Tuesday, October 31, 2017

`भंगार' ठरले गोसावी समाजातील व्यक्तिने लिहिलेले मराठीतील पहिले आत्मचरित्र! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी २८ ऑक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या २८ ऑक्टोबर २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. त्या बातमीची वेबपेज लिंक, जेपीजी फाइल व मजकूर पुढे देत आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/28102017/0/11/
--
`भंगार' ठरले गोसावी समाजातील व्यक्तिने लिहिलेले मराठीतील पहिले आत्मचरित्र!

- अशोक जाधव या लेखकाचे आत्मचरित्राचे प्रकाशक आहेत मनोविकास प्रकाशन

- समीर परांजपे

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर - भटका विमुक्त असलेला गोसावी समाज हा मुळचा भिक्षा मागून जगणारा. मात्र त्यांना मिळणाऱ्या भिक्षेचे प्रमाण कमी झाल्यामुळे पोट भरण्यासाठी या समाजातील लोकांनी पाच सहा पिढ्यांपूर्वी भंगार वेचण्याचे काम पत्करले. स्त्रियांनी शिक्षण घेणे हा जणू काही गुन्हा आहे अशी गोसाव्यांच्या जातपंचायतीची भूमिका. या सगळ्या बंधनांना झुगारुन गोसावी समाजातून गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत जी मुले-मुली शिकले त्यांच्यातलेच एक म्हणजे अशोक जाधव. पेशाने शिक्षक असलेल्या अशोक जाधव त्यांनी `भंगार' नावाचे आत्मचरित्र लिहिले असून ते मनोविकास प्रकाशनच्या वतीने लवकरच प्रसिद्ध होणार आहे. गोसावी समाजातील व्यक्तीने मराठीत लिहिलेले ते पहिले आत्मचरित्र आहे.
यासंदर्भात अशोक जाधव यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, इचलकरंजी परिसरात वेताळपेठ नावाचे एक गाव आहे तिथे माझा जन्म झाला. गोसावी समाज भटका विमुक्त असल्याने तो अनेक ठिकाणी विखुरला गेला आहे. त्यामुळे तो शिक्षण व अनेक सुविधांपासून वंचित राहिला होता. हा समाज गावगाड्याबाहेरचा. लोकांकडून मिळणाऱ्या भिक्षेचे प्रमाण कमी झाल्याने पोटापाण्यासाठी गोसावी समाजाच्या पूर्वीच्या पिढ्यांनी भंगार वेचायचा व्यवसाय पत्करला. त्यासाठी उकीरड्यांवर जावे लागे. हे जीणे खूप भयानक आहे. गोसावी समाजातील अनेक लोक आजही भंगार वेचण्याचा व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतील.
ते पुढे म्हणाले की, मला शिक्षणाची इच्छा प्रबळ होती. त्यामुळे मी खूप कष्ट घेऊन, विपरित परिस्थितीचा सामना करुन बीए., बीएड. झालो. त्यानंतर राधानगरी तालुक्यात शिक्षक म्हणून १६ वर्षे काम केले. आता इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये मराठी व इतिहास विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या आजवरच्या ४३ वर्षांच्या आयुष्यात गोसावी समाजातील व्यक्ती म्हणून जगताना जे अनुभव आले ते वेगळे होते. आपल्याला जसा शिकण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला तसा गोसावी समाज तसेच इतर बेघर लोकांच्या मुलामुलींना करावा लागू नये असे मला वाटत होते. त्यासाठी इचलकरंजीला पंचगंगा सहकारी साखर कारखान्यासमोर मी ५ गुंठे जागा घेतली. तोवर माझ्या मालकीचा एक इंच जमिनीचा तुकडाही नव्हता. त्या जमिनीमध्ये एक पत्र्याची शेड बांधून मी माझ्या कुटुंबासहित राहू लागलो. त्याचबरोबर गोसावी समाजातील तसेच बेघर मुला-मुलींना त्यांच्या कुटुंबासहित आमच्यासोबत राहायला दिले. त्यांना एकच अट घातली मला इथे राहाण्याचे भाडे देऊ नका पण तुमच्या मुलामुलींना शिकवा. आज या मुलामुलींपैकी एक मुलगी बीफार्मसी झाली, एक जोगतीण होती तिला शिकवून शिक्षिका बनविले, गोसावी समाजातील एक मुलगा माझ्याकडे राहून डॉक्टर झाला. एक मुलगी चांगली शिकून मुंबईत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करते आहे. यात मी काही विशेष करत होतो असे नाही. पण मी मुलींना शिकायला मदत करत होतो त्यामुळे गोसावी जातपंचायतीने माझ्यावर आठ वर्षे बहिष्कार घातला होता. सध्या मी `बेटी बचाव, बेटी पढाव' हे अभियान सुरु केले आहे.
अशोक जाधव पुढे म्हणाले की, मला आलेले सगळे अनुभव सांगावेसे वाटले. त्यातून `भंगार' हे आत्मचरित्र मी लिहिले. गोसावी समाजाबद्दल माहिती देणारे लेखन काही जणांनी केले आहे. पण गोसावी समाजातील एखाद्या व्यक्तीने आपले मराठीत आत्मचरित्र लिहिले आहे असे यापूर्वी घडलेले नाही. `भंगार' हे आत्मचरित्र लिहून झाल्यानंतर ज्यांनी त्याचा खर्डा वाचला त्यांच्या ही बाब लक्षात आली. तोपर्यंत मलाही या गोष्टीचे भान नव्हते. गोसावी समाज असो किंवा कोणताही भटका-विमुक्त समाज त्यांच्यात आज शिक्षणाचा प्रसार होत आहे पण अजूनही तो म्हणावा तितका होताना दिसत नाही. ही सगळी स्थिती या आत्मचरित्राद्वारे लोकांसमोर प्रखरतेने यावी हाही हे पुस्तक लिहिण्यामागचा माझा उद्देश आहे.

No comments:

Post a Comment