Friday, April 11, 2014

अमेरिकी विद्यार्थ्यांची स्पर्धा भारत, चीनशी! (दैनिक दिव्य मराठी - १२ एप्रिल २०१४)




दै. दिव्य मराठीच्या १२ एप्रिल २०१४ रोजी प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाची लिंक
--------
अमेरिकी विद्यार्थ्यांची स्पर्धा भारत, चीनशी!
------
- समीर परांजपे
sameer.p@dainikbhaskargroup.com
--------
अमेरिका जगातील सर्वात बलाढय़ राष्ट्र आहे, असा विचार करून तेथील युवा पिढी बेसावध राहिली तर अमेरिकेच्या स्पर्धक देशांचे काम त्यामुळे अधिकच सुकर होईल. नेमकी याच परिस्थितीची टोचणी मूळ अमेरिकी विद्यार्थ्यांना ओबामा देऊ इच्छित होते.
-------
उच्चशिक्षण घेऊन उत्तम नोकऱया पटकावण्यात किंवा व्यावसायिक बनण्यासाठी अमेरिकेत उपलब्ध असलेल्या संधींचा पुरेपूर लाभ घेऊन भारतीय व चिनी युवकांनी अमेरिकी युवा पिढीसमोर तगडी स्पर्धा निर्माण केली आहे. त्याची जाणीव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मेरीलँड येथे अमेरिकी विद्यार्थ्यांसमोर बोलताना नुकतीच करून दिली. आपण राहतो त्याच शहरात उत्तम नोकरी मिळविण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी स्पर्धा करण्याचे दिवस आता सरले आहेत. आता या गोष्टींसाठी अमेरिकी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करावी लागणार आहे, असे परखड बोल ओबामा यांनी ऐकविल्याने त्यावर अमेरिकी प्रसारमाध्यमांमध्ये लगेच उलटसुलट चर्चा सुरू झाली. अमेरिकेचे भवितव्य त्या देशातील तरुणांनीच घडवायचे असल्याने ते सुशिक्षित व सक्षम असणे आवश्यक आहे. अमेरिकी विद्यार्थ्यांना अधिक उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी त्या देशांतील विशिष्ट हायस्कूल्समध्ये शिकविला जाणारा पाठय़क्रम, शिक्षणतंत्र यांच्यात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी अमेरिकी शिक्षण खाते, कामगार खाते यांच्या संयुक्त प्रयत्नांतून काही नव्या योजना अमलात आणल्या जातील. त्याकरिता 100 दशलक्ष डॉलरचे अनुदान ओबामा सरकारने मंजूर केले आहे. अमेरिकेतील शालेय स्तरापासून ते पदव्युत्तर शिक्षणाचा दर्जा हा कोणत्याही देशापेक्षा उच्चच असल्याने तेथे मोठय़ा प्रमाणावर अन्य देशांतून विद्यार्थी शिकायला येतात. मात्र याच शिक्षणपद्धतीचा मूळ अमेरिकी विद्यार्थी नीट फायदा करून घेत नाहीत. त्यामुळे अमेरिकी विद्यार्थ्यांमध्ये उच्चशिक्षित असण्याचे प्रमाण गेल्या दोन दशकांपासून सातत्याने घसरत आहे. नेमके याच स्थितीमुळे ओबामा चिंतित झाले आहेत. उच्चशिक्षणामध्ये अमेरिकी विद्यार्थ्यांची जी पिछेहाट झाली, त्यामुळे त्यांच्या एकंदर प्रगतीला खीळ बसली आहे. यामुळेच अमेरिकेत विज्ञान-तंत्रज्ञान, व्यवस्थापन, माहितीशास्त्र अशा कित्येक क्षेत्रांमधील महत्त्वाच्या पदांवर उच्चशिक्षित भारतीय, चिनी युवकांची वर्णी लागू शकली, हे विसरता येणार नाही. अमेरिका ही महाशक्ती असून भारत व चीन या उदयोन्मुख महाशक्ती म्हणून पुढे येत आहेत. भारत अमेरिकेवर मात करण्यासाठी फारसा आग्रही नाही; मात्र चीन प्रत्येक क्षेत्रात अमेरिकेवर कुरघोडी करण्याचा हरघडी प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील उत्तम शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी चिनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात त्या देशात पाठवायचे व आधुनिकतेचे सारे प्रवाह जितक्या जलदीने चीनमध्ये आणता येतील तितके आणून अमेरिकेला तगडी स्पर्धा निर्माण करायची, हे चीनचे छुपे धोरण आहे. अमेरिकी राज्यकर्ते हा चिनी कावा ओळखत असल्यानेच ओबामा यांनी अत्यंत वेगळ्या शब्दांत अमेरिकी विद्यार्थ्यांना या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. अमेरिकेची ही बाजू समजावून घेतल्यानंतर आता भारतीय व चिनी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेला जाऊन शिकण्यादरम्यान जी चढाओढ चालते, त्या बाबीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाल्याने 2012-13च्या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत जाऊन शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रमाणात 3.5 टक्के इतकी घट झाली होती. गेली तीन वर्षे ही घसरण सुरू आहे. 2012-13 या शैक्षणिक वर्षात 96,754 भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिकत होते. 2001-02 ते 2008-09 या कालावधीत अमेरिकेत शिकायला येणाऱया विदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाण भारतीय युवकांचे असायचे. मात्र आता भारताला मागे हटवून चीनने गेल्या चार वर्षांत या संदर्भात पहिला क्रमांक पटकावला आहे. भारत दुसऱया क्रमांकावर ढकलला गेला असला तरी अमेरिकेत शिकायला येणाऱया चिनी विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थी हेच आपले तगडे स्पर्धक आहेत, असे वाटत असते. मूळ अमेरिकी विद्यार्थी आपल्याशी स्पर्धा करू शकतील इतके सक्षम नाहीत, अशी भावना अमेरिकेतील चिनी विद्यार्थ्यांची झालेली आहे. अमेरिकेत चीन, भारतापाठोपाठ दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यात मेख अशी आहे की, अमेरिकेतील चिनी विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे, तर भारत व दक्षिण कोरियाच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. 2012-2013 या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत 8 लाख 19 हजार 644 विदेशी विद्यार्थी शिकायला आले होते. 2013-14 या शैक्षणिक वर्षात हा आकडा आणखी वाढला आहे. चीनमधून 2 लाख 35 हजार विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी आलेल्या चिनी विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतूनही अन्य देशांत विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असतात. सध्या विविध देशांत जाऊन शिकणाऱया अशा अमेरिकी विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 83 हजार इतकी आहे. भारतातून विदेशांत आपल्या मुलाला पाठविण्यासाठी पालकांचा अग्रक्रम अमेरिकेला असतोच; पण त्याच्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांनाही पसंती दिली जाते. ब्रिटनमध्ये शिकायला आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या तिप्पट आहे. ऑस्ट्रेलियापेक्षा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण पाचपट आहे. भारत व चीनमध्ये मजुरी दर कमी असल्याने अमेरिकी कंपन्या आपल्या कामांचे या देशांमध्ये गेल्या दोन दशकांपासून मोठय़ा प्रमाणावर आऊटसोर्सिंग करत होत्या. त्यामुळे अमेरिकेतील स्थानिक लोकांच्या रोजगारांच्या संधींमध्ये घट झाली होती व बेकारीचे प्रमाणही वाढले होते. त्यात भर म्हणून अमेरिकेतील उच्चपदांवरही भारत, चीनसह अनेक विदेशी उमेदवारांची मोठय़ा प्रमाणावर वर्णी लागत असल्याने अमेरिकी युवकांमध्ये विदेशी नागरिकांविरोधात असंतोष वाढत होता. स्थानिक विरुद्ध परदेशी असे या संघर्षाचे स्वरूप होते. ही भावना नेमकेपणाने हेरून ओबामा यांनी कामाचे आऊटसोर्सिंग करणाऱया अमेरिकी कंपन्यांवर काही बंधने आणली व अमेरिकी युवकांचा असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा उपाय तात्कालिक आहे, याची जाणीव असलेल्या ओबामा यांनी आता जागतिक स्पर्धेत मागे पडलेल्या अमेरिकी युवकांचे कान टोचायचे ठरविले आहे. त्याची झलक त्यांनी मेरीलँड येथे केलेल्या भाषणातून दिसली. अमेरिका जगातील सर्वात बलाढय़ राष्ट्र आहे, असा विचार करून तेथील युवा पिढी बेसावध राहिली तर अमेरिकेच्या स्पर्धक देशांचे काम त्यामुळे अधिकच सुकर होईल. नेमकी याच परिस्थितीची टोचणी मूळ अमेरिकी विद्यार्थ्यांना ओबामा देऊ इच्छित होते. भारत व चीननेही ओबामांचे वक्तव्य गंभीरपणे घेऊन अमेरिकेत शिकायला गेलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
------

No comments:

Post a Comment