Saturday, April 5, 2014

बाजीप्रभूंच्या वीरमरणाचा वेगळा पैलू...(दै. सामना - १ आँगस्ट १९९९)

लेखाचा मुळ भाग


लेखाचा उर्वरित भाग.




छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये पावनिखंडीतील लढाई ही अशीच महत्त्वाची घटना आहे. या संग्रामात धारातीर्थी पडलेले बाजीप्रभू देशपांडे यांची ३३९ वी पुण्यतिथी हिंदू पंचांगातील तिथीशी ग्रेगरियन कँलेंडरचा मेळ घालता २९ जुलै १९९९ रोजी झाली. पावनिखिंडीचा रणसंग्राम अनेकांनी वर्णिलेला असला तरी आप्पा परब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भूगोल तसेच ऐतिहासिक साधनांच्या आधारे वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढले आहेत. पावनखिंडीचा संग्राम व बाजीप्रभूंनी लावलेली प्राणाची बाजी यासंदर्भातील आप्पा परब यांचा `वेगळा दृष्टीकोन त्यांच्याशी रंगलेल्या गप्पांतून जसा उमटला तसा या लेखात चितारला होता. हा माझा लेख दै. सामनाच्या १ आँगस्ट १९९९ रोजी उत्सव या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


बाजीप्रभूंच्या वीरमरणाचा वेगळा पैलू...

-    -    समीर परांजपे  
  paranjapesamir@gmail.com
छत्रपती शिवराय व त्यांच्या समकालीनलोकांविषयी आजवर विविध अंगांनी संशोधन झाले आहे व यापुढेही होत राहिल. वि. का. राजवाडे, ग. ह. खरे, सेतुमाधवराव पगडी आदी गतपिढ्यांतील इतिहासकारांनी तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रे संशोधून शिवकाळातील अनेक गोष्टींवर उजेड पाडला. त्यांच्यानंतर डाँ. अ. रा. कुळकर्णी, डाँ. जयसिंगराव पवार या संशोधकांनी आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या संशोधनातील त्रुटी दाखवत काही नवे निष्कर्ष शिवकाळातील घडामोडींबाबत मांडले. या मांदियाळीत मुंबईचे आप्पा परब हे इतिहाससंशोधक शिवकालाविषयी सातत्याने नवे पैलू तपासत असतात. छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये पावनिखंडीतील लढाई ही अशीच महत्त्वाची घटना आहे. या संग्रामात धारातीर्थी पडलेले बाजीप्रभू देशपांडे यांची ३३९ वी पुण्यतिथी हिंदू पंचांगातील तिथीशी ग्रेगरियन कँलेंडरचा मेळ घालता २९ जुलै १९९९ रोजी झाली. पावनिखिंडीचा रणसंग्राम अनेकांनी वर्णिलेला असला तरी आप्पा परब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भूगोल तसेच ऐतिहासिक साधनांच्या आधारे वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढले आहेत. पावनखिंडीचा संग्राम व बाजीप्रभूंनी लावलेली प्राणाची बाजी यासंदर्भातील आप्पा परब यांचा `वेगळा दृष्टीकोन त्यांच्याशी रंगलेल्या गप्पांतून जसा उमटला तसा इथे चितारला आहे.
शिवरायांच्या असंख्य मर्द मावळ्यांपैकी एक बाजीप्रभू देशपांडे. त्यांचे जन्मगाव पुणे जिल्ह्यातील भोरपासून तीन मैलांवर असलेले सिंद हे खेडे. पावनखिंडीचा रणसंग्राम झाला तेव्हा बाजीप्रभूंचे वय अदमासे ४५ वर्षे असावे. त्यांना सोनाबाई व गौतमाई अशा दोन धर्मपत्नी होत्या. सोनाबाईस महादजी, मोराजी, रामाजी व गौतमाईस बाबाजी, हरजी, विसाजी, अनाजी हे पुत्र होऊन वंशवेल विस्तारला होता. विजापूर दरबारचा सरदार अफजलखान याचा वध केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी तटाला माळा लावून २८ नोव्हेंबर १६५९च्या रात्री पन्हाळा जिंकून घेतला. शिवरायांच्या विजयमार्गात काटे पेरण्यासाठी विजापुरी सरदार रुस्तुम-इ-झमान, फाजलखान, मलिक इतबारा सारा फौजफाटा घेऊन १६५९च्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूरच्या रोखाने निघाले. १६ जानेवारी १६६० रोजी कोल्हापूर जवळच्या रायबागेत रुस्तुम-इ-झमानच्या सैन्याला छत्रपतींनी चारीमुंड्या चीत केले. या लढाईत शिवरायांना १२ हत्ती व दोन हजार घोडे विजापुरी सैन्याकडून हस्तगत करता आले.
याच सुमारास मराठा सरदार नेताजी पालकर यांनी मिरजेच्या किल्ल्यास वेढा दिला होता. विजापूर दरबारच्या सातत्याने होणार्या पराभवामुळे त्यांनी केलेल्या विनंतीनूसार औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवरायांचे पानिपत करण्याच्या मोहिमेवर २८ जानेवारी १६६० रोजी दक्षिणेत रवाना केले. त्याचवेळी तेलंगणातल्या कर्दुळ येथील सरदार सिद्दी जौहर रायपूर-विजापूर-अथणीमार्गे शिवाजीराजांवर चाल करुन आला. सिद्दी जौहरबरोबर रुस्तुम-इ-झमान, बाजी घोरपडे, सादातखान असे अनेक दरकदारही होते. या चारी बाजूंनी झालेल्या आक्रमणाच्या बातम्यांनी शिवराय सावध झाले. नेताजी पालकर यांनी घातलेला मिरजेचा वेढा उठवून शिवराय २ मार्च १६६० रोजी पन्हाळगडावर परतले. त्यांच्यासोबत येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे व पायदळातील एक-दोन हजार सैन्य असावे. त्याआधीच खुद्द पन्हाळागडावर सहा ते आठ हजार मराठा सैनिक उपस्थित असल्याची नोंद आहेच.
शिवरायांच्या पाठोपाठ विजापुरी सरदार सिद्दी जौहर पूर्वेकडून पन्हाळागडाला भिडला. पश्चिमेला सौदातखान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे हे पन्हाळगडाला वेढा घालू पाहात होते. उत्तर व दक्षिणेकडूनही विजापुरी सैन्याने पन्हाळगडाची कोंडी केली होती. हा वेढा नेताजी पालकर, सिद्दी हिलाल या मराठ्यांनी घोडदळाच्या तसचे पायदळाच्या छोट्या मोठ्या तुकड्यांच्या मदतीने फोडण्याचा व्यर्थ प्रयत्न करुन पाहिला होताच. हा वेढा सैल व्हावा म्हणून नेताजी पालकरने विजापूरवर प्रतिहल्ला केला, पण तरीही वेढा आणखीनच घट्ट बनला होता. याच सुमारास शाहिस्तेखानाने स्वराज्यात घुसून आतंक माजविला होता. बहुधा राजगडी जिजामातांसोबत असलेले मोरोपंत पिंगळे स्वराज्याची धुरा शिवरायांच्या अनुपस्थितीत सांभाळत होते. मोगल व विजापूरकरांना एकाच वेळी आवरणे मराठ्यांना जड जाऊ लागले. तेथे विजापुरी सरदार खवासखानाने नेताजी पालकरांना माघार घ्यायला लावली होती. सिद्दी जौहर व शाहिस्तेखान एकमेकांना मिळण्याआधी हालचल करणे छत्रपती शिवरायांसाठी आता आवश्यक होऊन बसले होते. यासाठी पन्हाळगडावरुन निसटून जाणे आवश्यक होते. वाक् चातुर्याने भरलेले संपूर्ण शरणागतीचे पत्र शिवरायांनी आपला वकील गंगाधरपंतांकडे देऊन पन्हाळगडला वेढा घालून बसलेल्या सिद्दी जौहरकडे त्यांना धाडले. पत्र पाहून सिद्दी जौहरने भुलून छत्रपती शिवरायांना तहाची बोलणी करण्यासाठी आमंत्रण धाडले. त्यानिमित्ताने जौहरच्या छावणीची टेहळणी शिवरायांच्या गुप्तहेरांनी सुरु केली. सिद्दी जौहरचा वेढा पडून आता जवळजवळ चार महिने झालेले होते. पावसामुळे वेढा थोडा ढिला पडलेला होता. त्यातला कच्चा दुवा शिवरायांच्या गुप्तहेरांनी हेरला. पन्हाळगडावरुन निसटून जाण्याची वाट सापडली. ही योजना फत्ते करण्यासाठी हिरडस मावळातील बांदलांच्या जमावाचे सरदार बाजीप्रभू देशपांडे यांना बरोबर घेण्याचे ठरले. त्यांच्याबरोबर ६०० ते ७०० मावळे होते. २९ जुलै १६६० या रात्रीचा पहिला प्रहर. छत्रपती शिवरायांनी घेऊन बाजीप्रभू पन्हाळ्याच्या राजदिंडीमार्गे निघाले. गड त्र्यंबक भास्करांच्या भरवशावर मागे सोडत टेहळ्यांच्या सांगातीने मागे-पुढे धारकरी ठेवून शिवरायांची पालखी पन्हाळगड उतरत होती.
शिवरायांच्या पालखीसोबत आणखीन एक पालखी होती. त्यात छत्रपतींप्रमाणेच पोषाख परिधान केलेला शिवा काशीद होता. आषाढाचा महिना, पौर्णिमेची रात्र व सभोवताली घनदाट जंगल. पन्हाळ्याजवळील म्हसईच्या पठाराचा पायथा येताच शिवा काशीदची पालखी ५० मावळे घेऊन मलकापूरच्या दिशेने निघाली व ६०० धारकर्यांसोबत शिवराय म्हसई पठारावर चढले. पुसाटी बुरुजावरुन त्र्यंबक भास्कर शिवरायांचे मार्गाक्रमण न्याहाळत होते. येथपर्यंत विजापुरी छावणीस शिवरायांच्या काव्याचा पत्ता लागलेला नव्हता. म्हसईच्या पठाराच्या उंचीखालील विजापुरी गस्तीच्या सैनिकांना मलकापूरच्या दिशेने जाणारी शिवा काशिदची पालखी दृष्टीस पडताच शिवराय पळाले असा संशय येऊन त्यांनी तत्काळ सिद्दी जौहरला तशी वर्दी दिली. याच दिशेला विजापुरी भाईखान, बाजी घोरपडे, सिद्दी मसूद होते. बरोबर याच्या विरुद्ध दिशेस सहा-सात मैलांवर असलेल्या सिद्दी जौहरच्या छावणीत बातमी सांगण्यासाठी काही सैनिक रवाना झाले.
बातमी मिळताच शिवरायांच्या पाठलागावर निघण्याचा निर्णय घेण्यास सिद्दी जौहर, सिद्दी मसूद व त्याच्या घोडेस्वारांना काही कालावधी लागलाच. विशाळगडकडे जाणारा प्रचलित मार्ग घोडदळास अनुकूल असल्याने शिवा काशिदच्या पालखीजवळ विजापुरी सैनिक त्या मार्गाने येऊन थडकले. विजापुरी सैनिकांनी शिवा काशिदला ताब्यात घेऊन त्याला सिद्दी मसूदच्या छावणीत आणले गेले. सिद्दी शिवरायांना ओळखत नव्हता. साहजिकच शिवाला शिवराय समजून विजयगर्जना करीत सिद्दी मसूद सिद्दी जौहरच्या छावणीत परतला. हिलालांच्या उजेडात सिद्दी जौहरने शिवा काशिदला पाहिले. त्यांच्यासोबत असलेल्या बाजी घोरपडे, फाजलखान यांनी शिवा काशिद हा शिवराय नाही हे निक्षून सांगताच सिद्दी जौहरने शिवा काशिदचे मस्तक धडावेगळे केले. पुनश्च आपली फसगत होऊ नये म्हणून फाजलखानाला दोन हजार घोडदळासह जौहरने मलकापुराकडे रवाना केले. आंबाघाटीचा रस्ता ओलांडून उचाट, पार्ले, माणमार्गे पांढर्या पाण्याच्या ओढ्यावर येऊन फाजलखान थडकला.
