Monday, June 5, 2017

संगणक अभियंता कौशिक लेलेच्या यूट्यूब चॅनेलमाध्यमातून देशविदेशातील २०० अमराठी लोक मोफत शिकत आहेत मराठी भाषा! - दिव्य मराठी ५ जून २०१७. - समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या 5 जून 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली मी केलेली ही विशेष बातमी.
-------
संगणक अभियंता कौशिक लेलेच्या यूट्यूब चॅनेलमाध्यमातून
देशविदेशातील २०० अमराठी लोक मोफत शिकत आहेत मराठी भाषा!
गुजराती भाषा शिकविण्यासाठीही विशेष प्रयत्न
- समीर परांजपे
मुंबई, दि. 5 जून
आयबीएम कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या व डोंबिवलीत राहाणाऱ्या कौशिक लेले या युवकाने स्वयंसेवी वृत्तीने व कोणतेही शुल्क न आकारता स्वत:चे दोन ब्लॉग व यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून देशविदेशातील अमराठी लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून जे प्रयत्न केले त्याला आता चांगले फळ आले आहे. त्याच्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून आता दोनशे अमराठी लोक मराठी शिकत असून त्यामध्ये मॅथ्यू चँग नावाचा एक चायनीज-अमेरिकन, जॉन गॉलटन हा लंडनमध्ये पीएचडी करीत असलेला ब्रिटिश विद्यार्थी अशा अनेकांचा समावेश आहे.
झेकोस्लाव्हिया या देशातून मार्टिन हा पुणे विद्यापीठात पीएचडीनंतरचे संशोधन करण्यासाठी सध्या आला आहे. काही महिनेच तो पुण्यात राहणार असला तरी त्याला स्थानिक भाषा शिकून घ्यायची त्याची होती. कौशिकच्या ब्लॉग आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो थोड्याच महिन्यात चांगले मराठी बोलू लागला आहे आणि अजून प्रगती करायचा प्रयत्न करतो आहे.
कौशिक लेले याने अमराठी व्यक्तींना मराठी शिकवण्यासाठी ऑनलाईन ट्युटोरियल्स तयार केली आहेत; जी त्याच्या पुढील दोन ब्लॉग्सच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/
या ब्लॉगमध्ये लर्न फ्रॉम इंग्लिश या विभागात १३९ धडे आहेत. तसेच लर्न मराठी फ्रॉम हिंदी या विभागात १०१ धडे आहेत. या ब्लॉग मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण (नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे शॉर्ट फॉर्म्स इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी 'one-stop-shop' असा हा ब्लॉग आहे. कौशिक लेले याने त्याच्या ब्लॉग मधील संभाषणाच्या २०६ साउन्ड क्लिप्स ही YouTube channel वर “Kaushik Lele” नावाच्या चॅनल वर टाकल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्याना मराठी उच्चार लवकर आत्मसात करता येतील. ही कौशिक लेलेच्या यूट्यूब चॅनेलची लिंक आहे.
https://www.youtube.com/c/KaushikLele_Learn_Marathi
यासंदर्भात कौशिक लेलेने सांगितले की, माझ्या ट्युटोरियल्स वापरून मराठी शिकत असल्याचे आत्तापर्यंत दोनशे लोकांनी ईमेलवर कळवले आहे. तर यूट्यूब चॅनलचे दोन हजारहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
त्यात महाराष्ट्रात शिक्षण किंवा कामनिमित्त परराज्यातून आलेल्या व्यक्ती, स्पर्धा परीक्षांसाठी मराठीचा अभ्यास करणाऱ्या अमराठी व्यक्ती, भाषांची आवड असणारे परदेशी नागरिक, अनिवासी मराठी आहेत. तसेच मराठी व्यक्तींच्या प्रेमात पडलेले किंवा लग्न केलेले परदेशी नागरिकही आहेत. दोन्ही ब्लॉग आणि यूट्यूब चॅनलना साडेचार लाखांपेक्षा जास्त वेळा लोकांनी भेट दिली आहे. मॅथ्यू चँग नावाचा एक चायनीज-अमेरिकन माणूस माझ्या वेबसाईट्सवरून मराठी शिकला आणि आता खूप चांगले मराठी बोलू शकतो. जॉन गॉलटन हा लंडनमध्ये पीएचडी करीत असलेला ब्रिटिश विद्यार्थीही माझ्याच यूट्यूब चॅनेलवरुन धडे शिकून उत्तम मराठी बोलू लागला आहे. डोंबिवली येथे झालेल्या साहित्य संमेलनात जॉनची हजेरी हा उत्सुकतेचा विषय बनला होता.
इथे मि‌‌ळते मराठी भाषेची सखोल माहिती
मराठी शिकवणाऱ्या इतर वेबसाईट्स / पुस्तकांच्या तुलनेत कौशिक लेलेचे ब्लॉगस्पॉट व यूट्युब चॅनेलची काही वैशिष्ट्ये आहेत. कौशिकने मराठी शिकण्याबद्दल जितकी माहिती दिली आहे तितकी मराठी शिकवणाऱ्या इतर कुठल्याही वेबसाईटमध्ये मि‌ळत नाही आणि कुठेही इतक्या सखोलपणे मराठी भाषेचे व्याकरण शिकवलेले नाही. बहुतेक सर्व वेबसाईट्सवर नेहमीच्या वापरातील १०-२० तर कधी पन्नासेक वाक्यांचं मराठी तयार भाषांतर असतं. आणि मग फळांची, फुलांची, प्राण्यांची नावे अशी यादी असते. पण, अशी १०-२० किंवा अगदी १०० वाक्यं पाठ केली तरी, कोणाला मराठी येणार नाही कारण. १०० वाक्यं पाठ झाल्यावर १०१वं वाक्य त्या व्यक्तीला स्वतः तयार करता येणार नाही. फेसबुकवरच्या "Learn Marathi' नावाच्या ग्रूपवरही कौशिक अतिशय सक्रिय आहे. या ग्रूपवर देशविदेशातले ९०० हून अधिक सभासद आहेत. मराठी शिकणाऱ्यांच्या प्रश्नांना, शंकांना तिथे तो उत्तरे देतो. त्याने एक नवीन Android App बनवले आहे. "Marathi Dictionary For Learners' या नावाने. हे अ‍ॅप गूगल प्ले वर उपलब्ध आहे. गुजराती भाषेचेही ऑनलाइन धडे
मराठीच्या वेबसाईट्‍स पूर्णत्वाला येत असतानाच गुजरातीसाठीही अश्या ट्युटोरिअयल्सची कमतरता असल्याचे जाणवले आणि हे कामही कौशिक लेलेने स्वतःच करायचे ठरवले. त्यानुसार मराठी प्रमाणेच कौशिकने इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी ऑनलाईन ट्युटोरियल्स आणि यूट्यूब व्हिडिओ तयार केले आहेत. त्यांच्या लिंक याप्रमाणे आहेत.
http://learn-gujarati-from-english.blogspot.in/
http://youtube.com/c/LearnGujaratithroughEnglishwithKaushik…

No comments:

Post a Comment