Thursday, October 12, 2017

निराशेच्या अंधारातून आशेच्या प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देतो `कासव' - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी सिनेकट्टा सेगमेंट

दै. दिव्य मराठीच्या मराठी सिनेकट्टा सेगमेंटसाठी कासव या चित्रपटाचे दि. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण. त्याची वेबपेज लिंक व मजकूर पुढे दिला आहे.
--
निराशेच्या अंधारातून आशेच्या प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देतो `कासव'
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - चार स्टार
--
कलाकार - इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम, मोहन आगाशे, ओंकार घाडी, देविका दप्तरदार, संतोष रेडकर
निर्माते : मोहन आगाशे - सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर
कथा- पटकथा-संवाद : सुमित्रा भावे
दिग्दर्शक : सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर
गीते : सुनील सुकथनकर
चित्रपट प्रकार - फॅमिली ड्रामा
--
मराठी चित्रपटात सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर या दिग्दर्शकांचे नाव अग्रणी घ्यावे लागते. अतिशय संवेदनशील विषय, आशय, सादरीकरण आणि हाताळणीत अनेक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. या दिग्दर्शकांच्या जोडीने मराठी चित्रपटाचा नवा अध्याय लिहिला आहे. दोघी, देवराई, वास्तुपूरूष, दहावी फ, जिंदगी झिंदाबाद, नितळ यासारख्या अप्रतिम चित्रपटांची निर्मिती या दोघांनी केली आहे. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या 'कासव' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सुवर्णकमळ पुरस्कारावर `कासव'ने आपली मोहोर उमटवली. त्यामुळे या चित्रपटाविषयी रसिकांच्या मनात उत्सुकता असणे साहजिकच होते. पण या चित्रपटाला वितरक उशीरा मिळाल्याने तो तयार झाल्यानंतर प्रदर्शित होण्यातही बरेच महिने गेले. कलात्मक व उत्तम चित्रपटांना वितरक सहजी मिळत नाहीत ही बाब कासवच्या निमित्ताने पुन्हा समोर आली. कासव हा चित्रपट पाहाणे हा चोखंदळ प्रेक्षकासाठी सर्वांगसुंदर अनुभव आहे.
कथा - जानकी कुलकर्णी ही मध्यमवयीन महिला. अमेरिकेत आपला नवरा ललित व मुलगा जयदीपबरोबर राहात असलेली ती एक गृहिणी. तिचा मुलगा जयदीप हा वयाच्या सोळाव्या वर्षीच स्वतंत्र झाला आहे. तर नवरा ललित हा त्याच्या उद्योगव्यवसायात खूपच व्यग्र. जानकीला त्यामुळे एकाकीपणाने ग्रासले आहे. त्यामुळे तिला काही मानसिक विकारही झाला आहे. तिचे मन खूप अस्वस्थ आहे. ती नवरा ललित व मुलगा जयदीपपासून दुरावून अमेरिकेहून मुंबईला परत आली आहे. मुंबईत तिचा एक वडिलोपार्जित फ्लॅट आहे. तिथे ती राहाते. तिला जडलेल्या मानसिक विकारापासून मुक्तता मिळविण्यासाठी तिने मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घेतली आहे. तिला एखाद्या विषयात मन गुंतविण्याचा सल्लाही मानसोपचार तज्ज्ञानी दिलेला आहे. त्यानूसार तिने उत्तम समाजसेवी कार्य करायचे असे ठरविले आहे. त्यानूसार तिने कोकणात सुरु असलेल्या कासव संरक्षण प्रकल्पामध्ये स्वत:ला गुंतवून घेतले आहे. हा प्रकल्प चालविणाऱ्या दत्ताभाऊंमुळे ती या कामात ओढली गेली. दत्ताभाऊंच्या कामाने तिला प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे ती मुंबईहून आपला वाहनचालक यदुसोबत कोकणातील प्रकल्पस्थळी आली आहे. ती मुंबईहून येताना तिला वाटेत एका हॉटेलच्या बाहेर एक मुलगा तापाने फणफणलेला दिसतो. त्याचे कपडे वगैरे अव्यवस्थित असले तरी तो बऱ्या घरचा मुलगा वाटत असतो. त्या मुलाला डॉक्टरचे उपचार मिळावेत म्हणून ती हॉटेलवाल्याला विनंती करते पण कोणीही त्याची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे जानकी त्या मुलाला आपल्या गाडीत बसवून कोकणातील आपल्या घरी घेऊन येते. या मुलाच्या दृश्यापासून खरेतर चित्रपटाची सुरुवात आहे. तो एका रेल्वे ब्रिजवर जातो. तिथे तो ब्लेडने आपल्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे हे प्रताप परिसरातील लोकांच्या लक्षात येऊन त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले जाते. पण तो मुलगा तेथूनही पळून जातो. तो एका ट्रकमध्ये बसतो