Wednesday, October 18, 2017

ना. धो. महानोर यांची जैत रे जैत चित्रपटाबद्दल मी घेतलेली मुलाखत - समीर परांजपे


जैत रे जैत या अविस्मरणीय चित्रपटाला नुकतीच 40 वर्षे पूर्ण झाली. त्या चित्रपटाच्या अनेक आठवणी रसिकांच्या मनात आहेत. दिवाळी विशेष म्हणून दै. दिव्य मराठीने दि. 15 आँक्टोबर 2017च्या रसिक या रविवार पुरवणीची चारही पाने जैत रे जैत या चित्रपटाबद्दलच केली आहेत. त्या रसिक पुरवणीमधे मी प्रख्यात कवि ना. धों. महानोर यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा मजकूर, जेपीजी फाइल व वेबपेजलिंक पुढे दिली आहे.
---
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात...
---
- ना. धों. महानोर
--
(शब्दांकन - समीर परांजपे)
---
१८ जानेवारी १९७७ या दिवशी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर यांनी मला लिहिलेले एक पत्र मला त्यानंतर काही दिवसांनंतर मिळाले. त्या पत्रानंतर माझ्या कवितालेखनाने एक नवे वळण घेतले. भारती मंगेशकरांनी या पत्रात म्हटले होते `गो. नी. दांडेकर यांचे जैत रे जैत नावाचे पुस्तक आहे. या गोष्टीवर हे (हृदयनाथ) रंगीत मराठी चित्रपट काढत आहेत. गावातल्या आदिवासींवर ती गोष्ट अप्पा दांडेकर यांनी लिहिली आहे. त्या कथेसाठी, चित्रपटासाठी आपण गाणी लिहावीत ही इच्छा आहे. तरी यासंबंधी आपण जब्बार पटेल यांच्याशी पुढील बोलणी करावीत. हे आपल्याला कथा समजावून देतील. दरम्यान, आपल्याला ते पुस्तक मिळाल्यास वाचावे.'
हे पत्र मिळाल्यावर माझ्या विचारांची चक्रे सुरु झाली. त्याआधी मी कधीही कोणत्याही चित्रपटासाठी एकही कविता-गीत लिहिलेले नव्हते. त्यावेळी मी नवकवी होतो. रानातल्या कविता व वही या दोन कवितासंग्रहांचा कर्ता. या कवितासंग्रहात होत्या माझ्या शंभर कविता. रानातल्या कविता पुस्तकाचे मराठी वाचकांनी उत्तम स्वागत केले होते. ए‌वढीच माझी पार्श्वभूमी. त्या काळात माझे शेती व पुस्तकांचे वाचनच अधिक चालायचे. मग मी चित्रपटासाठी गाणी लिहू शकतो असे मंगेशकरांना का वाटले असावे बरे? हा प्रश्न मनात येत होता. बरं मंगेशकर कुटुंबियांशी खूप घनिष्ठ ओळख म्हणावी तर तसेही नव्हते. आता त्यावेळच्या गोष्टींबद्दल विचार केला तर काही ठळकपणे आठवतात. माझे मित्र चंद्रकांत पाटील, रामदास भटकळ व मी असे मंगेशकर कुटुंबियांच्या `प्रभुकुंज' येथील घरी असेच केव्हातरी गेलो होतो. हा प्रसंग भारती मंगेशकरांचे मला पत्र येण्याआधीचा आहे. त्या दिवशी दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सारे काही विसरुन हृदयनाथ मंगेशकरांबरोबर गप्पा व गाणी ऐकत होतो. लतादिदी, हृदयनाथ यांची मी घेतलेली ही पहिली भेट. त्या भेटीत `वही' व तिच्या देशी लोकसंगीताचा लहेजा मी ऐकविला होता. इतकीच काय ती पार्श्वभूमी. 
भारती मंगेशकर यांचे पत्र आल्यानंतर मी महिनाभर एकदम शांत राहिलो. ग. दि. माडगूळकर, शांताबाई शेळके, पी. सावळाराम यासारखे दिग्गज कवी मंगेशकर कुटुंबियांच्या संपर्कात असताना ते माझ्यासारख्या नवकवीचा जैत रे जैत चित्रपटाच्या गीतलेखनासाठी विचार का करतील? असा विचार सतत मनात येत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्याकडून पुन्हा मला यासंदर्भात निरोप आला. तरीही मी साशंकच. जैत रे जैत हा म्युझिकल चित्रपट करावा असे मंगेशकरांच्या मनात होते. त्यामुळे चित्रपट दोन तासांचा व त्यात एक तासाची गाणी अशी योजना होती. पुन्हा सांगावा आला. १९ मार्च १९७७ रोजी गुढीपाडवा होता. त्या दिवशी मला प्रभुकुंज वर या असा निरोप मिळाला होता. त्या दिवशी तिथे पोहोचलो. जैत रे जैतशी संबंधित सारे जण तिथे जमलेले होते. गो. नी. दांडेकर, वीणा देव, पटकथा-संवाद लेखक सतीश आळेकर, दिग्दर्शक जब्बार पटेल, लतादिदी, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर असे सारेच. त्याशिवाय अजून काही सहयोगी कलावंत तिथे हजर होते. मी हृदयनाथांच्या शेजारी बसलो होतो. या बैठकीच्या सुरुवातीला जैत रे जैत या कादंबरीच्या काही जागांचे वाचन झाले. त्यानंतर गाण्यांच्या जागांबद्दल बोलत होतो आम्ही. या चर्चेच्या नोंदी काढणेही सुरु होते. ही चर्चा सुमारे दोन तीन तास सुरु होती. माझ्या खिशात मजुरी लिहिण्याची एक छोटी डायरी होती. तिच्यातच मी या चर्चेतील नोंदी करुन घेतल्या होत्या. खूप गंभीरपणे चर्चा ऐकत होतो. बैठकीतील वातावरण खेळकर होते, हास्यविनोदही सुरु होते. पण माझ्यावरचे दडपण नाही म्हटले तरी कायम होतेच...ही गाणी मी लिहून शकेन का? असेही मनात येत होते. जैत रे जैतसाठी एकुण सतरा गाणी करायची असे या बैठकीत ठरले. त्यातील १० मोठी गाणी व सात सॉगलेट््स. एक ते दिड मिनिटांचे गाणे म्हणजे साँगलेट. 
ही बैठक सुरु असताना लतादिदी मला म्हणाल्या की, तुम्ही मनावर दडपण घेऊ नका. गाण्याच्या जागा ठरवतोच आहोत. तुम्हाला हवे तेच तुम्ही लिहा. तुम्ही ही गाणी लिहू शकाल असा मला विश्वास आहे. ही गाणी छानच होतील अशी मला खात्री आहे.' त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनावरचे ओझे हलके झाले. हृदयनाथ मंगेशकर यांनीही लतादिदींच्या बोलण्याला रुकार भरला. मी मग नव्या उत्साहाने बैठकीत बोलू लागलो.
जैत रे जैत चित्रपटातील नायिका चिंधी ही एक मनमुक्त, गोड अशी आदिवासी मुलगी आहे. तिचा नवरा बुळा आहे. त्याच्याबरोबर संसार करण्यात तिला काहीही रस नाही. नाग्या नावाच्या भगतावर तिचे प्रेम जडले आहे. नाग्या ढोल उत्तम वाजवतो. जैत रे जैतची गोष्ट आहे ठाकर या आदिवासी जमातीची.आदिवासींमध्ये घटस्फोट वगैरे नसतो असते ती काडीमोड. त्या समाजातल्या प्रथेप्रमाणे दहा पाचजण एकत्र येतात. ज्यांना काडीमोड घ्यायची आहे ते काडी मोडून एकमेकांपासून फारकत घेतात. चिंधी देखील अशीच काडी मोडते. बुळ्या नवऱ्यापासून फारकत घेते. आता ती मुक्त झाली आहे. तरुण चिंधी आता नाग्याबरोबर संसार थाटायला, आपल्या मनाप्रमाणे जगायला मोकळी आहे. तिचा हा आनंद, चैतन्य एका गाण्यातून व्यक्त व्हायला हवे होते. या गाण्याच्या जागेवर आमची चर्चा सुरु होती. प्रभुकुंजवर सुरु असलेल्या या बैठकीत गप्पा, खाणं असं सार काही सुरु होते. त्यात मध्येच मी जरा उठलो. मंगेशकरांच्या फ्लॅटमध्ये एक खोली आहे. ती हृदयनाथांची. त्या खोलीत स्वामी विवेकानंदांचे मोठे तैलचित्र लावलेले आहे. तिथे एकटाच जाऊन बसलो. काडीमोड घेतलेल्या चिंधीचे मुक्त होणे यावर माझ्या मनात विचार सुरु होते. हे सारे शब्दांत कसे बांधता येईल यावर मग एकाग्र केले. खिशात मजुरी वाटण्याची डायरी होतीच. ती बाहेर काढली. पहिली ओळ सुचली. ती लिहिली.
