दै. दिव्य मराठीच्या २० जून २०१७ रोजीच्या अंकात मी शब्दांकन केलेली पत्रकार दिनेश कानजी यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. तिची लिंक, जेपीजी फाइल व मजकूर पुढे दिला आहे आवश्यक आहे.
Epaper http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/241/20062017/0/10/
---
त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा
---
पत्रकार दिनेश कानजी यांची मुलाखत
---
(शब्दांकन - समीर परांजपे)
--
पूर्वांचलातल्या सात राज्यांपैकी त्रिपूरा हे एक राज्य. देशातील लहान राज्यांपैकी एक असलेले. पूर्वांचलातील इतर राज्यांबद्दल तुलनेने बरेच लिखाण झाले आहे तसे त्रिपूराबद्दल झालेले नाही. मराठीत त्रिपूरा या विषयावर असलेली पुस्तके तशी दुर्मिळच. त्यामुळे पत्रकार दिनेश कानजी लिखित `त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार - दृष्यम् आणि सत्यम्' या पुस्तकाला विशेष महत्व आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २१ जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात सायंकाळी चार ते सहा या वेळेत होणार आहे. यानिमित्त या पुस्तकाचे लेखक दिनेश कानजी यांच्याशी केलेली ही बातचीत..
प्रश्न - त्रिपुरा या विषयावरच पुस्तक लिहावे असे का वाटले?
दिनेश कानजी - माय होम इंडिया या संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांच्याकडे एकदा मी त्रिपुराचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेले व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशी ख्याती असलेले माणिक सरकार यांच्याबद्दल कौतुकाचे बोल काढले. त्यावर देवधर म्हणाले की, माणिक सरकार यांची जशी प्रतिमा आहे तशी ती प्रत्यक्षात नाही. त्यांचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष त्रिपुरामध्ये जाऊन ते बघणे आवश्यक आहे. तेव्हापासून हे माझ्या मनाने घेतले होते. यंदाच्या वर्षीच्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातले काही दिवस असे मिळून सुमारे तीस दिवस त्रिपुरामध्ये जाऊन राहिलो. त्या राज्यातील ग्रामीण, शहरी अशा भागांमध्ये खूप भ्रमंती केली. लोकजीवन बघितले. त्याच भ्रमंतीची निरीक्षणे या पुस्तकात नोंदविली आहेत. त्रिपुरातील जनतेच्या नागरी प्रश्नांचा यात अनेक अंगांनी वेध घेतलेला आहे.
प्रश्न - `त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार - दृष्यम् आणि सत्यम्' असे या पुस्तकाचे शीर्षक देण्यामागचे काही खास प्रयोजन?
दिनेश कानजी - त्रिपूरामध्ये १९९३ सालापासून डाव्या आघाडीचे सरकार आहे. त्रिपूरातील त्यांचा राजकीय किल्ला अद्यापही अभेद्य आहे. १९९८ साली माकपचे नेते माणिक सरकार हे या राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेली १९ वर्षे ते त्रिपूराचे मुख्यमंत्री आहेत. या कालावधीत ज्या ज्या वेळेला त्रिपुरात विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी डाव्या आघाडीला संपूर्ण बहुमत मिळालेले आहे. विरोधी पक्ष म्हणावे तितके प्रबळ नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्रिपूराचा संपूर्ण विकास करायला माणिक सरकार यांना काहीच अडचण येण्याचे कारण नव्हते. पण तरीही म्हणावा त्रिपुराचा विकास झाला नाही. माणिक सरकार हे स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी मानले जातात. पण ते काही खरे नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्रिपुरात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. सामान्य माणसांचे प्रश्न तसे लोंबकळत आहेत. हे सारे त्रिपुरामध्ये केलेल्या भ्रमंतीत मला अनुभवता आले. तेथील भ्रष्टाचाराबद्दल बरीच माहिती मिळाली. माणिक सरकार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्रिपुरात जे अराजक माजले आहे तेच या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न - त्रिपुरातील सामान्य माणसाच्या जीवनाचे तुम्हाला जे दर्शन घडले त्याबद्दल सांगा.