व कोकणच्या दिशेने जाऊ लागतो. त्याच्या अंगात ताप असतो. अशक्तपणाही खूप असतो. एका हाॅटेलपाशी ट्रक थांबताच तो उतरतो व तिथेच जवळ झोपून राहातो. त्याचे ते गलितगात्र असणे परिसरातील अनेकांच्या लक्षात येते पण कोणीच काही मदत करत नाही. नेमकी त्यावेळेला तिथे जानकी येऊन पोहोचते. ती त्याला आपल्या सोबत घेऊन जाते. या मुलाकडे जे सामान असते त्यात त्याचा मोबाइल असतो. त्याच्या कवितांची एक जुनी वही, कपड्यांचा एक जोड असे काहीबाही सामान असते. त्या सामानातून त्याची थोडीथोडी ओळख प्रेक्षकांना पटत राहाते. जानकीच्या घरी आल्यानंतर ती हा मुलगा बरा होण्यासाठी डॉक्टरांना बोलावते. त्याच्यावर उपचार सुरु होतात. तो हळुहळू बरा होऊ लागतो. पण हा मुलगा विलक्षण एकाकी मनोवृत्तीचा आहे, तो निराश आहे हे त्याच्या देहबोलीतून जानकीच्या लक्षात आलेले असते. तीही मानसिक विकाराचा सामना करत असल्याने निराश झालेला माणूस नेमका कसा वागतो याची तिला उत्तम जाण असते. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून ती त्याला वाऱ्यावर सोडत नाही. त्या मुलाला ती निश असे संबोधते. त्याचे खरे नाव, आडनाव त्याच्याकडून जाणून घेण्याचा अजिबात परत करत नाही. निश जसजसा बरा होतो तसतसा त्याच्या विक्षिप्त स्वभावाचे तडाखेही काही वेळा जानकीला बसू लागतात. एक दिवस जानकी या निशच्या सामानातील त्याची डायरी पाहाते. त्यात तिला एक मोबाइल नंबर मिळतो. त्यावर फोन केल्यानंतर हळुहळू निश हा खरा कोण आहे हे तिला उलगडत जाते. निश हा देखील जानकीतील माणूसकी जाणवू लागते. तो तिच्याशी काहीशा आत्मीयतेने वागायला सुरुवात करतो. तो कालांतराने तिच्याकडे स्वत:बद्दल थोडे थोडे का होईना सांगू लागतो. जानकी ज्या कासव संरक्षण प्रकल्पात सहभागी झालेली असते तो प्रकल्प बघायला ती नीशला घेऊन जाते. कासवांची मादी समुद्राबाहेर येऊन किनाऱ्यावर अंडी घालते व ती समुद्रात परत निघून जाते. पण या अंड्यातून जेव्हा पिल्ले बाहेर येतात तेव्हा त्यांचे नीट संरक्षण होऊन ती पुन्हा समुद्रात परत कशी जातील याची काळजी निसर्गप्रेमींनी घेणे सध्या आवश्यक बनले आहे. कारण कासवे खायची माणसाला चटक लागल्याने हा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे की काय अशी स्थिती उद्भवू शकते. त्यामु‌ळे माणसापासून कासवाला वाचविण्यासाठी अनेक संस्थांनी जगभर कासवांच्या संरक्षणासाठी प्रकल्प सुरु केले आहेत. त्यातील एक प्रकल्प दत्ताभाऊंचा असतो. बाह्य संकटापासून वाचण्यासाठी कासव आपले सर्वांग निसर्गाने त्याला बहाल केलेल्या कवचाखाली ओढून घेते. संकट दूर होईपर्यंत तसेच पडून राहाते. अनेकदा माणसे जगताना कासवासारखेच एखाद्या कवचामध्ये स्वत:ला ओढून घेतात. निराशेेचे क्षण आले की माणसे अशी वागतात. पण कासव आपल्या कवचातून पुन्हा सर्वांग बाहेर काढून जगायला सुरुवात करते. निराशेच्या वातावरणातून बाहेर पाडून आशेच्या जगात ते पुन्हा जातात. माणूसही कासवासारखेच जगत असतो. कासवाची ही जीवनपद्धती पाहून जानकीला त्यातून प्रेरणा मिळालेली असते. निशचे खरे नाव मानवेंद्र. त्याचे आईवडिल दिल्लीला असतात. मानवेंद्रची आई मरण पावलेली असते. त्यामुळे त्याचे सारे बालपण आजीआजोबांकडे गेलेले असते. मानवेंद्रच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. त्याची सावत्र आई मानवेंद्रला आपल्यासोबत राहायला येण्यासाठी बोलवत असते. पण मानवेंद्रलाच ते सारे नको असते. तो आईवडिलांपासून दुरावलेला आहे. त्यांची आठवणही त्याला अस्वस्थ करते. त्याला मित्र होते पण आता तेही सारे लांब गेले आहेत. त्याला अायुष्यात काही राम वाटत नाही. त्यामुळे तो आत्महत्येचाही प्रयत्न करतो. त्याने शिक्षण अर्धवट सोडले आहे. तो दारु पितो, ड्रग्जही घ्यायचा. अशा जगाच्या दृष्टीने वाईट चालीच्या मुलाला आश्रय देऊनही जानकी अजिबात डगमगत नाही. तो कसा सुधारेल याकडेच तिचे लक्ष आहे. मानवेंद्र उर्फ निशविषयीची सारी माहिती जानकीला मिळाली आहे. पण ती त्याला तसे जाणवू देत नाही. कासवांच्या जीवनपद्धतीविषयीची सारी माहिती घेऊन, तो सारा प्रकल्प पाहून मानवेंद्रच्या मनातली निराशा झटकली जाते का? तो या कासवांपासून काही प्रेरणा घेतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. 
