Sunday, April 13, 2014

कावळे नामशेष होतायत... ( दैनिक सामना - २५ आँगस्ट २००२)




गेल्या काही वर्षांपासून नागरी जीवनात विषारी औषधांचा अतिवापर सुरु आहे. विषारी द्रव्ये वापरल्यामुळे जे कीटक, उंदीर, सरपटणारे प्राणी मरतात, त्यांचे मृतदेह कावळ्यांच्या खाण्यात आले की, तेही मृत्यूमुखी पडतात. जगले-वाचलेले कावळे प्रजोत्पत्ती करु शकत नाहीत. त्याच्याच परिणामी शहरे आणि खेडेगावांतूनही कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत चालली आहे. या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारा लेख मी दैनिक सामनामध्ये २५ आँगस्ट २००२ रोजी लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.

कावळे नामशेष होतायत...


-   -  समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com


गावाकडील मृत कीटक, सरपटणार्या आणि कुरतडणार्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन कावळे `घाण नष्ट करण्यात नगरपालिकांना एक प्रकारे सहाय्यच करीत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून नागरी जीवनात विषारी औषधांचा अतिवापर सुरु आहे. विषारी द्रव्ये वापरल्यामुळे जे कीटक, उंदीर, सरपटणारे प्राणी मरतात, त्यांचे मृतदेह कावळ्यांच्या खाण्यात आले की, तेही मृत्यूमुखी पडतात. जगले-वाचलेले कावळे प्रजोत्पत्ती करु शकत नाहीत. त्याच्याच परिणामी शहरे आणि खेडेगावांतूनही कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत चालली आहे.
प्रसिद्ध अरण्ययात्री व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी गेले अर्धशतक पक्ष्यांचा विविधांगी अभ्यास केला. कावळ्यांच्या होत असलेल्या र्हासाविषयी चितमपल्ली यांनी नोंदविलेली निरीक्षणे चिंताजनक आहेत. पक्षीगणांमध्ये कावळ्याला पूर्ण पक्षी म्हटले जाते. अनेक ऋतुंमध्ये तो माणसाबरोबर जगत असतो. देशात सामान्यपणे सर्वत्र आढळणार्या कावळा या पक्षाची निवड पाऊस व हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी केली होती.
कावळे आपली घरटी उन्हाळ्यात बांधतात पण पाऊस येण्याच्या थोडे अगोदर. त्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरुन पाऊस व हवामानाचा अंदाज बांधता येतो. वराहमिहिर, पराशर, गार्ग्य, नारद या विज्ञाननिष्ठ पूर्वाचार्यांनी कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरुन पावसाचा अंदाज दिलेला आहे. यासंदर्भात त्यांनी कावळ्याच्या संबंधाने तीन घटकांचा विचार केला.
(अ) आंबा, पिंपळ, निंब, करंज, अर्जुन या झाडांवर कावळ्यांनी घरटी केली की चांगला पाऊस पडतो. बाभुळ, बोर, खैर, सावर या काटेरी झाडांवर घरटी केली तर अवर्षण पडते.
(ब) कावळ्यांनी पूर्व उत्तर, ईशान्य, नैऋत्य, वायव्यया दिशांना झाडांवर घरटी केली तर पाऊस चांगला पडतो, तर पश्चिम, दक्षिण, आग्नेय आणि वृक्षांच्या मध्यभागी घरटी केली तर पाऊस कमी पडतो
(क) तिसर्या घटकात कावळ्यांनी घरट्यात घातलेल्या अंड्यांचा विचार केला आहे. तीन ते चार अंडी घातली तर चांगली वृष्टी होते, कावळ्याने एक अंड घातले की अवर्षण होते.
या तिन्ही घटकांची पडताळणी करण्यासाठी १९९४च्या उन्हाळ्यात कावळ्यांच्या घरट्यांचे निरीक्षण महाराष्ट्रातील पक्षीमित्रांच्या सहाय्याने करण्यात आले. त्या तपासणीतील निष्कर्षाची माहिती देताना मारुती चितमपल्ली यांनी म्हटले आहे की, १९९४ साली महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा असे कावळ्यांच्या घरट्यांची स्थिती पाहून वाटले होते. त्यावर्षी खरोखरच चांगला पाऊस पडला. मराठवाड्यातील भूकंपग्रस्त लातूर भागातील कावळे लुप्त झाले होते. त्यामुळे लातूर भाग अजूनही नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित नाही असा निष्कर्ष काढण्यात आला. गडचिरोली भागात अजिबात कावळे दिसत नाहीत. ही लक्षणे चांगली नाहीत असा एक निष्कर्ष होता.
`गुढमैथुन धार्ष्ट्ये च काले चालयसंग्रहम् अप्रमादमनालस्यं पज्व शिक्षेत वायसात् म्हणजे गुप्तरितीने संभोग, धीटपणा, योग्य वेळी घरटे करणे, नेहमी सावध असणे, आळस नसणे या पाच बाबींचे ग्रहण कावळ्यापासून माणसाने करावे असे म्हटले जाते. अशा उपयुक्त कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत हा पक्षी हळुहळू लुप्त होणे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. कावळ्याबरोबर आणखी एक पक्षीकुल नष्ट होईल ते म्हणजे गोड गळ्याने गाणार्या कोकिळचे. कारण कोकिळेची अंडी कावळे उबवितात!

No comments:

Post a Comment