टोळीयुद्धग्रस्त साल्वादोर...
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
साल्वादोरचा इंग्रजीतील अर्थ आहे, सेव्हिअर म्हणजे मुक्तिदाता... पण त्या देशाची ही ओळख फक्त शाब्दिक अर्थानेच उरलीय की काय, असे वाटावे अशी भयावह परिस्थिती या देशात आहे. यासंदर्भातील मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या २० एप्रिल २०१४च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे. या लेखाच्या दोन लिंक्स खाली दिल्या आहेत.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/20042014/0/4/
अमेरिका या देशाचे नाव घेताच डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती या देशाची प्रगती, तेथील आर्थिक संपन्नता व तेथील काही राज्यांना लाभलेले गरिबीचे अस्तर. अमेरिका खंडाचे नाव घेतले, की मात्र वेगळीच परिस्थिती दिसायला लागते. या खंडातील काही देश हे गरिबी, भूक, वांशिक संघर्ष यांच्या सापळ्यात अडकल्याचे बघून आपल्याला धक्का बसतो. ‘अमेरिका’ या शब्दाभोवतीचे वलय वितळू लागते. अमेरिका खंडातील दक्षिण अमेरिका, कॅरेबियन, मध्य अमेरिका यांचा भूभाग मिळून जो प्रदेश होतो, त्याला लॅटिन अमेरिका नावाने ओळखले जाते. लॅटिन अमेरिकेमध्ये तब्बल २१ देश येतात. त्यातले अर्जेंटिना, चिली, ब्राझील, क्युबा, व्हेनेझुएला, पेरु, उरुग्वेसारखे काही देश त्यांतील राजकीय घडामोडी व संपन्नतेच्या कहाण्यांमुळे डोळ्यांत भरतात. तर भीषण समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या लॅटिन अमेरिकी देशांमध्ये इक्वेडोर, ग्वाटेमाला, होंडुरास, हैती, निकारागुवासारखे देश कायम चर्चेत असतात. यात आणखी एक नाव आहे ते म्हणजे, ‘रिपब्लिक ऑफ अल् साल्वादोर’ या देशाचे... पण अल् साल्वादोर या लघुरूपानेच तो जास्त ओळखला जातो...साल्वादोरचा इंग्रजीतील अर्थ आहे, सेव्हिअर म्हणजे मुक्तिदाता... पण त्या देशाची ही ओळख फक्त शाब्दिक अर्थानेच उरलीय की काय, असे वाटावे अशी भयावह परिस्थिती या देशात आहे. मध्य अमेरिकेतील ‘बारियो १८’ ही अमली पदार्थांची तस्करी करणारी सर्वांत मोठी टोळी. या धंद्यात तिचे असलेले वर्चस्व मोडून काढण्यासाठी ‘मारा साल्वात्रुचा १३’ ही टोळी पुढे सरसावली. त्यातूनच अल् साल्वादोरमध्ये खूनखराबा सुरू झाला. या दोन्ही टोळ्यांमध्ये हजारो गुंडपुंड भरलेले आहेत. त्यांच्यातील संघर्षामुळे १९९०च्या दशकाच्या प्रारंभी दर दिवशी १६ जण मारले जात. जगामध्ये सर्वात जास्त खून पडणारा देश म्हणून अल् साल्वादोरला ‘बहुमान’ मिळाला, तो याच परिस्थितीमुळे... सरतेशेवटी २००३ ते २००९ या कालावधीत अल् साल्वादोरमधील सत्ताधीशांनी या दोन टोळ्यांबाबत कठोर धोरण स्वीकारले. त्यातील अनेक गुंडांची तुरुंगात रवानगी केली. तुरुंग भरून वाहू लागले, तरी या टोळ्यांचा पीळ जायला काही तयार नव्हता. हे टोळीयुद्ध हाताबाहेर चालले आहे, याची जाणीव होताच अल् साल्वादोरमधील डाव्या विचारांच्या सरकारने 2012मध्ये दोन्ही टोळ्यांच्या नेत्यांशी गुप्त खलबते केली व त्यातून या दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्षविरामाचा करार घडवून आणला. त्याचा तात्कालिक परिणाम असा झाला की, या देशामध्ये महिनाभरात जितके खून व्हायचे, त्यांचे प्रमाण निम्म्यावर आले होते. आता तरी देशातील हिंसाचाराचे सावट दूर होईल, अशी आशा त्यामुळे या देशातील नागरिकांच्या मनात निर्माण झाली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून या दोन टोळ्यांनी पुन्हा हिंसेचे तांडव सुरू केल्याने ही उरलीसुरली आशाही करपून गेली आहे.
अल् साल्वादोरमधील माजुक्ला हा अत्यंत मागासलेला भाग ‘मारा साल्वात्रुचा १३’ या टोळीच्या अधिपत्याखाली आहे. येथे दरदिवशी गोळीबाराच्या घटना घडत असतात. खूनखराबा तर पाचवीलाच पुजलेला आहे. अतिशयोक्ती वाटेल, पण तेथे नागरिकांना आपला जीव वाचवण्यासाठी या टोळीतील गुंडापुंडांना खंडणी द्यावी लागते. या परिसरात प्रवासी बससेवा चालविणारा उद्योजक रिगोबेर्टो हेर्नादेज म्हणतो, ‘टोळीवाल्यांना पैसे द्या व आपला जीव व व्यवसाय वाचवा, हे तर आमच्यासाठी रोजचेच झाले आहे.’ या टोळ्यांतील संघर्षामुळे अल् साल्वादोरमधील नागरिकांचे जिणेही हराम झाले होते. जीवित, वित्तहानी किती, याला गणतीच नाही. संघर्षविराम करारानंतर थोडी शांतता प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही टोळ्यांनी आपल्या बगलबच्च्यांचे पुर्नवसन व्हावे, यासाठी जरा लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी पुनर्वसन केंद्रे, बेकरीसारखे उद्योग सुरू करण्यात आले. या प्रयत्नांना सरकारची मदत अर्थात होतीच. सगळे काही बरे चालले आहे, असे वाटत होते; पण आतून काहीतरी खदखदत होते.
गेल्या जानेवारीमध्ये त्याचे परिणाम दिसायला लागले. खुनाच्या प्रकारांमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली. दररोज किमान नऊ लोकांना यमसदनी धाडले जाऊ लागले. मारा साल्वात्रुचा १३ व बारियो १८ या दोन टोळ्यांतील संघर्षविराम करार मोडीत का निघाला, याची धड माहिती ना हे टोळीवाले देत, ना सरकार. त्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. सध्या अल् साल्वादोरमध्ये दोन्ही टोळ्यांतील पूर्वाश्रमीच्या गुंडांसाठी व नागरिकांसाठी राबविण्यात येणार्या पुनर्वसन योजना कुणाच्याच फारशा पसंतीला उतरलेल्या नाहीत. तेथील लोकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी सुटसुटीत व खिशाला कमी चाट बसणार्या योजना हव्या आहेत. मारा साल्वात्रुचा १३ टोळीमध्ये कधीकाळी सक्रिय असलेला रिचर्ड ब्ल्यू म्हणतो की, अल् साल्वादोरमधील तरुणांना आपला विकास साधण्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध नाहीत.
देशामध्ये औद्योगिक उत्पादन रसातळाला गेलेले आहे. उद्योगधंदे फारसे नसल्याने पुरेसा रोजगार नाही, त्यामुळे प्रचंड बेकारी आहे. पोट भरण्यासाठी मग हे तरुण ‘मारा साल्वात्रुचा १३’ व ‘बारियो १८’ या टोळ्यांच्या अमली पदार्थ तस्करी व व्यापाराच्या कुकर्मात सामील होतात. अल् साल्वादोरमध्ये पोटभर जेवण, पुरेसे कपडेलत्ते मिळतील, असे जीवन जगायचे असेल तर त्या माणसाची कमाई महिन्याला किमान ४०० डॉलर इतकी असणे आवश्यक आहे. देशात कुठेही नोकरीधंदा करून इतका पगार मिळेल, अशी शाश्वती सध्या नाही. त्यामुळे मग तरुण मुले इझी मनीच्या दुश्चक्रात सापडतात व हिंसाचाराला प्रवृत्त होतात.’ ब्ल्यूने व्यक्त केलेली भावना हीच अल् साल्वादोरची नेमकी ठसठसती वेदना आहे. ‘मारा साल्वात्रुचा 13’ व ‘बारियो 18’ या टोळ्यांच्या संघर्षात तेथील शेकडो नागरिक निर्वासित झाले. जीवित, वित्तहानीला तर खळ नाही. या देशाच्या नावाचा अर्थ मुक्तिदाता असा असला, तरी अल् साल्वादोरला दुर्धर संकटातून बाहेर काढण्यासाठी अजून कोणी प्रेषित तिथे अवतरायची चिन्हे दिसत नाहीत. या देशाची अवस्था ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ अशीच झाली आहे!
No comments:
Post a Comment