महाराष्ट्रभूमीतील
तमाम गिर्यारोहकांना कोणत्याही मौसमात वर्षाचे ३६५ दिवस खुणावणार्या
हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याला कवेत घेण्याचे धाडस याच दगडांच्या देशातील राकट,
कणखर तरुणमनाने पुन्हा एकदा करुन दाखविले आहे. दिवंगत निष्णात गिर्यारोहक मिलिंद
पाठक यांच्यानंतर तब्बल एक तपाने १५०० फुटांवरील कोकणकड्याची बेलाग चढाई मोहिम एअर
इंडिया सुरक्षा विभाग व पिनॅकल क्लबच्या गिर्यारोहकांनी २४ जानेवारी २००० रोजी यशस्वी
केली. त्या घटनेवर दैनिक लोकसत्तामध्ये २९ जानेवारी २००० रोजी मी लेख लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी
फाईल वर दिली आहे.
एका तपानंतर कोकणकडा
पुन्हा सर
- समीर परांजपे
- paranjapesamir@gmail.com
महाराष्ट्रभूमीतील
तमाम गिर्यारोहकांना कोणत्याही मौसमात वर्षाचे ३६५ दिवस खुणावणार्या
हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याला कवेत घेण्याचे धाडस याच दगडांच्या देशातील राकट,
कणखर तरुणमनाने पुन्हा एकदा करुन दाखविले आहे. दिवंगत निष्णात गिर्यारोहक मिलिंद
पाठक यांच्यानंतर तब्बल एक तपाने १५०० फुटांवरील कोकणकड्याची बेलाग चढाई मोहिम
यशस्वी झाली आहे.
माळशेज घाटाच्या
परिसरात उभ्या ठाकलेल्या हरिश्चंद्रगडावरची वारी ही समस्त डोंगयात्रींसाठी एक
पर्वणीच असते. याच गडावरच्या कोकण कड्याच्या टोकाशी खाली वाकून खोल दरीत दिसणारा
राकट अर्धवर्तुळाकार कोकणकडा पाहाणे आणि त्यातून वर घोंघावत येणार्या वार्याचा
आनंद लुटणे ही तर हरिश्चंद्रगडावरील सफरीची खासच मौज. पण याच कोकणकड्याला थेट
अंगावर घेत त्याला आपलेसे करणे ही महाकठीण गोष्ट. ओव्हरहँग पद्धतीचा अंगावर येणारा
सुमारे ४५० ते ५०० फुटी कातळ हे या चढाईतील सर्वात मोठे आव्हान असून कदाचित
त्यामुळेच १९८८मध्ये मिलिंद पाठक यांनी मार्ग खुला केल्यानंतर त्यानंतरच्या बारा
वर्षांत कोकणकड्यावर चढाई करण्याचा प्रयत्न झाला नव्हता. एअर इंडिया विभाग आणि
पिनॅकल क्लब या संस्थांनी संयुक्तरित्या मोहिम आखून कोकणकडा सर करण्याचे आव्हान
स्वीकारले.
गेल्या अनेक वर्षांत
कोकणकड्यावर स्वारी करण्याचा कोणीही प्रयत्न केला नसल्याने त्यावरील
प्रस्तरारोहणाचा मार्ग हुडकून काढणे ही कठीण गोष्ट होती. १९८८ साली मिलिंद पाठक
यांच्यासमवेत मिलिंद पटाडे, अनिल साबळे व अन्य सदस्यांनी कोकणकड्याचा माथा सर केला
होता. राजेश पटाडे यांच्याकडे या मोहिमेच्या आठ रंगपारदर्शिका उपलब्ध होत्या.
