Thursday, October 12, 2017

हलाल - धार्मिक परंपरेच्या चरक्यात पिचलेल्या अबलेची व्यथा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी वेबसाइटमधील मराठी सिनेकट्टा

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी सिनेकट्टा या सेगमेंटसाठी हलाल या चित्रपटाचे मी दि. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी केलेले हे परीक्षण. त्याची लिंक व मजकूर पुढे दिला आहे.
----
हलाल - धार्मिक परंपरेच्या चरक्यात पिचलेल्या अबलेची व्यथा
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - तीन स्टार
--
कलाकार - चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव, प्रितम कागणे, विजय चव्हाण, छाया कदम, संजय सुगावकर, अमोल कागणे, विमल म्हात्रे, नेहा धाटणीकर, अरुण गीते, अमीर तडवळकर, ज्ञानेश भिलारे, केतन लुकंड, व्यंकटी मुसळे
कथा - राजन खान
पटकथा, संवाद - निशांत धापसे
दिग्दर्शक - शिवाजी लोटण पाटील
निर्माते - लक्ष्मण कागणे, अमोल कागणे
संगीत - विजय गटलेवार
चित्रपट प्रकार - फॅमिली ड्रामा
--
मुस्लिम महिलांच्या मानवी हक्काचे उल्लंघन करणारी त्रिवार तलाकची प्रथा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ३-२ बहुमताने २२ ऑगस्ट २०१७ रोजी संपुष्टात आणली. ही प्रथा अवैध, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल न्यायालयाने दिला. यासंदर्भात संसदेने कायदा करावा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या निकालामुळे मुस्लिम महिलांना मोठा दिलासा मिळाला पण दुसऱ्या बाजूला ही प्रथा शिरोधार्य मानणाऱ्यांनी विविध अंगाने आपला निषेध नोंदविलाच. या सगळ्या तापलेल्या वातावरणात त्रिवार तलाक पद्धतीवर कोरडे ओढणारा हलाल हा नवा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने अजून एक ठिणगी पडली. सेन्सॉरने संमत केलेला असूनही हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ नये म्हणून काही ठिकाणी निदर्शनेही झाली. प्रख्यात साहित्यिक राजन खान यांनी १९८१ साली हलाला ही कथा लिहिली होती. मुस्लिमांमध्ये हलाला ही एक धार्मिक प्रथा आहे. त्यावर या कथेत भाष्य अाहे. या कथेवर आधारितच हा चित्रपट आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यास अनेक चित्रपटगृहचालक राजी नाहीत. हलाल हा चित्रपट मुस्लिम सुधारणावाद्यांची विचारधारा अधिक बळकट करणारा आहे. त्यामुळे या चित्रपटाचे मराठी चित्रपटाच्या इतिहासात नक्कीच वेगळे स्थान आहे. 
कथा - एका गावात कद्रूस हा एक मुस्लिम युवक व त्याची पत्नी हलीम हे दांपत्य नांदत असते. कद्रूसची आई अत्यंत फटकळ असते. ती आपली सून हलीमा हिचा सातत्याने छळ करीत असते. तो छळ कद्रूसला पाहावत नाही. अशाने एक दिवस आपली आई हलीमचा जीवही घ्यायला मागेपुढे पाहाणार नाही याची कद्रूसला पुरेपूर जाणीव असते. कद्रूसला आईला घराबाहेर काढणे शक्य नसते व त्याला आपल्या बायकोचा छळ होत असलेला पाहावत नसतो. मग तो यातून एक मार्ग काढतो. तो त्रिवार तलाक प्रथेचा आधार घेतो. आपली पत्नी हलीमला तीनदा तलाक असे म्हणून तो तिला तिच्या माहेरी पाठवून देतो. या त्याचा हेतू हा असतो की, आपल्या आईच्या जाचापासून तिची कायमची सुटका होईल. तलाक दिल्यानंतर दोन वर्षे हलीम आपल्या आईवडिलांकडेच राहात असते. एक दिवस कुद्रूस हलीमच्या माहेरी येतो. तो हलीमच्या वडिलांना सांगतो की, मला हलीमला पुन्हा नांदवायचे आहे. आता हलीमच्या वडिलांपुढे पेच निर्माण होतो. ज्या पतीने आपल्या पत्नीला तलाक दिला आहे ती मुलगी पुन्हा त्याच पतीकडे नांदायला गेली आहे असे उदाहरण त्यांनी उभ्या आयुष्यात पाहिलेले नसते. या गोष्टीला धर्मही मान्यता देत नाही इतकी प्राथमिक माहिती त्यांना असते. त्यामुळे हलिमाचे वडिल आपल्या गावातील स्वधर्मीय ज्येष्ठ माणसे, सरपंच यांच्याशी सल्लामसलत करतात. मग हे सगळेजण गावातील मौलानाकडे जातात. तेव्हा मौलाना धार्मिक ग्रंथाचा हवाला देऊन सांगतात की, हलाला म्हणून अशी एक धर्मग्रंथात नमुद करण्यात आली आहे. तलाक घेऊन आलेल्या मुलीने पुन्हा विवाह केल्यास व त्या दुसऱ्या पतीनेही तिला तलाक दिल्यास ती तिसरा विवाह करु शकते. कोणताही विचार न करता आपल्या पत्नीला तलाक देणाऱ्या पुरुषांना वचक बसावा म्हणून ही प्रथा अंमलात आली आहे. त्या प्रथेचा अवलंब केल्यास हलीमने दुसऱ्या पुरुषाशी विवाह करावा. त्या दुसऱ्या पतीने हलीमला त्रिवार तलाक दिल्यास ती तिसरा विवाह करु शकेल. म्हणजे तिचा पुन्हा कुद्रूसशी विवाह लावून देता येईल. हलालाच्या या प्रथेबद्दल कुद्रूस, हलीम किंवा हलीमचे वडिल यापैकी कोणालाच फारसे काही माहित नसते. परंतु या प्रथेनूसार तोडगा निघेल असे कळल्यावर तो अमलात आणण्यास कुद्रूस, हलीमचे आईवडिल, गावचे ज्येष्ठ लोक, सरपंच असे सगळे राजी होतात. त्यानूसार ते हलीमचे दुसरे लग्न लावून देण्यासाठी तिच्या धर्मातील योग्य वर शोधू लागतात. पण तो काही त्यांना सापडत नाही. मग सरतेशेवटी गावातील मान्यवर विचारविनिमय करुन गावच्या मौलानालाच गळ घालतात की त्यांनी हलीमशी विवाह करावा व कालांतराने त्रिवार तलाक द्यावा. म्हणजे तिचे आम्ही कुद्रूसशी पुन्हा लग्न लावून देऊ. मौलाना हा सहृदयी माणूस असतो. हलीमचे भले करण्याच्या विचाराने ते तिच्याशी विवाहास तयार होतात. मौलान व हलीमचा विवाह होतो. त्यानंतर ते नांदू लागतात. मौलाना अखेर हलीमला त्रिवार तलाक देतात का? कुद्रूस व हलीमाचे पुन्हा लग्न होते का? असे काही प्रश्न त्यातून निर्माण होतात. त्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - हलाल हा अतिशय नाजूक विषयावरील चित्रपट असल्याने त्या चित्रपटाची मांडणी संयतरितीने करणे आवश्यक होते. तसेच अभिनयही संयत हवा होता. तो तसा सगळ्यांनीच केला आहे असे म्हणता येणार नाही. चिन्मय मांडलेकर याने केलेली मौलाना यांची भूमिका संयत झाली आहे. त्यातील विविध छटा त्याने उत्तम दाखविल्या आहेत. हलीमच्या भूमिकेत असलेली प्रितम कागणे हिने धार्मिक प्रथेमुळे पिचलेल्या महिलेची भूमिका साकारताना जितक्या गहराईने भावमुद्रा प्रकट करायला हव्या होत्या तितक्या तिला सादर करता आलेल्या नाहीत. तिचा अभिनय काही ठिकाणी सपाट वाटतो. तिच्या ऐवजी अधिक प्रगल्भ अभिनेत्री या भूमिकेसाठी सुयोग्य ठरली असती. कारण हलीम हिची भूमिका हा या चित्रपटाचा गाभा आहे. प्रियदर्शन जाधव (कद्रूस), प्रितम कागणे (हलीम), विजय चव्हाण (हलिमचे वडिल), छाया कदम (हलीमची सासू), संजय सुगावकर (सरपंच), अमोल कागणे (जीवन), विमल म्हात्रे (हलीमची आई), नेहा धाटणीकर (हलीमची लहान बहीण), अरुण गीते (पंच), अमीर तडवळकर (पंच), ज्ञानेश भिलारे ( पंच), केतन लुकंड (पंच), व्यंकटी मुसळे (पंच) या साऱ्यांच्या भूमिका ठीकठाक झाल्या आहेत. हलीमचे पिचणे, तिचे आक्रंदन हे जितके प्रभावीपणे चित्रपटात दिसायला हवे होते तसे ते दिसत नाही. त्यामुळे एक चांगली कथा असूनही काहीशा बटबटीत चित्रणामुळे हलाल चित्रपट हवा तितका मनाला भिडत नाही.
दिग्दर्शन - धगसारख्या चित्रपटात ज्यांनी आपल्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्याचा परिचय दिला त्या शिवाजी लोटण पाटील यांच्या दिग्दर्शनातील ती धग हलाल चित्रपट करताना फारशी जाणवली नाही. चित्रपटामध्ये मौलाना त्याच गावचा असून तो सारखा हिंदीतच का बोलतो व त्याच गावातले त्याचे बाकीचे स्वधर्मीय मराठीत का बोलतात हे काही कळले नाही. अशा अनेक ढोबळ चुका संवादापासून सुुरु होऊन दिग्दर्शनापर्यंत होत राहिल्याने हलाल चित्रपट योग्य तो प्रभाव प्रेक्षकांवर पाडू शकत नाही. मौलाना हे खूप चांगला माणूस आहे हा संवाद इतक्या वेळा चित्रपटात येतो की ते या चित्रपटाचे पालुपद आहे का असे वाटते. दिग्दर्शक म्हणून शिवाजी लोटण पाटील यांना हलाल चित्रपटाचा आत्मा गवसला नाही असे स्पष्टपणे म्हणावेसे वाटते. त्रिवार तलाक व हलाला प्रथेमुळे मुस्लिम महिलांची जी घुसमट होते त्याचे प्रत्ययकारी चित्रण शिवाजी लोटण पाटील यांना करता आले असते. पण ते तसे झाले नाही. सगळी दृश्ये सरधोपटपणे येतात व जातात. त्यामुळे चित्रपटाच्या मध्यंतरानंतरचा भाग हा काहीसा रटाळ झाला आहे. 
संगीत - या चित्रपटाला विजय गटलेवार यांनी संगीत दिले असून चित्रपटातील गाणी सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली आहेत. तर ती आदर्श शिंदे, सय्यद अख्तर,विजय गटलेवार यांनी गायली आहेत. त्यातील आदर्श शिंदे यांनी गायलेले गाणे त्यातल्या त्यात बरे आहे.                                                                     https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-halal-5712739-PHO.html

No comments:

Post a Comment