Friday, April 11, 2014

गिर्यारोहण...आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षानिमित्त...(दै. सामना - १३ जानेवारी २००२ )



पर्वतराजींचे, तेथील निसर्गाचे रक्षण व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २००२ हे `आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष म्हणून घोषित केलेले होते. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० नोव्हेंबर १९९८ रोजी आपल्या ५३ व्या बैठकीत १३० राष्ट्रांच्या संमतीने आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षात संपूर्ण विश्वालाच निसर्गरक्षणासाठी हाळी दिली होती. त्या निमित्त दै. सामनाच्या १३ जानेवारी २००२ रोजीच्या अंकात मी हा लेख लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.

गिर्यारोहण...आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षानिमित्त...


-    समीर परांजपे
Paranjapesamir@gmail.com


हिरवळ आणिक पाणी, तिथे सुचती मला गाणी...
कोणा निसर्गवेड्या, भटक्या, स्वच्छंदी कवीच्या अंत:करणातून उमटलेले शब्द मन उल्हसित करणारे आहेत. माणूस घडतो त्यामागे त्याचे गाव, नाती-गोती, आजूबाजूचा निसर्ग यांचा मोठा हातबार लागलेला असतो. निसर्गाकडून माणूस कळत-नकळत अनेक गोष्टी मिळवत असतो. अनुभवसंपन्न होत असतो. मात्र निसर्ग आहे म्हणून `मी आहे हे सोयीस्करपणे विसरुन माणूस वृक्षवल्ली, पशुपक्षी, पर्यावरण, डोंगरदर्या यांचा पद्धतशीर विध्वंस करण्याकडे सध्या लागलेला आहे.
निसर्गामध्ये दगड, पाणी, वारा, माती अशा अनेक घटकांची विविधता आलेली आहे. त्यामध्ये पशू, पक्षी, फळे, फुले, विविध प्रकारचे वृक्ष यांनी आपापल्या परीने रंग भरलेले आहेत. हा निसर्गसंपत्तीचा खजिना आपल्या कुशीत साठवून अनेक महाकाय पर्वत माणसाला सतत `कल्याणमस्तु हाच आशिर्वाद देत असतात. या पर्वतराजींचे, तेथील निसर्गाचे रक्षण व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २००२ हे `आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० नोव्हेंबर १९९८ रोजी आपल्या ५३ व्या बैठकीत १३० राष्ट्रांच्या संमतीने आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षात संपूर्ण विश्वालाच निसर्गरक्षणासाठी हाळी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षानिमित्त भारतात हिमालय, सह्याद्री यांचा प्रामुख्याने विचार करता येईल. देशामध्ये गिर्यारोहणाला खेळाचा दर्जा देण्यासाठी अद्यापही काही `शुक्राचार्यअडून बसलेल असले तरी या धाडसी प्रकारातून निसर्गाशी जास्तीत जास्त जवळीक साधली जाते हे कोणीही मान्य करेल. हिमालयात माऊंट एव्हरेस्टपासून माँन, मोरबू, कानाबो, मंत्री, बाँलजोरी, पनवाली, कामेट, अबी गामीन, धरमशाला, अंगदुरी अशी शेकड्यांनी नयनरम्य शिखरे आहेत. तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे पाच हजार फुटांपर्यंतच्या उंचीचे आहे. हिमालय व सह्याद्रीच्या पर्यावरणात फरक असला तरी तेथील वनसंपत्ती व वन्यजीवन आज धोक्यात आलेले आहे.
आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षानिमित्त हिमालय व सह्याद्रीच्या कडेकपार्यांत भ्रमंती करणार्या गिर्यारोहकांवर म्हणूनच काही विशेष जबाबदारीही आहे. हिमालय, सह्याद्रीतील गिरीशिखरे गिर्यारोहकांना सतत खुणावत असतात. या शिखरांचा माथा सर करण्यासाठी महाराष्ट्रातून तसेच इतर प्रांतातूनही दरवर्षी अनेक मोहिमा आयोजिल्या जातात. यातील पर्वतारोहणाच्या काही मोहिमा यशस्वी तर काही अयशस्वी ठरतात.  परंतु या यशापयशाचा हिशेब हा त्या गिर्यारोहकाच्या किंवा त्याच्या संस्थेच्या कक्षेपुरताच मर्यादित ठरतो. अशा मोहिमांपैकी ९० टक्के मोहिमा या तर वैयक्तिक असतात. त्यातून समाजाचे काही भले वगैरे होत नाही. भारतात व महाराष्ट्रात पर्वतराजीतील निसर्गरक्षणासाठी काही पर्यावरणवाद्यांनी चळवळी हाती घेतल्या होत्या. पण त्या दीर्घकाळ चालल्या नाहीत. महाराष्ट्रात एखाद्या गिर्यारोहण मोहिमेचे रुपांतर पुढे निसर्गरक्षणासाठीच्या चळवळीमध्ये झाल्याचे एकही उदाहरण नाही. निसर्ग, पशु-पक्ष्यांचे रक्षण अशी उद्दिष्टे घेऊन महाराष्ट्रात अनेक गिर्यारोहण संस्था स्थापन होतात. वैयक्तिक आकसातून या संघटनांची कालांतराने अनेक शकलेही होतात. या गिर्यारोहण संस्थांना एका धाग्यात गुंफू शकेल असा अखिल गिर्यारोहण महासंघ तर सध्या गतप्राण झालेला आहे. त्यामुळे अमुक इतकी शिखरे सर केली, शेकडो किल्ल्यांवर भ्रमंती केली यापलीकडे काही `विक्रमी सांगण्यासारखे या गिर्यारोहण संस्थांकडे शिल्लक राहिलेले नाही.
पर्वतारोहण हा छंदच मुळात खर्चिक आहे. गिर्यारोहणासाठी लागणारी साधने अत्यंत महागडी असून त्यामुळे या छंदापासून सर्वसामान्य लोक जरा बिचकूनच राहातात. ज्यांना हिमालयातील भ्रमंती परवडत नाही त्या लोकांना सह्याद्री पर्वताची रांग ही ट्रेकिंग, छायाचित्रण, निसर्गदर्शनासाठी सोयीची व आदर्श अशीच आहे. त्यातही पुन्हा फरक आहे. शास्त्रशुद्ध गिर्यारोहणाचे धडे घेतलेले लोक, निसर्गात नुसतीच भ्रमंती करणार्यांना ट्रेकर्स असे संबोधून त्यांची अवहेलना करतात. गिर्यारोहणातील ही जातीव्यवस्था अनावश्यक व अन्यायकारक आहे. जे ज्याला जमेल ते त्याने करावे. त्यांना अन्य लोकांनी हिणवू नये.
सह्याद्रीच्या कडेकपार्यांत कोणताही उद्देश मनात न बाळगता, निव्वळ मौजमजेसाठी भटकणार्या व्यसनाधीनांच्या टोळ्यांची धाड येत असते. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले किल्ले संपूर्ण राज्याचे सार आहे असे छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रांमध्येच म्हटले आहे. पण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करुन गिर्यारोहक असोत की ट्रेकर्स निसर्गाची नासधुसच करतात. जातील तिथे प्लॅस्टिकची घाण करुन वनस्पतींची वाढ खुंटवितात. सिगरेट, विडी शिलगाविल्यानंतर अर्धवट जळती काडी फेकून जंगलात वणवे लावतात. पशु-पक्ष्यांची चोरटी शिकार करतात. गड-किल्ल्यांवर स्वत:ची नावे कोरुन तेथील वास्तू, मूर्तींची विल्हेवाट लावतात. बुरुजांवरील तोफा खोल दरीत ढकलून देतात.
आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षात महाराष्ट्रातील गिर्यारोहकांना खूप काही करुन दाखविण्याची संधी आलेली आहे. `साहस शिबीरे भरविण्याच्या नावाखाली फक्त पैसे कमाविण्याकडे लक्ष ठेवणार्या बहुतांशी गिर्यारोहण संस्थांनी शाळा, महाविद्यालये, वस्ती पातळीवरील विद्यार्थी, नागरिकांना निसर्गरक्षणाचे महत्व पटविण्यासाठी खास प्रचारमोहिमा हाती घेतल्या पाहिजेत. गिर्यारोहणात अनेक निसर्गतज्ज्ञ सहभागी असतात. त्यांचे या कामी सहकार्य घेता येईल. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील मुलांना अद्यापही गिर्यारोहणाच्या आधुनिक तंत्रांविषयी फारशी माहिती नाही. मुंबई-पुण्याच्या डबक्यातच फिरणार्या गिर्यारोहण संस्थांनी ग्रामीण भागातील या निसर्गपुत्रांपर्यंत गेले पाहिजे. आज देशातील आदिवासींचे अस्तित्व नष्ट करण्यासाठीच शासन जणू काही धोरणे राबवित असते. या आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांच्या निसर्गज्ञानाचा फायदा घेऊन गिर्यारोहण संस्थांना एक चांगली पर्यावरण चळवळ उभी करता येईल. आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष संपले तरी ही चळवळ उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत पुढे चालविता येईल. यासाठी लागणारा पैसा हा खाजगी कंपन्या, शासन यांच्या सहकार्याने उभारता येईल. पण या सर्वांसाठी एकीचे बळ हवे. ते फुटीचा, व्देषाचा शाप लागलेल्या गिर्यारोहण संस्थांकडे आज नाही. आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षात निसर्ग व स्वत:कडे महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्था गांभीर्याने पाहू लागल्या तक ती सर्वात मोठी `उत्क्रांतीच होईल.


No comments:

Post a Comment