लिहिले. हे सारे पाहिले की, `: क्रियावान स पंडित:’ असेच श्री. रा. टिकेकरांचे वर्णन करावे लागेल.
श्री. रा. टिकेकरांचे पत्रपांडित्य आणि इतिहासलेखन यांच्या मुळाशी त्यांचे निरलस ग्रंथप्रेम हे महत्वाचे कारण होते. हिस्टरी आँफ `धर्मशास्त्रसारख्या पुस्तकावर टिकेकरांनी `टाइम्स आँफ इंडियामध्ये अज्ञात राहून लिहिलेले परीक्षण वाचून हे लिखाण गजेंद्रगडकर की सेटलवाडांनी केले असा वाद मुंबई हायकोर्टाच्या बार रुममध्ये रंगला होता. भारतीय शिल्पकलेसंदर्भात मुन्शींनी लिहिलेल्या ग्रंथांची टिकेकरांनी अत्यंत मनोज्ञ चिकित्सा केलेली होती. टिकेकरांच्या ग्रंथप्रेमामुळे डाँ. आंबेडकर, डाँ. पां. वा. काणे, डाँ. गोडेंसारखे अनेक विद्वज्जन त्यांच्याकडे आकृष्ट झालेले होते. भिलई, रौरकेला, पेराम्बूर, चित्तरंजन येथील कारखाने, अणुशक्ती, खत, रसायननिर्मिती, राष्ट्रीय विज्ञान संशोधन, प्रयोगशाळा असे नानाविध विषयांचे त्यांचे वाचन होते. इतिहास, प्राच्यविद्या, भारतीय देव-देवता, सण, उत्सव, काव्यशास्त्रविनोद, लोककथा हेही श्री. रा. टिकेकरांचे आवडते विषय होते. त्या विषयांतील ग्रंथांचे वाचन, परिशीलन करुन नवागत अभ्यासकांना या ग्रंथांचे संदर्भ पुरवण्यातही खास आनंद वाटायचा. त्यांच्या ग्रंथसंग्रहात पेशवे दप्तराचे ४५ खंड, पूना रेसिडन्सी काँरस्पाँन्डन्सचे १० खंड, ग्वाल्हेरच्या श्रीमंत चं. सं. आंग्रे यांच्याकडून आलेली विविध विषयांची पुस्तके होती. मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर येथील विद्यापीठांची प्रकाशने, भारतीय विद्याभवन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्याकडून भेट मिळालेले नानाविध ग्रंथ त्यांच्या संग्रहात होते. अनेक प्रतिथयश देशी-विदेशी प्रकाशक आपली पुस्तके परीक्षणासाठी श्री. रा. टिकेकरांना आग्रहाने देत असत. आपला ग्रंथसंग्रह अन्य अभ्यासकांनाही उपलब्ध करुन द्यावा या तळमळीने वयाची ७० वर्षे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे १६ आँगस्ट १९७२ रोजी श्री. रा. टिकेकरांनी स्वत:चा ग्रंथसंग्रह मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाला भेटीदाखल दिला होता.

श्री. रा. टिकेकरांच्या अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाचे वर्णन शब्दातीत आहे. या व्युत्पन्न विद्वानाचे १३ जून १९७९ रोजी निधन झाले. अमेरिकन संशोधक डाँ. मिल्सने Climate Makes the man असा एक ग्रंथ लिहिला होता. श्री. रा. टिकेकरांचे नेमके वर्णन करायचे झाले तर S. R. Tikekar makes the climate असे करावे लागेल. इतिहासाचा व्यासंग आणि शास्त्रीय लेखनाची बैठक यातून श्री. रा. टिकेकरांनी आपल्या परिघात विद्वत्तेचे एक रम्य वातावरण निर्मिले होते. त्या विव्दत्ताप्रपातात अनेक जण सचैल न्हाऊन निघाले. श्री. रा. टिकेकरांचे इतिहासकार म्हणून मला घडलेले दूरस्थ चित्र हे असे आहे!
श्री. रा. टिकेकरांची निवडक ग्रंथसंपदा
शिवसंस्मृती (१९२७), मुसलमानी मुलुखातील मुशाफिरी (१९३०), , केसरी-प्रबोध (१९३१), श्यामकांतची पत्रे (१९३४), आजकालचा महाराष्ट्र (१९३५), सरदेसाई स्मारक ग्रंथ (१९३८), मराठी गद्यविलास (१९३९), लोकहितवादींची शतपत्रे (१९४०), चापेकर संस्कृती (१९४६), गांधी-गोष्टी (१९४६), आजकालचा भारत (१९५७), जदुनाथ सरकार व रियासतकार सरदेसाई (१९६१), महाराष्ट्र (१९७४), Gandhigrams (१९४७), Who`s who of the PEN (१९५४), Who `s who of the Indian writers (१९६३), On Histiriography (१९६४), Maharashtra : the land, its people and their culture (१९६६), Our parliamentary progress (१९७१), Making of princely historians (१९७५).

No comments:

Post a Comment