Wednesday, April 9, 2014

…भूकंपाने गिर्यारोहकांच्याही हृदयाचे ठोके चुकविले! (दै. सामना - २ फेब्रुवारी २००१)



मुंबई पोलीस दल व सॅक या गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी पाच सुळक्यांवर स्वारी करुन देशाला व महाराष्ट्राला २६ जानेवारी २००१ रोजी प्रजासत्ताक दिनाची सलामी दिलीच, पण या यशाला भूकंपाच्या धक्क्याच्या थराराचीही किनारही लाभली.  या घटनेवर मी २ फेब्रुवारी २००१ रोजी दैनिक सामनामध्ये हा लेख लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


भूकंपाने गिर्यारोहकांच्याही हृदयाचे ठोके चुकविले!


-    समीर परांजपे
-    paranjapesamir@gmail.com
नाणेघाटाच्या कुशीत विसावलेल्या वानरलिंगी सुळक्यावर प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून मुंबई पोलीस दल व द सह्याद्री अँडव्हेंचर्स क्लब (सॅक) यांनी संयुक्तपणे आरोहण मोहिमेचे आयोजन केले होते. वानरलिंगीचे आरोहण करताना मोहिमेतील एक गिर्यारोहक आनंद शिंदे या सुळक्याच्या तिसर्या टप्प्यापर्यंत पोहोचला...अन् भूकंपाच्या धक्क्यांनी वानरलिंगी सुळका अक्षरश: गदागदा हलायला लागला. या अवचित प्रसंगाने सुळक्यावर आरोहण करणार्या आनंदच्या छातीत धस्स झाले. काही वेळाने धरणी हळुहळू शांत झाली आणि मग सॅकच्या गिर्यारोहकांनी वानरलिंगी सुळका सर केला.
अघटित वाटणारी अशीच ही घटना आहे. मुंबई पोलीस दलातील सशस्त्र पोलीस ` विभागात काँन्स्टेबल म्हणून कार्यरत असणार्या आनंद शिंदे या कुशल गिर्यारोहकाच्या नेतृत्वाखाली सॅक संस्थेच्या डाँ. उमेश कांबळे, अनुप नायर, विनायक मसकरे, महादेव गायकवाड, कैवल्य वर्मा, सचिन कोतकुंडे या गिर्यारोहकांनी महाराष्ट्रातील अवघड असे पाच सुळके सर करण्याची मोहिम प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून यशस्वीरित्या पार पाडली. या मोहिमेचा उपनेता होता संतोष निगडे.
किल्ले जीवधनजवळील वानरलिंगी, टोक, माळशेज लिंगी, वर्हाड्याची नवरा व नवरी हे पाच सुळके दि. २४ ते ३० जानेवारी २००१ या कालावधीत पोलीस व सॅकच्या गिर्यारोहकांनी संयुक्तपणे सर केले. या चित्तथरारक मोहिमेतील भूकंपाचा अनुभव सांगताना आनंद शिंदे म्हणाला की, यंदाच्या वर्षीच्या २६ जानेवारीचा मुहूर्त साधून वानरलिंगीचे आरोहण करायचा आमचा निर्धार पक्का होता. २५ जानेवारीला वानरलिंगी सुळक्याचे तिसर्या टप्प्यापर्यंतचे आरोहण मी पूर्ण केले. २६ जानेवारीला सकाळी लवकरच झुमारिंग करुन पुन्हा सुळक्याच्या तिसर्या टप्प्यापर्यंत चढत गेलो व तेथून पुढील टप्प्याचे आरोहण सुरु केले. त्या दिवशी सकाळचे साडेआठ वाजले असतील. तिसर्या टप्प्यातच मला अचानक अख्खा वानरलिंगी सुळका गदागदा हलत असल्याचे जाणवले.
वानगरलिंगी सुळका हलतो आहे असे मी ओरडून माझ्या साथीदारांना सांगत होतो, पण सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गिर्यारोहक साथीगारांनी माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही असे सांगून आनंद शिंदे म्हणाला की, आरोहण करताना कदाचित मलाच चक्कर येत असावी व त्यामुळे कडा हलल्याचा भास झाला असावा असेही एक क्षण मला वाटून गेले. पहिल्यांदा धक्का बसल्यानंतर एक-दीड मिनिटाने वानरलिंगी सुळका पुन्हा गदागदा हलू लागला. हा धक्का ओसरताच तिसर्यांदाही वानरलिंगी सुळका डळमळला. हा सुळका आता कलंडणार की काय अशी भीती मनात दाटून आली....

वानरलिंगी सुळका जेव्हा तिसर्यांदा हलला तेव्हा त्याचा झटका इतका जोरदार होता की गिर्यारोहण साधनांनी घट्ट जखडून घेतलेले असूनही इतक्या उंचीवरुन मी खाली कोसळणार की काय असे मला वाटू लागले होते असे सांगून आनंद शिंदे पुढे म्हणाला की, त्याक्षणी माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. मुंबई पोलीस दल व सॅक या गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी पाच सुळक्यांवर स्वारी करुन देशाला व महाराष्ट्राला प्रजासत्ताक दिनाची सलामी दिलीच, पण या यशाला भूकंपाच्या धक्क्याच्या थराराचीही किनारही लाभली. या मोहिमेसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक टी. के. चौधरी व सशस्त्र पोलीस विभागाचे उपायुक्त विश्वासराव साळवे यांनी खास मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment