Thursday, April 3, 2014

स्थिती आहे ‘स्फोटक’ तरी...(दै. दिव्य मराठी - ३१ मार्च २०१४)




इराक व पाकिस्तान या दोन्ही देशांतील परिस्थिती जितकी धोकादायक बनली आहे, तितकी स्थिती भारतात अद्याप तरी आलेली नाही व नजीकच्या काळात तशी शक्यताही दिसत नाही. त्यामुळे जगभरातील सर्वाधिक बॉम्बस्फोट घडणार्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागला, अशा बातम्या आल्या म्हणून हबकून जाण्याचे कारण नाही. या परिस्थितीचे विश्लेषण करणारा मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या अंकात ३१ मार्च २०१४ रोजी प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल मी वर दिली आहे.

स्थिती आहे ‘स्फोटक’ तरी...

- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com

जगभरात दरवर्षी सर्वाधिक बॉम्बस्फोट होणाऱया देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या ‘क्रमवारीत’ पहिला क्रमांक इराकने पटकावला असून दुसर्या स्थानावर पाकिस्तान आहे. बॉम्बस्फोटांसारखे भीषण प्रकार घडण्याच्या बाबतीतही भारत व पाकिस्तानने आपण ‘सख्खे शेजारी’ आहोत, हे या क्रमवारीतून सिद्ध केले आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल बॉम्ब डाटा सेंटरने (एनबीडीसी) २०१३मध्ये भारत व अन्य देशांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीच्या आधारे भारत व इतर देशांतील परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून एनबीडीसीने काही निष्कर्षही काढले आहेत. २०१३ मध्ये भारतामध्ये २०२ बॉम्बस्फोट झाले. ही संख्या त्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या (१०८) जवळजवळ दुप्पट आहे. अत्यंत
अस्थिर राजकीय वातावरण असलेल्या बांगलादेश व सिरियामध्ये गेल्या वर्षी अनुक्रमे ७५ आणि ३६बॉम्बस्फोट झाले होते. भारतासंदर्भात एक आशेचा किरण असा की, २०१२मध्ये आपल्या देशात २१३ बॉम्बस्फोट झाले होते पण २०१३मध्ये ही संख्या थोडी कमी झाली. मात्र भारतात २०१२मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ११३जण ठार व ४१९जण जखमी झाले होते. मात्र देशात २०१३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत १३०लोक ठार व ४६६जण जखमी झाले. २००४ते २०१३या दहा वर्षांच्या काळात भारतामध्ये २९८आयइडी बॉम्बचे स्फोट झाले व त्यात १३३७ जण मरण पावले होते. सातत्याने राजकीय अस्थैर्याच्या भोवऱयात सापडलेल्या अफगाणिस्तानमध्ये गेल्या पाच वर्षांत जितके आयइडी बॉम्बस्फोट झाले, त्यापेक्षा भारतात या प्रकारच्या बॉम्बस्फोटांची व त्यातून झालेल्या मनुष्यहानीची संख्या मोठी आहे. जगभरातील ७५टक्के बॉम्बस्फोट हे इराक, पाकिस्तान व भारतामध्ये होतात. मात्र जमावाला लक्ष्य करत घडवण्यात येणाऱया बॉम्बस्फोटांचे भारतातील प्रमाण ५८टक्के आहे, तर जगभरातील अन्य देशांत हेच प्रमाण ६८टक्के आहे. भारतात सुरक्षा दले व शासकीय इमारती यांना लक्ष्य करून घडवण्यात येणाऱया बॉम्बस्फोटांचे प्रमाण लक्षणीय आहे. नॅशनल बॉम्ब डाटा सेंटरने तयार केलेली आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच प्रसारमाध्यमांनी अफगाणिस्तानपेक्षा भारतामध्ये अधिक बॉम्बस्फोट, धोकादायक परिस्थिती असलेल्या देशांमध्ये भारत आघाडीवर, अशा आशयाच्या बातम्या दिल्या. त्यातील आकडेवारी बरोबर असली तरी या बातम्यांचा सूर मात्र भारताची प्रतिमा मलिन करणारा होता. जगभरातील सर्वाधिक बॉम्बस्फोट होणाऱया पहिल्या
तीन देशांपैकी इराक, पाकिस्तानपेक्षा भारत हा भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. भारतातील काश्मीरसारख्या काही समस्या या इराक, पाकिस्तानमधील विद्यमान समस्यांपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या आहेत. मात्र भारताची जमेची बाजू अशी, की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेली ६५वर्षे या देशात लोकशाही राजवट अतिशय स्थैर्याने नांदत असून या समस्यांवर संसदीय मार्गाने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यशही आलेले आहे. इराकमध्ये अमेरिकेने आक्रमण करून तेथील सद्दाम हुसेन यांची राजवट उलथली. त्यानंतर आजतागायत इराकमध्ये राजकीय स्थैर्य नांदू शकलेले नाही. याच्या परिणामी बंडखोरांच्या गटांचे फावले असून ते मोठय़ा प्रमाणावर तेथे बॉम्बस्फोट तसेच दहशतवादी हल्ले घडवून हिंसाचार माजवतात. अमेरिकी फौजा इराकमध्ये तैनात असूनही या हिंसक घटना त्यांना रोखता आल्या नाहीत. सद्दाम हुसेन यांना फाशी दिल्यानंतर इराकमधील स्थिती सुधारून तेथे लोकशाही राजवट स्वबळावर नांदेल, ही आशाही फोल ठरली आहे. पाकिस्तान हा देश तर जगभरातील दहशतवादी कारवायांचे मुख्य केंद्र आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानींना पाकिस्तानचा पाठिंबा होता. काश्मीर खोऱयामध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून मोठय़ा प्रमाणावर रक्तपात घडवत असतात. पंजाबमध्ये खलिस्तान चळवळीला व त्यातून पर्यायाने निर्माण झालेल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्ताननेच खतपाणी घातले होते. 2001 मध्ये अमेरिकेवर झालेला भीषण हल्ला तसेच मुंबईमध्ये २००८मध्ये झालेला हल्ला यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात होता, याचे पुरावेच उपलब्ध झालेले आहेत. १९४७मध्ये भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये तेथील लष्कराचा सत्तेवर वरचष्मा राहिलेला आहे. लोकशाही राजवटीचे प्रयोग या देशात अधूनमधून होतात; पण त्या राजवटी उलथवून लष्कर कधी सत्ता आपल्या हातात घेईल, याचा नेम नसतो. भौगोलिक जवळिकीमुळे इराक व पाकिस्तानमधील या दोन धोकादायक देशांतील वातावरणाचे थेट परिणाम भारतावर होतात, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. या परिणामांची तीव्रता अजून कमी कशी करता येईल, याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवे. मात्र इराक व पाकिस्तान या दोन्ही देशांतील परिस्थिती जितकी धोकादायक बनली आहे, तितकी स्थिती भारतात अद्याप तरी आलेली नाही व नजीकच्या काळात तशी शक्यताही दिसत नाही. त्यामुळे जगभरातील सर्वाधिक बॉम्बस्फोट घडणार्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागला, अशा बातम्या आल्या म्हणून हबकून जाण्याचे कारण नाही.
-------

No comments:

Post a Comment