Saturday, April 12, 2014

वाँटरफाँल रॅपलिंगचा चिंब उत्साह ( दै. सामनाची उत्सव पुरवणी - १ आँगस्ट १९९८)

लेखाचा मूळ भाग





लेखाचा उर्वरित भाग.






पावसाळा सुरु झाला की, वर्षा सहलींना उधाण येते. तरुण मंडळी पाठीवर हॅवरसॅक लटकावून हिरव्यागार डोंगरदर्यांत भटकंतीला जातात. पण भक्कम दोराच्या सहाय्याने एखाद्या उंच कड्यावरुन कोसळणार्या धबधब्याच्या सोबतीने वाँटरफाँल रॅपलिंग करण्यातले थ्रिल काही औरच असते. पिनॅकल क्लब या गिर्यारोहण संस्थेने कर्जतजवळील भिवपुरी येथे आयोजिलेल्या वाँटरफाँल रॅपलिंगमध्ये सहभागी होऊन त्या अनुभवावर मी दै. सामनाच्या उत्सव पुरवणीमध्ये १ आँगस्ट १९९८ रोजी हा लेख लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


वाँटरफाँल रॅपलिंगचा चिंब उत्साह


-    समीर परांजपे


-    कर्जत रेल्वे स्टेशन म्हटले की आठवतो दिवाडकरांचा बटाटेवडा. कर्जतच्या ओंजळीत आहे माथेरान, खंडाळ्याचा घाट, थंड लोणावळे आणि हीच गाडी पार पुण्यापर्यंतही जाऊ शकते... आम्ही इतक्या दूरच्या पल्ल्याचे लोक नव्हतो. कर्जतच्या पुढची ती मळलेली वाट मनी दाटवत आम्ही कर्जतच्या अलीकडेच उतरलो भिवपुरीला....वेळ होती रात्री सव्वादोनची. रेल्वे स्टेशनवर आमच्याशिवाय चिटपाखरुही नव्हते. आजूबाजूची पाचशे-सातशे घरे गपगार. मधूनच एखाद्या रेल्वे इंजिनाची घरघर. भिवपुरीजवळ एक सव्वाचारशे ते पाचशे फुटांचा पाण्याचा धबधबा मोठ्या दिमाखात कोसळत असून तिथे वाँटर रॅपलिंग करायचे असे काहीतरी मनात ठसलं होतं. पिनॅकल क्लब या गिर्यारोहण संस्थेच्या संतोष कल्याणपूर व संजय पेंडुरकर यांचे बोट धरलं...आणि सगळ्याच नवशिक्यांप्रमाणे निघालो नशीब अजमावायला...खास पावसाळ्यातलाच अनुभव हा...
पहिला पडाव होता भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळचे एक मारुती मंदिर. दोनच वर्षांपूर्वी पत्रे, लाकडी खांब यांच्या आधाराने नीटपणे उभं राहिलेले हे  मंदिर. अजून रात्रीचे साम्राज्य होते. पहाटेची चाहूल लागायला काही तास होते. त्यामुळे पाठीवरच्या सॅक मंदिराच्या सभागृहात ठेवल्या आणि दिली चक्क ताणून. झोपताना मनात विचार होताच...धबधबा किती उग्र असेल...शेवाळावरुन पाय पडून हड्डी मोडली तर काय करायचं...थोडक्यात नायगारा आणि भिवपुरीचे धबदभे सारखेच भयानक वाटू लागले. मंदिरात डास भारी, डोईवर छोटासा पंखा...तो सभागृहात पहुडलेल्या तीसएक जणांना वारा घालत होता!
तांबडं फुटलं....तसे मोकळे झालो...आता निघूया...मग...असे करताना सकाळी पावणेसातला जवळच्याच एका हाँटेलपर्यंत आलो. या हाँटेलची रचनाही छान आहे. खास गिरीभ्रमण करायला येणार्या ग्रुप्सना राहाण्याच्या सोयीची. रिकामे पोट पुन्हा भरले...आणि खर्या अर्थाने `लक्ष्याकडे कूच केले...
आम्ही या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यापूर्वी पिनॅकल क्लबच्या सराईत गिर्यारोहकांची एक तुकडी रॅपलिंगसाठी दोर बांधणे वगैरे तयारी करण्यासाठी आधीच रवाना झाली होती. मनात त्यामुळे आणखीन उत्सुकता होती....धबधब्याला आमचे दर्शन होईपर्यंत अर्ध्या तासाची चढ-उताराची पायवाट मळायची होती. त्याच ओघात पिनॅकल क्लबचा सेक्रेटरी राजन घाटगेने दादरच्या इराण्यात वाँटरफाँल रॅपलिंगविषयी पूर्वी दिलेली माहिती डोक्यात घोळत होती....धबधब्याच्या उत्साहाने तो सांगत होता...गिर्यारोहकाने कृत्रिम साधने वापरुन एखादा कडा, पर्वत, पाण्याचा प्रदेश, एखादी भूमी, शिखर यावरुन अत्यंत सुरक्षिततेने खाली उतरणे याला म्हणतात रॅपलिंग...अशाच एखाद्या कड्यावरून कोसळणारा धबधबा, नदीचा प्रवाह यातून वरील पद्धतीने गिर्यारोहक खाली उतरला की ते होते वाँटर रॅपलिंग...
वा! व्याख्या तर सोपी आहे! शेवटी एकदाचा तो अनामिक डोंगर उलथापालथा चढून आलो माथ्यावर. अगदी धबधब्याच्या वरच्या अंगाला खेटूनच उभे राहिलो...खाली पाहिलं तर सव्वाचारशे फूट खोल दरीत हे सर्व पाणी प्रचंड आवेगाने जमा होत होतं. जशी मुलाला आईची ओढ असते तसं...पिनॅकल क्लबच्या चार-पाच निष्णाच गिर्यारोहकांनी धबधब्याच्या विविध टप्प्यांवर दोर व्यवस्थित बांधलेले होते. त्यावरुन सावरत रॅपलिंगला आरंभ करायचा...प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करायची! आपल्यासारखे नवशिके कोण आहेत याचा शोध डोळे घेऊ लागले...तो अभय...करुणा...अशी नावे बघता बघता जोरी नावाच्या ११ वर्षे वयाच्या मुलीकडे लक्ष गेले. पिनॅकल क्लबच्या `मामाची म्हणजे विजय भालेरावची ही मुलगी. वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिच्या पायाला गिर्यारोहणाची भिंगरी लागली...किल्ले रायगडच्या टकमक टोकावरुन जोरीने याआधी रॅपलिंग केलयं इतकी ही हिम्मतबाज...मग आपल्यालाही हे जमलचं पाहिजे...मनाने निर्धार केला...संतोष कल्याणपूर मधेमधे वाँटरफाँल रँपलिंगच्या साधनांबद्दल माहिती सांगे...हा आहे मेन रोप...या दोराला आतमध्ये मारले आहेत आठ दोरांचे पीळ...त्याच्यावर आवरण आहे. हा दोर १५०० ते २००० किलोचे वजन पेलू शकतो. हे दोर ८, १०, १०.५, १२ मि.मि. इतक्या जाडीचे असतात. शक्यतो १०.५, १२ मि. मि. दोर आम्ही वापरतो....
या माहितीत खंड पडला कारण एकाने वाँटरफाँल रॅपलिंग करायला सुरुवात केली. सव्वाचारशे फूट दरीत उतरण्याआधीचे चेहेर्यावरचे त्याचे भाव थोडे भीतीचे...स्वत:चे शरीर एल आकारात ठेवत दोन पायांनी कपारींचा अंदाज घेत धबधब्यातून तो उतरु लागला. मध्येच शेवाळभरल्या खडकांवरुन पाय घसरतोय…दमसास सांभाळत तो धबधब्यातील पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचला. दोन दोरांच्या भरवशावर आपला मूल्यवान जीव खाईत घालतोय...विश्वास बसेना!
राजन घाटगेने आधीच सांगितले होते की, वाँटरफाँल रॅपलिंगमध्ये वापरण्यात येणार्या गिर्यारोहण साधनांमुळे हा प्रकार सुरक्षित आहे. जेव्हा एखादा माणूस वाँटरफाँल रॅपलिंगसाठी तयार होतो तेव्हा त्याच्या डाव्या हातात असतो तो मेन रोप. हा मेन रोप कडा उतरताना गिर्यारोहकाच्या कमरेच्या मागील बाजूस असतो. मेन रोप डाव्या हाताने गिर्यारोहकाने वरच्या दिशेला खेचला की तितके अंतर गिर्यारोहक खाली जातो. याच वेळी तो उजवा हातही मेन रोपवर ठेवून असतो. कमरेला दुसरा दोर बांधलेला असतो. त्याला बिले रोप किंवा सेफ्टी रोप म्हणतात... गिर्यारोहकाच्या कमरेला जो पट्टा असतो तो हर्नेस. १५०० ते दोन हजार किलो वजन पेलायची क्षमता असते हर्नेसची. कॅरेबिनर नावाचे साधन या हर्नेसला लावले जाते. हे सगळे जोडण्यासाठी ज्या डिसेंडरला दोर गुंडाळला जातो, त्यातून गिर्यारोहक खाली उतरायला लागला की दोर पास होतो...बिले रोपचा शरीराशी संबंध असतो. डिसेंडरशी नसतो...समजा, मेन रोपला काही इजा झाली तर बिले रोप असल्याने तुमच्या जीवाला धोका नसतो. कारण हा बिले रोप वरच्या बिलिअरच्या हातात असतो. त्यामुळे आपले नियंत्रण त्याच्या हाती दिले.
सगळे आठवतच हर्नेस कमरेला बांधला. आपली फजिती तर होणार नाहीना अशी भीतीनेच स्वत:ला त्या खाईत लोटून दिलेहातात आशेचे दोनच दोर...पण हे दोर नियंत्रित करणारे धबधब्याच्या सर्वच टप्प्यांवर उभे होते. पहिल्या टप्प्यावर पाण्याच्या वरुन येणार्या प्रचंड मार्याने बावचळलो...पायात हंटरशूज असूनही शेवाळभरले खडक त्यांच्या खांद्यावर पाय स्थिरावू देईनात. २५-३० फूट खाली गेलो असेन...आधाराचे पाय निखळून मी अधांतरी लोंबकळायला लागलो. भीती वाटली. मग मनाचा हिय्या करुन शरीर एल आकारात वाकवले. पायाची मांड पाणीभरल्या खडकांवर पक्की केली. आणि हळुहळू मेन रोप सरकवत...पाय टेकत खाली येऊ लागलो...अरे हे जमतयं आपल्याला...असा आत्मविश्वास येईपर्यंत पहिला टप्पा पारही झाला होता...
तानाजी सिंहगडाचा कडा चढून गेल्यावर जेवढा आनंदला नसले तेवढा मी त्या धबधब्यातून पहिल्या टप्प्यापर्यंत खाली आल्यावर मनातल्या मनात नाचलो! दुसर्या टप्प्यात भर पाण्यातून न जाता त्याच्या बाजूने दोर वळवून तिथून वाँटर रॅपलर्स खाली येत होते. कारण धबधबा तळाशी जिथे कोसळत होता तिथे ८ ते १० फुटांची मोठी घळ होती. म्हणजे एखादा नवशिक्या वाँटर रॅपलिंग करुन तिथे उतरला असता तर डायरेक्ट या `घळीतच गेला असता…पिनॅकल क्लब सदस्यांच्या या बारीक निरीक्षणाचेही त्यावेळी कौतुक वाटले...
पिनॅकल क्लब ही गिर्यारोहण संस्था स्थापन झाली १९८८ साली. गिर्यारोहक तयार करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून पिनॅकल क्लबच्या सभासदांनी नवशिक्यांना प्रोत्साहनाचा हात कायमच दिला आहे. आतापर्यंत पिनॅकल क्लबतर्फे हिमालयीन पर्वतराजीत माँन, नोरबू, पनवाली व्दार, कामेट-अबिगामीन, धरमसुरा-अंगदुरी, ग्युंडी, ग्लेसियर इथे गिर्यारोहण मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र दरवेळेस हिमालयात प्रत्येकाला जाणे शक्य नाही होत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा याही तितक्याच समृद्ध आहेत. पिनॅकल क्लबने ढाक भैरी, भैरव, वजीर, नानाचा अंगठा, खडा पारशी, ड्युक्स नोज, तेलबैला हे सह्याद्रीतले मानबिंदू सर केले आहेत.
त्यातूनच भिवपुरीचा हा धबधबा वाँटरफाँल रॅपलिंगच्या दृष्टीने नजरेत भरला. गेल्या तीन वर्षांपासून पिनॅकल क्लबने येथे वाँटरफाँल रॅपलिंग सुरु केले. स्पोर्ट क्लायबिंग या गिर्यारोहण प्रकारातील पंच म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातकीर्त असलेल्या राजन घाटगेने सांगितले की, पावसाळ्यात आम्ही भिवपुरीच्या या ठिकाणी नवशिक्यांसाठी किमान दोन ट्रेक तरी आयोजित करतो. एका दिवसात वाँटरफाँल रॅपलिंगमध्ये आम्ही ५० माणसांना खाली उतरवू शकतो. सहा ते सात वर्षे वयापासूनची कोणीही व्यक्ती यात भाग घेऊ शकते.

भिवपुरीचा तो फेसाळणारा धबधबा रॅपलिंग करत उतरताना आपण काही जगावेगळं केलय असे क्षणभरच वाटते. कारण त्यानंतर पिनॅकल क्लबच्या सदस्यांनी केलेली आजवरची कामगिरी वाचली आणि आपण खूपच क्षुद्र आहोत याची जाणीव झाली...गर्वाचेही कधीकधी असे वाँटरफाँल रॅपलिंग होतं तर!

No comments:

Post a Comment