मृत्यू हा किती
वेदनादायी ठरु शकतो, याचे प्रत्यंतर पिनॅकल क्लबची बालगिर्यारोहक जोरी भालेराव
हिच्या अवेळी जाण्याने आले. तिच्या आठवणी सांगणारा हा लेख मी दै. सामनामध्ये २
जुलै २००० रोजी लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
चिमुकल्या जोरीचे
अवेळी जाणे...
- समीर परांजपे
-
मृत्यू हा किती
वेदनादायी ठरु शकतो, याचे प्रत्यंतर पिनॅकल क्लबची बालगिर्यारोहक जोरी भालेराव
हिच्या अवेळी जाण्याने आले. जोरी ही आपल्यासारखीच मध्यमवर्गीय घरात उमलणारी मुलगी,
पण भालेरावांच्या घराने वेगळाच वसा घेतलेला आहे. या कुटुंबाला अशी समाजकार्याची
जोड आहे, तसेच गिर्यारोहण या साहसी क्षेत्राविषयी असीम अशी श्रद्धा आहे.
जोरीचे वडील विजय
भालेराव हे गिर्यारोहण क्षेत्रातील एक उत्कृष्ट छायाचित्रकार
सह्याद्री-हिमालयाच्या कडेकपार्यांत मनमुराद भटकून विजय भालेरावांनी आपला
गिर्यारोहणाचा छंद जोपासला. हिमालयातले `जोरी’ हे शिखरही त्यांनी पादाक्रांत केलेले होते.
आपल्या या विक्रमाची आठवण जपावी म्हणून आपल्या पहिल्या मुलीचे नाव त्यांनी `जोरी’ असेच ठेवले.
गिर्यारोहणाचा असा
वारसा घेऊन जोरी दिसामासी वाढू लागली. वयाच्या ६व्या वर्षीच पिनॅकल क्लबतर्फे
किल्ले रायगडावरच्या टकमक टोकावरुन आयोजिण्यात येणार्या रॅपलिंगच्या कार्यक्रमात
जोरी भालेराव सहभागी झाली होती. प्रथम रॅपलिंग करताना जोरी अजिबात घाबरलेली
नव्हती. दरवर्षी जेव्हा टकमक रॅपलिंगचा कार्यक्रम होतो तेव्हा जोरीचे रॅपलिंग हा
तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा आकर्षणाचा विषय असे. टकमक रॅपलिंग करताना, कड्याची
खोली पाहून लहानापासून मोठ्यापर्यंत कोणीही घाबरण्याची शक्यता असते. जोरी भालेराव
अशा लोकांचे दिल मजबूत करण्यासाठी भक्कम आधार बनत असे. तिच्यासारखी लहान मुलगी हसत
खेळत रॅपलिंग करताना बघून मनात धास्तावलेले मन हिंमत करुन टकमक टोकावरुन उतरत असत.
जोरीचे व्यक्तिमत्व आश्वासक होते. तिच्या डोळ्यांत नेहमी आनंद फुललेला असायचा.
जोरीला लहानपणापासून
पावसाचे तिला अतिशय वेड. निसर्गाच्या सान्निध्यात पावसाचे सपकारे अंगावर घेताना
तिला फार आनंद व्हायचा. मुंबईजवळचे अनेक छोटे-मोठे ट्रेक्स तिने आपल्या
वडिलांबरोबर केलेले होते. कर्जत-कसाराजवळील किल्ले, दर्याखोर्या येथील पदभ्रमण जोरीला
नावीन्याचे राहिलेले नव्हते. तिची दृष्टी नव्या क्षितिजाचा वेध घेत होती. टकमक
रॅपलिंग करताना तिचे गिर्यारोहणातील कौशल्य पिनॅकल क्लब या गिर्यारोहण संस्थेच्या
राजन घाटगे व महिबुब मुजावर या निष्णात
गिर्यारोहकांनी नजरेने टिपले. जोरी ही बारीक चणीची होती. वजन कमी होते. तिच्या
हालचाली चपळ होत्या. जोरीला गिर्यारोहणाचे अधिक शास्त्रशुद्ध शिक्षण द्यायचेच हे
दोघांच्याही मनाने घेतले होते.
घाडगे व महिबूबच्या
मार्गदर्शनाखाली जोरीने आर्टिफिशियल क्लायबिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली
होती. दीड-दोन वर्षांपूर्वी राजस्थानातील बिकानेर येथे झालेल्या राष्ट्रीय
पातळीवरील आर्टिफिशियल क्लायबिंग स्पर्धेत जोरी भालेराव हिने चौथा क्रमांक
पटकाविला होता. जोरी वयाने लहान व ताकदीने कमी होती. या स्पर्धेत चाळीस फुटी वाँलवर
१५-१६ फुट उंचीवर ओव्हरहँगला जोरी ताकद कमी पडल्यानेच अडकली. सुमारे वीस मिनिटे
तिने चिवटपणे झुंज दिली. पण स्पर्धा संचालकांच्या आदेशामुळे जोरीला वाँल चढून
जाण्याचा प्रयत्न शेवटी अर्धवट सोडून द्यावा लागला.
हा प्रसंग आहे तसा
छोटा पण त्यात जोरीची जिद्द दिसते. गिर्यारोहण क्षेत्रामध्ये बच्छेंद्री पाल,
शरावती प्रभू, संतोष यादव या महिला गिर्यारोहकांनी सुवर्ण कामगिरी करुन ठेवली आहे.
जोरी ही देखील त्याच मार्गाने वाटचाल करीत होती. आर्टिफिशियल क्लायबिंगमध्ये जोरी
आणखी काही वर्षांत स्वयंतेजाने तळपू लागली असती, ही भावना फक्त पिनॅकल क्लबचीच
नव्हती तर जोरी भालेरावचे गिर्यारोहण ज्यांनी पाहिले आहे त्यांचे मन त्यांना हेच
सांगत होते.
जोरी अभ्यासतही
हुषार होती. शिवाय नृत्य, अभिनय या कलांमध्येही वाकबगार होती. एका चित्रमालिकेत
तिने कामही केलेले होते. जोरी ही कॅम्प फायर स्पेशालिस्ट होती. विविध गाणी तसेच
व्यक्तींच्या हुबेहुब नकला करुन ती कॅम्प फायरमध्ये जान आणायची. वडिलांनी दिलेले
खाऊचे पैसे गरीब मुलांत वाटून टाकायची. आपल्याकडे जे जे म्हणून चांगले आहे ते
सर्वांमध्ये वाटून टाकण्याचाच तिचा स्वभाव होता.
जोरी भालेराव या
आनंदी फुलपाखराची अखेर मात्र अकस्मात झाली. मलेरिया फाँल्सिफेरम नावाचा ताप तिच्या
शरीरात कलीप्रमाणे शिरला. सायन रुग्णालयात जोरीवर उपचार सुरु होते. कधी तिची
प्रकृती गंभीर होत असे तर कधी आश्वासक वाटत असे. काळाशी चाललेली ही अविरत झुंज १४
जून २०००च्या रात्री दीड वाजता संपली. त्या क्रूर काळाने जोरीला तिच्या
दद्दू-मम्मीपासून, सर्व मित्रांपासून लांब ओढून नेले. पिनॅकल क्लबने अलीकडेच
जोरीला पूर्ण सदस्यत्व बहाल केले होते. इतकी ही चिमुरडी गिर्यारोहणात मॅच्युअर्ड
होती.
भालेराव कुटुंब
चेंबुरच्या ज्या शेल काँलनीत राहाते तेथे १५ जून २००० रोजी दुपारी जोरी भालेरावची
भव्य अंतिम यात्रा निघाली. भालेरावांच्या गिर्यारोहक मित्रपरिवाराला हुंदके आवरता
आले नाहीत. एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे सुरेंद्र चव्हाण, नेचर लव्हर्स, भरारी व
अनेक गिर्यारोहक संस्थांच्या प्रतिनिधींच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू
लागल्या होत्या. एका निरागस बालिकेला वाहिलेली ही मुक श्रद्धांजली होती. जोरीचे वय
वर्षे १३ हे काही अनंतकाळच्या प्रवासाला जाण्याचे वय नव्हते. १५ जून २०००च्या
संध्याकाळी पिनॅकल क्लबच्या वतीने दादर येथील छबिलदास शाळेत जोरी भालेरावला
श्रद्धांजली वाहण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनुभवी
गिर्यारोहक अतुल कुलकर्णी, युवा संस्थेची दिपाली शिंदे, नेचर लव्हर्सचे देवरुखकर,
छत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप केळकर, इतिहासाचे अभ्यासक आप्पा परब, पिनॅकल
क्लबचे अध्यक्ष विनायक वेंगुर्लेकर यांनी जोरीच्या विविध आठवणी सांगितल्या. एका
बालगिर्यारोहकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमण्याचा प्रसंग सर्वांनीच हृद्यावर दगड
ठेवून निभावून नेला.
जोरी भालेरावच्या
स्मृती आता आपल्यासोबत आहेत, पण तिची स्मृती चिरंतन जपण्यासाठी पिनॅकल क्लबने
उमेदीच्या गिर्यारोहकांना एखादी शिष्यवृत्ती किंवा पुरस्कार जाहीर करावा, अशी
भावना व्यक्त होत आहे. चिमुकल्या पावलांतील गिर्यारोहणाचे तुफान आता थंडावले आहे
अशी प्रतिक्रिया एका गिर्यारोहक मित्राने जोरीच्या अवेळी जाण्यावर व्यक्त केली. ही
प्रतिक्रिया अक्षरश: खरी आहे. जोरी तू खरचं आमच्यासाठी स्फूर्तीचा
झरा आहेस!
No comments:
Post a Comment