छत्रपती शिवरायांनी
स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यातील किल्ले
राजगडावर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागातर्फे मोठ्या
प्रमाणावर पुरातत्व जतनाचे काम करण्यात आले होते. त्यामध्ये किल्ले राजगडच्या
इतिहासावर प्रकाश टाकणार्या अनेक प्राचीन वस्तू पुरातत्वतज्ञांना डिसेंबर
१९९९मध्ये मिळाल्या होत्या. त्या सार्या कामासंदर्भात किल्ले राजगडवर किमान तीनदा
जाऊन व ते काम प्रत्यक्ष बघून मी दै. सामनाच्या २१ जानेवारी २००० व २२ जानेवारी
२०००च्या अंकात दोन लेख पूर्वार्ध व उत्तरार्ध या स्वरुपात लिहिले होते. इथे या
लेखाच्या पूर्वार्धाची जेपीजी फाईल दिली आहे.
किल्ले राजगडवरील
वास्तुसंशोधनात गवसल्या अनेक शिवकालीन वस्तू...
लेखाचा पूर्वार्ध
- समीर परांजपे
-
किल्ले राजगड –
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे
जिल्ह्यातील किल्ले राजगडावर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये
विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर पुरातत्व जतनाचे काम सुरु आहे. त्या दरम्यान किल्ले
राजगडच्या इतिहासावर प्रकाश टाकणार्या अनेक प्राचीन वस्तू पुरातत्वतज्ञांना
डिसेंबर १९९९मध्ये मिळाल्या आहेत. किल्ले राजगडवरील पद्मावती माची व बालेकिल्ला
भागात सध्या हे उत्खनन व वास्तुजतन सुरु असून ही दीर्घकालीन योजना आहे.
राजगडसंदर्भात नवनवीन पुरावे प्रकाशात येत असल्याने शिवकाळाच्या इतिहासलेखनालाही
वेगळे पैलू लाभू शकतील.
यासंदर्भात
महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक बा. स. गजभिये व
किल्ले रायगडवर वास्तुसंशोधनाचे कार्य करणारे रघुनाथ खेडेकर यांनी सामनाला माहिती
देताना सांगितले की, छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी किल्ले राजगडवरील
वास्तूजतनाच्या कामाला शासनाने प्राधान्य दिलेले आहे. १९९३ सालची विजयसिंह मोहिते
पाटील समिती व १९९५ सालच्या प्रमोद नवलकर समितीने दिलेल्या अहवालानूसार किल्ले
राजगडवरील वास्तूसंशोधनाचे कार्य हाती घेण्यात आले आहे.
राज्य पुरातत्व व
वस्तुसंग्रहालये विभागाच्या अख्यत्यारीत किल्ले राजगड जतनासाठी आहे. किल्ले
राजगडच्या डोंगराला मुरमदेवाचा म्हणत. या डोंगराला बहामनी राज्यात फारसे महत्व
नव्हते. अहमदनगर निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने मुरुमदेवाचा डोंगर ताब्यात
घेऊन त्याला प्रथम गडाचे स्वरुप दिले. या गडाचे रक्षण करण्याचे पहिले काम गुंजण
मावळातील शिलिमकर देशमुखांकडे होते. छत्रपती शिवरायांन १६४७नंतर मावळातील अनेक
गडांबरोबरच मुरुमदेवाच्या डोंगरावरील हा गडही ताब्यात घेतला व त्याला राजगड असे
नाव दिले. त्यामुळे छत्रपती शिवराय व शिलिमकरांमध्ये काही दिवस कुरबुरी सुरु
होत्या. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी शिवरायांनी राजगडवरच स्थापन केली. १६७०
पर्यंत ही राजधानी येथेच होती. शिवराय व संभाजी यांच्यानंतर हा किल्ला एक-दोन वेळा
औरंगजेबाच्या ताब्यात गेला. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात राजगडचे अधिपत्य
भोरच्या सचिवांकडे होते. सिंहगड वगळता संस्थान विलिन होईपर्यंत तो भोरच्या ताब्यात
राहिला. यावेळी राजगडवर हवालदार व काही अधिकारी असत.
किल्ले राजगडकडे
दुर्लक्ष झाल्याने तेथील अनेक वास्तूंची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. छत्रपती
शिवरायांच्या तेजस्वी कामगिरीचे प्रतिक जपायला हवेही भावना शासन दरबारी वाढीस
लागताच महाराष्ट्र पुरातत्व व वस्तूसंग्रहालये विभागाने या वास्तूंच्या जतनासाठी
एक योजना आखली. तिच्या राबवणुकीस सुमारे १ कोटी १८ लाख रुपये खर्च येणार होता.
त्यातील ४० लाख रुपये महाराष्ट्र शासनाने मंजूर केले असून त्यातून वास्तूसंशोधन व
जतनाचे काम राजगडावर सुरु झालेले आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात राजगडावरील
तळी स्वच्छ करणे, महत्वाच्या वास्तूंची दुरुस्ती व जतन तसेच पायवाटा तयार करणे या
कामाला प्राधान्य देण्यात आले.
किल्ले राजगडावरील
पूर्वापार वाटाही ढासळल्या आहेत. काही वाटा तर कड्यांच्या अंगावरुन जातात. त्यांची
रुंदी कमाल १ फूट ६इच इतकी होती. त्या मार्गावरील कातळ फोडून या पायवाटा सुमारे ६
फुट रुंदकरणे हे काम पुरातत्व विभागाने प्रथम हाती घेतले. यानुसार राजगडावरील
पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिर केंद्रस्थानी ठेवून पद्मावती ते गुंजवणे दरवाजा,
पद्मावती ते पाली दरवाजा, पद्मावती ते बालेकिल्ला मार्ग, गुंजवणे गावाकडून चोर
दरवाजाने प्रवेश करण्याचा मार्ग ह्या पायवाटा रुंद करण्यात आल्या. पावसाळ्यात तेथे
जमिनीची खूप धूप होते. अशा पायवाटांच्या टप्प्यावर व उंच जागी सिमेंटच्या पायर्या
बांधण्यात आलेल्या आहेत किल्ले राजगडावर अनेक गिर्यारोहक, इतिहासप्रेमी भेट देतात.
त्यांच्यासाठी दोन तीन विश्रांतीगृहे आहेत व स्वच्छतागृहे बांधण्याचे कमा जोरात
सुरु आहे. याशिवाय धोकादायक ठिकाणी रेलिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
राज्य पुरातत्व
विभागाने किल्ले राजगडावर असलेल्या विविध तळ्यांची साफसफाई करण्याचे काम हाती
घेतले आहे. गेल्या डिसेंबर १९९९मध्ये पद्मावती माचीवरील राजवाड्यामागील तळ्याची
सफाई करताना सुमारे १५ फुटांपर्यंत गाळ उपसण्यात आला. पद्मावती मंदिराजवळील
पाण्याची टाके साफ करण्यात आली. संजीवनी माचीकडे जाताना लागणारी एक-दोन टाके तसेच
राजगडच्या बालेकिल्ल्यावरील चंद्रकोर टाक्यातील गाळ संपूर्णपणे काढून ते साफ
करण्यात आले. बालेकिल्ल्यावर ४-५ पाण्याची टाकं असून तीही स्वच्छ करण्याचे काम
सुरु आहे. राजगडावरील सर्व तळी, टाके यांच्यात साठवणुकीचे पाणी आहे. तिथे जिवंत
झरे आढळून येत नाहीत.
किल्ले राजगडावरील
अनेक वास्तू मातीखाली अनेक वर्षे दबलेल्या अवस्थेत होत्या. त्यातील पद्मावती
माचीवरली ऐतिहासिक राजवाड्याच्या अवशेषांची आता साफसफाई करण्यात आली आहे.
पूर्वीच्या कचेरी इमारतीचा १/४ भाग नव्याने
प्रकाशात आणणे शक्य झाले आहे. इतकी वर्षे तो मातीखाली दबला होता. राजगडावर जी
शिबंदीची इमारत आहे तिचा पुढचा फलाटवजा भागही नव्याने उजेडात आणला गेला.
त्याचप्रमाणे सुवेळा माचीवरील एक सदरही मातीच्या ढिगार्यातून वर काढण्यात आली.
पद्मावती माचीप्रमाणेच किल्ले राजगडच्या बालेकिल्ल्यातही उत्खनन व वास्तूजतनाचे
काम मोठ्या प्रमाणावर पुरातत्व खात्याकडून सुरु आहे. बालेकिल्ल्यातील बाजारपेठ,
शिबंदी, राजवाडा, ब्रम्हर्षी मंदिर, गुंफा यांच्यावरील मातीची पुटे बाजूला सारुन
या वास्तू मुळ स्वरुपात कशा होत्या याचे दर्शन आता तेथे भेट देणार्यांना या कामामुळे
होत आहे.