इथे म्हसई आईला साकडे घालून छत्रपती शिवराय पठार सोडून डावीकडे कुंवरखिंडीत उतरले. चापेवाडी, खोतवाडी खिंड, करपेवाडी, आंबेवाडी, कळकवाडी, रिगेवाडी, मालेवाडी, पाटेवाडी या वस्त्या मागे टाकत म्हसवड्याजवळ तांबडे फुटण्याच्या सुमारास पांढर्या पाण्याच्या ओढ्यासमोर पोहोचले. याच ठिकाणी घात झाला. मलकापूरहून विजापुरी घोडदळ येथेच येत असल्याची बातमी टेहेळ्यांनी छत्रपती शिवरायांना दिली. आता त्वरा करायला हवी. छत्रपतींसमवेत असलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांनी २५ धारकरी बाजूला काढले. सिद्दी मसूदचे २००० घोडदळ व पायदळ रोखण्याचे काम या धारकर्यांवर सोपवून बाजीप्रभू अणुस्कुरा घाटाची वाट सोडून उजवीकडे विशाळगडाकडे जाण्यासाठी घोडखिंडीकडे वळले. हिंदु पंचांगाप्रमाणे १३ जुलैचा दिवस होता तो. त्यावेळचा पहाटेचा पहिला प्रहर. पांढर्या पाण्याच्या ओढ्याजवळ सिद्दी मसूदच्या सैन्याला रोखण्याचा प्रयत्न २५ धारकर्यांनी केला. व शेवटी ते लढून मेले. विजापुरी सैन्य घोडखिंडीकडे शिवरायांचा माग काढीत मार्ग आक्रमू लागले.
घोडखिंडीत शिवरायांनी उभ्या उभ्याच निर्णय घेतला. बाजीप्रभू देशपांडे यांच्या समवेत ३०० मावळे ठेवून उर्वरित मावळ्यांनिशी शिवरायांनी विशाळगडाकडे कूच केले. दोन प्रहरपावेतो विजापुरी फौजा पाठीवर येऊ देत नाही असे बाजीप्रभूंनी शिवरायांना वचन दिले होते. त्याची याद राखत बाजीप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे मावळ्यांनी सिद्दी मसूदच्या सैन्याच्या मार्गात अडथळे आणण्यासाठी दगडांच्या मोठमोठ्या राशी रचायला सुरुवात केली. विजापुरी सैन्याला कासारीचा ओढा ओलांडून घोडमाळाचा चढ चढू द्यायचा नाही. या निर्धाराने मावळे तटून बसले. सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांनी घोडखिंडीत प्रवेश करताच बाजीप्रभूंच्या मावळ्यांच्या गोफणी गरगरल्या. दगड तोफगोळ्यांसारखे गनिमांचा वेध घेऊ लागले. पहिल्या तुकडीने माघार घेताच सिद्दी मसूद दुसरी फळी घेऊन पुढे आला. पण मराठे पाठी हटेनात. विजापुरी सैनिकांनी कासाराच्या ओढ्यात घोडे घालून पुढे जाण्याचा विचार केला. तोच बाजीप्रभूच्या मावळ्यांनी सोडलेले दगड घोडदळावर आदळू लागले. खिंडीमध्ये विजापुरी सैनिकांच्या किंकाळ्या फुटत होत्या.
या अरुंद जागेत घोडे आवरणेही कठीण जात होते. असे युद्ध विजापुरी सैनिकांनी केलेले नव्हते. सरतेशेवटी पारनाईकांच्या कर्नाटकी पायदळासमवेत विजापुरी घोडदळ पायउतार होऊन खिंड चढू लागले. मराठ्यांनी लोटलेल्या दगडांचा मारा चुकवत विजापुरी सैन्य वर आले. आणि दुसर्या प्रहरी युद्धाला खर्या अर्थाने तोंड फुटले. विजापुरी सैन्य संख्येने जास्त असल्याने रेटा वाढला. दोन्ही बाजूंनी सैनिक कापले जात होते. मराठ्यांची संख्या कमी होत चालली होती. पण सिद्दी मसूदला होणारा प्रतिकार अधिक कडवा बनत चालला होता. बाजीप्रभू देशपांडे अग्रभागी होते. हे सर्व पाहून पीरनाईकांची बंदूकधारी तुकडी झाडाझुडपांतून पुढे सरसावली. बंदुकीचा बार झाला व एक गोळी सणसणत बाजीप्रभूंच्या दंडास लागली. पट्ट्याचा एक हात थांबला. विजापुरी सैनिकांनी हा मोका साधून बाजीप्रभूंवर तलवारीचा वार केला. बाजीप्रभू रणांगणावर पडले! मराठ्यांचा प्रतिकारही क्षीण झाला! इतक्यात  विशाळगडावरुन तोफांचे आवाज झाले! बाजींनी आपला तळमळत असलेला प्राण सोडला!
घोडखिंडीतला हा संग्राम उरकून विशाळगडाच्या दिशेने सिद्दी मसूद घोडदळासह वेगाने निघाला. घोडखिंडीत दोन्ही बाजूची किमान ५०० प्रेते पडलेली होती. विजापूरी सैन्य निघून गेल्यावर मावळ्यांनी बाजीप्रभूंचा देह उचलला. विशाळगडावर सुखरुप पोहोचलेल्या शिवरायांना बाजीप्रभूंच्या बलिदानाची बातमी जेव्हा समजली तेव्हा ते उद्गारले `आज घोडखिंड पावनखिंड झाली. बाजींचा रणसंग्राम सुरु असताना घोडखिंडीने पुढे सरकलेल्या शिवरायांनी पालवणीचा जसवंतराव दळवी, शृंगारपूरचा सुर्यराव सूर्वे यांचा बेसावध वेढा मारुन विशाळगड गाठला. ४२ मैलांचे हे अंतर कापण्यास शिवरायांना ७ प्रहर म्हणजे २१ तास लागले. बाजीप्रभूंनी घोडखिंड सुमारे दीड प्रहर झुंजविली. बहुतांशी कोकणात पसरलेल्या विशाळगडास वेढा घालणे विजापुरी फौजेस अशक्य होते. सिद्दी मसूद माघारी फिरला. इतके होऊनही सिद्दी जौहरने पन्हाळगडाचा वेढा सुरुच ठेवला होता. शेवटी २२ सप्टेंबर १६६० रोजी शिवरायांच्या सांगीवरुन किल्लेदार त्र्यंबक भास्करने पन्हाळा सिद्दी जौहरच्या हवाली केला.