दिनेश कानजी - पूर्वांचलातील राज्यांत ित्रपुरा हे प्रचंड राजकीय स्थिरता लाभलेले राज्य आहे. अतिशयोक्ती करत नाही पण त्रिपुरातील ग्रामीण भागांमध्ये काही ठिकाणी पिण्याचे पाणी सहजी उपलब्ध नसल्याने शेवाळ साठलेल्या डबक्यांतील पाणी काढून ते पिण्याची वेळ सामान्य माणसांवर आली आहे. शहरांमध्येही पाणीपुरवठ्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. या पाण्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने त्या पाण्यावर प्रक्रिया करुनच ते नागरिकांना पुरविले जाते. पण हे कामही धडपणे केले जात नाही. त्यामुळे लोहयुक्त पाण्यामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. गंडाखेरा भागातील काही गावांमध्ये मच्छरांचे थैमान इतके आहे की, रात्री लोक झोपू शकत नाहीत. शेकोट्या पेटवून जागे राहातात व न झालेली झोप सकाळी एक दोन तास झोपून पुरी करतात. माणिक सरकार यांच्या कारकिर्दीत सामान्य माणसांच्या या छोट्या समस्या तसेच रोजगारासारखे महत्वाचे प्रश्नही सुटू शकलेले नाहीत. त्रिपुराची ३८ लाख लोकसंख्या आहे. त्यातील सुमारे आठ ते नऊ लाख लोक आजमितीला बेकार आहेत. त्रिपुरात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. याची दुसरी बाजू अशी की या राज्यात शेतकरी आत्महत्या करतच नाही असे नाही पण जे मरण पावतात त्यांच्या व्यवसायाची नोंद करण्याची तसदी इथले पोलिस कधीही घेत नाहीत. त्यामुळे खरी परिस्थिती समाजायला काही मार्गच नाही. हरयाणापेक्षा त्रिपुरामध्ये बलात्कारांचे प्रमाण कमी आहे असा हास्यास्पद दावा डाव्या आघाडीच्या एका आमदाराने केला होता. मात्र त्रिपुरात होणाऱ्या बलात्कारांचे प्रमाण हरयाणापेक्षाही जास्त आहे हे नंतर आकडेवारीवरुन सिद्ध झालेच.डाव्या पक्षाच्या एका आमदारावर आपल्या कर्मचाऱ्याच्या सात वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्रिपुरा पोलिसांनी फक्त एफआयआर नोंदविण्यापुरतीच कारवाई केली. त्रिपुरातील माणिक सरकार यांची १९ वर्षांची भ्रष्ट राजवट झाकून डाव्या पक्षांनी देशभरात त्रिपुराच्या बोगस विकास मॉडेलची भरपूर चर्चा घडविली. मनरेगासाठी मिळणारा निधी संपूर्णपणे खर्च करणारे राज्य म्हणून त्रिपुरा राज्याचा गौरव व्हायचा. पण आता जेव्हा या कामांचे नीटपणे परीक्षण सुरु झाले तेव्हा असे लक्षात येते आहे की, त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. मनरेगाचा पैसा माकप व डावे पक्ष आपले कार्यकर्ते सांभाळण्यासाठी खर्च करीत आहेत. तशी काही प्रकरणेही उजेडात आली आहेत.
प्रश्न - माणिक सरकार यांच्या कारभाराबाबत या पुस्तकात काय निरीक्षणे मांडली आहेत?
दिनेश कानजी - रोझव्हॅलीसारख्या घपलेबाज चिटफंड कंपनीला सुरक्षा कवच देणाऱ्या, दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांना पाठीशी घालणाऱ्या माणिक सरकार यांचे कर्तृत्व स्थानिक प्रसारमाध्यमांनी चव्हाट्यावर आणले असताना राष्ट्रीय प्रसारमाध्यमे त्यांची आरती ओवाळत आहेत. अशा मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे गरीबांचे मसिहा म्हणून जे मार्केटिंग सुरु आहे ते त्रिपुरामधील परिस्थिती प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यानंतर किती खोटारडे आहे हे लक्षात आले. माणिक सरकार यांच्या कारभाराचा पंचनामा मी या पुस्तकात केला आहे. डाव्या पक्षांचा वैचारिक दुटप्पीपणा, देशविरोधी कारवाया उघड करणे, माणिक सरकार यांची बनावट प्रतिमा उद््ध्वस्त करणे आणि गेली अडीच दशके वामपंथी चरकात भरडल्या जाणाऱ्या त्रिपुरावासीयांच्या वेदना उर्वरित देशातील लोकांपर्यंत पोहचविणे हा या पुस्तकाचा मुळ उद्देश आहे.
प्रश्न - त्रिपुरामध्ये बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर आहेत, दहशतवादी संघटना आहेत, त्याशिवाय काही धार्मिक तणावाचे मुद्दे असतीलच त्याबद्दल सांगा.
दिनेश कानजी - देशाची फाळणी तसेच बांगलादेश युद्धाच्या वेळेस बांगलादेशातून (पूर्वीचा पूर्व पाकिस्तान) हिंदु व मुस्लिम निर्वासित भारतात आले. ते त्रिपुरातही लक्षणीय संख्येने आहेत. त्रिपुराच्या एकुण लोकसंख्येमध्ये आठ टक्के मुस्लिम आहेत. या राज्याची सुमारी ८०० हून अधिक कि.मी. ची सीमारेषा बांगलादेशला लागून आहे. या सीमाभागात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी चालते. त्रिपुरात गांजाची शेती मोठ्या प्रमाणावर होते. दस्तुरखुद्द माणिक सरकार यांच्या मतदारसंघातही ती होते. पण त्या गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्रिपुरात हिंदु-मुस्लिमांतील तणाव हा मुद्दाच नाही. तिथे शोषित व शोषक असाच महत्वाचा मुद्दा आहे. त्रिपुरात काही दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यातील काहींचे लागेबांधे डाव्या पक्षांशी तर काहींचे काँग्रेसशी आहेत. त्रिपुरात भाजपला आजवर फार मते मिळत नसत. पण गेल्या वर्षांत झालेल्या काही निवडणुकांत भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी बरीच वाढलेली आहे. त्रिपुरातील भ्रमंतीत अशा सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष निरीक्षण करुन तेच या पुस्तकात सविस्तरपणे लिहिलेले आहे.
---
No comments:
Post a Comment