Friday, June 23, 2017

गांधीवादी कार्यकर्ते पुंडलिक कातगडे यांच्या आत्मचरित्रातील `चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या एका प्रकरणाचे होणार स्वतंत्र पुस्तक- समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २३ जून २०१७








दै. दिव्य मराठीच्या दि. 23 जून 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली मी केलेली विशेष बातमी. त्या बातमीचा मजकूर, जेपीजी फाइल व लिंक सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/amravati-city/…/0/3/
---
गांधीवादी कार्यकर्ते पुंडलिक कातगडे यांच्या आत्मचरित्रातील 
`चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या एका प्रकरणाचे होणार स्वतंत्र पुस्तक
- मराठी साहित्यातील ग्रंथनिर्मितीत होतोय अशा प्रकारचा पहिलाच आगळा प्रयोग
- चंपारण्य सत्याग्रहाचे शताब्दीवर्ष सुरु असल्याने प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचा १ जुलै रोजी होणार प्रकाशन सोहळा
- समीर परांजपे
मुंबई, दि. २२ जून - बिहारमधील चंपारण्य येथे जुलमी ब्रिटिश निळ कारखानदारांच्या अन्यायाविरोधात महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचे यंदा शताब्दीवर्ष सुरु अाहे. या सत्याग्रहात सहभागी झालेले गांधीजींचे अनुयायी पुंडलिक कातगडे यांनी कालांतराने लिहिलेल्या आत्मचरित्रात चंपारण्य सत्याग्रहातील स्वत:च्या अनुभवांवर साठ पानांचे एक प्रकरणच आहे. `चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या शीर्षकाचे हे प्रकरणच आता स्वतंत्र पुस्तकाच्या रुपात सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान लवकरच प्रकाशित करीत आहे. यानिमित्ताने एखाद्या आत्मचरित्रातील एक प्रकरण निवडून त्याचेच स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करण्याची घटना मराठी साहित्यात प्रथमच घडते आहे.
`चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतील ग्रंँट रोड येथील मुंबई सर्वोदय मंडळाच्या सभागृहात येत्या १ जुलै रोजी होणार अाहे. या पुस्तकाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनचे संचालक रामदास भटकळ यांच्या हस्ते होणार असून यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे प्रा. श्रीराम जाधव व आंदोलन मासिकाच्या संपादिका सुनीती सु. र. हे वक्ते म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
यासंदर्भात गांधीवादी विचारांचे अभ्यासक व सर्वोदयी कार्यकर्ते जयंत दिवाण यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांचे कर्नाटकातील अनुयायी गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य म्हणजे पुंडलिक कातगडे. १९१६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मुंबई प्रांतिक परिषदेला लोकमान्य टिळक व महात्मा गांधी हे दोघेही उपस्थित होते. त्यावेळी पंुडलिक कातगडे यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच वेळी गंगाधर देशपांडे यांच्या सांगण्यावरुन पुंडलिक कातगडे चंपारण्यात सेवेसाठी गेले. त्यावेळी त्यांचे वय २२ वर्षांचे होते. चंपारण्यात गांधीजींनी तीन आश्रम सुरु केले होते. त्यापैकी एक आश्रम भितीहरवा या गावात होता. या आश्रमात ११ महिने राहून कातगडे यांनी महत्वाचे कार्य केले. त्या परिसरातील एमेन या जुलमी निळकारखानदाराच्या विरोधात पुंडलिक कातगडे यांनी अभूतपूर्व लढा उभारुन स्थानिक गावकऱ्यांना संघटित केले. चंपारण्यातील संघर्षगाथेच्या आपल्या आठवणी पुंडलिक कातगडे यांनी १९५० साली `पुंडलिक' या आत्मचरित्रातील एका स्वतंत्र प्रकरणात लिहिल्या. हे प्रकरणच साठ पानांचे आहे.
मराठी साहित्यामध्ये एखाद्या आत्मचरित्रातील विशिष्ट प्रकरण निवडून त्याचे स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करण्याची घटना कधी घडलेली नाही. `चंपारण्यातील कार्याचा अनुभव' या पुस्तकाच्या रुपाने तो नवा पायंडाही मराठी साहित्यात पडणार आहे.
पुंडलिक कातगडे यांची संघर्षगाथा
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्माजींचे पुढारपण कर्नाटकसिंह गंगाधरराव देशपांडे यांनी स्वीकारले. चंपारण्य सत्याग्रहात गंगाधर देशपांडे यांचे शिष्य पुंडलिक कातगडे सहभागी होते. गांधीजींनी खेड्याकडे चला आंदोलन सुरु केल्यानंतर गंगाधररावांनी हुदली नावाच्या खेड्यात जाणे येणे सुरु केले. त्यांच्याबरोबर पुंडलिक कातगडे देखील हुदलीस जाऊन राहू लागले. १९२९ साली जमनलाल बजाज यांच्याकडे कातगडे यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण समितीचे चिटणीस म्हणून काम केले. कातगडे अविवाहित होते. १९३२च्या मिठाच्या सत्याग्रहात कातगडेंना कारावास भोगावा लागला होता. १९३४-३५ साली बिहारच्या भूकंपग्रस्त भागात कार्य करण्यासाठी महात्मा गांधींनी बोलाविल्यामुळे कातगडे तिथे गेले होते. १९४१च्या वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनात गांधीजींनी पुंडलिक कातगडेंची निवड केली होती. पण वडिलधाऱ्यांच्या सल्ल्यानूसार तुरुंगात न जाता त्यांनी बेळगाव जिल्हा विधायक समिती स्थापन केली होती. १९४२च्या लढ्यात कातगडेंना तुरुंगवास झाला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी समग्र ग्राम सेवा समिती स्थापन केली. १९५९-६० सालानंतर हुदली गावातील समग्र ग्राम सेवेच्या कामातून पुंडलिक कातगडे स्वत:चे लक्ष कमी कमी करीत गेले. त्यानंतर त्यांनी भूदान आंदोलनात विशेष लक्ष घातले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही ते सक्रिय होते.

No comments:

Post a Comment