पद्मावती माची ते
बालेकिल्यामध्ये जे वास्तूसंशोधन सुरु आहे, त्या दरम्यान मातीच्या ढिगार्यामध्ये
दडलेल्या अनेक प्राचीन वस्तू, शिवकालीन-ब्रिटिशकालीन नाणी डिसेंबर १९९९ मध्ये
राजगडावर पुरातत्वतज्ज्ञांना मिळाली आहेत. या वस्तूंमुळे राजगडच्या इतिहासावर काही
वेगळा प्रकाशझोत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात पुरातत्व अभियंता
रघुनाथ खेडेकर यांनी सांगितले की, वास्तूसंशोधनात राजगडवरील पद्मावती माचीवर
मातीखाली दबलेल्या अवस्थेत एक नक्षीदार दगडी जाते, याच माचीवरील राजवाड्याच्या
भागात माहुताचा अंकुश मिळालेला आहे. राजगडच्या बालेकिल्ल्यामध्ये दगडी लामणदिवा,
तोफांचे दोन गोळे, मातीची तुटक्या अवस्थेतील भांडी, तांब्याचे तीन नक्षीदार गडू,
बुद्धिबळाच्या सोंगट्या, दरवाजाच्या लोखंडी कड्या, शिशाचे गोळे, याचबरोबर तीन
शिवकालीन व पाच ब्रिटिशकालीन नाणीही मिळालेली आहे. या वस्तूंचा संगतवार अभ्यास
करुन नवे निष्कर्ष काढता येणे सहजशक्य आहे.
१९९९ सालामध्ये
किल्ले राजगडावर वास्तूसंशोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु झालेले असले तरी याआधी
१९८०मध्ये काही प्रमाणात गडावर वास्तूसंशोधन झाले होते. पद्मावती माचीवरच्या
राजवाड्याच्या एका भागात तेव्हा मातीखाली दबलेले पुजेचे साहित्य मिळाले होते.
त्यात आचमन करायची पळी, फुलपात्र, सहाण, वेगवेगळ्या आकाराच्या थाळ्या, देवीचा
चांदीचा टाक होता. यावरुन राजवाड्यात देवघर कुठे होते याचा शोध लागला. त्याशिवाय
बाणांचे अग्रभाग, शिवराई अशाही काही चीजा मिळाल्या होत्या. त्यानंतर डिसेंबर
९९मध्ये सुरु झालेल्या वास्तूसंशोधन कार्यात अशाच ऐतिहासिक वस्तू मिळत आहेत.
किल्ले राजगडावरील वास्तूसंशोधनाचा प्रवास हा दीर्घकालीन अशू त्यासाठी पुढील
टप्प्याची आखणी पुरातत्व खात्याने केलेली आहे.
-----
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यातील किल्ले राजगडावर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर पुरातत्व जतनाचे काम करण्यात आले होते. त्याबद्दल दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखाचा उत्तरार्ध २२ जानेवारी २००० रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याची जेपीजी फाईल व तो लेख खाली दिला आहे.
-----
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यातील किल्ले राजगडावर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर पुरातत्व जतनाचे काम करण्यात आले होते. त्याबद्दल दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखाचा उत्तरार्ध २२ जानेवारी २००० रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याची जेपीजी फाईल व तो लेख खाली दिला आहे.
किल्ले राजगडच्या पद्मावती माचीवरील ऐतिहासिक सदरेची पुनर्रचना होणार
लेखाचा उत्तरार्ध
समीर परांजपे
- Paranjapesamir@gmail.com
किल्ले राजगड – किल्ले राजगडावरील वास्तुसंशोधनाच्या दुसर्या टप्प्यात
पद्मावती माचीवरील शिवकालापासून वापरात असलेल्या सदरेची तत्कालीन स्वरुपानूसार पुनर्रचना
करण्याचा महाराष्ट्र पुरातत्व व वस्तूसंग्रहालये विभागाचा विचार आहे. जुनी
कागदपत्रे व इतिहासतज्ज्ञांनी केलेल्या वर्णनाचा मागोवा घेऊन सदरेसाठी लागणारे चार
लाकडी नक्षीदार खांब पुण्यातील एका कारागिराकडून तयार करुन घेण्यात आले आहेत. पुणे
जिल्ह्यातील किल्ले राजगडवरील जतनकाम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील शिवकाळाशी
संबंधित अन्य किल्ल्यांकडे पुरातत्व विभाग आपले लक्ष वळवेल.
किल्ले राजगडावरील वास्तुसंशोधनाची पार्श्वभूमी सांगताना पुरातत्व
विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक वास्तू,
गड-किल्ले, तीर्थक्षेत्र यांच्या जतनासाठी कार्यवाही करण्याकरिता विजयसिंह
मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती.
शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंततर तत्कालीन सांस्कृतिकमंत्री प्रमोद
नवलकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली. या
नव्या समितीने आपल्या बैठकांमध्ये चर्चा करुन महाराष्ट्रातील सुमारे २७ किल्ल्यांच्या
जतनाचा विचार केला व त्यावर समितीची सहमतीही झाली.
या २७ किल्ल्यांमध्ये काही किल्ले शिवकाळपूर्व असले तरी त्यांचा
छत्रपती शिवरायांच्या जडणघडणीशी निकटचा संबंध आला होता. या किल्ल्यांमध्ये पुणे
जिल्ह्यांतील सिंहगड, राजगड, तोरणा, शिवनेरी, पुरंदर, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिंधुदूर्ग,
विजयदुर्ग, रायगड जिल्ह्यातील रायगड, मुरुड-जंजिरा, खांदेरी-उंदेरी, ठाणे
जिल्ह्यातील वसई, अर्नाळा, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनगड, पन्हाळगड, विशाळगड तसेच
कंधार (नांदेड), गाविलगड (अमरावती), नरनाळा (अकोला), परांडा नळदुर्ग (धाराशीव),
हरिश्चंद्रगड (अहमदनगर), प्रतापगड (सातारा), साल्हेर-मुल्हेर (नाशिक), सुवर्णदुर्ग
(रत्नागिरी), देवगिरी (औरंगाबाद) यांचा समावेश होतो. या किल्ल्यांमधूनही राजगड,
नळदूर्ग, विशाळगड या तीन किल्ल्यांवरील वास्तूसंशोधन व जतनीकरणाला सर्वोच्च
प्राधान्य द्यायचे ठरविण्यात आले होते. अर्थात ही कार्यवाही टप्प्याटप्प्याने होणारी
असल्याने प्रथम किल्ले राजगडचे काम हाती घेण्यात आले.
किल्ले राजगडावरील वास्तूसंशोधनाचा पहिला टप्पा गेल्या एप्रिलमध्ये
संपावा अशी पुरातत्व विभागाची अपेक्षा असून दुसर्या टप्प्यात नेमक्या कोणत्या
वास्तूंची डागडुज करायची याचाही विचार झालेला आहे. त्यानूसार राजगडावरील पद्मावती
माचीवरील शिवकाळापासून वापरात असलेल्या सदरेची तत्कालीन स्वरुपानूसार पुनर्रचना करण्य़ाचे
ठरविण्यात आले आहे. प्रसिद्ध इतिहाससंशोधक गं. ह. खरे यांच्या स्वराज्यातील तीन
दूर्ग या पुस्तकामध्य़े पदमावती माचीवरलील सदरेचे वर्णन दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व
काळापर्यंत सदरेचे काही भाग शाबूत होते. नंतर मात्र अनास्थेमुळे ते भुईसपाट झाले.
सदरेचे कोरीव खांब कसे होते याचे वर्णन ग. ह. खरे यांनी आपल्या पुस्तकात दिले आहे.
त्यानूसार पुरातत्व विभागाने पुण्यातील एका कारागिराकडून चार लाकडी नक्षीदार खांब
तयार करुन ठेवले आहेत. हिअर केम स्वराज्य या दि. वि. काळे यांच्या पुस्तकात सदरेचे
छत कसे होते याचे वर्णन उपलब्ध आहे. शेवटी राजगड भोर संस्थानच्या ताब्यात असताना
पद्मावती माचीवरील सदर ज्या स्वरुपात टिकून होती तेच स्वरुप पुनर्रचनेत असावे असा
कल या बांधणीत आहे.
पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर, ब्रम्हर्षी मंदिर,
जननी मंदिर यांच्या इमारतींची डागडुजीही त्यांच्या मुळ स्वरुपाला धक्का न लागू
देता दुसर्या टप्प्यात करण्यात येणार आहे. पद्मावती मंदिरासमोर एका जुन्या
वास्तूचा मोठा जोता आहे. यावरच तेवढ्या आकाराची दोन मोठी विश्रांतीगृहे परस्परांना
जोडून बांधण्यात येतील. यातील एक पुरुष व दुसरे महिलांसाठी असेल. किल्ले राजगडला
जे गडप्रेमी भेट देतात त्यांच्या निवासाची सोय होण्याच्या दृष्टीने हे बांधकाम
जुन्या वास्तूंची नजाकत कायम ठेवून करण्यात येईल. पद्मावती माचीवरील दारुगोळा
कोठारात सध्या गडप्रेमींना राहाण्यासाठी एक मोठे सभागृह आहे, पण वादळवार्यामुळे ते
काहीसे उध्वस्त अवस्थेत असल्याने त्याचीही योग्य ती दुरुस्ती करुन गडप्रेमींना
राहाण्यासाठी ते खुले करण्यात येईल. राजगडाच्या प्रत्येक माचीवरील सदरेचीही
व्यवस्थित साफसफाई करण्यात येणार आहे. राजगडावर जे तलाव आहेत ते पाणी साठवणुकीचे
असल्याने काही काळाने गाळ साचून हे पाणी खराब होते. हे पाणी प्यायल्यामुळे आजार
होऊ शकतात हे लक्षात घेऊन पाणीशुद्धीकरणाची एक खास यंत्रणाही या तलावांजवळ
बसविण्यात येईल. राजगडावर विविध अशी ४० महत्वाची ठिकाणे असून तेथे पुरातत्व
विभागाच्या वतीने नामफलक लावण्यात येतील जेणेकरुन गडप्रेमींना गडदर्शन सुलभपणे
करता यावे.
राजगडावरील पद्मावती, सुवेळा व संजीवनी या माची व बालेकिल्ला या सर्व
परिसरातल्या वास्तू आजही मातीखाली दबलेल्या अवस्थेत आहेत. त्यांच्यावरची मातीची
पुटे काढून त्यांना प्रकाशात आणण्याचे महत्कार्य पुरातत्व विभागाने हाती घेतले
असले तरी हे काम पूर्ण होण्यास आणखी काही वर्षे लागतील. पद्मावती माचीवरील
राजवाड्याचे अवशेष हे माती, झुडुपाच्या ढिगार्याखालून बाहेर काढण्यात आले असले तरी
त्यांच्या देखभालीकडे खात्याला सातत्याने लक्ष पुरवावे लागणार आहे. त्यासाठी
राजगडावरील पुरातत्व विभागाच्या कर्मचार्यांची संख्याही वाढवावी लागेल. राजगडाला
असलेले चोर दरवाजा, अळू, गुंजवणे, पाली, भुतोंडे आदी दरवाजे गेट लावून बंदिस्त करण्याचे कामही हाती घ्यावे
लागेल.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातल्या वेल्हे गावाच्या आग्नेयेस
सुमारे १५ कि.मी. वर राजगड असून तो समुद्रसपाटीपासून १३७६ मीटर उंचीवर आहे. बरचेसे
गडप्रेमी सध्या गुंजवणे वाटेवरुन राजगड चढण्यास सुरुवात करतात. राजगडाच्या
उत्तरेकडे पद्मावती, आग्नेयेस सुवेळा, नैऋत्येस संजीवनी अशा तीन माची व गडाच्या
पठारावर मधोमध बालेकिल्ला आहे. राजगडचे तट व बुरुज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे
चिलखती आहेत. राजगडावर येण्यासाठी गुंजवणे, पाली, अळू, काळेश्वरी असे चार दरवाजे व
तीन दिंड्या असल्याने राजगडावरील मुख्य वस्ती तेथेच होती. तथापि सुवेळा, संजीवनी व
पद्मावती माच्यांवर व बालेकिल्ल्यातही काही वस्ती होती. छत्रपती शिवराय कुटुंबासह
बालेकिल्ल्यात राहात असत. सुवेळी माची साधारणत: सपाट व चिंचोळी
आहे. संजीवनी माची चिंचोळी असली तरी पायर्यापायर्यांनी खाली व वरच्या स्तरावर ती
बांधून काढली आहे. राजगडावरील मुख्य देवता पद्मावतीचे मंदिर पद्मावती माचीवर आहे.
तिन्ही माची व बालेकिल्ला यांवर गणेश, मारुती, ब्रम्हर्षी, जननी, काळेश्वरी,
भागेश्वरी, महादेव यांची लहान-मोठी मंदिरे आहेत. बालेकिल्ल्यावर शिवकाळातील लहानशी
बाजारपेठ आहे. या नमुन्यावर पुढे किल्ले रायगड येथे भव्य बाजारपेठ बांधण्यात आली.
असा विविधांगी विस्तार असलेल्या किल्ले राजगडावर सुरु असलेल्या
वास्तुसंशोधन व जतनाच्या कामातून पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे नामवंत पुरातत्वशास्त्रज्ञ
शिवकालीन इतिहासावर वेगळा प्रकाश टाकतील याची सर्वांनाच खात्री आहे.
No comments:
Post a Comment