Monday, April 14, 2014

कवितेच्या साथीने उडणारी स्मृतिपाखरं (दैनिक सामना - १० आँक्टोबर २००० )



डाँ. सतीश गायकवाडांची `स्मृतिपाखरं म्हणजे असंख्य घटनांचा चलत् चित्रपट. त्यातील काही घटना मात्र मनाच्या फांदीवर घर करुन राहातात. या घटना स्मृतिपाखरांच्या रुपाने आपल्या हाती येतात. या पुस्तकाचे परीक्षण मी दैनिक सामनामध्ये १० आँक्टोबर २००० रोजी लिहिले होते. मात्र हे परीक्षण मी सीमा परांजपे म्हणजे माझ्या आईच्या नावाने लिहिले होते. कारण त्या दिवशी दै. सामनाच्या अंकात माझा अजून एक लेख प्रसिद्ध होणार होता. एकाच दिवशी एकाच लेखकाचे दोन लेख प्रसिद्ध होणे वृत्तपत्रीय संकेताला धरुन नसल्याने मला टोपण नावाने हे लेखन करावे लागले.


कवितेच्या साथीने उडणारी स्मृतिपाखरं


-  -   समीर परांजपे
-    Paranjapesamir@gmail.com

डाँ. सतीश गायकवाडांची `स्मृतिपाखरं म्हणजे असंख्य घटनांचा चलत् चित्रपट. त्यातील काही घटना मात्र मनाच्या फांदीवर घर करुन राहातात. या घटना स्मृतिपाखरांच्या रुपाने आपल्या हाती येतात. डाँ. गायकवाड यांच्या `स्मृतिपाखरं या आत्मकथनाचे थोडक्यात वर्णन करावयाचे झाल्यास तर त्यांच्या `बाभूळ कवितेतल्या ओळीत ते होईल.
कुठून आली इवलीशी पाखरं
नाही ठाव गाव
सुंदर जोडी गळ्यात अवीट गोडी
लाल हिरव्या रंगात छटा पिवळसर थोडी
आत्मकथन हा साहित्यातला सर्वात अवघड प्रकार. आत्मकथनात कल्पनाविलासाला जागा नसावी. तिथे असतो उघड केलेला आपला जीवनप्रवास. सर्वांचाच जीवनप्रवास गोड, छान असेलच असे काहीही नाही. डाँ. गायकवाड यांचे आत्मकथन हा एका कवीचा जीवनप्रवास आहे, नव्हे ते एक भावरम्य काव्य आहे! रोजच्या जीवनात आलेले अनुभव, मग ते विद्यार्थी म्हणून किंवा डाँक्टर म्हणून किंवा कवी म्हणून नाहीतर मागासललेल्या समाजात व जातीचे लेबल व त्याबरोबर येणारा जातीचा भार वाहणारा नागरिक म्हणून आलेले अनुभव उत्कटतेने डाँक्टर स्मृतिपाखरांच्या रुपाने आपल्या आत्मचरित्रात उतरवितात.
डाँक्टर सतीश गायकवाड यांनी `फलार दादा बोला वो तुमी या प्रकरणात म्हटल्याप्रमाणे कदाचित त्यांच्या जीवनात मोठ नाट्यं नसेलही, म्हणून काय झालं, डाँक्टरांच्या मते सार्यांचेच जीवन आत्मकथेचा विषय होऊ शकते. डाँक्टर म्हणतात की, `जीवन याची व्याख्याच मुळी असंख्य वेगवेगळ्या अनुभवांची पोतडी अशी होईल. प्रत्येकाचे अनुभव वेगळे. संवेदना वेगळ्या. अशा या असंख्य वेगवेगळ्या अनुभवाने संपन्न झालेले जीवन प्रत्येकाचे नाट्यमय असणारच.
`जर हर गार्डाची शिटी न्यारी, तसंच हरगी हातही न्यारा तर मग का बोलू नये फलाट दादा असे मर्ढेकरांनी म्हटले आहे. त्याच धर्तीवर हर ड्रायव्हरचा न्यारा हात, जातीच्या बेडीत अडकला आहेअशी बारीक बात फलाट दादा बोलून गेला तर चुकले कुठे अशा प्रश्न डाँ. गायकवाड विचारतात. डाँक्टरांनी शेवटच्या दोन प्रकरणांत केलेले जीवनाचे वर्णन व जातीरोगाचे शक्तिमय विश्लेषण हे श्रेष्ठ दर्जाचे आहे.
`जातीची डबकी माणसांचा महासागर प्याली
अन् अफाट मत्सराचे मच्छर व्याली
पसरवीत व्देषाचा आजार रक्तात
सारा देश फणफणतो जातीरोगाच्या तापात
असे चिवटपणे लिहित डाँक्टर जातीरोगाच्या व्याप्ती व निदान यावर लिहितात ते मनाला पटते.
`विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा हे केशवसुतांचे उद्गार आठवत डाँ. सतीश गायकवाड आपल्याला घेऊन जातात त्यांच्या शेणोली गावच्या ५० वर्षांपूर्वीच्या विश्वात सदर्न मराठा रेल्वेच्या गाडीतून. `ये ये घारी, माझ्या दारी ही कविता मुलांना शिकविताना दारी न येणार्या घारीवरचा राग मुलांना आपटून व्यक्त करणारे मास्तर. भीमाला बकासूनर म्हणून शेणोलीच्या शेणाने सावरलेल्या मातीत लोळणारे शिक्षक यांच्या गोष्टी सांगताना डाँक्टर आपल्याला गुदगुल्या करतात. पण आंधळा भीम परमेश्वराला `माझ्याच नशिबी जातीचा हा भार असा प्रश्न विचारतो. त्यावेळी आपल्या पापण्या ओल्या झालेल्या असतात. मारक्या मास्तरांनंतर ते ध्येयवादी मास्तरांची गोष्ट गायकवाड या पुस्तकात सांगतात.
निसर्गप्रेम हा डाँक्टरांचा लिखाणाचा स्थायीभाव आहे. `पाठशिवणीचा खेळ खेळत राहिला काळ`घरी तसाच मिणमिणता दिवा या प्रकरणांतून त्यांनी उभे केलेले गावजीवन व निसर्गनियम मनाला भावतात. आपली प्रेमळ आई हेमंत ऋतूत शुक्राच्या चांदणीसारखी तेजस्वी, शीतल व ग्रीष्मातल्या सूर्यासारखे तापट वडिल यांच्या स्वभावातली वैशिष्ट्ये डाँक्टर सहज टिपतात.
`कुणाच्या हाताशी कुणाचा गळा?’ `नाही थांबणार त्याचा कधीच गोंधळ या प्रकरणांतून डाँ. सतीश गायकवाड महाराष्ट्रातल्या समाजजीवनाचे चित्र रेखाटतात. त्याचबरोबर एखादी गोष्टही सांगून जातात.
खेड्यात वाढलेला तल्लख बुद्धीचा हा मुलगा पुण्यात शिक्षणासाठी येतो व चमकतो. गणितावर मनापासून प्रेम करणारा हा विद्यार्थी मोठ्या भावाच्या सांगण्यावरून मुंबईला मेडिकलला प्रवेश घेतो. आपल्या मेडिकल काँलेजमधल्या जीवनाविषयीही डाँक्टर या आत्मकथनात खूप काही उत्तम सांगून जातात.
गुणवान विद्यार्थी असतानाही कसा कारण नसताना त्याच्या पोस्टग्रॅज्युएशन शिक्षणात अडथळा आणणारी समाजवृत्ती व पहिल्या नंबरने पास झाला म्हणून रेड कार्पेट घालून बोलावणारी अमेरिका. यामुळे डाँ. गायकवाड यांच्या मनात उठलेले वादळ व शेवटी अमेरिकेला न जाता स्वत:च्या देशात `रेड कार्पेटऐवजी  पाय काट्याने रक्तबंबाळ होत असतानाही राहणारे डाँक्टर मनाला भावतात.
`चारु या प्रकरणात पत्नीने त्यांच्या जीवनात आणलेला बदल व कर्तृत्ववान डाँक्टर म्हणून पत्नीने स्वत: केलेली वाटचाल याविषयीचे वर्णन आहे. `डाँक्टर मी`सूर्य रेंगाळला या प्रकरणांतून लेखकाचा आप्तेष्टांचा इलाज करताना हेलकवणारे, भावतरल अंर्तमन पारदर्शकतेने दिसते. `बरबीन अँव्हेन लंडन या कथेत आलेले लंडन खूपच छान रंगविले गेले आहे. तसेच स्वतच्या कुटुंबात समरस झालेला डाँक्टरही मनाची पकड घेतो.
स्मृतिपाखरं
लेखक – डाँ. सतीश गायकवाड
प्रकाशक – डाँ. चारुशीला गायकवाड
मूल्य – २५० रु. पृष्ठे - २८४



No comments:

Post a Comment