अभिनय - निश उर्फ मानवेंद्र या युवकाच्या भूमिकेत आलोक राजवाडे याने कसदार अभिनय केला आहे. निराश, हताश, आयुष्याला कंटाळलेला एकाकी मुलगा त्याने आपल्या देहबोलीतून अप्रतिम उभा केला आहे. तो उत्तम गातोही त्यामुळे या चित्रपटात त्याने गायलेली आलापी तसेच त्याचे गुणवान असणे हे निशच्या भूमिकेचा अंतरात्मा झाला आहे. जानकीच्या भूमिकेत इरावती हर्षे हिने मनातून अस्वस्थ असलेली मध्यमवयीन महिला उत्तमप्रकारे वठवली आहे. तिचे एकाकीपण, तिची करुणा हे इरावतीच्या भावमुद्रांतून ठोसपणे प्रकटते. किशोर कदम (यदू), मोहन आगाशे (दत्ताभाऊ), ओंकार घाडी (परशू हा बालकलाकार), देविका दप्तरदार (सुबेला), संतोष रेडकर (बाबल्या) यांच्याही भूमिका तोलूनमापून झाल्या आहेत. कुठेही नाव ठेवायला तसुभरही जागा नाही.
दिग्दर्शन - सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर यांचा चित्रपट हा आशयघन व वेगळा असणार हे सांगायलाच नको. कासवाची जीवनशैली व निराश माणसाने िनराशा झटकून पुन्हा आयुष्यात उभे राहाणे या दोन गोष्टींची जी सांगड या दिग्दर्शकद्वयाने कासव चित्रपटात घातली आहे ती अप्रतिमच आहे. कासवांच्या जीवनशैलीचे जे चित्रण या चित्रपटात आले आहे तसे यापूर्वी कधीही मराठी चित्रपटांत तरी ते दिसले नव्हते. नीश उर्फ मानवेंद्र व जानकी यांचे जगणे एका घटनेनंतर समांतर होऊ जाते तो प्रवास अनेक हृदयस्पर्शी प्रसंगांतून दाखविला आहे. ते प्रसंग पाहाताना प्रेक्षक चित्रपटात गुंतून पडतो. कोणताही मसाला न वापरता केवळ आशयघनतेवर प्रेक्षकांना खिळवून ठेवणे ही किमया सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर यांना साधली आहे. कारण ते चिंतनशील दिग्दर्शक आहेत. कासव हा दिग्दर्शनाच्या बाबतीत, छायाचित्रणाच्या बाबतीत अगदी उजवा आहे. 
संगीत - या चित्रपटातील गीते : सुनील सुकथनकर यांची आहेत तर संगीत साकेत कानेटकर यांनी दिले आहेत. ही गीते सायली खरे, आलोक राजवाडे यांनी गायली आहेत. ती गीते अतिशय अर्थपूर्ण आहेत. प्रत्यक्ष चित्रपटात ती पाहाताना त्यांचा अन्वयार्थ अधिक स्पष्ट होतो. आशयघनता, छायाचित्रण, दिग्दर्शन, अभिनय सर्वच बाबतीत उजवा असलेल्या कासव चित्रपटाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला पाहिजे. तरच असे अधिकाधिक आशयघन मराठी चित्रपट बनविण्यासाठी निर्माते, दिग्दर्शकांना उत्साह येईल.                                                                         https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-marathi-movie-kasav-review-5714002-PHO.html

No comments:

Post a Comment