Monday, June 5, 2017

सनी लिओनी थिरकणार मराठी चित्रपटातील आयटम साँगमध्ये! - दै. दिव्य मराठी दि. 3 जून 2017. - समीर परांजपे



सनी लिओनी थिरकणार मराठी चित्रपटातील आयटम साँगमध्ये!
`बॉईज'मधील गाण्यात करणार दिलखेचक नृत्य
मुंबई, दि. १ जून (समीर परांजपे) - पोर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली व मग बॉलिवूड चित्रपटांकडे मोहरा वळविलेली सनी लिओनी आता चक्क मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहे. `बॉइज' नावाच्या आगामी मराठी चित्रपटातील एका आयटम साँगमध्ये गाण्यात सनी लिओनी आपल्या दिलखेचक अदा दाखविणार असून हे गाणे सुनिधी चौहानने गायले आहे. सनी लिओनीचा बॉईज हा पहिलाच मराठी िचत्रपट असून तिच्या रुपाने अजून एक सुपरस्टार आयटम साँग गर्ल मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहे.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बॉइज या चित्रपटाचे निर्माते असून प्रख्यात संगीतकार अवधुत गुप्ते हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. बॉइज चित्रपटासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी एक पत्रकार परिषद झाली. `सनी लिओनीला मराठी भाषा कितपत समजते? तिने मराठी चित्रपटात एका गाण्यात का होईना भूमिका करायचा निर्णय का घेतला?' या प्रश्नाला उत्तर देताना अवधुत गुप्ते यांनी सांगितले,`किशोरवयीन मुलांच्या गमतीजमती, त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आयाम या सर्व गोष्टींवर बॉइज या चित्रपटात हलकेफुलके भाष्य करण्यात आलेले आहे. सध्या कोणत्याही किशोरवयीन मुलाच्या ज्या कोणी ड्रीमगर्ल्स असतील त्यामध्ये सनी लिओनी सर्वात आघाडीवर असणार हे सांगायलाच नको. त्यामुळे सनी लिओनीला या चित्रपटातील एका गाण्यातील भूमिकेसाठी बोलाविण्याची गोष्ट पुढे आली तेव्हा चित्रपट निर्मात्यांनी ती लगेच उचलून धरली. बॉइज चित्रपटाला मीच संगीत दिले असून खास सनी लिओनीसाठी म्हणून मी जे धमाल गाणे तयार केले त्यातील मराठी शब्द तिने उत्तमरित्या समजून घेतले. त्यामुळे तिने प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी व्यवस्थित लिपसिंकिंग केले आहे. मराठी चित्रपटांना सध्या मिळत असलेले यश तसेच पुरस्कार या गोष्टींची सनी लिओनीला व्यवस्थित माहिती आहे.'
बॉइज चित्रपटातील सनी लिओनीची पावले ज्या गाण्यावर थिरकणार आहेत, त्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गणेश हेगडे यांनी केलेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर हे करीत अाहेत. बॉइज चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये सर्वत्र झळकणार असून त्यामध्ये संतोष जुवेकर, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमेनीस, वैभव मांगले आदी प्रतिथयश कलाकारांनी कामे केली आहेत. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहात असलेल्या युवा पिढीची दुनिया या चित्रपटात प्रेक्षकांना पाहाता येणार आहे.
युवापिढीकेंद्रित चित्रपटांचा प्रवाह
एफयू हा युवांची स्पंदने टिपणारा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतानाच युवा पिढीच्या भावभावनांचे दर्शन घडविणारा बॉईज हा चित्रपट येत आहे. यामुळे युवाप्रधान चित्रपटांचा मराठीत सिलसिला सुुरु होण्याचीही शक्यता आहे. ऑगस्ट हा महिना सगळीकडे युथ फेस्टिवल महिना म्हणून प्रचलित असतो. नेमका तोच महिना बॉईजच्या प्रदर्शनासाठी निवडण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment