महाराष्ट्र राज्य
पाठ्यपुस्तक मंडळ निर्मिती मंडळ व माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यात पाठ्यपुस्तक
निर्मितीसंदर्भात सुसंवादी कारभार होत नसल्याने ९वी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची
छपाई १९९४च्या जून महिन्यापर्यंत पूर्ण झाली नव्हती. तसेच पाठ्यपुस्तक निर्मिती
मंडळाच्या अधिकृत वितरकांचा वितरणाबाबत चालू असलेला घोळ त्याला कारणीभूत होता.
त्या वस्तुस्थितीवर प्रकाश पाडणारी बातमी मी दैनिक नवशक्तीमध्ये १६ जून १९९४ रोजी
लिहिली होती. या बातमीची जेपीजी फाईल वर दिली आहे.
`पापुमं’चे रडगाणे अखेर कायम!
९ वीच्या पुस्तकांची
छपाई सुरुच
- समीर परांजपे
- paranjapesamir@gmail.com
महाराष्ट्र राज्य
पाठ्यपुस्तक मंडळ निर्मिती मंडळ व माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यात पाठ्यपुस्तक
निर्मितीसंदर्भात सुसंवादी कारभार होत नसल्याने ९वी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची
छपाई अद्याप पूर्ण झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. तसेच पाठ्यपुस्तक
निर्मिती मंडळाच्या अधिकृत वितरकांचा वितरणाबाबत चालू असलेला घोळही यंदा सुरुच
राहिल्याने मुंबईतील अनेक विक्रेत्यांकडे इतर इयत्तांची बरीच पुस्तके विक्रीसाठी
आलेलीच नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
महाराष्ट्र राज्य
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतची पाठ्यपुस्तके
लेखकांकडून लिहून घेऊन ती छापण्याचे काम आहे. इ. ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विविध
विषयांची पुस्तके मात्र माध्यमिक शिक्षण मंडळ विविध लेखकांकडून लिहून घेते व ती
छापण्याचे काम पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ करते. या कार्यविभागणीमुळेच यंदा इ.
९वीची पाठ्यपुस्तके वेळेवर बाजारात येऊ शकलेली नाहीत. माध्यमिक शिक्षण मंडळाने इ.
९वीची इंग्लिश व मराठी माध्यमासहित एकूण आठ भाषांतील पाठ्यपुस्तकांतील अभ्यासक्रम
गेल्या वर्षी बदलला आहे. त्या बदललेल्या अभ्यासक्रमानूसार १९९३च्या आँगस्ट
महिन्यापर्यंत ही ८ भाषांतील सर्व विषयांची पुस्तके पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु
१९९३च्या डिसेंबर महिन्यामध्ये माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लेखकांनी इ. ९वीची
पाठ्यपुस्तके नव्या अभ्यासक्रमानूसार लिहून छपाईसाठी पाठ्यपुस्तक निर्मिती
मंडळाकडे सोपविली. डिसेंबरपासून या पाठ्यपुस्तकांच्या छपाईला सुरुवात झाली होती.
या पुस्तकांच्या मजकूरात आयत्यावेळी अनेक बदल केले गेल्याने यावर्षीच्या
फेब्रुवारी महिन्यात शेवटपर्यंत इ. ९वीच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम पूर्ण
करण्याचे निर्धारित लक्ष्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला पूरे करता आले नाही.
जुलैपर्यंत देणार
आता इयत्ता ९वीची
सर्व पुस्तके छपाई चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करुन ती बाजारात विक्रीस
आणण्याचा मनसुबा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या वरिष्ठ
अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
अनेक पुस्तके
बेपत्ता
इ. ९वीच्या
पाठ्यपुस्तकांचा अपवाद करता इतर इयत्तांचीही पुस्तके बाजारात उपलब्ध नसल्याची
तक्रार काही पुस्तकविक्रेत्यांनी या प्रतिनिधीकडे केली. मुंबईतील दादर पश्चिम
येथील आयडियल बुक स्टाँलचे कांताशेठ नेरुरकर यांनी सांगितले की, त्यांच्याकडे
सहावी, पाचवीच्या मराठी, हिंदी, गणित या विषयांची पाठ्यपुस्तके विक्रीसाठी आलेलीच
नाहीत. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे महाराष्ट्रात एकूण चार हजार वितरक
आहेत. मुंबईसाठी अपना बाजार व मंडळाचा मुख्य डेपो असे दोन मुख्य वितरक आहेत. वितरक
व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांच्यामध्ये प्रत्येक पुस्तकाच्या प्रतीमागे १५ की
२० टक्के कमिशन घ्यावे यासाठी वाद सुरु असल्याचे कळते. या वादाच्या परिणामी काही
वितरकांनी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची पुस्तके वितरित करण्याचे थांबविले
असल्याचेही खात्रीलायकरित्या कळते.
विलंब कशासाठी?
यंदाच्या वर्षी
पहिली, सहावी, नववी, अकरावी या इयत्तांचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलण्यात आल्याने व
नवी पाठ्यपुस्तके छापण्यास विलंब झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मात्र अतोनात हाल
होत आहेत. दरवर्षी पाठ्यपुस्तक मंडळ सुमारे आठ कोटी पाठ्यपुस्तकांच्या प्रती छापून
एकुण ६५ कोटी रुपयांची उलाढाल करते. पण यंदा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने विविध
पुस्तकांच्या साडेपाच कोटी प्रती छापून त्या वितरित केल्या आहेत. म्हणजे निव्वळ ६०
टक्के छपाईकामच झालेले आहे. त्यातच यंदा इयत्ता ८वी करिता फ्रेंच, रशियन, पर्शियन,
जर्मन या चार विदेशी भाषांची पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमात नव्याने लावण्यात आली
आहेत. त्या विषयांच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे अतिरिक्त कामही पाठ्यपुस्तक
निर्मिती मंडळाला करावे लागले. माध्यमिक शिक्षण मंडळाने ठरलेल्या मुदतीत ही सर्व
पाठ्यपुस्तके लिहून न दिल्याने आजचा बाका प्रसंग ओढविला आहे.
No comments:
Post a Comment