Wednesday, October 18, 2017

भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांची जैत रे जैत चित्रपटाबद्दल मी घेतलेली मुलाखत




भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांची मी घेतलेली मुलाखत

----
भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांची मी जैत रे जैत चित्रपटाच्या आठवणींसंदर्भात घेतलेली ही विशेष मुलाखत. हा सुवर्णयोग आला ती मुलाखत दै. दिव्य मराठीच्या दि. 15 आँक्टोबर 2017च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाली आहे. तो मजकूर, जेपीजी फाइल व वेबपेजलिंक सोबत दिली आहे.
---
सृजनाचे योग जुळले...
------------------------
- लता मंगेशकर
------------------------
(शब्दांकन - समीर परांजपे)
-----
‘जैत रे जैत’ या कादंबरीवर आम्ही चित्रपट काढला. आप्पासाहेब दांडेकरांची ही अत्यंत आवडती कादंबरी होती. त्यामुळे निर्माती म्हणून उषाने (मंगेशकर) या कादंबरीवर चित्रपट बनविण्याची इच्छा आहे सांगितले. तेव्हा आप्पासाहेब अतिशय खुश झाले.
माझी आप्पांची ओळख तशी खूप जुनी. मी भगवद््गीता रेकॉर्ड केली तेव्हाची. त्यावेळी आप्पासाहेब घरी येऊन संस्कृत मला शिकवायचे. सगळी भगवद््गीता म्हणून दाखवायचे. मला म्हणायचे, म्हणून दाखवा, आता मला. मग संभाषण करायला लावायचे. त्यातल्या चुका लक्षात आणून द्यायचे. संस्कृत उच्चारांमधले दोष सांगायचे. आम्ही पहिल्यांदा घरी रिहर्सल करायचो. मग मी भगवद््गीतेतले अध्याय रेकॉर्ड करायचे.
आप्पा दांडेकरांशी आमचे असे स्नेहबंध होते. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या दोघांतला जिव्हाळ्याचा विषय होता. पुढे त्यांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवर आम्ही चित्रपट करायचे ठरविले, तेव्हा हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या चित्रपटाचे संगीत करावे ,असेही ठरले. या चित्रपटात माझे एकच गाणे होते. ते म्हणजे,‘मी रात टाकली.' गाणे अतिशय सुंदर होते. पण हेच कशाला, सगळीच गाणी त्या सगळ्या वातावरणाला शोभेल अशीच होती. हा चित्रपट ठाकर या आदिवासी जमातीतील माणसांची गोष्ट सांगतो. जब्बार पटेल हा चित्रपट बनविताना एका गोष्टीवर ठाम होते ते, म्हणजे कथानकात जे आहे तेच शक्यतो, या चित्रपटात दाखवायचे. उगीचच नवीन काहीतरी ड्रेस तयार केलेत, ठाकरांच्या बोलीपेक्षा चित्रपटातील पात्रे वेगळेच, काही बोलत आहेत किंवा उगीचच भलत्या ठिकाणी डान्सचे गाणे घातले आहे असे जब्बार पटेल यांनी काहीही केले नाही. चित्रपटातील नृत्याच्या जागेत ठाकरांचे नृत्य घेतले. ठाकरांची जशी जीवनशैली आहे, तशीच चित्रपटात दाखविली. म्हणूनच चित्रपट उत्तम झाला. त्याला विश्वासार्हता आली.
‘जैत रे जैत’ या चित्रपटात चिंधी या नायिकेच्या भूमिकेत स्मिता पाटील होती. तिने आणि मोहन आगाशे यांनी खूपच छान काम केले. शांतारामबापूंचा नातू सुशांत रे याने लहानपणीच्या नाग्याची भूमिका केली होती. त्याचाही भाग स्मरणात राहणारा होता. या चित्रपटाशी जोडलेली एक गोष्ट सांगते. तो प्रसंग ऐकून, आम्हीही भयंकर घाबरलो होतो. ते म्हणजे, कर्नाळ्याला चित्रीकरणादरम्यान मोहन आगाशेे यांना खरोखर मधमाश्या चावल्या होत्या. त्याचा त्यांना खूप त्रास झाला होता. औषधोचारही घ्यावे लागले होते. अशा अडचणींवर मात करुन ज्या वास्तववादी पद्धतीने हा चित्रपट बनवायला हवा होता, तसाच जब्बार पटेल यांनी बनविला. हृदयनाथनी चित्रपटासाठी जी गाणी केली, ती अगदी त्या कथानकाला अनुरुप अशीच होती.
ना. धो. महानोर यांनी ही सर्व गाणी लिहिली. त्यांच्यासोबत पुढे मी‘माझ्या आजोळची गाणी' मी रेकॉर्ड केली . महानोर नेहमीच भावगर्भ गाणी लिहितात. माझ्या मते, ते फार मोठे कवी आहेत. ते आपल्या छोट्याश्या गावाला राहातात, शेती करतात. त्यांच्यामध्ये काव्याचा जो एक नैसर्गिक गुण आहे त्यातूनच त्यांच्यातील कवी घडला असावा. सरतेशेवटी, मी तर असे म्हणेन की, ‘जैत रे जैत’ या चित्रपटामध्ये प्रत्येक गोष्ट जुळून आली होती. त्यामुळेच हा चित्रपट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment