दै. दिव्य मराठीच्या 2 जून 2017 रोजीच्या अंकात प्रस्तावित युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने माझा पुढील लेख प्रसिद्ध झाला होता.
-----
युवा मराठी साहित्य संमेलनाची `संगीतखूर्ची'
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
--
जसे प्रत्येक क्षेत्रात आहे, तसेच साहित्यामध्येही युवा पिढी काय लिहिते याकडे जगभरात सर्वत्र लक्ष दिले जाते. युवा पिढीच्या साहित्यातून जे शब्दांचे धुमारे फुटतात, त्याचा थेट परिणाम त्या देशाच्या भविष्यावरही होणार असतो. त्यामुळे अमेरिका, युरोपसह प्रगत देशांतील सरकारे, विद्यापीठे युवा साहित्य महोत्सव भरविण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. भारतामध्येही युवा साहित्यासंदर्भात काही उपक्रम सुरु असतात. परंतु त्यांचे उद्दिष्ट साहित्यकेंद्री असले तरी बऱ्याचदा त्यात साहित्यबाह्य उचापतीच अनेक चालतात. कन्नड, तािमळ, बंगाली अशा काही भाषांमध्ये युवा साहित्यावर लक्ष देण्याची सत्प्रवृत्ती अधिक प्रबळ आहे. पण आपल्या मायमराठीची बातच काही और अाहे. मराठी साहित्य हे जागतिक पातळीवर नेण्याचे स्वप्न उराशी बाळगणे चांगले आहे. पण त्यासाठी जे मुलगामी प्रयत्न करावे लागतात त्यात आपले मराठी साहित्यिक, वाचक, साहित्य संस्था व राज्य सरकार नेहमीच तोकडे पडत आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१२ साली तयार केलेल्या युवा धोरणात युवा मराठी साहित्य संमेलन घेण्याची तरतुद असूनही गेल्या पाच वर्षांत सरकारला एकही युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित करता आलेले नाही. महाराष्ट्र शासनाच्या अख्यत्यारीत मराठी भाषा व साहित्य विषयक काम करणाऱ्या काही संस्था असताना त्यांना या संमेलनाचे आयोजक न करता युवा मराठी साहित्य संमेलनाचे घोंगडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या गळ्यात टाकण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून युवा मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत अलीकडच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला एक पत्र मिळाले. त्यामध्ये या संमेलनाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी यंदाही एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी मराठी साहित्य महामंडळाला निमंत्रण देण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी २५ लाख रुपये देण्यात येतात. इतक्या रकमेत कोणतेही संमेलन आयोजित करणे शक्य नाही असे साहित्य महामंडळाचे म्हणणे आहे. २५ लाख रुपयांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच युवा मराठी साहित्य संमेलन अशा दोन्हींचे आयोजन करण्यात यावे अशी सरकारची अपेक्षा आहे का असाही सवाल महामंडळातील काही धुिरण करतात.
राज्यात युवा मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचा विचार रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री व मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांनी २०१४ साली बोलून दाखविला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे २०१५ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्रातील अनेक युवा लेखकांच्या अभिव्यक्तीसाठी वेगळे युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात यावे असे प्रतिपादन केले होते. त्यानंतर युवा मराठी साहित्य संमेलन भरविण्यास राजी नसलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने दोन वर्षापूर्वी तसे संमेलन घेण्यास काहीशी अनुकुलता दाखविली होती. त्यानुसार औरंगाबादमध्ये युवा मराठी साहित्य संमेलन घेण्याचे ठरविण्यात आले होते. पण ते प्रत्यक्षात कधीच झाले नाही.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इत्यादी संस्था हाताशी असताना त्यांना युवा मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यास महाराष्ट्र शासन धजावत नाही. आमच्याकडे संमेलनाचे आयोजन करण्याइतके मनुष्यबळ व अनुभव नाही असे अनौपचारिकरित्या सांगून महाराष्ट्र शासन या आयोजनाचे लष्टक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मागे लावून देण्याच्या प्रयत्नात दरवर्षी असते. यंदाच्या वर्षीही सरकारने तोच पवित्रा घेतला आहे. खरेतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने व प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने बुलडाण्यात २०१५ साली राज्यस्तरीय बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पण आपल्याच संस्थांच्या कार्यक्षमतेकडे शासन मुद्दामहून कानाडोळा करते अशी या संस्थांमधील अधिकाऱ्यांचीही तक्रार आहे.
महाराष्ट्र सरकार व त्यांच्याशी संबंधित बाकीच्या संस्था युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याबाबत ठोस हालचाल करत नाहीत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व युवा मराठी सािहत्य संमेलन अशा दोघांसाठी किमान दरवर्षी दीड कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करीत नाहीत हे एका बाजूला निराशाजनक चित्र अाहे. मात्र दुसऱ्या बाजूला मराठी साहित्यिक, वाचकांपैकी मुठभर का होईना काही लोक खाजगी संस्थांच्या मदतीने त्यांच्या त्यांच्या परिघात युवा मराठी साहित्य संमेलने भरवितात, त्यात काही वेगळे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वास्तवाचा एक अंतिम परिणाम असतो. २०१५ साली पुण्यामध्ये खासगी संस्थांनी पहिल्या अखिल भारतीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यानंतर यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात ‘अग्निपंख’ या संस्थेतर्फे दोनदिवसीय ‘युवा मराठी साहित्य संमेलन’ झाले. ही दोन्ही संमेलने युवकांच्या आकांक्षा जाणून घेण्यात यशस्वी ठरली होती. मात्र मराठी साहित्य विश्वात विविध संस्थांकडून जी युवा मराठी साहित्य संमेलने होतात त्यातील बहुतांशी संमेलनांतून कसदार युवा साहित्यिकांची पिढी पुढे आली आहे असेही फारसे आशादायक चित्र नाही. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकरी युवा साहित्य संमेलने होतात त्यात होणारे कार्यक्रम मात्र युवा साहित्यिकांना प्रेरणा देणारे असतात असा सूर साहित्यवर्तुळात आहे. साहित्य अकादमीतर्फे दोन दिवसांच्या युवा साहित्यिक संमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तेथेही युवा साहित्यावर फार प्रकाशझोत पडला असे झालेले नाही. साहित्य अकादमीतर्फे महाराष्ट्रात दरवर्षी होणाऱ्या युवा संमेलनाचा आता एक साचा झाला आहे. या संमेलनातही काव्यवाचन, कथाकथन, मी आणि माझ्या पिढीचे साहित्य असेच ठरीव कार्यक्रम झाले. युवा पिढीही ही तंत्रज्ञानस्नेही आहे, तिच्या समोरील सामाजिक समस्यांचे स्वरुप मागील पिढ्यांपेक्षा खूपच वेगळे आहे. या वातावरणातून युवा पिढी जी साहित्यनिर्मिती करते त्याकडे युवा मराठी साहित्य संमेलनांमध्ये फारसे लक्ष देण्यात येत नाही अशी तक्रार युवा पिढीतील साहित्यिक करताना दिसतात. मराठी साहित्यात मुख्य प्रवाह, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, ख्रिश्चन साहित्य असे अनेक प्रवाह आहेत. या सर्व प्रवाहांना सामावून घेईल असे युवा मराठी साहित्य संमेलन दरवर्षी व्हायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने स्वत:च्या अख्यत्यारीतील मराठी भाषाविषयक संस्थांकडे या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी देऊन ते नीट पार पडेल याकडे लक्ष दिले पाहिजे. महाराष्ट्राचे पुस्तकाचे गाव उभारले म्हणजे युवा पिढी साहित्याकडे वळेल असे होत नाही. कारण आज तिला पुस्तकांव्यतिरिक्त अनेक आकर्षणे खुणावत आहेत. या युवकांना पुस्तकांपर्यंत आणण्यासाठी त्यांच्यातीलच समर्थ युवा लेखक त्यांच्यापुढे ठसठशीतपणे संंमेलनांसारख्या उपक्रमातून पुढे आणले पाहिजेत. तसेच या युवा संमेलनांचे सरकारीकरणही होता कामा नये. युवा धोरण नुसते आखून उपयोग नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी रेखीव प्रयत्नही हवेत. युवा मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्र सरकारकडून उत्तम आयोजन हे त्यातील पहिले पाऊल ठरावे.
No comments:
Post a Comment