सिद्दी जोहर व आदिलशहा यांच्यात बेदिली होऊन आदिलशहाने जौहरचा नंतर खून करविला ही एक बाजू. दुसरीकडे विशाळगडाहून कालांतराने रायगडी जाताना शिवराय बाजीप्रभूंच्या सिंद या गावी गेले. तिथे बाजींची आई दिपाईआवा हिचे व मंडळींचे सांत्वन केले. तसेच बाजींचा ज्येष्ठ पुत्र महादजी उर्फ मायाजी याला शिवरायांनी सरदारकी दिली. बांदलांच्या माणसांना गडावर कारखानदारी दिली व दरबारात प्रथम मुजर्याचा मानही दिला. घोडखिंडीतील युद्ध श्रेष्ठ मानले गेल्याचा हा पुरावा. बाजीप्रभूंचे बलिदान अशा तर्हेने श्रेष्ठ ठरले.
म्हसईचे पठार व बाजीप्रभू
पन्हाळ्यानजिकच्या म्हसईचे पठार याचा शब्दोद्भव म्हसा + आई असा असावा. महिषासूराला मारणारी आई. या विस्तृत पठारावरचे दैवत. बहामनी अगर आदिलशाहीत किंवा विजयनगर साम्राज्यात त्याकाळी अरबस्तानातून आलेले अरबी घोडे राजापूर वा अन्य बंदरातून अणुस्कुरा किंवा आंबाघाटाने विशाळगडाच्या आसमंतात येत. ते ज्या ठिकाणी स्थिरावत त्या माळास घोडमाळ म्हणत. इ. स. १७००मध्ये विशाळगडास वेढा घालताना औरंगजेबाची छावणी त्या ठिकाणी पडली म्हणून त्यास बादशहाचा माळ म्हणू लागले. सध्या त्यावर धरणग्रस्तांची वस्ती आहे. अरबस्तानातून आलेले घोडे आदिलशहाची दुय्यम राजधानी पन्हाळा येथे पोहोचविण्याचे काम विशाळगडाच्या किल्लेदाराकडे होते. योग्य संरक्षण देऊन पठाराखाली कासारीचा ओढा ज्या ठिकाणी ओलांडला जाई त्यास घोडखिंड म्हणत. ती थोपवून धरताना बाजीप्रभू मरण पावले. सध्या तिला पावनखिंड म्हणतात. राजापूर-अणुस्कुरा- घोडमाळ- घोडखिंड – म्हसई पठार, पन्हाळा हा प्राचीन व्यापारी मार्ग असावा. या म्हसईच्या पठारावरुन विरुद्ध बाजूस काही लेणीही आहेत. इतिहास संशोधकांनी या मार्गाचा अधिक बारकाईने अभ्यास करायला हवा.

(या लेखासाठी वापरलेले संदर्भ ग्रंथ - सभासद बखर, शिव दिग्विजय बखर, शिवभारत, संकल्पित शिवचरित्र- त्र्यं. ज. शेजवलकर, छत्रपती शिवाजी महाराज - दि. वि. काळे, वेध महामानवाचा - डाँ. श्री. दा. सामंत, राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे, दुर्गभ्रमण - गो. नी. दांडेकर, किल्ले पन्हाळगड - मु. गो. गुळवणी, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट गॅझेटियर)

No comments:

Post a Comment