Tuesday, October 24, 2017

कवितेतून गाण्याकडे : लोभस शब्दसांगावा - समीर परांजपे -- ना. धों. महानोर यांच्या पुस्तकाचा परिचय...दै. दिव्य मराठी २४ ऑक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. 24 आँक्टोबर 2017च्या अंकात मधुरिमा या पुरवणीमध्ये मी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितेतून गाण्याकडे या पुस्तकाचे परीक्षण लिहिले आहे. त्या लेखाची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मजकूर पुढे देत आहे.

http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/24102017/0/5/
----
कवितेतून गाण्याकडे : लोभस शब्दसांगावा...
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
चित्रपटांसाठी गीते लिहिणारे हे मुळात प्रतिभावंत कवी असतात. त्यामुळेच त्यांना चित्रपटातील कथानकासाठी अनुकूल अशी उत्तमोत्तम गाणी लिहिता येतात. ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबूडकर, सुधीर मोघे हे त्या प्रभावळीतील काही तेजस्वी तारे. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली अनेकानेक गाणी ही आजही लक्षावधी रसिकांच्या मनात आजही लखलखत आहेत. मात्र अशा प्रतिभावंत गीतकारांच्या कामगिरीची मराठी समीक्षकांनी म्हणावी तशी दखल कधी घेतलीच नाही. गीतकार हे प्रतिभावंत कवी कसे आहेत याबद्दल मराठीत उल्लेखनीय अशी समीक्षा कधीही लिहिली गेली नाही. कवि हा श्रेष्ठ व गीतकार हा काहीसा दुय्यम असाच मराठी समीक्षकांचा नेहमी पवित्रा राहिला आहे. ही सल अनेक साहित्यरसिकांच्या मनात आहे. मात्र या भेदभावापलीकडे स्वत:च्या कवितेने जाऊन पोहोचलेले अजून एक महत्वाचे नाव म्हणजे निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे. जैत रे जैत या चित्रपटापासून महानोर यांनी चित्रपटगीते लिहायला सुरुवात केली. महानोर यांनी जैत रे जैत, सर्जा, दोघी, मुक्ता, अबोली, उरुस, एक होता विदुषक, अजिंठा, मालक, यशवंतराव चव्हाण अशा दहा मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. त्याचबरोबर चित्रपटबाह्य गाणीही लिहिली जी विविध ध्वनिमुद्रिका व सीडींमध्ये समाविष्ट आहेत. ना. धों. महानोर यांचा हा जो कवितेतून गाण्याकडे प्रवास झाला त्याबद्दल रसिकांना खूप कुतुहल होते. विविध साहित्यविषयक कार्यक्रमांत, काव्यवाचनप्रसंगी त्यांना रसिक या गाण्यांच्या निर्मितीबद्दल प्रश्न विचारायचे. त्या गाण्यांची निर्मिती कशी झाली याबद्दल त्या त्या वेळी महानोर विवेचनही करायचे. पण हे सारे विवेचन अक्षरबद्ध तसेच ग्रंथबद्ध होणे आवश्यक होते. ते कार्य आता पूर्ण झाले असून त्यातूनच ना. धों. महानोर यांचे काव्यातून गाण्याकडे हे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पॉप्युलर प्रकाशनने ते पुस्तक प्रसिद्ध केले आहे.
या पुस्तकाच्या मनोगतात ना. धों. महानोर यांनी आपल्या गीतलेखनाचे सारतत्व सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे `मी माझे काव्य निसर्ग प्रतिमांतून व नव्या निर्माण केलेल्या शब्दांमधून उभे केले. कविता काहीच सांगत नाही, सूचित करते. संपूर्ण कविता प्रतिमा होऊन लिहिलेल्या प्रीतीच्या व दु:खाच्याही कविता मी माझ्या परीने लिहिल्या. मराठी रसिकांनी त्यासाठी मला भरभरुन दिले. अनेक गायक, गायिका- संगीत दिग्दर्शक यांनी त्या कवितेला आणखी वेगळ्या जगात नेऊन ठेवले. कविता व गीत यात मी कधीच फरक न ठेवता एकसंध लिहिले. हा भेद कोणी केला मला ठाऊक नाही. चित्रपट गीतांमध्ये व इतर ध्वनिमुद्रिकांमध्येही मुक्त कविता, लयबद्ध कविता, गाणी आहेत. त्यासंबंधी रसिकांमध्ये कुतुहल असते. त्याची माझी म्हणून निर्मितीप्रक्रिया व पद्धती याविषयी आणि त्या अनुषंगाने मी लिहावे असा रसिकांचा आग्रह म्हणून मी कवितेतून गीताकडे हे पुस्तक लिहिले.'
कवितेतून गीताकडे या पुस्तकाचे पहिले प्रकरण आहे ते `आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले' हे. १९४२ साली महानोर यांच्या जन्माच्या काळात पळसखेड हे दोनशे-तीनशे उंबऱ्यांचे गाव होते. या खेड्याचा श्वास प्राण होता गाणं. लोकगीत, लोकसंगीत, लोकनृत्य आणि लोकसंस्कृतीची पांघर अंगावर घेऊन जगण्याचा. चांगला हंगाम, दुष्काळ, संकट, सणउत्सव, देवधर्म, भजन-कीर्तन, ओवी, झोपाळा, लोकनृत्य यांत एकजीव होऊन छान जगणाराहा खेड्यांतील शेतकरी समाज. या सगळ्या गोष्टींचे संस्कार ना. धों. महानोर यांच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. हे मातीतले सारे संस्कार पुढे ना. धों. महानोर यांच्या कवितेतून उमटले. या माहोलवर त्यांनी लिहिलेल्या पहिल्या प्रकरणात त्यांच्या काव्यप्रवासाचे मुलस्थान काय होते याची सविस्तर माहिती रसिकांना मिळते. महानोर यांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांनी कविता व गीत यांच्यातील फरकच संपवून टाकला. 
महानोर यांनी ज्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली त्या प्रत्येक चित्रपटातील दोन गाणी त्यांनी त्या चित्रपटाबद्दल लिहिलेल्या प्रकरणात दिली आहे. या गाण्यांच्या अनुषंगाने त्यांच्या लेखनामागची प्रक्रिया व अनुभव कथन केले आहेत. जैत रे जैत चित्रपटाविषयी लिहिलेल्या प्रकरणात त्यांनी `हिरव्या पानात हिरव्या पानांत चावळ चावळ चालते...', नभं उतरु आलं ही दोन गाणी आवर्जून दिली अाहेत. जैत रे जैत चित्रपटासाठी मंगेशकरांनी जेव्हा महानोरांना गाणी लिहायला बोलावले तेव्हा महानोरांना त्याचे खूप आश्चर्य वाटले होते. त्यावेळी त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या रानातल्या कविता, वही या दोन कवितासंग्रहात एकुण शंभर कविता होत्या. ते नवकवी होते. कधीही चित्रपटासाठी एकही कविता-गीत त्यांनी तेव्हा लिहिलेले नव्हते. ही सारी पार्श्वभूमी घेऊन ते १९ मार्च १९७७ रोजी गुढीपाडव्याला लतादिदी मंगेशकर यांच्या मुंबईतील प्रभूकुंज या निवासस्थानी जैत रे जैत संदर्भातील बैठकीला हजर झाले. चित्रपटाच्या विविध अंगांविषयी बैठकीत चर्चा होत होती. गाण्यांच्या जागाही ठरत होत्या. अशाच एका गाण्यासाठी चर्चा झाली. महानोर प्रभुकुंज निवासस्थानातील एका लहानशा खोलीत एकटेच जाऊन बसले. ते त्या गीताच्या बांधणीत व्यग्र झाले होते. खिशातील मजुरी वाटण्याची लहान डायरी होती. त्यावरच ते लिहिते झाले...
मी रात टाकली
मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची, बाई लाज टाकली
ह्या पंखांवरती
मी नभ पांघरती
या ओळी लिहून ते पुन्हा बैठकीत सामील झाले. सग‌ळ्यांच्या आग्रहावरुन आपल्या गावरान पद्धतीने त्यांनी स्वच्छ शब्द व लयीत हे गीत तिथे गाऊन दाखविले. संबंध प्रभुकुंज टाळ्यांनी दुमदुमला. हे गाणे तिथेच संमत झाले. अशा रितीने निसर्गकवि ना. धों. महानोर हे आता गीतकाराच्या भूमिकेत शिरले होते. जैत रे जैतमध्ये मोठी दहा गाणी व एक दीड मिनिटे अवधीची सात साँगलेट्स होती. ती सारी महानोर यांनी लिहिली. जैत रे जैत चित्रपट त्यातील गाणी व दिग्दर्शन या दोन्ही गोष्टींनी गाजला. 
कवितेतून गाण्याकडे वळल्यानंतर महानोरांनी दहा चित्रपटांसाठी गीतलेखन केले. `सर्जा' चित्रपटातील `चिंब पावसानं रान झालं आबादानी', मी काट्यातून चालून थकले ही गीते, `दोघी' चित्रपटातील `भुई भेगाळली खोल ओल राहिली ना कुठं', `इथे आलो होतो मागाया जोगवा', `मुक्ता' चित्रपटातील `त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे', `वळणवाटातल्या झाडीत हिर्वे छंद', `अबोली' चित्रपटातील `तुझ्या वाटेला ओले डोळे सुकून गेले पाणमळे', `निळ्या ग डोळ्यांच्या स्वप्नात चांदणं' अशा अनेक गाण्यांनी ना. धों. महानोर यांनी रसिकांच्या आयुष्यात शब्दचांदण्यांचा प्रकाश दिला. 
त्याशिवाय माझ्या आजोळची गाणी, दूरच्या रानात, माझी मुलगी, गाथा शिवरायाची, पालखीचे अभंग, गगनाला पंख नवे, फिटे अंधाराचे जाळे, नाव माझं शामी, गंध मातीचा, जरा अस्मान झुकले, शेवंतीचं बन या चित्रपटबाह्य ध्वनिमुद्रणांमध्ये महानोर यांनी लिहिलेली गीतेही तितकीच भावस्पर्शी झाली आहेत. त्यांचाही प्रवासही या पुस्तकात चित्रपटाबाहेरची गाणी या स्वतंत्र विभागात एकेका प्रकरणाद्वारे महानोर यांनी मांडला आहे. कविता व गीत यांतील भेद संपविणाऱ्या कवीचा हा `कवितेतून गाण्याकडे' हा लोभस शब्दसांगावा रसिकांनी आवर्जून वाचला पाहिजे.
--
पुस्तकाचे नाव - कवितेतून गाण्याकडे
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
किंमत - २५० रुपये
पृष्ठसंख्या - १४८
---

No comments:

Post a Comment