मी रात टाकली. 
मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची, बाई लाज टाकली...
ह्या पंखावरती मी नभ पांघरती...
असे काहीसे लिहून मी पुन्हा खोलीबाहेर आलो. बैठकीत सामील झालो. त्यांना म्हटले `मला काही बोलायचे आहे. काही सुचले आहे.' काडीमोड प्रसंगाविषयीच्या लिहिलेल्या गाण्याबद्दल मी त्यांना सांगू पाहात होतो. मला या गाण्याच्या ज्या ओळी सुचल्या त्या म्हणून दाखवायच्या तयारीने जरा सरसावून बसलो. लतादिदी, आशाताईंकडे पाहिले. त्यांनाही माझ्या मनातली भावना कळल्या असाव्यात. माझी गावरान पद्धतीने गाण्याची एक पद्धत आहे त्याच पद्धतीने या ओळी गाण्यास त्यांची काही हरकत नव्हती असे दिसत होते. मग मी माझ्या आवाजात स्वच्छ शब्द व लयीत दोन ओळी गायल्या.
मी रात टाकली
मी कात टाकली
या दोन ओळी म्हणून झाल्यानंतर त्या बैठकीतील साऱ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. हृदयनाथांनी माझ्याकडून ती छोटी डायरी मागून घेतली. त्यात मी ज्या ओळी लिहिल्या त्या पुन्हा वाचल्या. ते डॉ. जब्बार पटेल यांना म्हणाले `पहिला तुकडा, बंध झाल्यानंतर मधे तिच्या-त्याच्या तारुण्याची, भरगच्च भेटीची, घट्ट प्रीतीला साजेशी झील हवी, तिथे मला व संगीतकाराला खूप काही करता येईल.' त्यावर मी त्यांना म्हटले `माझ्या काही ओळी अशाच आहेत. यात बसणाऱ्या. लिहून देतो.' तिथेच त्या ओळी, झील, संगीताचा बदल सगळे आले. `हिरव्या पानात हिरव्या पानात चावळ चावळ चालते' हे ते शब्द. त्याच दिवशी दुपारी हृदयनाथ म्हणाले `सोळ्या गाण्यांत मी कुठेही हस्तक्षेप करणार नाही.' एका गाण्यासाठी वजन देतो, लिहू शकता?' ते वजन असे होते`तम चढत आहे, रात वाढत आहे, कुणी करीत आहे, मधुर अभिसार'
संगीताचे खरेतर मला काहीही ज्ञान नाही. मात्र लहानपणापासून आमच्या खेड्याच्या परिसरात जे लोकसंगीत आहे, जे गाणेबजावणे व्हायचे ते ऐकत आलो होतो. ते ऐकून परिपूर्ण झालो होतो. त्यामुळे हृदयनाथांनी सांगितलेल्या वजनावर मी गीतरचना करायला सुरुवात केली. शब्द अलगद सुचू लागले.