त्यांच्याच सहाय्याने या मोहिमेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. परंतु
त्यावेळच्या रंगपारदर्शिका व आता कातळाच्या तसेच तेथील परिसरात झालेले बदल यांचा
मेळ साधणे हीसुद्धा तितकीच कठीण गोष्ट होती. राजन घाडगेच्या नेतृत्वाखालील चमूने
ही सर्व आव्हाने शिरी घेतली होती. महिबूब मुजावर, सादिक अली, मुनिष गुप्ता, संजय
पेंडुरकर, अशोक पावसकर हे या चमूत सामील होते. अनिल बांदेकर व विजय शहा यांनी
तळछावणीची व्यवस्था सांभाळली.१२ जानेवारी २००० रोजी कोकणकड्याच्या प्रस्तरारोहणाची
ही मोहिम सुरु झाली, तीही २६ जानेवारी २०००च्या आत कोकण कडा सर करायचे उद्दिष्ट
डोळ्यासमोर ठेवूनच. २६ जानेवारीला बर्याच जणांना आपल्या पोटापाण्याच्या ड्युटीवर
हजर व्हायचे होते. माळशेज घाटाच्या प्रारंभी वसलेल्या सावर्णे गावातून बेलपाडा या
गावापर्यंत सर्वांनी कूच केली. या गावापासून तीन तासांच्या अंतरावर तळछावणी
उभारण्यात आली. १२ जानेवारीला प्रथम पुढच्या टप्प्यातील तळछावणीचा मार्ग शोधून
काढून मोहिमेचा प्रारंभ झाला. आश्चर्याची गोष्ट म्हडे १२ वर्षांपूर्वीच्या मोहिमेत
ठेवलेल्या कड्या, बोल्टपैकी काही साहित्य अजूनही ऊन-पावसाचा मारा खाऊनही बर्याच
चांगल्या स्थितीत असल्याचे या पथकाला आढळले. मात्र बर्याच ठिकाणी नव्याने सामग्री
वापरण्याची गरज अपरिहार्य होती. दररोज साडेचार ते पाच तासांचे प्रस्तरारोहण व एकूण
आठ तासांची अंग मेहनत हा या चमूचा रोजचा दिनक्रम झाला होता. अपवाद फक्त दोन
दिवसांचा होता. या दोन दिवशी मात्र त्यांनी सक्तीने विश्रांती घेतली होती. प्रस्तरारोहणापैकी
सलग दीड ते दोन तास झुमारिंग पद्धतीने चढाई करुन पायावर खूप ताण येत असे. पुढील
टप्प्यावरील तळछावणीपासून पुढे चार छावण्या केल्या होत्या. दररोज प्रत्येक टप्पा
पार करुन तळछावणीकडे परतायचे आणि दुसर्या दिवशी पुन्हा मार्ग धुंडाळायला सुरुवात
करायची. चढाईच्या अर्ध्या टप्प्यावर ससाण्याची गुहा हा मोठा मार्गदर्शक टप्पा
होता. पण नेमक्या त्याच टप्प्यावर दोन-तीन गुहा असल्याने थोडा गोंधळ उडाला.
त्यामुळे ही चुक सुधारण्यात एक दिवस खर्ची पडला. शेवटचा साडेचारशे फुटांचा ओव्हरहँग
टप्पा हा सर्वात कठीण होता. त्यापूर्वी सलामीवीर महिबुब मुजावर व साजिक अली खान
यांनी डोंगराच्या कुशीतच रात्री विसावा घेतला. या ठिकाणची जागा एवढी अरुंद होती
की, झोपतानाही दोरी बळकट ठेवण्यासाठी यांत्रिक सामग्रीचा आधार त्यांना घ्यावा
लागला. अखेर २४ जानेवारी २००० रोजी या दोघांनी कोकणकड्याचा माथा सर केला, तेव्हा
सार्या चमूचा आनंद गगनात मावेनासा झाला. संपूर्ण चढाई मोहिमेत चढाईबरोबरच नुसत्या
स्पर्शानेही निखळणारे दगड-गोटे तसेच विंचू, घोरपड, मधमाशा, वटवाघळे, साप असे
भीतीदायक व लक्ष विचलित करणारे प्राणी यांना तोंड देत ही चढाई एअर इंडिया-पिनॅकल
क्लबच्या गिर्यारोहकांना करावी लागली. एकदा तर संपूर्ण रोपवर मधमाशांचे मोहोळ जमा
झाले होते. यातील बरीचशी चढाई ही हाताच्या बोटांना नखाइतका आधार देतच केलेली असते.
अशा चढाईतच बोटांचा आधार घेतानाच त्या कपारीतून वटवाघूळ उडाल्याने बोटांवर जखमा
झाल्याचा दुर्घर प्रसंगही या चढाईतील एका गिर्यारोहकावर ओढविला होता. अनेक
कपार्यांमध्ये विंचू सापडले. पण कोणत्याही श्वापदांना स्वत:हून इजा न करण्याचा कटाक्ष या गिर्यारोहकांनी
संपूर्ण मोहिमेदरम्यान पाळला. मिलिंद पाठक यांच्या मोहिमेतील राजेश पटाडे यांनी
पुन्हा एकदा आपल्या स्मृतिंना उजाळा देत एअर इंडिया-पिनॅकल क्लबच्या
गिर्यारोहकांनी आखलेल्या कोकणकडा चढाई मोहिमेच्या ठिकाणी हजेरी लावली होती. पटाडे
यांच्याबरोबर नव्या दमाचा आणखी एक चमू होता. पटाडे यांनी एअर इंडिया सुरक्षा विभाग
व पिनॅकल क्लबच्या चमूला प्रत्यक्ष मोहिमेतही मार्गदर्शन केले. त्याचबरोबर बेलपाडा
ग्रामस्थांचीही त्यांना चांगलीच मदत झाली. पाण्याचा अतिशय तुटवडा असूनही सलग १२
दिवस अथक प्रयत्न करीत कोकणकडा चढाई मोहिम यशस्वी करण्यासाठी या चमूला यश
येण्याकरिता अनेक लोक झटत होते. या मोहिमेत एअर इंडिया-पिनॅकल क्लबच्या
गिर्यारोहकांना सुमारे २७०० फुटांचा रोप लागला. ध्येयासक्ती आणि धोक्याचे भान हे
दोन्ही मनात ठेवून कोकणकडा सर करण्याची मोहिम एअर इंडिया-पिनॅकल क्लबच्या
गिर्यारोहकांनी यशस्वी करुन दाखविली.
No comments:
Post a Comment