Thursday, October 19, 2017

नाचता येते म्हणून जगते - समीर परांजपे (बॉलिवूडमधे ज्या विदेशी नर्तिका-नर्तक येतात त्यांच्यावरील लेख)

नाचता येते म्हणून जगते....
-------------
- समीर परांजपे
---
`देसी गर्ल' हे दोस्ताना या हिंदी चित्रपटातले गाणे आठवतेय का तुम्हाला? प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम व अभिषेक बच्चन देसी गर्लच्या ठेक्यावर लयदार नाचत आहेत. देसी गर्ल प्रियांका चोप्रावर आपली नजर खि‌ळून राहातेय असे वाटतेय तोवर तिच्या मागे नाचणाऱ्या डान्सर्स मुलींवर आपली नजर खिळते. या डान्सर मुलींमुळे प्रियांका चोप्राचे भारतीयत्व अधिक ठसठशीतपणे अधोरेखित होते. कारण तिच्यामागे असणाऱ्या सुमारे ५० मुली असतात लख्ख गौरवर्णीय. त्या असतात विदेशी नर्तिका. बॉलिवूड चित्रपटातील एका गाण्यात इतक्या विदेशी नर्तिका असणे ही गोष्ट फारशी जुनी नाही बर का? देशी गर्ल गाणे असलेला दोस्ताना चित्रपट झळकला होता अवघ्या तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ रोजी. या चित्रपटाच्या आधी आणि नंतरही हिंदी चित्रपटांतील बऱ्याच गाण्यांमध्ये या विदेशी नर्तिका आपली मोहक अदाकारी दाखविताना दिसतातच.
भारतात नृत्यकलेत निपुण असलेल्या मुली कमी आहेत का? तर अजिबातच नाही. मग या विदेशी नर्तिकांना बाॅलिवूड लाल गालिचे अंथरुन का बोलावते?
हॉलिवूड, युरोप व अन्य प्रगत देशांतील चित्रपटसृष्टी तर बॉलिवूडपेक्षा अधिक पैसेवाली, जागतिक अपील असलेली वगैरे. मग या विदेशी मुली भारतात त्याही मुंबईमध्ये हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी का येत असाव्यात? असे अनेक प्रश्न देसी गर्ल गाणे बघताना मनात येत होते.
शोधा म्हणजे सापडेल असे म्हणतात.
मुंबई असो किंवा भारतातील कोणतेही शहर, गाव घ्या. तिथे तुमच्या आमच्यासारखे निमगोरे किंवा सावळे लोक रस्त्यावरुन जात असतील तर फार तर तुमच्याकडे इतर लोक एक कटाक्ष टाकतील किंवा ढुंकूनही बघणार नाहीत. पण त्याच ऐवजी एखादा विदेशी गौरवर्णीय पुरुष किंवा महिला रस्त्याने चालली असेल तर लोक माना वळवून वळवून त्याच्याकडे बघतात.
कारण...
गोरी कातडीचा माणूस हा श्रेष्ठच असतो, तो आपल्यापेक्षा जास्त गुणवान असतो असा काहीसा समज आपण करुन घेतलाय. तो आजच नाही तर इंग्रजांची सत्ता देशाच्या बोकांडी बसायच्या आधीपासूनच तो इथे रुढ आहे. भारतच कशाला गौरेतर कोणत्याही देशांत हीच भावना सगळीकडे थोड्याफार फरकाने दिसेल. मग असे आहे तर मग या विदेशी नृत्यांगना अापला श्रेष्ठ देश सोडून या गौरेतर भारतवर्षातील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यायला का इतक्या धडपडतात? त्या इथे येऊन नेमके काय करतात?
आपल्या मायदेशातून भारतातील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अशाच उडून यायला या विदेशी नृत्यांगना म्हणजे काही अस्मानी पऱ्या नाहीत. या विदेशी नृत्यांगनांना भारतातील चित्रपटांत कामे मिळवून देण्यासाठी मुंबईत बरेच एजंट्स आहेत. त्यांनी आपल्या कंपन्या रितसर स्थापन केल्या आहेत. या एजंट्सची कार्यालये आहेत जास्त करुन अंधेरी, मालाड, गोरेगाव या भागांमध्ये. त्यातीलच एक एजंट आहे विकी (नाव बदलले आहे)...त्याचा दूरध्वनी क्रमांक मिळाल्यानंतर बऱ्याचदा फोन केला. पण त्याच्यासाठी माझा मोबाइल नंबर ओळखीचा नसल्याने तो कदाचित उचलला गेला नाही. मग साधारण २२ व्या वेळा फोन केल्यानंतर त्याने फोन उचलला. त्याला एक संदर्भ सांगितला. ते नाव ऐकल्यावर तो विदेशी नृत्यांगना भारतात कशा येतात व त्यांच्या कामाचे नेमके स्वरुप काय असते याविषयी सविस्तर फोनवरच बोलायला तयार झाला.
विकी सांगत होता `२६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. इस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, बेलारुस, मोल्दोवा, युक्रेन, रशिया, आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया असे पंधरा देश त्यातून निर्माण झाले. यापैकी रशिया वगळता बहुतेक देशांत गरीबी आहे, बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्या देशांतील उत्तम नर्तिका असलेल्या मुली या वर्क व्हिसा मि‌‌ळवून भारतात बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी येत असतात.'
विकी सांगत राहिला ` सोव्हिएत रशियातून फुटून निघालेल्या देशांमध्ये आता तेथील काही लोकांनी अशा डान्सर रिक्रुटिंग एजन्सीज स्थापन केलेल्या आहेत की ज्यांच्याशी आम्ही संपर्कात असतो. या विदेशी एजन्सी त्यांच्याकडचे उत्तम नर्तक व नृत्यांगना यांची सविस्तर माहिती आम्हाला पाठवितात. कोणत्या चित्रपटात कोणत्या गाण्यासाठी किती विदेशी नृत्यांगना हव्यात याची माहिती निर्माता, दिग्दर्शक तसेच नृत्यदिग्दर्शकापर्यंत आमच्याकडे आधीच पोहोचलेली असते. त्यानूसार मग विदेशी एजन्सीशी संपर्क साधून आम्ही तितक्या नृत्यांगनांची निवड करतो. त्यांची रितसर कागदपत्रे भारतात सादर करुन त्यांना वर्क व्हिसा मिळवून देण्यासही मदत करतो. अशा पद्धतीने अत्यंत कायदेशीररित्या त्या बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्याचे कसब दाखविण्यासाठी अवतरतात.'
`एखाद्या चित्रपटातील गाण्यासाठी कधी कधी एका गटात पाच ते सहा गौर नृत्यांगनांना त्यांच्या मायदेशातून बॉलिवूडमध्ये बोलाविले जाते. रशियाच्या सावलीतल्या देशांतील असल्यामुळे या मुलींना इंंंग्लिश भाषा चांगली येत असे नाही. त्या जेमतेम इंग्रजी बोलू शकतात. उत्तम नृत्याबरोबर बऱ्यापैकी इंग्रजी येणे हा पण त्यांच्यासाठी कदाचित बॉलिवूडमध्ये काम मिळविण्यासाठी पात्रता निकष ठरलाय असे वाटते' असे म्हणून आपल्याच विनोदावर विकी फोनवर हसला.
कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, बेलारुस, मोल्दोवा, युक्रेन, रशिया, आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया या देशांतून जास्त करुन विदेशी नृत्यांगना बॉलिवूडमध्ये नृत्यांगना म्हणून येतात. वर्क व्हिसा मिळाल्याने त्या भारतात विशेषत: मुंबईत तीन ते चार महिने राहातात. त्यांना त्यांच्या कामाचा पैका किती मिळतो? असा प्रश्न संभाषणादरम्यान दोनदा-तीनदा विचारला. त्यावर विकीने पटकन उत्तर दिले नाही. मग वेगळ्याच प्रश्नाला उत्तर देताना मध्येच त्याने काही आठवल्यासारखे केले व सांगू लागला ` या विदेशी नृत्यांगना वर्क व्हिसा व त्यांचे आवश्यक सामान घेऊन भारतात येतात. बाकी त्यांच्या सुरक्षिततेची, खाण्यापिण्याची, राहाण्याची सारी व्यवस्था आम्ही पाहातो. मुंबईतील अंधेरी, वर्सोवा, मालाड पश्चिम अशा काही भागांतील आलिशान इमारतींमध्ये या विदेशी नृत्यांगना सहा ते सात जणींच्या गटात एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहातात. हा फ्लॅट आम्हीच त्यांना भाड्याने मिळवून देतो. अर्थात या फ्लॅटचे भाडे त्यांनी त्यांच्याच कमाईतून भरायचे असते. पाच-सहा जणी एकत्र राहिल्याने त्यांचा इथे राहाण्याचा खर्चही विभागला जातो व त्यांचे पैसेही वाचतात. `
तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत बॉलिवूडच्या चित्रपटांत जितके काम असेल तितके त्या करतात. एका शिफ्टसाठी भारतीय नृत्यांगनांना जितकी रक्कम मिळते त्यापेक्षा साहजिकच थोडी जास्त रक्कम या विदेशी नृत्यांगनांना मिळते. आठ तासाची एक शिफ्ट असते. २००७ साली या विदेशी नृत्यांगनांना महिना १००० ते १६०० डॉलर इतके पैसे चित्रपट निर्मात्याकडून मिळायचे. पण आता दहा वर्षांनी चित्र खूप बदलले आहे. आता या विदेशी नृृत्यांगनांची दर महिन्याची कमाई प्रत्येकी सरासरी सुमारे ३००० डॉलरपर्यंत म्हणजे भारतीय रुपयांत साधारण एक लाख ९२ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. या कमाईत दर महिन्याला थोडेवर खाली होऊ शकते. पण इथे भारतात कमाई करुन त्या जेव्हा त्या आपल्या देशात परत जातात तेव्हा तेथे उदरनिर्वाहासाठी त्यांना हे पैसे पुरेसे ठरतात.'
या विदेशी नृत्यांगना बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी येतात वगैरे ठीक आहे. पण त्यातील काही व्यसनीही असतात. काही अमली पदार्थांच्या तस्करीत सामील झाल्याचीही तुरळक उदाहरणे आहेत. काही जणीही वेश्याव्यवसायही करतात असे निदर्शनास आले होते. मात्र असे प्रकार या विदेशी नृत्यांगना करत नाही असे विकी असो वा तशाच एक दोन एजंटनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना सांगितले. कारण या विषयावर उघडपणे फारसे कोणी बोलत नाही. का ते माहित नाही? खरतर विदेशी नृत्यांगना भारतात चित्रपटात काम करण्यासाठी आणणे हा काही चोरटा धंदा तर नाही. पण या व्यवसायाभोवती या एजंटांनी गुढ वलय ठेवलेय हे मात्र खरे...
--
अंधेरी लिंक रोडवरची ओबेराॅय स्प्रिंग्स ही इमारत. या इमारतीत अलीकडेच कंगना राणावतने फ्लॅट विकत घेतला आहे. विपुल शहा, प्रीती सप्रू, शर्लिन चोप्रा, लव्हली सिंग असे अनेक सेलिब्रिटीज या इमारतीत राहातात. याच इमारतीत बेलारुसमधील पाच ते सहा नृत्यांगना एक फ्लॅट भाड्याने घेऊन एकत्र राहात आहेत असे कळले होते. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांची मुंबई, भारतातील जीवनशैली कशी आहे याची माहिती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. परंतू ना या सोसायटीच्या गेटवरील सुरक्षा रक्षक धड माहिती द्यायला तयार होईना, ना एजंट तशी कोणतीही तयारी दाखवेना. `रिस्क नही लेना है मुझे असे तो म्हणत होता...' या विदेशी नृत्यांगनांचे मुंबईतील वावरणेही त्यांच्या एजंटच्या मार्गदर्शनानूसारच काटेकोरपणे चालते. चित्रीकरणाच्या ठिकाणाहून त्या थेट आपल्या फ्लॅटवरच परत येतात. त्यांच्या सुरक्षिततेची हमीही एजंटनेच घेतलेली असते. त्यामुळे त्याचे त्यांना ऐकावेच लागते. समजा चित्रीकरणाची कामे संपली की मुंबई किंवा गोवा अथवा कुलु मनाली सारख्या ठिकाणी एजंटमार्फत या नृत्यांगनांच्या प्रदेश भटकंतीची सोय केली जाते. एक प्रकारे त्या स्वेच्छेने त्या एका चौकटीतच वावरतात. भारतात यायचे, चित्रपटांत कामे करायची, पैसे मिळवायचे आणि परत जायचे एवढीच महत्वाची उद्दिष्टे बऱ्याच जणींची असतात. मग या विदेशी नृत्यांगना अंमली पदार्थांची तस्करी, वेशाव्यवसायात सापडतात कधी कधी ते कसे? असा प्रश्न मनात उरलाच होता...तर असेही काही गुन्हेगारी एजंट आहेत चित्रपटसृष्टीत...एवढेच उत्तर मला विकीकडून मिळाले...व तो विषय तिथेच संपला...
सोनी टीव्हीवर कपिल शर्मा शोमध्ये अधूनमधून विदेशी नृत्यांगना आपली अदाकारी सादर करताना िदसतात. म्हणजे आता बॉलिवूड चित्रपटच नव्हे तर भारतीय वाहिन्यांच्या कार्यक्रमातही त्यांच्यासाठी जागा निर्माण होऊ लागली आहे. बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही आता विदेशी नृत्यांगना दिसू लागल्या आहेत. लागण लागते अशा गोष्टींची लगेच.
मग तरीही अजून एक मुद्दा राहातच होता की, विदेशी नृत्यांगनांबरोबर पुरुष नर्तक किती येतात भारतात? तर उत्तर आले शंभर विदेशी नर्तिका असतील तर चार पाच विदेशी पुुरुष नर्तक असे हे प्रमाण आहे. १८ ते २७ वर्षे याच वयोगटातील विदेशी नृत्यांगना भारतात चित्रपटात काम करण्यासाठी येतात. बेलारुसची कटासियार्ना िलएश्को या २७ वर्षांच्या नृत्यांगनेने त्याच्याकडे मागे व्यक्त केलेली प्रतिक्रिया विकी सांगत होता. ती म्हणाली होती ` भारतीय संगीत ऐकायला व समजून घ्यायला सोपे आहे पण जेव्हा तुम्ही त्या गाण्यावर नृत्य करायला जाता तेव्हा ते मात्र अवघड आहे. आम्हाला पाश्चिमात्य नृृत्याची सवय आहे. हिंदी गाण्यावर पाश्चिमात्य धर्तीचे नृत्य जरी करायचे असले तरी देखील त्याला भारतीय वळण मिळते. हिंदी गाण्यांचे लिपसिंकिंगसाठी उच्चारही समजून घ्यावे लागतात. कोरिओग्राफर नृत्याच्या ज्या स्टेप्स देतो त्या नीट करतानाच हिंदी गाण्याचे बोलही तोंडाने म्हणतोय असे दृश्य असेल तर मग मेहनत खूप करावी लागते. आमचा भारतातील अनुभव चांगला आहे. बॉलिवूडमधे काम करायला मिळाल्यानंतर आम्हालाही चांगली कमाई होते म्हणून तर येतो आम्ही इथे'
बॉलिवूडच्या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार काम करतात म्हणून खूप आरडाओरड मनसे, शिवसेनेसह काही राजकीय पक्षांनी केली. आता त्या देशाचे कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायचे खूपच कमी झाले आहे. विदेशी नृत्यांगनांना हिंदी चित्रपटातील गाण्यांमध्ये स्थान दिल्यामुळे आमच्या पोटावर पाय दिला जातोय अशी ओरड ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनने केली. त्यामुळे विदेशी नृत्यांगनांना चित्रपटांत कामे देण्याचे प्रमाण काही काळ कमीही झाले पण त्यांना भारतात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कारण त्यांच्याकडे असतो वर्क व्हिसा व काम करुन स्वत:ला जिवंत ठेवण्याची जिद्द. गोऱ्यांच्या कातडीचे फाजील आकर्षण आपण बाळगतो पण त्या नृत्यांगनांना त्यांच्या देशात असलेला गरिबीचा शाप हा त्यांचे भवितव्य काळे करत असतो. गोऱ्या कातडीमागील हे काळे भवितव्य आपण कधी पाहाणार आहोत की नाही? तेही मुंबईत आपल्या जवळच वावरत असते तेही आपण बघायला तयार होत नाही...कसले ग्लोबलाइज्ड झालोय आपण?
---
मुंबईतील कुलाबा भागात गेलात तर तिथे सॅल्व्हेशन आर्मीसारखी स्वस्त दरातील काही गेस्ट हाऊसेस आहेत. भारतात आलेले व जीवाची मुंबई करण्यासाठी आलेले बरेच विदेशी पर्यटक तिथे राहातात. स्वस्त दरात रािहल्याने या पर्यटकांचे पैसेही वाचतात व त्यांना मुंबई जरा अधिक एन्जॉय करता येते. नेमके हे बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शकांना माहिती आहे. काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण विदेशात होते. त्या चित्रीकरणातील काही भाग जर चुकून िकंवा तांत्रिक कारणाने राहून गेला असेल तर एवढा मोठा ताफा विदेशात नेऊन ते सारे चित्रीत करणे याची फार पैसा वाया जातो. मग त्यावर निर्मात्यांनी एक तोड काढली. हा जो उरलेला भाग आहे तो मुंबईतच सेट लावून चित्रीत केला जातो. त्यासाठी निर्मात्याची माणसे किंवा काही एजंटस् कुलाबा भागातील स्वस्त दरातल्या गेस्ट हाऊसेसमध्ये राहाणाऱ्या विदेशी लोकांशी संपर्क साधतात. त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात काम करणार का विचारतात. त्यावर हे विदेशी लोक या चित्रपटात किंग खान (शाहरुख)किंवा सलमान खान आहे का म्हणून हटकून विचारणा करतात. तसे असेल तर त्यांच्यासाठी ते सोन्याहून पिवळे असते. तसे नसेल तरी ते बॉलिवूडच्या चित्रपटात आपण दिसणार या आनंदात एक-दोन दिवसांसाठी काम करायला तयार होतात. या विदेशी पर्यटकांना एका दिवसाचे साधारण १८०० रुपये व एका वेळचे जेवण दिले जाते. त्यांना गेस्ट हाऊसपासून ते चित्रीकरण स्थळापर्यंत त्यांना भाड्याच्या कारने नेले जाते व परत आणले जाते. यातूनही काही एजंट चांगले पैसे कमावतात. मग िवदेशी पर्यटकांकडून चित्रपटात करुन घेतले जाणारे काम हे जमावातील एखादा गोरा किंवा क्वचित आयटम साँगमधील विदेशी पाहुणा असेही काहीही असते....मुंबई ही अशी मायानगरी आहे तिची ही अशी विविध रुपे आहेत.










No comments:

Post a Comment