Sunday, April 6, 2014

पुस्तके लिहिणार्या व पुस्तकाचा विषय झालेल्या दोन चहावाल्यांची कथा (दै. सामना - १६ डिसेंबर २००१)





पुस्तके लिहिणार्या व पुस्तकाचा विषय झालेल्या दोन चहावाल्यांची कथा


- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com


देशाची आर्थिक राजधानी मुंबई व राजकीय राजधानी दिल्ली येथील दोन चहावाल्यांची ही `स्पेशल' कथा आहे. हे दोन्ही कथानायक महाराष्ट्राशीच संबंधित आहेत. दिल्लीत गेली अनेक वर्षे चहा बनविण्याचा व्यवसाय करणारे लक्ष्मण राव यांचा हात लिहिता झाला. त्यांनी आजवर तीन पुस्तके लिहिली आहेत. तर मुंबईतील दादर येथील बबन कांबळे यांना चहा बनविण्याबरोबरच उत्तमोत्तम पुस्तके वाचण्याचे व त्यावर चर्चा करण्याचेही वेड आहे. त्यामुळे बबन कांबळे अनेक लेखकांच्या पुस्तकांत व्यक्तिचित्राच्या रुपाने समाविष्ट झाले आहेत.
दिल्लीत स्थायिक झालेल्या लक्ष्मण राव यांचे आयुष्य संघर्षमयच आहे. येथे लक्ष्मण राव १९६७ च्या सुमारास महाराष्ट्रातून आले. त्यांनी चहा बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. या उद्योगात जम बसल्यानंतर त्यांची मुळातील साहित्यविषयक उर्मी उफाळून आली.
चहा बनविण्याच्या उद्योगात लक्ष्मण राव यांना चित्रविचित्र माणसे भेटली. जीवनात अनेक आडवळणेही आली. दिल्ली शहर तर राजकारणी आणि गमत्यांचा बाजारच आहे. अशा व्यक्तींच्या भेटींनी समृद्ध झालेल्या आपल्या जीवनाचे सार लक्ष्मण राव यांनी १९७९ साली लिहिलेल्या `नई दुनिया के नये लोग' या आत्मचरित्रात आले आहे.
लक्ष्मण राव यांच्या आयुष्यात स्थित्यंतरे व स्थलांतरे खूप झाली. त्यातील वैयक्तिक अनुभवांच्या आधारे राव यांनी `नर्मदा' ही कादंबरी लिहिली. त्यामध्ये अमरावतीहून भोपाळला स्थलांतरित झालेल्या व अनाथ असलेल्या एका दलित मुलीचे चित्रण आहे. `नर्मदा' कादंबरी नुुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्याआधी `रामदास', `प्रधानमंत्री' या पुस्तकांनी लक्ष्मण राव यांना नावलौकिक मिळवून दिलेला असून, अजून त्यांची तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. स्वत:ची पुस्तके लक्ष्मण राव स्वत:च प्रकाशित करतात.
लक्ष्मण रावांकडे लिहिता `हात' आहे. तर मुंबईच्या बबन कांबळे यांच्याकडे वाचनाची `दृष्टी' आहे. दादर पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक एक वरुन बाहेर पडले की, फेरीवाल्यांच्या घोळक्यात बबनरावांचा चहाचा स्टाॅल त्याच्या स्वच्छतेमुळे व आकर्षक मांडणीमुळे खुलून दिसतो. चविष्ट चाॅकलेट चहा, उकाळा, बटाटा पोहे ही बबन कांबळे यांची स्पेशालिटी. गेली ३५ वर्षे ते दादर येथे हा चहाचा व्यवसाय करीत आहेत. अगदी मध्यरात्र उलटली तरी दादर रेल्वे स्थानक परिसराला टक्क जाग असते. पत्रकार, साहित्यिक, नाट्यकलावंत, राजकारणी, सामान्य माणसे यांच्यापैकी कोणीही बबनभोवती घोळका करुन उभे असतात. तेथे चहा पिता पिता साहित्यापासून ते राजकारण, समाजकारणापर्यंत एकमेकांशी गप्पा मारण्यात रंगून जातात. बबनराव कांबळे यांच्या वैयक्तिक संग्रहात शेकडो पुस्तके आहेत. हा माणूस `आध्यात्मिक' असल्याने तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताबाई यांच्या गाथांचे बबनरावांनी अक्षरश: पारायण केलेले आहे. समकालीन साहित्यकृतींमध्येही त्यांना तितकाच रस आहे. योगासनावर सदाशिवराव निंबाळकरांचे पुस्तक, शिवाजी सावंत यांचे `मृत्युंजय', `युगंधर',  नर्मदा परिक्रमेवरील दाभोळकरांचे पुस्तक अशी विविध प्रकारची पुस्तके बबनराव कांबळे यांनी अगदी बारकाईने वाचलेली आहेत.
समांतर धाटणीचे चित्रपट पाहाणे, त्यांच्याविषयीची पुस्तके वाचणे हाही बबनराव कांबळे यांचा आवडता छंद आहे. पुन्हा प्रत्येक पुस्तकावर मार्मिक टिप्पणी करण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे पत्रकार, साहित्यिक, नाट्यकलाकारांमध्ये बबनराव कांबळे या व्यक्तीबद्दल नितांत आदर आहे. बबनरावांवर वृत्तपत्रांनी किती वेळा लेख लिहिले असतील याची गणतीच नाही. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या मुद्रा या पुस्तकात बबनरावांचे सुंदर व्यक्तिचित्र लिहिले आहे. लक्ष्मण राव, बबनराव कांबळे यांचे मुक्काम दोन वेगवेगळ्या शहरात आहेत. ते दोघे परस्परांविषयी ऐकून असतील पण प्रत्य़क्ष अोळख कधीही झालेली नाही. पण त्यांचा व्यवसाय व साहित्याविषयीचे प्रेम या दोन बंधांनी लक्ष्मण राव व बबनराव कांबळे यांच्यामध्ये अदृश्य पण अतुट असे नाते निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment