Sunday, April 13, 2014

एकाकी वृद्धांची माहिती जमविण्याची पोलिसांची मोहिम (दैनिक सामना – २९ मे २०००)




-    मुंबईत एकाकीपणे राहाणार्या वृद्ध नागरिकांच्या हत्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही हत्याकांडे टळावीत या हेतूने मुंबई पोलिसांनी सध्या शहरातील कोणकोणत्या इमारतींमध्ये एकाकी वृद्ध माणसे राहातात याची बारकाईने माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे. मात्र पोलिसांना या मोहिमेदरम्यान हे एकाकी राहणारे वृद्ध नागरिक अत्यंत कस्पटासमान वागणूक देत आहेत.  याबद्दलची मी केलेली विशेष बातमी मी दैनिक सामनाच्या २९ मे २००० रोजी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.

एकाकी वृद्धांची माहिती जमविण्याची पोलिसांची मोहिम

-    समीर परांजपे
-     
-    मुंबईत एकाकीपणे राहाणार्या वृद्ध नागरिकांच्या हत्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही हत्याकांडे टळावीत या हेतूने मुंबई पोलिसांनी सध्या शहरातील कोणकोणत्या इमारतींमध्ये एकाकी वृद्ध माणसे राहातात याची बारकाईने माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे. मात्र पोलिसांना या मोहिमेदरम्यान हे एकाकी राहणारे वृद्ध नागरिक अत्यंत कस्पटासमान वागणूक देत आहेत.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी सांगितले की, १९९८ साली एकटेच राहाणार्या वृद्धांच्या हत्येत लक्षणीय वाढ झाली होती. यावर्षी अशा प्रकारच्या ९९ वृद्ध व्यक्तींच्या हत्या झाल्या. त्यातील १३ प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. १९९९ साली एकलकोंडया १७ वृद्धांच्या मुंबईत हत्या झाल्या. त्यातील ११ खूनांचा तपास लागून पोलिसांनी आरोपींना अटक केली.
यंदाच्या वर्षी तर जुहू येथे प्रिया राजवंश या एकाकी राहाणार्या अभिनेत्रीच्या खुनाने तर सार्यांची झोप उडाली. वयाने ज्येष्ठ असलेली प्रिया राजवंश हिचा खून मालमत्तेच्या वादातून करण्यात आला होता. परंतु चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या लुटारुंनी प्रियाचा खून केला असे वातावरण त्यावेळी मारेकर्यांनी प्रिया राजवंशच्या फ्लँटमध्ये उभे केले. याप्रकरणी आनंदबंधूंना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. प्रिया राजवंशच्या हत्येनंतर सांताक्रूझ येथे अरुणा गोस्वामी या एकाकी वृद्धेचा नुकताच खून करण्यात आला. विशेष म्हणजे तिचा मुलगा तिच्या घरापासून काही अंतरावरच राहात होता. पण त्याचा नियमित संपर्क नसायचा. अरुणा गोस्वामी हत्येनेही चांगलीच खळबळ माजविली.
अशा घटनांनंतर मुंबई पोलिसांना खडबडून जाग आलेली असून एकाकी वृद्ध व्यक्तींची माहिती जमा करण्याचे आदेश आता मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकारी दररोज एकाकी राहणार्या वृद्ध व्यक्तींच्या शोधात निघतात.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी सांगितले की, प्रत्येक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक हे आपापल्या हद्दीतील इमारतींमध्ये एकलकोंडे वृद्ध व्यक्ती वा दांपत्य कोण राहातात याची बारकाईने चौकशी करीत आहेत. एखाद्या इमारतीत अशा वृद्ध व्यक्ती आढळल्या की, पोलिस निरीक्षक त्यांच्याकडे जातात. त्यांच्या घरात कोणकोण आहे, या वृद्धांचे नातेवाईक जर परदेशात असतील तर ते कुठे कुठे आहेत याची सखोल माहिती या वृद्ध नागरिकांना विचारुन ती नोंदवून घेतात.
एकाकी राहणार्या वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम सुरु असतानादेखील पोलिसांना हे वृद्ध नागरिक अनेकदा सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. मुंबईतील दक्षिण भागामध्ये उच्चभ्रू वस्ती आहे. १९९८ ते आत्तापर्यंत एकाकी वृद्धांच्या ज्या हत्या झाल्या त्यामध्ये सर्वाधिक हत्या दक्षिण मुंबईत झालेल्या आहेत. त्या करणार्यांमध्ये नोकर, प्लंबर किंवा माहितगार व्यक्तीचाच समावेश असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची एकाकी राहाणार्या वृद्धांना माहिती मिळावी म्हणून गणवेशधारी पोलिस या वृद्धांच्या घरी जातात. काही वृद्ध माणसे पोलिसांना घरात घेऊन त्यांना हवी ती माहिती पुरवितात. पण दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहणारे एकाकी वृद्ध घराचा दरवाजाही न उघडता पोलिसांना पिटाळून लावत आहेत. ते कोणत्याही प्रकारची माहिती तर देतच नाहीत परंतु पोलिसांचे संरक्षण आम्हाला नको असे सांगण्याचा उपमर्दही काही एकाकी वृद्ध करीत आहेत.
दक्षिण मुंबईतील उच्चभ्रूंच्या सोसायट्या, विलेपार्ले, जुहू, खार, सांताक्रूझ, वांद्रे, दादर, बोरिवली, माहिम, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुलुंड या भागांमध्ये अधिक प्रमाणात वृद्ध नागरिक एकाकी अवस्थेत राहातात. मुंबईतील चाळी वा झोपडपट्ट्यांमध्ये जरी वृद्ध लोक एकाकीपणे जगत असले तरी तेथे त्यांच्या जीवाला विशेष धोका नसतो. कारण या वस्त्यांमध्ये आजूबाजूला थोडासा तरी गजबजाट असतो. पण सहकारी सोसायट्या वा बंगल्यांमध्ये एकाकी वृद्ध अधिकच एकलकोंडे होतात. त्यांची हत्या करुन मुद्देमाल लांबविणे लुटारुंना अधिक सोपे वाटते. ही मानसिकता लक्षात घेऊन मुंबईतील या सर्व भागातल्या सहकारी सोसायट्यांमध्ये एकाकी वृद्ध कोण राहातात याकडे अधिक लक्ष देऊन पोलिसांना तपास चालविला आहे.
एकाकी वृद्ध पोलिसांना दरवाजातूनच पिटाळून लावण्याच्या घटना का घडतात या प्रश्नावर एका ज्येष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले की, पोलिसांची हप्तेखोरी, त्यांची डागाळलेली प्रतिमाही वृद्धांच्या अशा उफराट्या वागणूकीस कारणीभूत आहे. खर्या गणवेशात आलेला पोलिसही वृद्धांना तोतया पोलिस वाटल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

एकाकी अवस्थेत जगणार्या वृद्धांन आपल्या घरी नोकर-चाकर ठेवताना त्याची पूर्ण माहिती व जमल्यास त्याचे छायाचित्र आपल्या संग्रही ठेवावे असे आवाहनही पोलिसांकडून केले जात आहे. एकाकी वृद्धांसंदर्भातील ही माहिती मुंबईचा सामाजिक अभ्यास करणार्यांनाही भविष्यात उपयोगी पडण्यासारखी आहे. त्यामुळे ज्यांच्या सुरक्षिततेचे काम हाती घेण्यात आले आहे, त्या एकाकी अवस्थेत राहाणार्या वृद्धांनी या मोहिमेसाठी पोलिसांना संपूर्ण सहकार्य द्यायला हवे. ते या वृद्धांच्या हिताचे आहे असे या ज्येष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले.

No comments:

Post a Comment