नभ उतरू आलं
चिंब थर्थर ओलं
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरात
हे गाणे अाशाबाई गाणार हे तिथेच नक्की झाले. त्यानंतरच्या दोन दिवसांत ठाकरं ठाकरं, पीक करपलं, कोण्या राजाने कच्चपक्कं झालं अशी गाणी माझ्याकडून लिहून झाली. १९ मार्च व २० मार्च १९७७ हे दोन दिवस प्रभुकुंजवर जैत रे जैत चित्रपटाबद्दल बैठक चाललेली. त्या बैठकीतून थोडे बाजूला होऊन माझे गीतलेखनही सुरु होते. १९७७ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणिबाणी उठविल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली.त्या निवडणुकीचे मतदान नेमके १६ ते १९ मार्च या कालावधीत पार पडले. मतदान २० मार्च रोजी सकाळी सुरु झाले. साधारण संध्याकाळपासून मतदानाचे निकाल यायला सुरुवात झाली होती. जनता पक्षाला जनतेने भरभरुन मते दिली होती. १९ व २० मार्च रोजी प्रभूकुंजमध्ये जैत रे जैतच्या नाग्या या उत्तम ढोल वाजविणाऱ्या भगताबद्दल आम्ही चर्चा करत होतो व २० मार्चला प्रभूकुंजच्या बाहेरील रस्त्यांवर ज्यांना निवडणुकीत विजय मिळाला त्यांचे कार्यकर्ते उत्साहाने ढोलताशे वाजत होते. अशा सगळ्या नादनिनादातच या दोन दिवसांता जैत रे जैतची काही गाणी माझ्याकडून लिहून झाली. ही गाणी वाजतील हे माहित होते पण ती इतकी गाजतील याबद्दल तेव्हा काहीच कल्पना नव्हती.
दिवस पुढे सरकत होते. सगळी गाणी लिहून झाली होती. जैत रे जैतच्या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु झाले होते. नीलकंठ प्रकाशनचे प्रकाश रानडे हे मंगेशकर कुटुंबीय व माझेही परमस्नेही. ते उत्साहाने जैत रे जैतच्या पुढच्या प्रक्रियेबद्दल मला उत्साहाने सांगायचे. प्रकाश रानडे यांनी १६ मे १९७७ला पुण्याहून मला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते `जैत रे जैतचा मुहूर्त झाल्यावर २५ एप्रिल १९७७ रोजी चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि जास्तीत जास्त वेगाने आता शुटिंग आवरण्याचे काम चालले आहे. या महिनाअखेरपर्यंत सर्व शुटिंग संपेल. आता १७ ते २१ मे १९७७ या कालावधीत खालापूर येेेथे काम संपवून नंतर कर्नाळा किल्ल्यावर सर्व युनिट जाईल. म्हणजे ३० मेपर्यंत कर्नाळ्यावर नक्की सर्वजण असणार. तेव्हा आपण नक्की तिकडे जाऊ शकता. आतापर्यंत सहा गाणी आणि चार कवने यांची रेकॉर्डिंग झाली आहेत. पुढील काम सुरु आहे. झालेल्या कामांपैकी काही रशेस जब्बारने पाहिल्या. चांगल्या झाल्या आहेत. आपण शुटिंगसाठी डायरेक्ट जाणार की पुण्यावरुन जाणार ते कळवावे.'
जैत रे जैतचे चित्रीकरण १४ जुलै १९७७ रोजी संपले. त्याच दिवशी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी मला एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले होते `आजच जैत रे जैतचे चित्रीकरण संपले. वाटल्या होत्या त्यापेक्षाही अनंत अडचणी चित्रणात आल्या. गेले दोन-ती महिने कसे गेले हे सविस्तर लिहायला बसलो तर छान कादंबरी होईल. अन् कुणा कादंबरीकाराचे बक्षिस मला मिळाल्यामुळे त्याच्या शिव्याशापांचा धनी होईन. नवीन नवीन अनुभव आले. बरीचशी माणसे कळली. त्याचा निर्मितीला उपयोग होईस. अस्तु. पावसाळा सुुरु झालाय. तुम्ही शेती आणि काव्य या क्षेत्रांत आघाडीवर असणारच. काही नवीन लिहिल्यास पाठवून द्या. `जैत रे जैत'ची गाणी बरी (चाली) झाली आहेत.तुमच्या शब्दांना सूर देण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही; पण माझ्या सामान्य सुरावटींना आपले शब्द सामर्थ्य देतील याबद्दल खात्री आहे. म्हणून `जैत'च्या संगीताबद्दल मी निर्धास्त आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चित्रं पुरी होती. एडिटिंगच्यावेळी माझ्यासाठी आपल्या निसर्गरम्य शेतीचा विरह चार दिवस सोसणे, ही विनंती.' 
काळ कसा भरभर निघून जातो. जैत रे जैत चित्रपट प्रदर्शित झाला त्याला ४० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पुण्यातील िमत्र फाऊंडेशनच्या वतीने २२ सप्टेंबर २०१७ रोजी एका दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात माझ्यासह पं. हदयनाथ मंगेशकर, प्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कवी ना. धों. महानोर यांच्याशी चंद्रकांत काळे यांनी रसिकांशी संवाद साधला. प्रख्यात गायक रवींद्र साठे, राधा मंगेशकर, मधुरा दातार यांनी जैत रे जैतमधील गीते सादर केली. यावेळी बोलताना मी म्हणालो `जैत रे जैत' पूर्वी चित्रपटासाठी गीतलेखन केले नव्हते. मंगेशकरांच्या चित्रपटासाठी एकदम सोळा ते अठरा गाणी लिहायची म्हटल्यावर दडपण आले होते, परंतु ही कादंबरी वाचल्यावर शब्दकळा मनात तयार होऊ लागली. माझे भरताड शब्द हृदयनाथ मंगेशकर यांनी सुंदर केले आणि या गीतांनी मला चंदेरी दुनियेत नेले.'
जैत रे जैतची गाणी रसिकांच्या आठवणीत कशी ताजीतवानी आहेत याचे अजून एक उदाहरण. माजी केंद्रीय संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी १ एप्रिल १९९८ रोजी मला एक पत्र लिहिले. त्यातील दोन ओळी अशा आहेत `जैत रे जैत यासारख्या निसर्गचित्रपटातील आपल्या गाण्यांची गोडी सदैव ताजी टवटवीत वाटते. आपल्याकडून मराठी साहित्याच्या काव्यदालनात यापुढेही मोलाची भर पडेल, असा मला विश्वास वाटतो.'
जैत रे जैतची गाणी माझ्याकडून चांगली उतरली याचे कारण मी माझ्या कवितेविषयी केलेला काही विचार. चांगल्या मराठी कवितेचा कुठलाही ठसा आपल्यावर नको, आपली स्वत:ची प्रतिमा, स्वत:भोवतीचा निसर्ग, शेतीचा निसर्ग, तिथले ओरबाडणारे दु:ख, हे लक्षात ठेवून नव्या जाणीवांसाठी आणि एक एका ओळीसाठी झगडून लिहिले. खर तर कविता काहीच सांगत नाही, सूचित करते. संपूर्ण कविता प्रतिमा होऊन लिहिलेल्या प्रीतीच्या व दु:खाच्याही कविता मी माझ्या परीने लिहिल्या. मराठी रसिकांनी त्यासाठी मला भरभरुन दिले. अनेक गायक-गायिका- संगीत दिग्दर्शक यांनी त्या कवितेला आणखी वेगळ्या जगात नेऊन ठेवलं. नवा त्यातला रसिक वर्ग खेड्यापाड्यापासून तर शहरात-देश-परदेशात माझा झाला. कविता आणि गीत यात मी कधीच फरक न ठेवता एकसंध लिहिले. हा भेद कोणी केला मला ठाऊक नाही. हे सारे विचार घेऊनच मी जैत रे जैतची गाणी लिहायला बसलो होतो....जैत रे जैत चित्रपटानंतर सर्जा, दोघी, मुक्ता, अबोली, उरुस, एक होता विदूषक, अजिंठा, मालक, यशवंतराव चव्हाण अशा चित्रपटांसाठीही गाणी लिहिली.....काहींच्या मते मी आता कवि असण्याबरोबरच गीतकारही झालो होते..या मतमतांतरात जायचे कारण नाही. पण हा चित्रपटगीते लिहिण्याचा अनोखा प्रवास जैत रे जैतपासून सुरु झाला होता...त्याने मला भरभरुन आनंद दिला जो अविस्मरणीय आहे.

No comments:

Post a Comment